‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२५
-सानिया भालेराव
क्वांटम फिजिक्स, मल्टिपल रिअॅलिटी, मॅनिफेस्टेशन आणि त्यामागचं विज्ञान हा एक फार इंटरेस्टिंग विषय. क्वांटम लिव्हिंग विषयावर वाचताना, शिकताना, अनुभवताना हे प्रकर्षाने जाणवतं की आपलं जीवन हे केवळ एक सरळ रेषेत चालणारं, ठरवून ठेवलेलं वास्तव नसून, ते अनंत शक्यतांनी भरलेलं एक अद्भुत विश्व आहे. क्वांटम फिजिक्स आपल्याला सांगतं की आपल्या आजूबाजूला असंख्य शक्यता एकाचवेळी अस्तित्वात असतात आणि आपण ज्या शक्यतेवर लक्ष केंद्रित करतो, तीच शक्यता प्रत्यक्ष वास्तव म्हणून आकार घेते.
अल्बर्ट आईन्स्टाईनने एकदा म्हटलं होतं – “Reality is merely an illusion, albeit a very persistent one.” म्हणजे वास्तव हा एक भास आहे, फक्त तो आपल्याला फार ठाम वाटतो. हे वाक्य वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात ना? . कारण आपण जे वास्तव मानतो ते सुद्धा आपल्या धारणांवर, आपल्या ऑब्झर्वेशनवर , आपल्या भावनांवर अवलंबून असतं. आपण ते बदललं तर मग वास्तव पण बदलू शकेल का? कदाचित वेड्यासारखा हा प्रश्न आहे, असं तुम्हाला वाटू शकेल, पण ज्यांनी केवळ विचारांनी आपण आपल्या भावना बदलू शकतो हे अनुभवलं असेल त्यांना कदाचित यात तथ्य वाटू शकतं. वास्तव हे एक स्थिर, अपरिवर्तनीय ठोकळा नाही, तर एक गतिशील क्षेत्र आहे ज्याला आपले विचार, भावना आणि लक्ष आकार देतात. आणि हाच क्वांटम लिव्हिंगचा बेसिक फंडा आहे.
पारंपरिक न्यूटोनियन भौतिकशास्त्र आपल्याला शिकवतं की कारण आणि परिणाम या चौकटीत जग घडतं. पण क्वांटम फिजिक्स या मर्यादित चौकटीपलीकडे जाऊन सांगतं की आपण आपल्या विचारांनी आणि भावनांनी परिणाम आधीच ठरवू शकतो. याचं सुंदर उदाहरण म्हणजे प्रसिद्ध Double Slit Experiment. इलेक्ट्रॉन्स कधी पार्टिकल, तर कधी वेव्ह म्हणून वागतात. पण ते ठरतं निरीक्षकाच्या उपस्थितीवर. यालाच ऑब्जर्व्हर इफेक्ट म्हणतात . म्हणजेच आपलं लक्ष कुठे आहे, यावर वास्तव अवलंबून असतं. याचा थेट अर्थ – जगात अनंत शक्यता आहेत, आपण ज्या शक्यतेवर फोकस करतो, तीच आपल्या आयुष्यात साकार होते. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे आणि जर असं असतं तर आपण सगळेच एकदम सुकर आणि आपल्याला हवं तसं आयुष्य जगू शकू. हे असं विज्ञान कसं असू शकेल? तर ही गोष्ट फक्त विज्ञानापुरती मर्यादित नाही. जर थोडं खोलात शिरलात तर आपल्या रोजच्या अनुभवातही हे दिसून येतं. आपण ज्या विचारांत जास्त वेळ घालवतो, ज्या भावनांमध्ये बुडून जातो, तसेच अनुभव वारंवार आपल्यासमोर येतात. उदाहरणार्थ, जर एखादा मनुष्य सतत स्वतःला अपयशी समजत राहिला, तर त्याच्यासमोर सतत अपयशाचीच दारं उघडतात. उलट जर त्याने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला सुरुवात केली, तर त्याच्यासाठी यशस्वी संधी निर्माण होऊ लागतात.
