– प्रवीण बर्दापूरकर
दोन छोट्या आठवणींचा मिळून हा लेख आहे . या आठवणी सुट्या सुट्या सांगण्यात काही मतलब नाही कारण त्या दोन्हींचं नातं एकमेकाशी घट्ट जुळलेलं आहे
||१||
पहिली घटना घडली तेव्हा मी ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीच्या संपादकपदाचा राजीनामा देऊन लेखनाच्या कांही प्रकल्पात मग्न होतो . एक दिवस पत्रकारितेतले महनीय ज्येष्ठ सहकारी दिनकर गांगल यांचा फोन आला . माझ्या पिढीचे जे काही ‘स्टार जेष्ठ सहकारी आहेत त्यापैकी दिनकर गांगल एक . गांगल म्हणाले , ‘अरे मी आत्ताच हॉस्पिटल मधून आलो . तुझ्या मित्राची प्रकृती बरीच चिंताजनक आहे’.
दिनकर गांगल ज्या माझ्या मित्राबद्दल बोलत होते त्यांचं नाव कवी ग्रेस . कर्करोगावर उपचार घेण्यासाठी ते पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयात दाखल होते . गांगल यांच्या सांगण्यावर अविश्वास दाखवण्यासारखं काहीच नव्हतं . उत्सुकता म्हणून थोडीशी माहिती काढली तर , गांगल यांनी दिलेला ‘जर्नालिस्टिक इशारा’ बरोबर होता असं कळलं . मग मी तेव्हा ‘दिव्य मराठी’चे संपादक असलेले कुमार केतकर यांना फोन केला आणि ही माहिती सांगितली . या विषयावर थोडंबोलणं झाल्यावर केतकर म्हणाले ‘तू एक पीस ( ही केतकर स्टाईल ! ) तयार करुन ठेव . ऐन वेळेवर कामाला येऊ शकतो . मी लगेच ठिय्या मारुन बसत कविश्रेष्ठ ग्रेस यांच्याबद्दल एक हजारावर शब्दांचा मजकूर लिहून ठेवला . तो केतकरनाही पाठवला .
दरम्यान काही दिवस गेले आणि शुभ वर्तमान आले की ग्रेस यांची प्रकृती आता चांगली सुधारत आहे . औषधोपचाराला ते सकारात्मक प्रतिसाद देत आहेत . ग्रेस हळूहळू चाहत्यांशी बोलण्याच्याही अवस्थेत आले ; हिंडू-फिरु . त्याच काळात ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ या समजाला छेद देणाऱ्या ‘आई’ या प्रकल्पासाठी मी त्यांच्याशी बोललो . त्यावेळी त्यांनी त्यांच्या आईवर असलेली ‘सांजभयाच्या साजणी’ या या कवितासंग्रहात पान क्रमांक ३३ आणि ३४ वर प्रकाशित झालेली कविता घेण्यास सांगितलं . ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ ही कविता ग्रेस यांनी त्यांच्या आईवर लिहिलेली आहे , असा सर्वत्र समज तेव्हा होता , तो आजही आहे पण , ‘ती’ कविता त्यांच्या आईवरची नाही’ , हे यांनी ग्रेस यांनी विवेक रानडे आणि मला निक्षून सांगितलं .
काही महिने गेले . दिवाळीचा हंगाम आला आणि ग्रंथालीचं मुखपत्र असलेल्या (शब्द)‘रुची’ या अंकाला एखादा तरी लेख द्यावा असा आग्रह सुदेश हिंगलासपूरकर या मित्रानं धरला . खरं तर , कामात अखंड बुडालेलो होतो . नवीन लेख लिहिण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता आणि मला काही सुचनंही शक्य नव्हतं पण , बोलता बोलता एकदम ग्रेस यांच्यावर लिहून ठेवलेल्या मजकुरची आठवण झाली . मग सुदेशला मी म्हणालो , ‘असं करतो माझ्याकडे ग्रेस यांच्यावर एक व्यक्तीपर जरा वेगळा लेख आहे . त्याचं पुनर्लेखन करुन तो ‘रुची’च्या दिवाळी अंकासाठी पाठवतो . सुदेशला ती कल्पना आवडली . मग पुनर्लेखन करुन ‘पुराणपुरुष’ हा लेख (शब्द)रुची’च्या दिवाळी अंकासाठी पाठवून दिला.
तो लेख चांगला जमला असावा कारण त्याला प्रतिसाद चांगला मिळाला .
