-अविनाश दुधे
बीटी गेल्याची बातमी समजली आणि दुसऱ्याच क्षणाला ‘एक पर्व संपले! एका दंतकथेची अखेर!’ अशी प्रतिक्रिया मनात उमटली. एखादी व्यक्ती, स्थळ , घटना किंवा परंपरेबाबत वर्षांनुवर्षे किंवा अनेक पिढ्यांत काही कथा सांगितल्या जातात त्याला दंतकथा म्हणतात. बीटी नावाचा माणसाबाबत अशा अनेक कथा सांगितल्या जातात. आयुष्याची ८७ वर्ष जी जीवनमूल्य घेऊन हा माणूस जगला त्यामुळे हयातीतच ते दंतकथेचा विषय ठरले होते.
बीटी जिवंत असताना आणि आता ते गेल्यानंतरही वेगवेगळ्या क्षेत्रातील लहानथोर माणसं त्यांच्याबाबत एवढ्या कथा सांगताहेत की ही अशीही हाडामासाची माणसं असतात, हे समजून विस्मयचकित व्हायला होतं. बीटींच्या संपूर्ण आयुष्याचा पट पाहिला की जीवनाकडे पाहण्याची आणि जीवन जगण्याची त्यांची एक ठाम भूमिका होती, हे लक्षात येतं. मूल्यांप्रती असलेली बांधिलकी, तत्वनिष्ठ जीवनपद्धती, साधेपणा आणि पारदर्शक पद्धतीनेच बीटी संपूर्ण आयुष्य जगलेत.
गेले दोन दिवस अनेक मान्यवर ,संपादक , पत्रकार , बीटींचे सहकारी त्यांच्या जगण्यातील शेकडो सत्यकथा सांगताहेत , लिहिताहेत, भरभरून बोलताहेत. बीटी स्वतःबद्दल क्वचितच बोलत मात्र बीटींचे सार्वजनिक जीवन, त्यांची संसदीय कारकीर्द म्हणजे ‘खुली किताब’ होती. ‘नुटा बुलेटिन’ मध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचा संपूर्ण लेखाजोगा लिहून ठेवलाय . त्यामुळे स्वतःबद्दल काही सांगा , आत्मचरित्र लिहायला हवं , असा आग्रह केला की आत्मचरित्र लिहावं असं विशेष काही केलं नाही , मात्र जे काही जगलोय ते नुटा बुलेटिनमध्ये आहे, असे ते विनम्रपणे सांगत.
कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटी जन्म झाला असल्याने अभाव त्यांनी प्रारंभीपासूनच अनुभवला. कधी गप्पांच्या ओघात डॉ. पंजाबराव देशमुखांनी सुरु केलेल्या श्रद्धानंद हॉस्टेलमध्ये राहून घेतलेलं शिक्षण , गाडगेबाबांची भेट , हॉस्टेलच्या पोरांना ताट, वाट्या घेऊन देण्यासाठी गाडगेबाबांसोबत टांग्याने अमरावतीच्या बाजारात जाण्याचा प्रसंग , गाडगेबाबांची ऐकलेली अनेक कीर्तनं, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी नेता म्हणून झालेली यशवंतराव चव्हाणांची भेट, त्यांनी केलेलं भाषणाचं कौतुक, पुढे साक्षात डॉ . पंजाबराव देशमुखांनी शिवाजी महाविद्यालयात बीटींनी अध्यापक म्हणून जॉईन व्हावं म्हणून पाठवलेली चिठ्ठी, या त्यांच्या मर्मबंधातील अनमोल ठेवी होत्या.
सुरुवातीच्या दिवसात बीटींच्या वाट्याला आलेलं आयुष्य आणि सभोवतालच्या परिस्थितीने आयुष्यात नेमकं काय करायला हवं, ही त्यांची दिशा निश्चित झाली. विदर्भाच्या कोरडवाहू शेतकऱ्यांचे अभावग्रस्त जीवन , निरक्षरता , दारिद्रय याचा त्यांच्या मनावर एवढा खोलवर परिणाम झाला की पुढे आयुष्यभर पाणी , सिंचन , अनुशेष आणि शिक्षण या विषयांकडे त्यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केले . विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर संसदीय आयुध आणि घटनात्मक तरतुदींच्या जोरावर एका मागास भागाचे चित्र कसे बदलवता येते, मस्तवाल सत्तारूढ नेत्यांना कसे सरळ करता येते, हे बीटींनी दाखवून दिले.