हे ऐकायला जादूई वाटेल, पण यामागे ठोस वैज्ञानिक आधार आहे. डॉ. जो डिस्पेन्झा म्हणतात – “Your personality creates your personal reality.” तुमचं व्यक्तिमत्त्वच तुमचं वास्तव निर्माण करतं. त्यांच्या संशोधनानुसार, आपले विचार, भावना, सवयी, आणि त्यातून तयार होणारे न्यूरल पॅटर्न्स यांचा आपल्या आयुष्यावर थेट परिणाम होतो. आपण जर आपले भावनिक वर्तन बदललं, तर आपले मेंदूतले न्यूरल पाथवेज बदलतात, ऊर्जा बदलते आणि आपण एक नवीन वास्तव निर्माण करू शकतो.
ही गोष्ट फक्त थिअरी नाही, तर प्रयोगातून सिद्ध झालेली आहे. आज न्यूरोप्लास्टिसिटीवर होणारे संशोधन स्पष्ट सांगतं की मेंदू आयुष्यभर बदलत राहू शकतो. पूर्वी शास्त्रज्ञांचा समज होता की ठराविक वयानंतर मेंदू आणि नुरोन्सचं जाळं बदलत नाही. पण आज विज्ञान सांगतं की प्रत्येक नव्या अनुभवाने, नव्या सवयींनी, नव्या भावनांनी आपले मेंदूतले पॅटर्न्स बदलतात. म्हणूनच आपले विचार बदलले, तर आपलं वास्तव बदलणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की – एखादी छोटीशी गोष्ट जर मनाला लागली, तर आपण दिवसभर त्याच विचारांमध्ये अडकून राहतो. आणि नंतर आपल्या समोर तशाच घटना, त्याच पद्धतीचे प्रसंग उभे राहतात. हाच तो वायब्रेशनल मॅच. म्हणूनच उर्जा शिफ्ट करणं, विचार बदलणं, ‘पिव्होटिंग’ करणं फार महत्त्वाचं आहे.
आता तुम्ही म्हणाल की बाई, हे पिव्होटिंग म्हणजे काय तर याचा अर्थ विचाराला वेगळी दिशा देणं.
उदाहरणार्थ, नकारात्मक अनुभव आला की आपण लगेच त्याच्यात गुरफटून जायला लागतो. पण त्या क्षणी आपण सजग झालो आणि विचार केला की यातून काय शिकता येईल, किंवा दुसरी सकारात्मक बाजू काय असू शकते, तर ऊर्जा लगेच बदलते. ही ऊर्जा बदलली की वास्तवही बदलू लागतं. जसं की, एखाद्या मुलाखतीत अपयश आलं, तर बहुतेक लोकं स्वतःला दोष द्यायला लागतात. पण जर त्याच अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहिलं, तर तीच ऊर्जा पुढच्या संधीला यशात परिवर्तित करू शकते.
आजकाल सर्वत्र लॉ ऑफ अॅट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ अॅसम्प्शन यावर चर्चा ऐकायला मिळते. बरेच लोकं म्हणतात की हे फक्त मानसिक खेळ आहेत. पण खरं विज्ञान पाहिलं तर यामागे क्वांटम फिजिक्सचा ऑब्झर्व्हर इफेक्ट काम करत असतो. आपण जे पाहतो, ज्या दृष्टीकोनातून पाहतो, त्यावरच ते वास्तव ठरतं. म्हणजेच लॉ ऑफ अॅट्रॅक्शन ही काही गूढ गोष्ट नाही, तर विज्ञान आणि अध्यात्माचा सुंदर संगम आहे.
नेव्हिल गॉडर्ड यांनी म्हटलं आहे – “Imagination creates reality.” कल्पनाशक्ती वास्तव निर्माण करते. त्यांचा विश्वास असा की केवळ विचार बदलून काही होत नाही, पण त्या विचाराला भावनिक आधार दिला, जणू ती गोष्ट आधीच घडली आहे असा अनुभव घेतला – तर ती गोष्ट खूप वेगाने वास्तवात साकार होते.
उदाहरणार्थ, आपण एखादं स्वप्नं पाहतो की मला एक सुंदर घर हवं आहे. पण आपण त्याचं फक्त चित्र डोक्यात ठेवून थांबलो, तर त्याचा काही उपयोग नाही. उलट जर आपण रोज त्या घरात राहतोय, त्या घराच्या वातावरणात श्वास घेतोय अशी अनुभूती घेतली, तर मन आणि शरीर एकाच लहरींवर येतात. आणि युनिव्हर्स त्या लहरींना प्रतिसाद देतं.