हा लेख प्रकाशित झाला तेव्हा ग्रेस पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल होते . कविश्रेष्ठ ग्रेस यांनी त्या लेखाच्या प्रति झेरॉक्स करुन घेतल्या . प्रकृतीची चौकशी करण्यासाठी येणाऱ्यांना माझ्या लेखाची झेरॉक्स प्रत ग्रेस देत असत . त्या लेखाबद्दल एकदा ग्रेस यांच्याशी बोलणंही झालं . ग्रेस त्या लेखावर फिदा होते . ( त्याच दरम्यान एकदा मला जी . ए. कुळकर्णी यांच्या भगिनी ) नंदा पैठणकर यांचाही फोन आल्याचं स्मरतं . नागपूरकरांनी त्याच काळात कविवर्य ग्रेस यांना ‘विदर्भभूषण’ हा सन्मान प्रदान केला . तो स्वीकारण्यासाठी ग्रेस नागपूरला आले . कार्यक्रमाला जाण्याच्या आधी नेहमीप्रमाणे आम्ही विवेक रानडेच्या स्टुडिओमध्ये जमलो . नागपुरात कार्यक्रम असेल तर कार्यक्रमाला जाण्याआधी विवेकची पत्नी सुप्रिया हिच्या हातचा चहा पिण्याचा वसा ग्रेस यांनी पाळलेला होता , त्यासाठी आम्ही सर्व जमलो होतो . आता नाव आठवत नाही पण , त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाची एक पत्रकार ग्रेस यांची मुलाखत घेण्यासाठी आली . तेव्हा ग्रेस यांनी तिला सांगितलं की प्रवीण बर्दापूरकर सरांचा लेख तू वाचून घे म्हणजे तुला मला काय प्रश्न विचारायचे हे समजू शकेल वगैरे . तर ते असो .
||२||
ग्रेस यांच्या लेखावर प्रतिक्रिया येण्याचा सिलसिला थांबतच नव्हता त्यातच एक दिवस ग्रेस यांनी फोनवर बोलताना मला सांगितलं की तुमचा लेख आशाबाईंना सुद्धा खूप आवडला आहे आणि त्या तुम्हाला फोन करणार आहेत . मी ती गोष्ट हसण्यावारी नेली आणि ग्रेस यांना म्हटलं , ‘तुम्ही विनाकारण मला झाडावर चढवत आहात’ . असेच दोन-तीन दिवस गेले . एक दिवस दुपारी चार-साडेचारच्या सुमारास सेलफोनची बेल वाजली . सेलफोनच्या स्क्रीनवर झळकणारा नंबर अनोळखी होता आणि तेव्हा माझ्याकडे कॉलर आयडी ही सुविधा नव्हती . मी फोन रिसीव्ह केला तर कानात एकाच वेळेस हजारो घंट्या मंजुळ स्वरात किणकिणल्या ! आणि ‘प्रवीण बर्दापूरकरांचा नंबर नं हा ?’ अशी पृच्छा झाली . जन्मल्यापासून जो मेलोडियस आवाज कानात गुंजतो आहे , तो विसरला कसा जाणार ?
मी ‘हो’ म्हणालो आणि तो आवाज ओळखला आहे हे सांगायच्या आताच समोरुन सांगण्यात आलं की , ‘मी आशा भोसले बोलते आहे’ .
एरवी हे असं घडलं , असं अन्य कोणी म्हणालं असतं तर मी कदाचित पटकन विश्वास ठेवला नसता पण , हे माझ्याच बाबतीत घडत होतं . गारूड झाल्यासारखं मी नकळत मी त्यांना कोण बोलतोय ते सांगितलं तेव्हा आशाताई त्याच चिरपरिचित स्वरात म्हणाल्या , ‘मला माहिती आहे मी कुणाला फोन केला ते . मी तुम्हाला फोन केला ते कवी ग्रेस यांच्यावरचा तुमचा रुचीच्या दिवाळी अंकातील लेख खूप छान आहे हे सांगण्यासाठी…’ पुढं त्या काय बोलल्या त्या आठवत नाही…
मी काहीतरी थातूरमातूर बोललो आणि ‘तुम्ही कुठे वाचला हा लेख ?’असा प्रश्न त्यांना विचारला तर त्या म्हणाल्या , ‘साक्षात कविवर्य ग्रेस यांनीच तो लेख मला दिला . ग्रेस यांना असं नेमक्या शब्दात शब्दात पकडणं तुम्हाला कसं काय जमलं बुवा ?’
त्यावर न उमजून मी विचारलं तुम्हाला काय म्हणायचं ते काय माझ्या लक्षात येत नाहीये त्यावर आशाताई म्हणाल्या ‘ग्रेस यांच्या व्यक्तिमत्व पाऱ्यासारख आहे . सहजासहजी ते पकडता येणे शक्य नाही . तुम्ही मात्र माणूस म्हणून ग्रेस यांना बरोबर शब्दात पकडलं आहे . बरं केलं तुम्ही त्यांच्या कवितेवर लिहिलं नाहीत . त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व एका वेगळ्या स्वरुपात आमच्यासमोर आलं…वगैरे असं काहीतरी बोलणं झालं .