विदर्भ व मराठवाड्यासारख्या मागास भागाच्या अनुशेष पूर्ततेसाठी त्यांनी घेतलेली जीवापाड मेहनतीची इतिहासात नोंद होईल. घटनेतील ३७१ (२) या कलमाद्वारे राज्यपालांना त्यांच्या अधिकाराची आठवण करून देणे आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून वैधानिक विकास महामंडळ , मागास भागातील सिंचन प्रकल्प , पाणी पुरवठा योजना आणि इतरही विषयातील अनुशेष पूर्ततेसाठी बीटी सातत्याने ३० वर्ष झगडत राहिले. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज आणि बलवान नेत्यांसोबतची विधिमंडळातील लढाई ही महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहावी अशी कहाणी आहे .
बीटींना महाराष्ट्र उत्तम संसदपटू म्हणून ओळखतात पण बीटींच्या व्यक्तिमत्त्वाचे इतरही अनेक मनोवेधक पैलू होते. ते जेवढे उत्कृष्ट संसदपटू तेवढेच उत्कृष्ट शिक्षक होते .बीटी प्राध्यापक म्हणून अतिशय ताकतीचे होते. त्यांनी तेव्हा लिहिलेली पुस्तके अनेक वर्षेपर्यंत अमरावती -नागपूर विद्यापीठात शिकवली जात. कुठल्याही विषयात हात टाकला की बीटी त्याच्या मुळापर्यंत जात. सर्वांगाने तो विषय समजून घेत. अध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीत वर्गावर जाताना त्यांनी कधीही एक मिनिट उशीर केला नाही आणि वर्ग कधीही वेळेअगोदर संपविला नाही. हा वक्तशीरपणा त्यांनी आयुष्यभर जपला . कुठल्याही कार्यक्रमस्थळी बीटी ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिट हजर राहत. बीटी आले की आयोजकांचा बीपी वाढत असे. बीटी टाईमपास करत आहे , असे दृश्य त्यांच्या आयुष्यात कधीही दिसले नसे . संपूर्ण दिवसाची आखणी आणि वेळापत्रक त्यांचे ठरलेले असे . २०१० च्या पराभवानंतर बोटींची संसदीय कारकीर्द संपली . मात्र अखेरच्या क्षणापर्यंत लेखन , वाचन , व्यासंगात ते व्यग्र असत . म्हणूनच ‘ज्ञानतपस्वी’ , ‘ज्ञानयोगी’ या शब्दांनी त्यांचा गौरव होत असे . ५० वर्षातील नुटा बुलेटिनच्या अंकांचे अवलोकन केले तर बीटींचा शेकडो विषयातील अफाट आवाका लक्षात येतो .
त्यांच्या साधेपणाबद्दल खूप सांगितलं जात , पण त्यांना त्यात काहीही विशेष वाटत नव्हतं. प्रवीण बर्दापूरकर या ज्येष्ठ संपादकांनी व रघुनाथ पांडे या पत्रकार मित्राने त्याबाबत सविस्तर लिहिलंय. ‘लोकमत’ मध्ये असताना माझा सहकारी असलेला गणेश वासनिक परवा सांगत होता . मुंबईचे अधिवेशन आटोपून बीटी बडनेराला आले म्हणजे स्टेशनबाहेर पडल्यावर ते सिटी बसची वाट पाहत उभे असायचे . बसला उशीर असल्यास तेव्हा ऑटो चालक असलेला गणेश व अन्य ऑटोचालक त्यांना घरी सोडून देण्यासाठी आग्रह करायचे. बीटी त्यांच्यासोबत गेले की संपूर्ण भाडे ते आवर्जून द्यायचे .आजच्या नेत्यांच्या महागड्या गाड्या आणि त्यांची बेमुर्वतखोरपणा , माज पाहिला की बीटींचा बस, ट्रेन, सिटी बस, दुचाकीवरील प्रवास हा दुसऱ्या ग्रहावरील माणूस होता, हे सांगणारा आहे.