यावर एकहार्ट टॉले म्हणतात – “Realize deeply that the present moment is all you have. Make the NOW the primary focus of your life.” सखोलपणे समजून घ्या की तुमच्याकडे फक्त हा क्षण आहे. तुमच्या आयुष्याचा प्राथमिक केंद्रबिंदू हा वर्तमान क्षण असू द्या. क्वांटम लिव्हिंग म्हणजे हाच “NOW” – आत्ताच्या क्षणात सजगतेने जगणं, आपल्या उर्जेचं भान ठेवणं म्हणजे क्वांटम लिव्हिंग.
बर्याचदा आपण भविष्याची चिंता करत राहतो किंवा भूतकाळाच्या आठवणीत गुरफटून जातो. पण खरं आयुष्य हा फक्त हा आत्ताचा क्षण आहे. या क्षणात आपण जसं विचार करतो, जशी भावना बाळगतो, तसं भविष्य घडतं. म्हणून वर्तमान क्षणाची जाणीव ही क्वांटम लिव्हिंगमधली किल्ली आहे.
बर्याचदा आपण विचार करतो की “हे माझ्याच बाबतीत का घडतंय?” आणि आपण प्रतिक्रिया देत राहतो. पण क्वांटम लिव्हिंग शिकवतं की प्रश्न बदलून विचार – “मी यातून काय शिकतेय?” प्रतिक्रिया देणं म्हणजे भूतकाळाच्या आधारावर वागणं, तर प्रतिसाद देणं म्हणजे सजगतेने नवी दृष्टी निवडणं. हीच शिफ्ट आपल्या आयुष्यात नवीन दारं उघडते.
एक छोटासा बदल – “का मी?” ऐवजी “यातून मला काय शिकायला मिळतंय ?” – हा आपल्या उर्जेला वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर नेतो. आणि ती फ्रिक्वेन्सीच नवं वास्तव निर्माण करते. जीवनातील प्रत्येक संकट ही एका नव्या संधीची बीजं असतात. आपण या बीजाला कस खतपाणी घालतो त्यानुसार त्याचा बहर ठरतो. .
हे फक्त विज्ञान नाही, ही एक जीवनपद्धती आहे. सजगतेने विचार करणं, उर्जेचं भान ठेवणं, अनंत शक्यतांना स्वीकारणं – हे क्वांटम लिव्हिंगचं सार आहे. “Where focus goes, energy flows,” असं म्हणतात. आपण जिथे लक्ष देतो, तिथेच ऊर्जा वाहते. जर लक्ष दुःखावर असेल तर दुःख वाढतं, जर लक्ष शक्यतांवर असेल तर त्या उमलतात. त्यामुळे लक्ष्याची निवड ही सर्वात महत्त्वाची आहे. आणि हा चॉईस आपल्याकडे आहे. ही सर्वात महत्वाची बाब.
सराव अवघड नाही. रोज काही मिनिटं ध्यान करा, आपल्या ध्येयाची अनुभूती घ्या. जणू ते आधीच घडलंय. नकारात्मक विचार आला की लगेच पिव्होट करा आणि सकारात्मकतेकडे वळा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार माना. कारण “Gratitude is the highest frequency” – कृतज्ञता ही सर्वात उच्च फ्रिक्वेन्सी आहे. कृतज्ञतेने आपण आपलं लक्ष कमतरतेवरून समृद्धीकडे वळवतो. आणि हीच वळणं वास्तव बदलवतं.
जगण्याचा हा दृष्टीकोन आपल्या रोजच्या आयुष्यात फरक घडवतो. कामावर एखादी अडचण आली, घरी मतभेद झाले – आपण जर डिफॉल्ट मोडमध्ये प्रतिक्रिया दिली, तर तसंच चक्र चालू राहतं. पण जर सजगतेने शांत झालो, श्वासावर लक्ष दिलं आणि मग प्रतिसाद दिला, तर तेच क्षण वेगळा अनुभव बनतो.
हे क्षणागणिक सरावाने शक्य होतं. एकेक दिवस आपण अधिक सजग, अधिक शांत, अधिक संतुलित होऊ लागतो. हळूहळू आपल्यातली ऊर्जा इतकी बदलते की आपल्यासमोरच्या परिस्थितीचं रूप पालटायला लागतं.
