– प्रवीण बर्दापूरकर
दिवाकर कृष्णा आचार्य हे नाव मराठी कथा वाचकांना नवीन नाही . मोजकं , शैलीदार आणि कसदार पण अतिशय मोजकं लेखन करणारा लेखक म्हणून दिवाकर आचार्य परिचित आहे. दिवाकर हा खरं तर , दंत वैद्यक शास्त्राचा विद्यार्थी आणि पुढे शिक्षक व प्रॅक्टिशनर . १९७८ साली दंत वैद्यक शास्त्र शिकत असतानाच त्यानं लिहिलेली ‘छत्री’ ही कथा ‘सत्यकथे’त प्रकाशित झाली . या कथेनं मराठी कथा समजून-उमजून वाचणारे वाचक आणि समीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं . पुढच्या लेखनातूनही दिवाकरनं वाचकांना कधीच निराश केलं नाही . ‘छत्री’ ही कथा प्रकाशित झाल्यावर काहीच महिन्यात दिवाकर कृष्ण आचार्यची आणि माझी , नागपूरच्या शासकीय दंत वैद्यक महाविद्यालयाच्या वसतिगृहात भेट झाली ती त्याचा सहाध्यायी अनिल पिंपळापुरे याच्यामुळे . ते दोघंही पुढे दाताचे डॉक्टर झाले . तेव्हा बघितल्यावर ‘छत्री’सारखी कसदार कथा लिहिणारा हा लेखक असेल , यावर तेव्हा पटकन विश्वास बसला नाही पण , पुढे त्याच्या ‘स्पर्श’ , ‘डॉक्टर’ , ‘माईल्स टू गो’ अशा अनेक कथा अनुष्टूभ , अभिरुची , मौज , माणूस या नियतकालिकात प्रकाशित झाल्या .
नंतरच्या काळात एक वैशिष्ट्यपूर्ण व कसदार कथा लेखन करणारा लेखक म्हणून दिवाकरचं नाव मराठीत साहित्यात स्थिरावलं , घेतलं गेलं जाऊ लागलं . ‘माईल्स इज टू गो’ हा त्याचा कथासंग्रहही पुढे प्रकाशित झाला.आधी शिकताना आणि नंतर अकोला येथील दंत वैद्यक महाविद्यालयात अध्यापन करता करताच त्याचं हे कथालेखन सुरु होतं . सोबत दंतोपचाराचं त्याचं क्लिनिकही सुरु होतं . या काळात कथा लेखनासोबतच बालनाट्य आणि आकाशवाणीच्या अवकाशातही दिवाकरनं बऱ्यापैकी मुशाफिरी केली मात्र , तो प्रामुख्याने रमला तो कथा लेखनात . मोजकं , वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय सूक्ष्म तपशीलासह कसदार लेखन त्यांनं आतापर्यंत केलं आहे . याच सर्व वैशिष्ट्यांसह ‘पीळ’ च्या निमित्तानं दिवाकर कृष्ण आचार्य यानं कादंबरी लेखनाच्या क्षेत्रात आश्वासक पाऊल टाकलं आहे . जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं आहे
‘पीळ’ ही कादंबरी नवी दिल्लीच्या कॉपर कॉइन पब्लिशिंग हाऊसनं प्रकाशित केली असून वेधक असं मुखपृष्ठ रवी मुकुलचं आहे . कादंबरीचा भावार्थ रवी मुकुल यानं मुखपृष्ठातून सार्थपणे व्यक्त केला आहे . कादंबरीत काही रेखाटन आहेत आणि ती श्रीधर अंभोरे यांची आहेत.