आर्थिक व्यवहाराबाबत ते कमालीचे पारदर्शक होते . २००४ मध्ये , पुढे २०१० च्या निवडणुकीत त्यांनी आपला संपूर्ण वैयक्तिक जमाखर्च लोकांसमोर मांडला. विधानपरिषदेचा सदस्य म्हणून मिळणारे मानधन , वेगवेगळ्या समितीवर सदस्य म्हणून मिळालेला भत्ता , शेतीतून मिळणारे उत्पन्न… अगदी एखाद्या गोष्टीतून शंभर रुपये जरी मिळाले असतील तर तेही त्यांनी जाहीर केले . सोबतीला खर्च कुठे , कोणत्या कामासाठी झाला याचेही विवरण दिले . आमदार निधीतून कुठली कामे झालीत, त्यासाठी किती खर्च आला , हा सगळा लेखाजोगा त्यांनी प्रसिद्ध केला . लोकप्रतिनिधी असलेल्या माणसाने आपला व्यवहार हा पारदर्शकच ठेवला पाहिजे यासाठी ते आग्रही होते.
बोटींचा दिवस भल्या पहाटे सुरु व्हायचा . ऋतू कुठलाही असू द्या , धो धो पाऊस किंवा कडाक्याची थंडीतही अमरावतीच्या जगप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात भल्या पहाटे ४ वाजता बीटी उडी घेत . हा त्यांचा दिनक्रम कधीही चुकत नसे , मुंबई व नागपुरात विधिमंडळ अधिवेशना दरम्यान ते तेथील तलावात पोहत असे. कितीही महत्त्वाचे काम असो , त्यांच्या पोहण्यात खंड नसे . मुलींच्या लग्नाच्या दिवशीही ते पोहायला गेलेच आणि अगदी परवा १९ तारखेला ते जग सोडून सोडून गेले, त्यादिवशीही सकाळी ते पोहून आलेच .अनेक विषयातील ही शिस्त , नियमितता , वक्तशीरपणा आणि जगण्यावरची अव्यभिचारी निष्ठा बीटींना एकमेवाद्वितीय ठरवून गेला.
बीटींच्या अशा कथा सांगायच्या किती ? बीटी देशमुख कोणाबद्दल वावगं बोलताहेत , गॉसिप करताहेत, असं दृश्य कधीच दिसायचं नाही . आपलं जे काही म्हणणे आहे त्याविषयातील समग्र नियम , कायदे आणि तरतुदींचा अभ्यास करून ते मांडायचे, ”अभ्यासोनी प्रगटावे” हा त्यांचा शिरस्ता होता . वैयक्तिक गप्पातही ते लूज कधीच बोलत नसत. पत्रकारांनी एखाद्या विषयात प्रतिक्रिया वा माहिती मागितली तर ते फोनवर देत नसत. त्याला घरी बोलावत . त्याला व्यवस्थित समजावून सांगत आणि ते जे काही सांगत ते वाचून दाखवयाला सांगत . सार्वजनिक जीवनातील कोणत्याही मनुष्याने जाहीर भाषण , लेखन, प्रतिक्रिया देताना प्रत्येक शब्दाबाबत सजग असलं पाहिजे, आपण जे बोलतोय , तेच छापून आलं पाहिजे यासाठी ते कमालीचे आग्रही असतं.
२००९-१० चे वर्ष. अमरावतीत इंडिया बुलच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाविरुद्ध प्रचंड वातावरण तापलेले . शेतकऱ्यांच्या हक्काचे सिंचनाचे पाणी या प्रकल्पाला देण्याचा निर्णय झाल्याने बीटींनी त्याविरोधात मोहीम उघडली. सरकार प्रकल्पाच्या पाठीशी. मुख्यमंत्री विलासराव देशमुख , नंतर मुख्यमंत्री झालेले अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार , पालकमंत्री सारे इंडिया बुलच्या साथीला. अपवाद वगळता अमरावती जिल्हातील लोकप्रतिनिधीही विकले गेलेले . अशा परिस्थितीत बीटी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई लढले . या दरम्यान गुरुकुंज मोझरीत तीव्र आंदोलन झाले होते . लाठीचार्ज व गोळीबारही झाला. पुढेही ठिकठिकाणी तीव्र आंदोलन झालेत . पण या दरम्यान सरकार व प्रकल्पाची तरफदारी करणारे मंत्री व आमदारांविरुद्ध बीटी एक शब्दही कधी वावगे बोलले नाही. टीकाटिपणी केली नाही.
8888744796
………………………………………….
अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.