एकदा विचार करून बघा – फेसबुकच्या अल्गोरिदमसारखंच आहे आपलं आयुष्य. तुम्ही ज्या पोस्टवर जास्त वेळ देता, ज्या लाईक करता, कमेंट करता, त्याच पोस्ट्स पुढं पुन्हा पुन्हा दिसतात. आणि ज्या पोस्टकडे तुम्ही लक्षच देत नाही, त्या हळूहळू तुमच्या फीडमधून गायब होतात. हेच नेमकं आपल्या आयुष्याबद्दल खरं आहे. आपण ज्या विचारांवर, ज्या भावनांवर, ज्या घटनांवर जास्त लक्ष देतो, त्या आपल्या वास्तवात पुन्हा पुन्हा येतात. म्हणूनच सतत समस्या, त्रास, नकारात्मकतेवर लक्ष दिलं, तर तेच अनुभव पुन्हा आपल्याला मिळतात. उलट जर आपण सजगपणे ठरवलं की लक्ष सकारात्मकतेकडे, शक्यतांकडे आणि आपल्याला हवंय तिथं द्यायचं, तर आयुष्यही तसंच आकार घेतं.
क्वांटम लिव्हिंग हाच तर मुद्दा सांगतं . याचं पुढचं पाऊल म्हणजे – “What you focus on expands.” हे वाक्य साधं आहे पण फार मोठं सत्य सांगतं. आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, त्या वाढतात. नकारात्मकतेवर लक्ष दिलं, तर तीच मोठी वाटते. सकारात्मकतेवर लक्ष दिलं, तर तिचं फुलं उमलतात. अगदी पेरणीसारखं – बी कसं आहे यावर सगळं अवलंबून.
आणखी एक गहन वाक्य आहे – “Life is not happening to you, life is responding to you.” आयुष्य उलगडत नाही , ते आपल्याला उत्तर देतं. आपण आतून जे स्पंदन, विचार आणि विश्वास ठेवतो , त्यावर आपल्याला प्रतिसाद मिळतो. जर तुम्ही सतत म्हणत बसलात की “माझ्यासोबतच असं का घडतं?”, तर आयुष्य त्याचे आणखी पुरावे देत राहील. पण जर तुम्ही विचारलंत की “यातून मी काय शिकू शकते आणि पुढे काय निर्माण करू शकते?”, तर आयुष्य तुमच्याशी सहकार्य करायला सुरुवात करतं. आहे की नाही हि अमेझिंग गोष्ट.
म्हणजे शेवटी आपल्या हातात आहे – कोणत्या विचारांना आपल्याला वाढवायचं आहे. फेसबुक फीडसारखंच आयुष्याचं फीड आपण क्युरेट करू शकतो. ज्या भावनांना, गोष्टींना, विचारांना, परिणामांना दुर्लक्षित करायचं, ते आपोआप गायब होऊ शकतात आणि ज्या विचारांना, भावनांना आपण मनाच्या स्पेसमध्ये जागा देतो, तेच आपल्या वास्तवाचं रूप घेतात.
वेन डायर म्हणतात – “Change the way you look at things and the things you look at change.” ज्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन तुम्ही बदलता, त्या गोष्टी स्वतः बदलतात. हेच क्वांटम लिव्हिंगचं खरं तत्त्व आहे.
लेख संपवताना मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. आयुष्यात कधी काही वाईट घडलं की आपल्याला आपोआप तोंडातून निघतं – “का माझ्याच बाबतीत?” पण खरं सांगायचं तर आयुष्य हे अनुभूतीसाठी आहे. प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग हा आपल्याला काहीतरी सांगत असतो. फक्त त्या क्षणी आपण ते पाहू शकतो का नाही यावर आपण त्याकडे कसं बघतो हे अवलंबून असतं. खूपदा, मागे वळून बघितलं, की लक्षात येतं – जिथं आपल्याला तुटल्यासारखं वाटलं होतं, तिथंच आपण खरं तर घडत होतो.
