कौशल्याचा पॅसिफिक : डॉक्टर प्रशांत कसारे

 संतोष अरसोड
   अलीकडे डॉक्टर म्हटलं की काही अपवाद वगळता सर्वसामान्य जनता फारसं चांगलं बोलताना आढळत नाही . त्याची कारणेही वेगवेगळी आहेत.आरोग्यसेवेचे कवडीचेही ज्ञान नसलेल्या काही आर्थिक गुंडांनी मोठमोठे कार्पोरेट दवाखाने उभे केले आहेत. या कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये काम करणारा डॉक्टर अक्षरश: मजुरासारखा राबत असतो. कार्पोरेट हॉस्पिटल संचालकांच्या पापाचे वाटेकरी मग डॉक्टर वर होतात. अशा वेळेला सेवेलाच प्राधान्य देणारे डॉक्टरांना सुद्धा   आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जातात.वैद्यकीय व्यवसाय एकीकडे असा बदनाम होत असताना सामान्य माणसाची यात मोठ्या प्रमाणात लुट होते . डॉक्टर व एकंदरीतच वैद्यकीय व्यवसायाबद्दल असं अविश्वासाचं वातावरण सर्वत्र असताना या अंधारछायेत काही पणत्या मात्र प्रकाश देताना आपणास दिसतात. या प्रकाशाचे ते कधीही भांडवल करत नाही.केवळ पैसा कमावण्यासाठी व्यवसाय नसून व्यवसायातून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे याचे अचूक निदान करणारे काही डॉक्टर आपणाला सभोवताली  दिसतात. यवतमाळ येथील भूमिपुत्र डॉक्टर प्रशांत गणपतराव कसारे हे त्यातीलच एक नाव.सामाजिक भान ठासून भरलेला हा तरुण डॉक्टर यवतमाळच्या सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व साहित्य जगतातील एक महत्त्वाचं नाव आहे. वंचितांच्या वेदना दूर करू पाहणारा हा उमदा डॉक्टर समाजाची रक्तवाहिनी होत आहे.
       डॉक्टर प्रशांत कसारे हे यवतमाळ येथील नामवंत आर्थोपेडीक सर्जन आहेत. आर्थोपेडीक सर्जन व्हावे हे स्वप्न त्यांनी लहानपणीच पाहिले होते.सहावीत  असताना पहिल्या मजल्यावरून ते खाली पडले, त्याच दिवशी त्यांनी असे ठरवले की मला याच क्षेत्रात करिअर करायचे आहे. रुग्ण वेदनेने तळमळत असताना त्या  अवस्थेमध्ये रुग्णांना वेदनेतून मुक्ती देण्यात जो आनंद असतो तो आनंद फार वेगळा असतो. आर्थिक स्थिती फारशी मजबूत नसतानाही डॉक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांच्या वडिलांनी पूर्ण केले. वेगवेगळ्या बँकांचे कर्ज घेऊन वडिलांनी प्रशांत यांना डॉक्टर केले.  डॉक्टरांनी आपल्या शिक्षणादरम्यान आपल्या क्षेत्रातील अद्यावत ज्ञान प्राप्त करण्याला प्राथमिकता दिली.  या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर बी.बी. जोशी हे त्यांचे आदर्श आहेत. आपलं कौशल्य दिवसागणिक अधिक विकसित व्हावे म्हणून त्यांनी देशाच्या विविध भागांमध्ये डॉक्टर म्हणून महत्त्वपूर्ण सेवा दिली आहे. या साऱ्या ज्ञानाचा वापर जिल्ह्यातील लोकांसाठी करावा या भावनेतून त्यांनी आपल्या सेवेचे क्षेत्र म्हणून यवतमाळ जिल्ह्याची निवड केली.
          रुग्णसेवेला प्रारंभ केल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या ज्ञानाची कसोटी पाहणारा एक प्रसंग  त्यांच्या आयुष्यात आला .अकील खान नावाचा २२ वर्षांचा एक तरुण.  लाकूड कापण्याच्या  मशीनमध्ये हात अडकून त्याचा हात तुटला होता. रक्तबंबाळ अवस्थेत अकील याला डॉक्टर कसारे यांच्याकडे आणण्यात आले. त्याची परिस्थिती पाहताच ती गंभीर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले . अकीलच्या जगण्याच्या वाटा प्रशस्त केल्या पाहिजे एवढेच आव्हान या वेळी डॉक्टर कसारे यांच्यापुढे होते. त्याच्या आर्थिक परिस्थितीची कुठलीही चौकशी न करता केवळ आणि केवळ अकीलला अपंगत्व येऊ न देण्याच्या भावनेतून त्यांनी उपचार सुरू केले. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला, तपासणी झाली अशातच एक रक्तवाहिनी शाबूत असल्याचे डॉक्टर प्रशांत यांच्या लक्षात आले.काहीही झाले तरी अकीलचा हात जोडणारच या भावनेतून डॉक्टर प्रशांत यांनी तब्बल अडीच तास शस्त्रक्रिया केली. पुढील १२ तासांमध्ये हाताची हालचाल होणे त्यांना अपेक्षित होते. मात्र डॉक्टर प्रशांत यांचे कौशल्य कामी आले आणि आठव्या तासालाच अकीलचा हात हालचाल करू लागला.केवळ आणि केवळ आर्थिक बाब समोर ठेवून प्रशांत यांनी जर शस्त्रक्रिया केली नसती तर अकीलला एका हाताला कायमचे मुकावे लागले असते. आज शस्त्रक्रिया केलेल्या त्या हातानेच अकील आपल्या कुटुंबाचा गाडा ओढतोय.
     आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा अशा प्रकारे वापर करणाऱ्या डॉक्टर प्रशांत यांचे सामाजिक भान सुद्धा तितकेच प्रगल्भ आहे.वंचितांच्या झोपडीमध्ये प्रकाश पेरला  जावा या भावनेतून सामाजिक क्षेत्रात ते काम करत आहे.यवतमाळच्या तलाव फैलातील अनिल पुट्टेवार या  रिक्षाचालकाच्या  मुलाच्या आयुष्याला आकार देण्याचं काम प्रशांत यांनी केले आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष ढवळे यांनी वैभव अनिल पुट्टेवार या हुशार विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी डॉक्टर प्रशांत यांचेकडे दिली आणि त्यांनी सुद्धा तितक्याच आनंदाने  ही जबाबदारी स्वीकारली. वैभव हा यवतमाळ येथे एमबीबीएसचे  शिक्षण घेत असून त्याचे संपूर्ण शुल्क आणि शैक्षणिक साहित्याची जबाबदारी डॉक्टर प्रशांत यांनी घेतली आहे. वैभवला सुद्धा नामवंत आर्थोपेडीक सर्जन बनवण्याचं स्वप्न त्यांच्या डोळ्यात आहे.मतीन भोसले यांच्या प्रश्नचिन्ह आश्रम शाळेतील काही मुलांचे वैद्यकीय पालकत्व सुद्धा त्यांनी स्वीकारले आहे.
    दिवसेंदिवस वातावरणातील होत असलेल्या बदलांमुळे पाणी प्रश्न पेटतो आहे. मागील वर्षी यवतमाळ शहराला सुद्धा पाणीटंचाईचे भीषण असे चटके बसले. ग्रामीण भागात सुद्धा पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होतो आहे. त्याचा खरा त्रास घरातील महिलेला होतो.आपणही या क्षेत्रामध्ये काहीतरी योगदान दिलं पाहिजे ही भावना डॉक्टर प्रशांत यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यवतमाळ येथील त्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचे ठरले. आधीच शहरांमध्ये पाण्याची टंचाई आणि त्यातच जवळपास चार हजार लोकांच्या जेवणाचा कार्यक्रम करायचा. का करायचा हा खर्च? पोट भरलेल्या लोकांना का खाऊ घालायचं? असे एक ना अनेक प्रश्न मनामध्ये घोंगावत होते. रात्री दोन वाजता अचानक त्यांनी पत्नी रेखा यांना व्हाट्सअप वर एक मेसेज पाठवला. why can’t we donate the fund we will require to inaugurated our hospital to be donated for Paani Foundation at Barbara and Akola Bazar. असा तो मेसेज होता.डॉक्टर असलेल्या पत्नी रेखा यांनी प्रशांत यांच्या या निर्णयाचे स्वागत करून त्यांना होकार दिला. पाणीदार गावाअंतर्गत पाणी फाऊंडेशनच्यावतीने  मडकोणा हे गाव दत्तक घेण्यात आले होते. गावाला पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी हजारो हात राबत होते. डॉक्टर प्रशांत यांनी मडकोणा या गावासाठी स्वतःच्या दवाखान्याचा शुभारंभ रद्द करून तब्बल एक लाख 51 हजाराची देणगी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केली. इतकेच नव्हे तर पिंपरी, मडकोना बरबडा ,अकोला बाजार, वडगाव जंगल आदी ठिकाणी जाऊन त्यांनी या पाण्याच्या कामाला हातभार लावला आहे. भविष्यात यवतमाळला पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांना सोबत घेऊन ” गो ग्रीन “ही चळवळ अधिक लोकाभिमुख केली आहे. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरांमध्ये पाच हजार झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला आहे.
      एखाद्या दवाखान्यातील दालनाला एखाद्या साहित्यिकाचे नाव असल्याची घटना दुर्मीळ असते. कसारे कुटुंबीयांचे  वऱ्हाडी बोलीचे सौंदर्यशास्त्र संपूर्ण महाराष्ट्रभर पसरविणाऱ्या कवी शंकर बडे यांच्याशी  कौटुंबिक संबंध होते.वडील गणपतराव कसारे यांच्या “स्वप्नी भेटून जा ” या काव्यसंग्रहाला शंकर बडे यांची प्रस्तावना आहे.बडे काकांच्या या नात्याचा सुगंध आपल्या दवाखान्यात कायम दरवळत राहावा म्हणून कसारे परिवाराने येथील एका दालनाला” शंकर बडे दालन “असे नाव दिले आहे.वैद्यकीय पेशा वाळवंटी स्वरूप धारण करत असताना प्रशांत कसारे सारख्या डॉक्टरच्या रुपात संवेदनाचे असे झरे  जेव्हा दिसतात, तेव्हा मनाचं आभाळ मात्र भरून येते.सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणविषयक भान असणारे असे डॉक्टर हीच खरी समाजाची संपत्ती असते.
(लेखक मीडिया वॉच पब्लिकेशनचे कार्यकारी संपादक आहेत)
9623191923
Previous articleपंडित नेहरू : वैचारिक वादळे
Next articleयुद्धस्य परिणाम नसती कधीच रम्या…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

