पोर्तुगीज स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना – कारंजाचा काण्णव बंगला

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२४)

-कुणाल झालटे

पोर्तुगीज स्थापत्य कलेशी साधर्म्य दाखविणारा आणि १० हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळात वसलेला वऱ्हाडातील कारंजा लाड येथील ‘काण्णव बंगला’ वास्तुकलेचा आदर्श नमुना ठरावा असाच आहे. या एकमजली बंगल्यात एकूण ३६ दालने आहेत. प्रत्येक दालनातील दरवाजे, खिडक्या, खांब यावरील कोरीव काम अतिशय सुरेख आहे. १९०३ साली बांधण्यात आलेल्या या भव्य बंगल्याने गतकाळातील अनेक सोनेरी स्मृती जपून ठेवल्या आहेत…लोकमान्य टिळकांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचे पदस्पर्श या बंगल्याला लाभले आहेत. विशेष म्हणजे श्रीलंकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांचा बंगला हुबेहूब काण्णव बंगल्याची प्रतिकृती होता. काण्णव घरण्याची पाचवी पिढी आज या बंगल्यात नांदत आहे.

विदर्भातील कारंजा (लाड) हे वाशीम जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाण. पुराण आणि इतिहासात या शहराचे उल्लेख ठिकठिकाणी आढळतात.  वाकाटकपूर्व राजवटीपासून तो देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, ईमादशाही, नागपूरकर भोसले अशा अनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत. . श्री. नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेले कारंजा जैनांची काशी म्हणूनही ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कारंजा शहरावर दोनदा स्वारी केल्याने मराठी इतिहासातही कारंजाचा उल्लेख येतोच. एकापेक्षा एक संपन्न आणि वैभवशाली राजवटी कारंजा शहराने अनुभवल्या असल्याने या शहरात अनेक पुरातन वास्तू, गढी, वेशी पाहायला मिळतात. वेगवेगळ्या राजवटीतील  दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरुळपीर वेस आणि पोहा वेस या चार भग्नावस्थेतील वेशी आजही बाहेरून कारंजा लाड शहरात येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करतात. अनेक ऐतिहासिक वास्तूंसोबतच प्राचीन अशी कस्तुरी हवेली आणि १९०३ मध्ये बांधण्यात आलेला  काण्णव बंगला ही कारंजाची खास वैशिष्ट्य आहेत. कस्तुरी हवेलीची आज प्रचंड दुर्दशा झाली असली तरी काण्णवांचा बंगला मात्र अजूनही उत्तम अवस्थेत आहे.

कृष्णाजी काण्णव

कारंजा शहराबद्दल , तेथील इतिहास आणि ऐतिहासिक वास्तूंबाबत मला सुरुवातीपासून आकर्षण आहे . प्रशासकीय सेवेत काम करण्यास सुरुवात केल्यापासून कधीकाळी आपल्याला कारंजा येथे काम करण्याची संधी मिळावी, असे खूप तीव्रतेने वाटत होते. माझी ही  तीव्र इच्छा एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण झाली. मला येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती मिळाली.येथे काम करण्यास सुरुवात केल्यानंतर वेळेच्या उपलब्धतेनुसार एकेक ऐतिहासिक वास्तू पाहण्यास सुरुवात केली. माझ्या ‘बकेट लिस्ट’ मधील काण्णव बंगला पाहायला लवकरच जायचे असे ठरवत असतानाच कारंजा येथे तत्कालीन उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या पुढाकाराने सुरु रनिंग ग्रुपच्या सदस्यांना  काण्णव कुटुंबातील सदस्य सुब्रतो काण्णव यांनी एके दिवशी त्यांच्या  सुप्रसिद्ध बंगल्यात  अल्पोपहारासाठी निमंत्रित केले. त्यावेळी गप्पागोष्टींमध्ये  या ऐतिहासिक बंगल्याबाबत अगदी सविस्तर माहिती त्यांनी आम्हाला दिली. काण्णव  कुटुंब हे मुळचे साताऱ्यातील फलटणचे. कापसाच्या व्यापारासाठी ते कारंजात आले आणि इथल्या मातीत रमले. लवकरच त्यांचा व्यापार भरभराटीस आला. त्यानिमित्ताने तेव्हाचे कुटुंब प्रमुख कृष्णाजी काण्णव यांचा वेगवेगळ्या शहरात प्रवास व्हायचा. मुंबईला त्यांचे अनेकदा जाणे व्हायचे. तेथील ब्रिटीश व पोर्तुगीज स्थापत्यकलेच्या देखण्या, रुबाबदार वास्तू पाहून ते प्रभावीत झाले. एकदा त्यांनी मुंबईहून परत आल्यानंतर कारंजात पोर्तुगीज शैलीतील बंगला बांधण्याचा निर्धार जाहीर केला. केवळ बोलून ते थांबले नाहीत .