या कादंबरीचा विषय अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे . यापूर्वी हा विषय मराठी कथा किंवा कादंबरी लेखनात वाचायला मिळाला नसावा असं वाटतं . म्हशीचं व्यायनं म्हणजे , बाळंतपण हा या विषयाभोवती ही कादंबरी फिरते आणि त्या एका वेगळ्या जगाची सफर वाचकालाही घडवते . या कादंबरीच्या निमित्तानं पशु वैद्यक क्षेत्रात ही कादंबरी आपल्याला घेऊन जाते आणि त्या जगातले माहिती नसलेले असंख्य तपशील आपल्यावर गारुड करतात . ही घटना वऱ्हाडात घडते आणि तीही ग्रामीण भागात . ( शहरी आणि ग्रामीण वऱ्हाडच्या बोलीचा बाज वेगळा आहे . ) त्यामुळे वऱ्हाडाचा अस्सल ग्रामीण बाज या कादंबरीत डोकावतो . पशू आणि मानवी भाव जीवनातील वऱ्हाडी शब्द, वऱ्हाडी म्हणी , वऱ्हाडी बोली आणि वऱ्हाडी वातावरण या कादंबरीत वैपुल्यानं आलेलं आहे . मराठी साहित्यात शेती , शेतीचा परिसर , गावगाडा , ग्रामीण माणूस आणि त्याचं भावजीवन मोठ्या प्रमाणत आलेलं आहे पण , एका म्हशीच्या बाळंतपणाच्या निमित्ताने पशू आणि मानवी जीवन यांचे भावबंध ‘पीळ’ कादंबरीच्या निमित्तानं पहिल्यांदाच वाचकांच्या समोर येत आहेत . एक डॉक्टर असल्यानं मानवी गुंतागुंतीच्या भावजीवनाबद्दल संवेदनशील असणारा लेखक त्याच नजरेतून पशूकडे कसा बघतो याचं दर्शन अनेक प्रसंगातून होतं.
पशु वैद्यक डॉक्टर म्हणजे , व्हेटर्नरी डॉक्टर किंवा अस्सल ग्रामीण बाजात सांगायचं तर ‘ढोरांचा डॉक्टर’. ‘म्हैस’ , त्या म्हशीचं बाळंतपण आणि त्या निमित्तानं असंख्य अशी पात्र या कादंबरीत येतात . शशांक , विलास , पिनाक, अर्जुन, अर्जुनचे आई-वडील नथू , सरकार , बारक्या, कारभारी , लक्ष्मी आणि अर्थातच म्हैस अशी ही पात्र आहेत . अनेक पात्र असूनही प्रत्येक पात्र ठसशीतपणे रंगवलं गेलेलं आहे . उल्लेखनीय भाग म्हणजे पशू आणि मानव यांच्या जगण्यातील अतिसूक्ष्म पीळ या कादंबरीत जागोजागी येतात . पशू आणि मानवी जीवन यांची या ठिकाणी झालेली सरमिसळ आणि त्यातून निर्माण झालेले भावनात्मक ताणेबाणे या कादंबरीत लेखकानं शैलीदारपणे उभे केलेले आहेत ; त्यातून लेखकाच्या निरीक्षण शक्तीच्या प्रत्यय येतो आणि त्यात आपणही गुंतत जातो . मानवाची म्हणजे पशू वैद्यक तज्ज्ञाची पशू विषयक जाणीव करुणा , ममत्व आणि काहीशा भीतीने कशी ओतप्रोत भरलेली असते हे वाचताना आपण गुंगून जातो . त्या भावनात्मक जगताशी एकरुप होऊन अतिशय आत्मीयतेनं ही वर्णनं आलेली आहेत . एकीकडे कोणत्या क्षणी तो पशू हल्ला करु शकेल याच्या भीतीखाली आणि दुसरीकडे त्या पशूचं वेदना निवारण कसं करावं , ही पशू वैद्यक तज्ज्ञांची व्यावसायिक समर्पित भावना या म्हशीच्या बाळंतपणामुळे समोर येते आणि पशू आणि मानव यांचे भावनात्मक पीळ , ताण-तणाव सारखेच आहे याची जाणीव होणं हे या कादंबरीचं मोठं यश समजायला हवं आणि संपूर्ण वाचायलाच हवं असं आहे. .