आलेला प्रसंग अद्दल घडवण्यासाठी किंवा वेदना देण्यासाठी नाही, तर काहीतरी अमूल्य शिकवायला आला होता. जर तुम्ही स्वतःमध्ये थोडं आत शिरलात, तर कदाचित एखादा लिमिटिंग बिलीफ सापडेल किंवा एखादा असा थॉट पॅटर्न गवसेल जो नकळत रेझिस्टन्स निर्माण करत असतो आपल्या इच्छापूर्तीच्या मार्गात. आणि एकदा का तो लिमिटिंग बिलीफ आपल्याला गवसला , की बदलाची प्रक्रिया सुरू होते.
जर आपण तो “का?” हा प्रश्न बदलून “मी यातून काय शिकतेय?” असा विचार केला, तर त्या वेदनेतूनही काहीतरी नवीन उमलतं. तीच घटना मग त्रास न राहता वाढीचं साधन बनते. आपल्याला बळकट करते, सजग करते आणि आतून थोडं थोडं घडवत जाते.
संकट म्हणजे शेवट नसतो. खरं तर तो एक नवा प्रारंभ असतो. एखादं दार बंद होतं, म्हणजे दुसरं कुठंतरी मोठं दार उघडतं. आपल्याला वाटतं सगळं संपलंय, पण प्रत्यक्षात विश्व आपल्याला एका वेगळ्या रस्त्यावर नेत असतं. क्वांटम लिव्हिंग हीच तर गोष्ट शिकवतं – आलेल्या प्रसंगात दडलेला धडा ओळखा, कारण प्रत्येक घटना ही तुमच्यासाठी वाढीचं पाऊल आहे.
आयुष्य आपल्या विचारांना, भावनांना, स्पंदनांना प्रतिसाद देतं. आपण आतून जे बी पेरतो, त्याचं फळ आपल्याला मिळतं. विचार म्हणजे बी, भावना म्हणजे ऊर्जा आणि कल्पनाशक्ती म्हणजे पाणी. हे तिघं मिळून आपलं भविष्य घडवतं. भीती पेरली तर चिंता वाढते, पण कृतज्ञता पेरली तर आनंदाचं झाड उमलतं.
एकदा करून बघा– रोज सकाळी उठून जर आपण फक्त तीन छोट्या गोष्टींसाठी मनापासून “थँक यू” म्हटलं, तर दिवस वेगळा सुरू होतो. आणि असं करत करत नकळत लक्ष तक्रारींपासून कृतज्ञतेकडे वळतं. जिथं लक्ष जातं, तिथं ऊर्जा वाहते. आणि जिथं ऊर्जा जाते, तिथं वास्तव बदलतं.
मला म्हणूनच वाटतं की आयुष्य आरशासारखं आहे. जर सतत म्हणाल की “माझ्याच बाबतीत वाईट का होतं?”, तर तोच प्रतिबिंब पुन्हा पुन्हा दिसतं. पण जर माझ्या आयुष्यात या चांगल्या गोष्टी आहे आणि मला हे दिल्याबद्दल मी निर्मिकाचा आभारी आहे असं तुम्ही म्हणालात तर बघा तो दिवस किती छान जातो ते..
मग खरी ताकद कुठं आहे? वास्तव आपल्या हातामध्ये याची जाणीव, आधी आत बदल घडवायचा आहे मग बाहेरचं विश्व आपोआप बदलतं याची समज येणं ही खरी ताकद आहे.
म्हणूनच स्वतःशी संवाद महत्वाचा. आपल्या हातात आहे वास्तव घडवायची ताकद! निवड आपण करू शकतो – दुःखाचं गाणं गात बसणार की शक्यतांची नवी सिम्फनी वाजवणार? हे आपल्या हातात आहे. आणि ज्याला ही निवड करता येते तो आपल्या कल्पनांना अस्तित्वात आणू शकतो.
शेवटी एवढंच म्हणेन – जर हा लेख तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, तर समजा हा योगायोग नाही. हा युनिव्हर्सचं संकेत आहे. तुमची फ्रिक्वेन्सी आता सकारात्मकतेकडे वळते आहे. फक्त दृष्टीकोन बदला , बाकीचं विश्व आधीच तुमच्यासाठी बदलायला तयार राहील.
(लेखिका संशोधक , ब्लॉगर व चित्रपट समीक्षक आहेत.)
8408886126










