किल्ल्यांनो, गडकोटांनो तुम्ही तेव्हाच बेचिराख व्हायला हवं होतं…

– समीर गायकवाड

किल्ल्यांनो, गडकोटांनो तुम्ही तेंव्हाच बेचिराख व्हायला हवं होतं कारण … कारण… तुमचा पोशिंदा आता हयात नाहीये..
त्यांचे पोशिंदे असलेले शिवबाराजे आपल्या किल्ल्यांची किंमत जाणून होते. किल्ल्यांवर त्यांनी जीवापाड प्रेम केले होते. .
शिवराय म्हणजे गडकोट, स्वराज्य म्हणजे गडकोट आणि गडकोट म्हणजे रयत !
हे समीकरण इतिहासाने आपल्या सर्वांच्या मस्तकात असं भिनवलंय की गडकोट हा शब्द उच्चारताच शिवराय आठवतात, झुंजार रणमर्द मावळे आठवतात ! लढाऊ मराठ्यांचा तेजस्वी इतिहास डोळ्यासमोर येतो.

हे सर्व आता लिहिण्याचे कारण म्हणजे काही किल्ले विकासासाठी भाडोत्री वा तत्सम तत्वावर देण्याचा सरकारचा तथाकथित निर्णय आणि त्यावरून सुरु असलेली धुळवड ! सरकारने हा निर्णय रद्दबातल झाल्याची कोणतीही स्पष्ट घोषणा केलेली नाही. यावर सफाई देताना सरकारकडून असं सांगितलं गेलंय की वर्ग एक मधील कोणत्याही किल्ल्यांना सरकार हात लावणार नाही. स्वराज्य व शिवराय यांचा थेट संबंध नसलेल्या वर्ग दोन मधील किल्ल्यांबद्दलच नवे धोरण असेल. या किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी आणि त्यांची निगा राखण्यासाठी सरकार हे किल्ले विकसनासाठी देणार आहे.

हा निर्णय अन्य कोणत्याही पक्षाच्या सरकारने घेतला असता तर आता सत्तेत असलेल्या पक्षांनी किती गहजब केला असता याचा अंदाज लावता येत नाही. असो. सरकार चालवायचे म्हणजे अनेक तडजोडी कराव्या लागतात.
तर सरकारचं असं म्हणणं आहे की या किल्ल्यांच्या संवर्धनासाठीच हे करावं लागतंय.

तर मित्रहो आपण जरा शिवकाळात जाऊन पाहू या, गडकोटांच्या संवर्धनासाठी तेंव्हा शिवरायांनी काय केलं होतं याचा मागोवा घेऊया.
शिवबांनी किल्ले कसे जिंकले, त्यांची पुनर्निर्मिती कशी केली, जीर्णोद्धार कसा केला याचे अनेक दाखले इतिहासात आहेत. स्वराज्यात दाखल झालेल्या प्रत्येक किल्ल्याची देखभाल करण्यासाठी त्यांची निगा राखण्यासाठी महाराज स्वतः लक्ष घालत होते.

सोबत शिवबांचे एक पत्र दिले आहे, ज्यात त्यांनी एक तहनामा केला आहे. यानुसार राजांनी १७५००० होन इतकी रक्कम किल्ल्यांच्या डागडुजीसाठी, उभारणीसाठी अदा केली आहे. कोणत्या किल्ल्याला किती रक्कम खर्च करायची याची आकडेवारी दिली आहे. रायगडसारख्या किल्ल्यास मोठ्या रकमेची तजवीज करताना ती रक्कम कोणत्या कामासाठी खर्च करावी याचे तपशीलही दिले आहेत.

आता शिवराय नाहीत. स्वराज्यही नाही. मग या किल्ल्यांचे संवर्धन, डागडुजी आणि निगा राखण्याचे काम कुणाचे ? यासाठी लागणारा संपूर्ण निधी देण्याची जबाबदारी कुणाची ? त्यासाठी कोणते नैतिक मार्ग अवलंबले पाहिजेत ? हे प्रश्न ज्याने त्याने स्वतःला विचारावेत !