मी इतका नम्रपणे आणि इतका वेळ कोणाशी बोलतो आहे हे काही बेगम मंगलाच्या लक्षात येत नव्हतं . मग फोन संपल्यावर मी तिला सांगितलं की आशाताईंचा फोन होता आणि ती संध्याकाळ मग आम्ही आशाताईंच्या नावानं सेलिब्रेट केली .
||३||
इथे सांगायचा मुद्दा आणखी एक आहे , मी जेव्हा ‘लोकसत्ता’साठी मुंबईत पत्रकारिता करत होतो तेव्हा मंगेशकर कुटुंबीयांशी ‘लोकसत्ता’नं पंगा घेतलेला होता . पेडर रोडवर मंगेशकर कुटुंबीयांचं निवासस्थान आहे . नेमक्या त्याच रस्त्यावर फ्लाय ओव्हर ( उड्डाण पूल ) उभारला जाण्याचं सरकारचं नियोजन होतं . त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार होता पण , मंगेशकर कुटुंबीयांनी या फ्लाय ओव्हरला विरोध केला . ‘आमची प्रायव्हसी त्यामुळे अडचणीत येईल’ , असा बचाव त्यांनी केला . ‘हा फ्लाय ओव्हर झाला तर आम्ही भारत सोडून जाऊ’ असा दिला . ‘लोकसत्ता’नं मात्र हा फ्लायओव्हर झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि फ्लाय ओव्हर व्हावा या बाजूनं काही ( म्हणजे मंगेशकर कुटुंबीयांच्या भूमिकेच्या विरोधात !) बातम्याही दिल्या होत्या . त्यामुळे मंगेशकर कुटुंबीय आणि त्यांची कांही चाहती मंडळी ‘लोकसत्ता’वर स्वाभाविकच जाम नाराज होती . त्याच दरम्यान कशासाठी तरी प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांचं निवास्थान असलेल्या प्रभु कुंजवर फोन केला तर मंगेशकर कुटुंबीयांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिली नव्हती किंबहुना प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट शब्दात नकारच दिला होता . थोडक्यात सांगायचं तर ‘लोकसत्ता’ आणि मंगेशकर कुटुंब यांच्यात बऱ्यापैकी कटूता निर्माण झालेली होती पण , वृत्तपत्रात काम करताना भूमिका घेतल्याबद्दल अशा कटूता अनेकदा येत असता असतात . त्यामुळे आम्हाला काही त्याचं विशेष वाटलं नव्हतं .
‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीच्या मी संपादक झालो तेव्हा अशा भोसले यांचा एक कार्यक्रम नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर झाला . आधार या संस्थेने तो आयोजित केलेला होता . आयोजक असलेली शुभदा फडणवीस , डॉ . अविनाश रोडे , हेमंत काळीकर ही मंडळी माझ्या लोभातली होती . त्यामुळे आशा ताई यांच्यासोबत चहापानासाठी मलाही बोलावलं होतं . त्यावेळेस मी ‘लोकसत्ता’चा म्हटल्यावर आशा ताईंनी भुवया उंचावल्या होत्या . एकूण काय तर त्यांच्या मनात अजून अढी कायम होती , असं जाणवलं . ग्रेस यांच्या लेखावर बोलताना मात्र ही अढी जाणवली नाही .नंतरच्या काळातही प्रामुख्याने विमानतळावर आमच्या तीन-चार भेटी झाल्या पण , त्या नमस्कार चमत्काराच्या फार काही पुढे नव्हत्या . आशा भोसले त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर मला कानात किणकिणलेल्या मंजुळ घंट्याचा आवाज ऐकू आला…
लताबाई आणि आशाताईंची राजकीय भूमिका हा एक स्वतंत्र मुद्दा आहे . एखादी राजकीय भूमिका घेण्याचा अधिकार प्रत्येक लेखक-कलावंताला आहेच . पुढे जाऊन आशाताईंनी राजकारण्यांचं केलेलं लांगूनचालन सर्वांना पटेलच असंही नाही . मलाही तो पटणं शक्यच नाही पण , ‘फॉर दॅट मॅटर’ कला आणि तो माणूस यात गल्लत करता कामा नये , अशी माझी तरी भूमिका आहे . लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघी बहिणींचा आवाज हा एक चमत्कार होता . त्या चमत्कारावर आमचं भावविश्व अंकुरलं , उमललं , फुललं…हे ऋण फिटण्यासारखं कदापिही नाहीच . त्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी , अजूनही त्या भावविश्वावरच माझी पिढी वावरत आहे , यातच सारं कांही आलं .
■चित्र मांडणी- महेश जोशी-दराडे , छत्रपती संभाजीनगर ■








