-अविनाश दुधे
गेल्या वर्षी सरांच्या दीर्घ मुलाखतीसाठी मी त्यांच्या मागे लागलो. बीटींकडे गेलं की तीन चार तासांची गप्पांची मैफिल नेहमीची. लोकांचे , सार्वजनिक,प्रश्न , पाणी , सिंचन , अनुशेष सिंचन या विषयांवर ते भरभरून बोलायचे, या विषयांवर बोलताना त्यांना वेळेचा विसर पडायचा.
‘हे विषय महत्त्वाचे आहेच . पण मला तुमच्या आयुष्याची जडणघडण, तुमच्या आयुष्यात आलेली महत्त्वाची माणसं, ३० वर्षाच्या सांसदीय कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटना , तुमच्या वैयक्तिक आवडी -निवडी आदी गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत’, हा आग्रह प्रत्येक भेटीत मी करायचो. वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायला बीटी कधीच तयार नसायचे., स्वतःचा उदोउदो करायला त्यांना आवडायचे नाही . त्यामुळे प्रत्येक वेळी ते काही ना काही कारण सांगून टाळायचेत .
मात्र मी कनपटीलाच बसलो. ‘सर, तुमच्या एवढ्या दीर्घ सार्वजनिक आयुष्यात एकही Video Interview नाही. तुमच्यासाठी नाही तर किमान पुढील पिढीला बीटी कसे दिसत, कसे बोलत, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, माणसं हे समजायला हवं’ असा आग्रह मी धरला. दैनिक ‘जनमाध्यम’ चे संपादक प्रदीप देशपांडे व ज्येष्ठ विधिज्ञ किशोर देशपांडे यांनाही या महिमेत सामील करून घेतले.
नुटाचे पदाधिकारी , बीटी सरांचे स्नेही आमच्या प्रत्येक भेटीनंतर सरांच्या मुलाखतीचे तेवढे जमवा . खूप महत्त्वाचे documentation होईल असे सांगत . मध्यंतरी च्या काळात मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार , Sunil Tambeलेखक सुनील तांबे, मराठी भाषा ,अभ्यासक , संशोधक , सामाजिक कार्यकर्ते Deepak Pawar डॉ .दीपक पवार अमरावतीत आले तेव्हा, महाराष्ट्राची वाटचाल , जडणघडण समजून घ्यायची असेल तर बीटी सरांची एक दीर्घ मुलाखत घ्यायला हवी, असे त्यांनीही आग्रहाने सांगितले होते .
शेवटी माझ्या व प्रदीप देशपांडे यांच्या अनेक भेटीनंतर आमच्या मोहिमेला यश आले. बीटींनी होकार दिला. ‘मात्र आधी तू मला प्रश्नावली पाठव’ असे त्यांनी , त्यासाठी काय, काय वाचायचे हेही सांगितले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी काही दिवसातच प्रश्नावली तयार केली. त्यांना घरी नेऊन दिली. मेलवर टाकली. आता कधी बसायचं? मुलाखत कधी रेकॉर्ड करायची सांगा, असा पुन्हा आग्रह धरला. लवकरच बसू, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांनी फोन केला, तर तुझा दिवाळी अंक होऊ दे, मग बसू असे म्हणाले. नंतर माझं आजारपण आलं. त्यात काही दिवस गेले. त्यानंतर पुन्हा पाठपुरावा सुरु केला तेव्हा लवकरच कळवतो म्हणाले. पण मुलाखतीचा दिवस कधी उगवलाच नाही,
आता..आता ती मुलाखत कधीच होणार नाही.
………………………… …………………………
प्रा. बी . टी . देशमुख यांच्या मुलाखतीचे प्रश्न
-सर, जवळपास साडेआड दशकाच्या दीर्घ कालखंडाचे आपण साक्षीदार आहात. या कालावधीत खूप साऱ्या ऐतिहासिक घटना घडल्यात. देश स्वतंत्र झाला. देशाची नवनिर्मितीला सुरुवात झाली. देशाला आकार देणाऱ्या संस्थांची निर्मिती झाली. महाराष्ट्राची निर्मिती झाली. चार युद्धे झालीत…यापैकी कुठल्या घटनांचा ठसा तुमच्यावर उमटला?
— तुमच्या तारुण्याच्या , जडणघडणीच्या काळात खूप मोठी माणसं या देशात, महाराष्ट्रात होती. त्यापैकी गाडगेबाबा , डॉ. पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण अशा अनेकांसोबत आपला संबंध आला. त्यांच्या काय आठवणी आहेत?
(गाडगेबाबांचे कीर्तन, श्रद्धानंद हॉस्टेलच्या बाबांच्या आठवणी, यशवंतरावांसोबतचे चहापाणी)
-सर , १९८० ला आपण आमदार झालात . त्यानंतरचे तुमचे सार्वजनिक जीवन लोकांना बऱ्यापैकी माहित आहे . मात्र तुमचे गाव, तुमचे बालपण , घरातील परिस्थिती, शालेय जीवन , महाविद्यालयीन जीवन याबद्दल फारशी माहिती नाही . ती सांगा.
— शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली . साक्षात डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुखांनी तुम्हाला बोलावून घेतले होते . तो संपूर्ण प्रसंग आणि प्राध्यापक म्हणून तुमच्या कारकिर्दीबाबत सांगा
– वेळेच्या बाबत अतिशय काटेकोर असा तुमचा लौकिक आहे .अध्यापक असताना एक मिनिटही तुम्ही वर्गावर उशिरा जात नव्हते . सार्वजनिक जीवनातही वेळेबाबत तुमचा आग्रह आम्ही अनेकदा अनुभवला आहे. हा काटेकोरपणा आला कुठून?
