काळ तर मोठा कठीण आला…

– विजय चोरमारे

गेल्या दोन दिवसांत अनेक विषयांची सरमिसळ करून वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. त्यातून परिस्थितीचे नीट आकलन होण्याऐवजी गुंतागुंत वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि एखाद्या वाक्यात प्रतिक्रिया देण्यामुळं भूमिका स्पष्ट होत नाही त्यामुळं मुद्दाम हे लिहित आहे. प्रसारमाध्यमांच्यादृष्टिनेही कसोटीच्या असलेल्या या काळात आपण कुठे होतो याचीही त्यानिमित्ताने नोंद व्हावी किमान आपल्यासाठी एवढाच हेतू आहे.


एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना झालेली अटक ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. काल मुंबईत वांद्रे स्थानकावर जी गर्दी जमली त्यासाठी एबीपी माझाची ट्रेन सुरू होणार असल्यासंदर्भातील बातमी कारणीभूत असल्याच्या आरोपावरून ही कारवाई झाली आहे. अत्यंत संवेदनशील काळात जो गोंधळ झाला त्यामुळे महाराष्ट्र सरकारही हबकून गेले, अशा परिस्थितीत आपण कठोर पावले उचलत आहोत, हे दाखवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून केलेली कारवाई यापलीकडे त्याला फारसा अर्थ नाही. माझ्या आकलनानुसार ज्या कारणासाठी राहुल कुलकर्णीला अटक केली आहे, त्याच कारणासाठी विनय दुबेला अटक झाली आहे. तसे असेल तर यातील एकाची अटक चुकीची आहे. अर्थात राहुल कुलकर्णीची अटक चुकीची आहे, हे मी ठामपणे म्हणू शकतो.

एबीपी माझाची बातमी आणि त्यासंदर्भातील वस्तुस्थिती संपादक राजीव खांडेकर यांनी स्पष्ट केली आहे. विशेष रेल्वे सोडण्याची बातमी सकाळी नऊ वाजता दाखवली. अकरानंतर तर कोणत्याही ट्रेन सुरू होणार नसल्याची बातमी दिली. त्यामुळे या बातमीमुळे गोंधळ झाला हे म्हणणे पटणारे नाही. आजच्या एकूण वृत्तवाहिन्यांमधील बातम्यांच्या आशयाचे सपाटीकरण आणि सुमारीकरण होत असल्याच्या काळात राहुल कुलकर्णी यांच्यासारख्या पत्रकारामुळे महाराष्ट्राचे काही वेगळे वार्तांकन पाहायला मिळत असते. ते संवेदनशील आणि उत्तम राजकीय, सामाजिक आकलन असलेले पत्रकार आहेत. कुठल्याही एका व्यक्तिच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला मान्य असायला पाहिजे असे नाही. अनेकदा काही गोष्टी स्वतःच्याही मनाविरुद्ध कराव्या लागण्याचा हा काळ आहे. अशा काळात राहुल कुलकर्णी आणि एबीपी माझाच्या कव्हरेजसंदर्भात अनेक मतभेद असू शकतात. परंतु एखाद्या पत्रकाराच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठिशी उभे राहणे हे मला माझे कर्तव्य वाटते.

वर्तमानातील एखाद्या गंभीर विषयासंदर्भात काही महत्त्वाची घडामोड होणार असल्याची बातमी समजल्यावर आणि त्याच्या पुष्ट्यर्थ अधिकृत कागद मिळाल्यानंतर एक्साईट झाला नाही, तर तो रिपोर्टर असू शकत नाही. त्यातून ट्रेनशी संबंधित बातमी दिली गेली असावी. त्यासंदर्भात अधिक खातरजमा करणे शक्य होते. दुर्दैवाने ते झाले नाही त्यामुळेच पुढचे सगळे रामायण घडले. वांद्र्यात जे लोक जमले होते तो वर्ग ‘टीव्ही नाइन’ ‘भारतवर्ष’, ‘रिपब्लिक भारत’, ‘इंडिया टीव्ही’, ‘सुदर्शन’ वगैरे वृत्तवाहिन्या पाहणारा वर्ग होता. तो ‘एबीपी माझा’ची बातमी पाहून आला असे म्हणणे म्हणजे म्हणजे टार्गेट ठरवून मत बनवल्यासारखे आहे. वांद्र्यात जी गर्दी जमवली ती नियोजनबद्धरितीने जमवण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. लोक जमले होते ती जागाही विशिष्ट हेतू ठेवून निवडण्यात आली असावी. रजत शर्मा यांच्यासारख्या पत्रकारानेही, मशिदीसमोर गर्दी जमल्याचे जे ट्विट केले, त्यावरून संबंधितांचे हेतू स्पष्ट होतात. पोलिसांनी या गोष्टीच्या मुळाशी जायला हवे. ते षड् यंत्र रचणारे कोण आहेत ते शोधून त्यांना बेड्या ठोकायला पाहिजेत. केवळ सरकार काहीतरी करते आहे हे दाखवण्यासाठी वरवरची कारवाई पुरेशी ठरणार नाही.