मुंबईतील मंत्र्यांच्या दालनापासून ते गल्लीतल्या नगरसेवकाच्या कार्यालयासाठी खर्चायला मुबलक पैसे आहेत आणि किल्ल्यांसाठी पुरेसे पैसे नाहीत यात सरकारचा काहीच दोष नाही, दोष स्वराज्याचा आणि या किल्ल्यांचा आहे, कारण यांच्यासाठी लक्षावधी होन खर्ची घालणारा लाखांचा पोशिंदा आता उरला नाही. उरलाय तो त्यांच्या नावाचा वापर !

माझी सरकारविरुद्ध आणि सरकारमधील राजकीय पक्षांविरुद्ध कसलीही तक्रार नाहीये. माझी तक्रार त्या किल्ल्यांविरुद्ध आहे, त्यांनी केंव्हाच नेस्तनाबूत व्हायला हवं होतं. त्यांचा पोशिंदा गेला तेंव्हाच ते धुळीस मिळाले असते तर आज त्यांच्यावर ही नौबत आली नसती..

________________________________________________

पत्राच्या प्रारंभी शिवमुद्रा आहे-
प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुविश्व वंदिता। शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।

मजकूर –

जाबिता तह सन इमारती करणे सन इसने कारणे
इमारती करावयाचा तह केला असे
की गबाल हुनरबंद लावून
पैसा पावत नाही. हुनरबंद
गवगवा करीता काम करत नाहीत या
बदल यैसा तह केला की नेमस्तच इमारती
करावी

. . . होनू
. .. १७५०००
. .. मार येक लाख पचाहत्तरी हजार
.. . होनु रास

५०००० – रायगड
.. ३५००० दीवा घरे
.. … २०००० – तळी
.. ..१०००० – गच्ची
.. .. ५००० – केले
.. _________
.. .. ३५००० –
.. १५००० – तट
.. ________
.. ५००००

१०००० – ** गड
१०००० – सीधुदुर्ग
१०००० – वीजयेदुर्ग
१०००० सुवर्णदुर्ग
१०००० – प्रतापगड
१०००० – पुरधर
१०००० – राजगड

{ पत्राच्या फोटोच्या दुसऱ्या भागातील मजकूर- (पत्र एकच आहे. त्याचे दोन फोटोत विभाजन केले आहे) }
५००० – प्रचंडगड
५००० – प्रसीधगड
५००० – विशाळगड
५००० – महिपतगड
५००० – सुधागड
५००० – लोहगड
५००० – सबलगड
५००० – श्रीवर्धनगड व मनरंजन
३००० – कोरोगड
२००० – सारसगड
२००० – महीधरगड
१००० – मनोहरगड
७००० – कीरकोल
_____________

१७५०००

येणेप्रमाणे एक लाख पच्छाहत्तरी
हजार होनु खर्च करणे मोर्तब सुद

(येथे मोर्तबाचा शिक्का उमटवला आहे – ज्याचा मजकूर आहे : मर्यादेयं विराजते )

दस्तुर राजश्री पंत म्हणुन
सग्रह केला.

_________________________________________________

टीप – हे पत्र कोल्हापूर पुरालेखागार, पंत अमात्य बावडा दफ्तर येथे उपलब्ध आहे.
खेरीज राजवाडे खंड आठ, अनुक्रमांक २२ वरतीही हे पत्र उपलब्ध आहे
पत्राचा कालावधी इसवीसन १६७१ – १६७२ या दरम्यानचा आहे.

 

(लेखक नामवंत स्तंभलेखक आहेत)

83809 73977

हे सुद्धा अवश्य वाचा-  जेव्हा महाराष्ट्र महाराजांचाच पराभव करतो- http://bit.ly/2k7jS8u

Previous article‘चांद्रयान-2’ मोहीम-Journalism vs Jingoism (अंधराष्ट्रवाद)
Next articleचार्ली चॅप्लीनचे लेकीस पत्र
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here