-महाविद्यालयीन जीवनात तुमचे आदर्श , आयडॉल म्हणावेत अशी व्यक्तिमत्त्वं कोण होती ? त्यांच्या कुठल्या गुणवैशिट्यांचा तुमच्यावर प्रभाव पडला ?
-काही काळ तुम्ही पत्रकारिताही केली . त्याच्या काही आठवणी .. . शिवाजी महाविद्यालयात अध्यापक असताना तुम्ही पुस्तकही लिहिले . तुमच्याजवळ सांगण्यासारखं खूप काही असताना तुम्हाला पुस्तक , आत्मचरित्र लिहावं नाही का वाटलं?
-तुम्ही संयुक्त महाराष्ट्रवादी होते असे सांगितले जाते , ते खरे आहे काय ? त्याकाळात विदर्भात स्वतंत्र विदर्भ व्हावा असे वातावरण होते, ब्रिजलाल बियाणी , जांबुवंतराव धोटे व विदर्भातील अनेक दिग्गज नेते विदर्भाबाबत आग्रही असताना तुम्ही संयुक्त महाराष्ट्रवादी कसे?
-सर , १९९० ते २०१० अशी तब्बल ३० वर्षाची तुमची कारकीर्द ऐतिहासिक ठरली . आज सभागृहात धिंगाणा घालून , अचकट , विचकट बोलून प्रसिद्धी मिळवण्यात मातब्बरी समजली जाते . असे असताना या एवढ्या वर्षात सांसदीय आयुधांचा वापर करून तुम्ही अनेक प्रश्न मार्गी लावलेत ? हे कसं शक्य केलं?
– तुमच्या काळात सांसदीय प्रथा परंपरांचे पालन करणारे , आदर करणारे राज्यकर्ते होते , सभापती , अध्यक्ष होते . मात्र आज साराच आनंदीआनंद आहे .अशा परिस्थितीत नवीन निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना तुम्ही काय सांगाल?
-सर , ३० वर्षाच्या तुमच्या सांसदीय कारकिर्दीत वसंतदादा पाटील , शरद पवार , शंकरराव चव्हाण , अंतुले, सुधाकरराव नाईक , मनोहर जोशी , नारायण राणे सुशीलकुमार शिंदे विलासराव देशमुख , अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण असे अनेक मातब्बर मुख्यमंत्री पाहिले, अनेक अभ्यासू मंत्रीही आणि विरोधी पक्षनेतेही पाहिलेत या सर्वांच्या कार्यशैलीचे काय वेगळेपण सांगता येईल?
-सर , आज आमदार निवडून आला की दुसऱ्या महिन्यात त्यांच्या ढुंगाणाखाली Innova येते . विधिमंडळ अधिवेशनादरम्यान हॉटेलशिवाय तो राहत नाही. या पार्श्वभूमीवर खूप त्यागी , साधी राहणीमान असलेले लोकप्रतिनिधी तुम्ही पाहिले आहेत . तुम्ही स्वतःही त्यापैकी एक आहात. अशा काही लोकप्रतिनिधींच्या आठवणी …
सर , तुम्ही आमदार असताना २००४ च्या निवडणुकीदरम्यान ‘माझे आर्थिक जीवन’ असा एक लेखाजोगा प्रकाशित केला होता. आपल्याकडे आलेला प्रत्येक पैसा कुठून आला आणि त्याचा विनियोग कसा केला हे अतिशय सविस्तरपणे तुम्ही लोकांसमोर मांडले होते . हे असे का करावे वाटले . कोणीही अशी मागणी केली नसताना तुम्हाला हे का करावे वाटले?
-सर , तुम्ही आमदार झालात तेव्हा महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन आणि त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा फारच तोकड्या होत्या . मात्र तुमच्या ३० वर्षाच्या कार्यकाळात तुमच्या सततच्या पाठपुराव्याने महाविद्यालयीन शिक्षक /प्राध्यापक हे गलेलठ्ठ पगार घेणारी जमात झाली आहे . तुम्ही याना नको तेवढे लाडावून ठेवलेत. या वर्गाला शिक्षणाबद्दल ,ज्ञानाबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी, प्रेम तर नाहीच पण सामाजिक प्रश्नांबाबतही यांना काही देणेघेणे नसते . एक आत्ममग्न जमात तुम्ही तयार केली , असा आरोप तुमच्यावर होतोय .
-तुम्ही तुमच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लावलीत . तुम्हाला स्वतःला समाधान वाटते अशी कुठली कामे आहेत? आणि जी कामे करायची राहून गेलीत ती कोणती आहेत?
– तुम्ही तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडीबद्दल बोलत नाही . सांगत नाही . पण तुम्हाला सांगीत , चित्रपट , खेळ काय -काय आवडतं? या क्षेत्रातील तुमच्या आवडीचे कलाकार , खेळाडू कोण आहेत ?
– एवढे दीर्घ आयुष्य जगल्यावर माणसाच्या आयुष्याला आकार देण्यात प्रयत्न , मेहनतीसोबत नियती, नशिबाचाही मोठा रोल असतो असे आपणास वाटते का?
– साडे आठ दशकाच्या तुमच्या कार्यकाळात सर्वच क्षेत्रात झालेले बदल तुम्ही अतिशय बारकाईने अनुभवलेत. या एवढ्या वर्षात Civilization च्या सर्वोत्तम अवस्थेत माणूस पोहोचला आहे की त्याचे अधःपतन होत आहे , आपणास काय वाटते?
(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )
8888744796
………………………………………….
अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.