दुसरा मुद्दा आहे स्थलांतरित मजुरांचा. तीन आठवड्यांपासून अधिक काळ हे मजूर ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. ज्यांना संधी मिळाली आणि शक्य झाले त्यांनी पायी, सायकलने असा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून गाव गाठले. ते सुटले. बाकीचे नरकयातनांमध्ये अडकले. २४ तारखेला टाळेबंदीची घोषणा झाल्यानंतर दिल्लीत उद्रेक झाला. मुंबईत त्यावेळी तो झाला नाही. परंतु परवा वांद्रे येथे लोक जमले त्याची कारणे काहीही असली तरी तो तळातल्या घटकांचा उद्रेक होता, हे आपण समजून घेणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे. अडकून पडलेल्या लोकांसाठीची व्यवस्था फार वाईट असल्याचे ठिकठिकाणचे अहवाल आहेत. लोकांना दोनवेळेला नीट खायला मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत कुठल्यातरी शाळेत, मोठ्या हॉलमध्ये लोकांना ठेवले आहे. तिथे ना पंख्यांची व्यवस्था. ना पाण्याची व्यवस्था. ना नीट स्वच्छतागृहांची व्यवस्था. ठिकठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी लोक अडकले आहेत, तसेच हजारो लोक मुंबईत अड़कले आहेत. ते जसे परराज्यांतील आहेत, तसेच महाराष्ट्रातील आहेत. जे लोक घरात पंख्यांखाली पाककलेची प्रात्यक्षिके आणि गाण्याचे व्हिडिओ बनवत बसलेत ते शहाजोगपणे सांगताहेत की लोकांनी आहे तिथेच थांबणे सर्वांच्या हिताचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही सुरुवातीपासून तेच सांगत आहेत. वैद्यकीय आघाडीवर महाराष्ट्र सरकार नियोजनबद्ध रितीने काम करते असले तरी लोकांच्या व्यवस्थेच्या आघाडीवरची परिस्थिती निराशाजनक आणि वाईट आहे, हे स्पष्टपणे नमूद करायला हवे. केवळ दोन वेळचे खायला दिले म्हणजे लोकांची सोय केली आणि आपली जबाबदारी संपली असे होत नाही. माणूस म्हणून जगण्यासाठी त्यापलीकडे काही हवे असते. फुकटचे खायला मिळत असूनही उगाच लोक भिंतीवरून उड्या मारून शेकडो किलोमीटर धावत, चालत जाण्याचे धाडस करीत नाहीत.
ज्यांना कुणाला वाटतं ना की, लोकांनी आहे तिथंच थांबावं त्यांच्यासाठी केशव मेश्राम यांच्या कवितेच्या ओळी आठवतात.

एक दिवस मी परमेश्वराला
आईवरून शिवी दिली
तो लेकाचा फक्कन हसला.
म्हटलं, साल्या तुकडाभर भाकरीसाठी
गाडीभर लाकडं फोडशील काय?

तर ज्याला कुणाला वाटतं ना की, लोकांनी तिथंच थांबावं त्यांनी एकवेळ धारावीतल्या सार्वजनिक शौचालयात विधी करून दाखवावा नाहीतर दुपारच्या उन्हात कुठल्याही मोबाइल टॉयलेटमध्ये बसून दाखवावं.

व्यवस्थेपुढं माणसांमाणसांमध्ये कसा भेद असतो बघा. सरकारनं परदेशातल्या लोकांना विमानानं आणलं आणि त्यांनी आणलेल्या रोगासाठी इथल्या कष्टकरी लोकांना खुराड्यांत कोंडून ठेवलं. स्थलांतरित मजूर आणि धार्मिक पर्यटक वेगवेगळे असतात हे गुजरात सरकारनं दाखवून दिलं. टाळेबंदी २४ मार्चला जाहीर झाल्यानंतर गुजरातचे १८०० पर्यटक हरिद्वारमध्ये अडकले होते. गुजरात सरकारने २८ बसेसमधून २८ मार्चला त्यांना गुजरातमध्ये आणलं. सुरत, बडोदा, राजकोट, भावनगर, जामनगर आणि खेडा या जिल्ह्यांतील हे यात्रेकरू होते. म्हणजे गुजरातने आपले बाहेर अडकलेले लोक आणले. उत्तरप्रदेश सरकारने दिल्लीत अडकलेल्या आपल्या हजारो लोकांसाठी शेकडो बसेस पाठवल्या. महाराष्ट्र सरकारने मात्र पुण्या-मुंबईत अडकलेल्या आपल्या लोकांसाठी अशी काही सुविधा केली नाही. ते लोक अजूनही अडकून पडले आहेत. या गोष्टीचीही नीट नोंद करायला हवी.


