काश्मीरची नवी ‘आशा’

-साभार-दिव्य मराठी

-अविनाश दुधे

शमीमा अख्तर… हिने गायलेलं आणि तिच्यावरच चित्रित झालेलं ‘पसायदान’ यू ट्यूब आणि इतर समाज माध्यमांतून ३५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी ऐकलं आहे . एखाद्या नॉन कमर्शियल कलाकाराला एवढा प्रचंड प्रतिसाद क्वचितच मिळतो. कोण आहे ही शमीमा? उत्तर काश्मीरच्या बंदिपोरा जिल्ह्यातील ही तरुणी. शमीमा अडीच वर्षाची होती, तेव्हा आत्याच्या मांडीवर बसून प्रवास करत असताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात आत्याचा मृत्यू झाला. ही सुदैवाने वाचली. मृत्यू म्हणजे काय, हे कळण्याचं वय नसताना तिने तो जवळून अनुभवला. त्यानंतर मृत्यूचे तांडव पाहतच ती मोठी झाली. तीच शमीमा जेव्हा भूतकाळातील अनुभवांबाबत कुठलीही कटुता न ठेवता ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो… दुरितांचे तिमिर जावो… जो जे वांछील तो ते लाहो…’ हे एका आर्ततेने गाते, तेव्हा ते शब्द उरत नाहीत. जगातील प्रत्येकाच्या कल्याणाची मंगलकामना करणाऱ्या प्रार्थनेचे ते सूर लोकांच्या हृदयाला भिडले नसते, तरच नवल होतं.

शमीमा अख्तर… हिने गायलेलं  ‘पसायदान’. नक्की ऐका – http://bit.ly/2SXMK1P

शमीमा अशी एकटी नाही. अकिब भट, जोगिंदरसिंग, मुख्तार अहमद दार, बशीर खान, रुकाया मकबूल या काश्मिरातील तरुणांनी दहशतवादाचे भीषण चटके अनुभवले आहेत. दोडा जिल्ह्यातील जोगिंदरसिंगची कहाणी तर हेलावून टाकणारी आहे. तो केवळ चार वर्षांचा असताना दहशतवाद्यांनी त्याच्या कुटुंबातील १५ लोकांची हत्या केली. बहिणीने त्याला लपवून ठेवल्याने तो कसाबसा वाचला. सर्वांची कहाणी थोड्या फार फरकाने अशीच. या सर्वांनी अगदी लहान वयात रक्त पाहिले; हत्या, बॉम्बस्फोट अनुभवले. ते आज संगीताच्या माध्यमातून शांततेचा संदेश देताहेत. ‘सरहद’ या संस्थेच्या माध्यमातून एक नवीन आयुष्य जगण्याची धडपड करणाऱ्या या तरुणांनी पुण्यात ‘गाश’ (आशा) नावाचा Music Band तयार केला आहे. काश्मिरी, हिंदी आणि अगदी मराठीत सुद्धा गाणाऱ्या या तरुणांचा हा Band अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाला आहे. यू ट्यूबवर Sarhad Music वर गेलात, की एखादा मजहर सिद्दिकी गणपती नामावली, णमोकार महामंत्र गाताना दिसतो. शमीमा पसायदानासोबत गुरुनानाकजींची पदे, तर काश्मिरी पंडित कुटुंबातील पल्लवी कौल गुरू तेजबहादूर साहेबांच्या स्मरणार्थ गाताना दिसते. ‘जन्नत- ए- कश्मीर’ या नावाने झालेले कार्यक्रमही तिथं ऐकायला मिळतात.

धर्माच्या नावावर डोके फडकावण्याचा खेळ काश्मीरसह जगभर जोरात सुरू असताना त्याला शब्द- सुरांच्या माध्यमातून विधायक उत्तर देण्याची धडपड हे तरुण करताहेत. त्याचं श्रेय ते ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार यांना देतात. त्यांच्यामुळेच आम्हाला आयुष्याचा सूर गवसतोय, अशी कृतज्ञ भावना व्यक्त करतात. सरहद आणि संजय नहार ही नावं आता महाराष्ट्राला अपरिचित नाहीत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ज्यांची आयुष्यं उजाड झाली, अशा कुटुंबातील मुलांना २००४ पासून शिक्षणासाठी ते पुण्यात घेवून येतात. त्यासाठी त्यांनी कर्जत आणि गुजरवाडीत सरहद स्कूल व कॉलेजची स्थापना केली आहे. अलीकडच्या काही वर्षांत आसाम आणि ईशान्येकडील दहशतग्रस्त राज्यातील मुलेही येथे शिकण्यासाठी आणली जात आहेत. त्यांच्या स्वत:च्या घरात दहा काश्मिरी तरुण राहतात.

२००४ मध्ये लहान मुलं म्हणून आलेल्या अनेक मुलांनी आता पदवी प्राप्त केली आहे. ‘सरहद’च्या प्रयत्नांमुळे अनेकांना देशाच्या विविध भागांत नोकरी, रोजगार प्राप्त झाला आहे. या प्रयत्नांमुळे नहार मुस्लिम आणि हिंदू अशा दोन्ही धर्मातील कट्टरपंथीयांच्या ‘हिटलिस्ट’वर आहेत. मुस्लिम दहशतवादी त्यांना भारत सरकार व लष्कराचे एजंट समजतात. दुसरीकडे, काश्मिरात राहणारे सारे दहशतवादीच असतात, अशी वेडगळ समजूत बाळगणाऱ्या अतिरेकी हिंदू संघटनाही त्यांना धमक्या देत असतात. मात्र, कुठलाही वाद-विवाद न करता नहार शांतपणे आपलं काम करतात. शब्दांपेक्षा कृती अधिक आश्वासक असते, हे ते मानतात. आज त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे काश्मिरींचा, तेथील शासकीय अधिकाऱ्यांचा, अगदी ‘हुरियत’सारख्या संघटनांचाही विश्वास त्यांनी संपादन केला आहे. ३७० कलम रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था आणि उद्योग समूहांनी काश्मीरमध्ये जावं, तेथील तरुणांना उत्तम शिक्षण व रोजगार उपलब्ध करून द्यावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यात गेलात तर संजय नहार यांना भेटून ‘सरहद’ची माहिती घ्यायला विसरू नका.

शमीमा अख्तर हिने गायलेलं रूणुझुणु रूणुझुणु रे भ्रमरा…हे सुद्धा नक्की ऐका http://bit.ly/2VlMRpt

(लेखक मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक आहेत)

8888744796

Previous articleडिजीटल कंटेंटसाठी हवेत नवीन निकष
Next articleपत्रकारितेत बदलांमधील संधी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here