१८९९ साली त्यांनी बंगल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. या कामासाठी राजस्थान, काठियावाड, मुंबई व गोव्यावरूनही  काही कारागीर बोलावण्यात आले. ज्या ठिकाणी हा बंगला बांधण्याचे ठरले तिथे खोदकाम करताना काळी माती लागल्याने बांधकामाच्या पायात प्रत्येक आठ फुटांवर सहा इंचाचा शिसाचा धर टाकण्यात आला. बांधकाम करताना कुठल्याच विषयात तडजोड करण्यात आली नाही. बंगल्याचे विटा चुन्याचे बांधकाम काठेवाडी कारागिरांनी केले. बंगल्याचे खांब एकसंघ बर्माटिक वूडचे आहेत. (त्याकाळी ब्रह्मदेशातील देशातील सागवानाचे लाकूड बांधकामासाठी सर्वोत्कृष्ट समजले जात असे.) राजस्थानी कारागिरांनी बारीक नक्षी कोरून त्याला चार चांद लावले आहेत. प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या पक्षाच्या  आकारांची जाळीदार नक्षी आहे.  बंगल्याची  रंगरंगोटी मुंबई येथील तेव्हाचे प्रख्यात विठोबा पेंटर यांनी केली आहे. या बंगल्याचे प्रवेशद्वार सभामंडपासारखे आहे. समोरचे दोन्ही नक्षीदार स्तंभ कित्येक टन वजन असलेल्या ओतीव बिडाचे आहेत. फसरबंदी त्याकाळातील  दुर्मीळ इटालियन मार्बलची आहे. या परिसरात इटालियन मार्बल वापरणारे त्या काळात काण्णव हे एकमेव गृहस्थ होते. वास्तूच्या मधोमध दोन्ही दालनांना लागून ३०  बाय ३० चौरस फुटाचा चौक आहे. दुसऱ्या माळ्यावर ५०  बाय ४० फुटांचा दिवाणखाना आहे. एकंदरीतच बंगल्याची लौकीक संपन्नता डोळे दिपवणारी आहे. १९०३ मध्ये या बंगल्याचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा साडेतीन लाख रुपये खर्च झाला होता.

या बंगल्याला अनेक थोरामोठ्यांचे पाय लागले आहेत. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर व इतरही अमेक महत्त्वाच्या नेत्यांनी या बंगल्याला भेट देऊन येथील पाहुणचार घेतला आहे. संगीताच्या तर अनेक मैफिली  येथे रंगल्या आहेत.  बालगंधर्व, मास्टर दिनानाथ, (दिनानाथ मंगेशकर यांची कंपनी कारंज्यात आली असताना काण्णवांकडे गाण्याची मैफल झाली तेव्हा चिमुकल्या  लता मंगेशकरांची बाळपावले याच बंगल्यात दुडदुडली होती.) हिराबाई बडोदेकर, केशवराव भोळे, पंडित नारायण व्यास, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, मनोहर बर्वे आदी अनेक प्रतिभावंत कलाकारांची साधना या बंगल्याने अनुभवली आहे. प्रत्येक मैफीलीनंतर काण्णवांकडे वन्हाडी परंपरेनुसार पुरणपोळ्यांची पंगत असायची. एकदा केशवराव भोळ्यांसाठी मसाल्याची आमटी (सार) बनविली, केशवरावांना ती एवढी आवडली की ते चक्क दहा वाट्या आमटी प्यायले. परिणामी घसा खराब होऊन रात्रीची मैफल रद्द करावी लागली होती. या बंगल्यामध्ये एकेकाळी कीर्तन महोत्सवाचेही आयोजन होत असे.  घोंगडेबुवा महाराज, कराडकर, कोल्हटकर, पाठक, हिरवळकर, आयाचीतकर, निजामपूरकर, भालेराव, कुळकर्णीबुवा इत्यादी प्रसिद्ध किर्तनकारांची कीर्तने  या बंगल्यात  झाली.

काण्णव बंगल्यासारखेच उभारले 
श्रीलंकेतील  व्हाईसरायचे  निवासस्थान 

कृष्णराव काण्णवांनी बांधलेल्या  या बंगल्याची महती तेव्हा पार सातासमुद्रापार गेली होती . तेव्हाच्या इंग्रज राजवटीचा अंमल भारतासोबत नजीकच्या श्रीलंकेवरही होता. तेव्हाच्या श्रीलंकेतील इंग्रज  व्हाईसरायचे निवासस्थान  काण्णव बंगल्यासारखे करण्याचा निर्णय घेण्यात आला. बांधकामासाठी तत्कालीन वन्हाड प्रांताच्या इंग्रजांच्या कारभाऱ्याऱ्यांनी काण्णवांच्या बंगल्याचे बांधकाम करणारे कारागीर जहाजाने तत्कालीन सिलोनला नेले . तेथे या बंगल्याची प्रतिकृती उभी राहिली. श्रीलंकेचे व्हाईसराय हाऊस म्हणून ओळखले जाणारे हे निवासस्थान श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर तिथले पहिले राष्ट्राध्यक्ष सिरीमाओ भंडारनायके यांचे शासकीय निवासस्थान झाले.

(लेखक वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे तालुका दंडाधिकारी आहेत.)

9970015068

 

Previous article‘नूर’ – ए – रणथंबोर
Next articleभारतीय राजकारणातील कौटुंबिक सत्तासंघर्ष
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here