वांद्रे येथील घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते ज्या रितीने प्रतिक्रिया देऊ लागले ते आश्चर्यकारक होते. वांद्रे येथील गर्दी हे महाराष्ट्र सरकारविरोधातील षड्.यंत्र असल्याची शंका बळकट ठरणारा भाजपच्या नेत्यांचा एकूण उत्साह होता. स्थलांतरित मजुरांचे जे हाल होत आहेत, त्याला खरेतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक जाहीर केलेली टाळेबंदी कारणीभूत आहे. एकूणच करोनाच्या काळातला भाजपच्या नेत्यांचा एकूण व्यवहार गंभीर नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी असताना सगळ्यांनी पीएम केअर्सला देणग्या दिल्या. सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसही पीएमकेअर्सला देणग्या देण्याचे आवाहन करू लागले. त्यातून त्यांची नियत दिसून येत होती. संकटाच्या मुकाबला संयुक्तपणे करण्याऐवजी कुरघोडीचे राजकारण करण्यातच हे नेते धन्यता मानत आहेत. एवढे सुमार लोक कसे काय राज्य करीत होते, याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. उद्धव ठाकरे ज्या संयमाने परिस्थितीला सामोरे जात आहेत, ते पाहून लोक आपोआप तुलना करू लागले आहेत. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी नाहीत, याबद्दल दुस-यांदा लोक मनोमन समाधान व्यक्त करीत आहेत. सीएए, एनआरसीच्या काळात महाराष्ट्र शांत राहिला त्यावेळी पहिल्यांदा आणि आता करोनाच्या संकटात दुस-यांदा. कारण महापुराच्या काळात महापुराने पश्चिम महाराष्ट्राला विळखा घातला तरी फडणवीस महाजनादेश यात्रेत व्यस्त होते, हे लोक विसरलेले नाहीत. आजही कठीण काळात ते चिरकुट मुद्द्यांचे राजकारण करीत आहेत. स्वतःला जमत नाही म्हटल्यावर राज्यपालांना हाताशी धरून कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र डोळे उघडे ठेवून बघत आहे.


टीव्हीवर धीर देणारे उद्धव ठाकरे दिसतात. भीती घालणा-या नरेंद्र मोदींच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारे उद्धव ठाकरे आश्वासक वाटतात. परंतु महाराष्ट्र आश्वस्त असण्याचे तेवढेच एक कारण नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे उत्तम काम करताहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण अशी अनुभवी मंत्र्यांची फळी त्यांच्यामागे खंबीरपणे काम करीत आहे. उद्धव ठाकरे यांच्या कृतीतून जो आत्मविश्वास दिसतो आहे, तो या अनुभवी फळीच्या बळावरचा आहे, हेही विसरून चालणार नाही.


राहुल कुलकर्णी प्रकरणावरून सगळ्याच प्रसारमाध्यमांनी धडा घेण्याची आवश्यकता आहे. एखाद्या प्रकरणावरून जेव्हा असंतोष निर्माण होतो तेव्हा तेवढेच कारण नसते. त्याआधी साचलेले बरेच काही असते. आजच्या काळात प्रादेशिक माध्यमांचे सूत्रधार कोण आहेत आणि कळसूत्री बाहुल्या कोण आहेत, हिंदी वाहिन्यांचे सूत्रधार कोण आहेत आणि राजापेक्षा राजनिष्ठ कोण आहेत हे सगळे लोकांना कळत असते. त्यातून मग हितसंबंध दुखावलेली मंडळी संधी साधतात. सध्याचा काळ सनसनाटी निर्माण करण्याचा, धार्मिक विद्वेषाच्या बातम्या पेरून टीआरपी वाढवण्याचा नाही याचे भान सगळ्यांनीच ठेवायला हवे.

(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स’ चे सहायक वरिष्ठ संपादक आहेत)

1 COMMENT

  1. चोरमारे यांचा लेख उत्तम.अतिशय balanced.चहूबाजूंनी विचार केलेला आणि करायला लावणारा.बाहेर प्रांतातील मजुरांना बसेस करून ताबडतोब त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पोचवायला हवेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here