या कादंबरीत केवळ एका म्हशीचं बाळंतपण येत नाही म्हणजे , केवळ पशू येत नाही तर त्यासोबत आपल्याला अपरिचित असलेलं पशु वैद्यक जगतही हळूहळू उलगडत जातं आणि आपणही त्यात तितक्याच अलगदपणे गुंतत जातो . पशू वैद्यक डॉक्टर आणि पशू यांचे परस्पर संबंध अतिशय अनपेक्षित ताण-तणावाचेही आहेत ; प्रसंगी खेळीमेळीचे आहेत , प्रसंगी एकमेकाला समजून घेणारे आहेत आणि क्वचित सुन्न करणारेही आहेत . हे सर्व वऱ्हाडी बोली , म्हणी आणि वऱ्हाडी परिसरातून आपल्यासमोर येत जातं आणि आपणही भोवंडत जातो . पशू आणि मानव यांच्या या परस्पर संबंधात अनेक पीळ आहेत आणि ते पीळ अतिशय सूक्ष्मपणे व्यक्त करण्यात लेखक दिवाकर आचार्य यशस्वी झालेला आहे . हे पीळ अनेकदा आपल्याला एखाद्या खोल डोहासारखे वाटतात आणि त्यामुळे ते गूढही वाटतात कारण त्यातल्या अनेक बाबी आपल्याला आजवर कधी ठाऊकच नव्हत्या.
अस्सल वऱ्हाडी ‘बाज’ हे या कादंबरीच्या शैलीचे वैशिष्ट्य . ही शैली अनेकदा निवेदनात्मक होते तर कधी संवादात्मक होऊन आपल्याला कादंबरी गुंतवून टाकते हे . सगळं इतकं सुबोध आणि साध्या शैलीत होतं की ते सगळं जणू आपल्यासमोर ते वातावरण एखाद्या चित्रमे ( picarian ) सारखं उभं राहतं , ही देखील या कादंबरीची आणखी एक जमेची बाजू आहे . वैद्यक शास्त्रात पदवी घेतलेल्या एखाद्या डॉक्टरनं ग्रामीण आणि त्यातही वऱ्हाडी शैलीतले हे बारकावे ज्या ताकदीनं व्यक्त केले आहेत त्याचं करावं तेवढं कौतुक नक्कीच थोडं आहे. ‘पीळ’ ही कादंबरी हाती आली तेव्हा दिवाकर कृष्णा आचार्य या नावामुळे आणि रविमुकुलच्या मुखपृष्ठामुळे तिच्याकडे मी आकर्षित झालो . पण , ही कादंबरी वेगळी वाटली , बेहद्द आवडली याचं कारण हे आकर्षण केवळ बाह्य नाही तर कादंबरी लेखनाची ती ताकद आहे हे ‘पीळ’ वाचून संपवल्यावर जाणवलं . अशात मराठी साहित्यात सतीश नाईक , पंकज भोसले , डॉ. राजेंद्र मलोसे अशा कांहीचं कांहीवेगळ्या विषयावरचं लेखन वाचायला मिळत आहे . त्या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांच्या मालिकेत बसणारी ‘पीळ’ ही कादंबरी आहे .
जाता जाता – to talk turkey , भालचंद्र नेमाडे यांच्या पुढे मराठी कादंबरी गेलेलीच नाही , हे नेमाडे पंथीयांचं आवडतं ‘रडगाणं’ असतं . त्या सर्वांनी ही कादंबरी आवर्जून वाचायला हवी म्हणजे , मराठी कादंबरी त्यापेक्षा कुठेतरी बरीच पुढे गेलेली आहे याची किमान जाणीव तरी त्यांना होईल आणि ‘नेमाडे पंथीय’ नोस्टाल्जिया’तून ते बाहेर येतील .
(लेखक नामवंत पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत)
Cellphone +919822055799