8 COMMENTS

 1. Agadi kharach ahe …one more thing I would like to add is …He has very fine hand for surgery and also very attentive,careful for his patients…Very happy about this article on Dr. Prashant sir and Dr Rekha

 2. Salutes to the hard work, achievements, and special social contributions of Dr Prashant Kasare.

  Very well narrated article..Cheers Avinash Pudhe. Thank you.

 3. Good stand for improving Doctor Patient Relationship.
  I think the situation is mainly because of corporate money oriented hospitals.
  Individual Sevabhavi doctors still doing our work of rendering services to patients is still continued????????????????

 4. फारच छान लिहिलेय..
  डाॅक्टरांच्या कर्तुत्वाला मृदंगी साज चढवलाय.
  -मोहन पांडे
  नागपूर
  [email protected]

 5. प्रशांत कसारे सर डॉक्टरचं नसुन एक समाजसेवक आहेत, ते गो ग्रीन यवतमाळ चे सक्रिय सदस्य असुन यवतमाळात हजारो झाडे लावण्यामध्ये हातभार आहे. त्यान्नी एका गरीब मुलाला डॉक्टर बनविण्याचा मानसं केला आहे, माझाकडून त्यांच्या या कार्याला सलाम आणी शुभेच्छा आहेत !!
  यवतमाळ ला लाभलेले वैभव !!!

 6. तुमच्या या लिहण्यामुळे डाॅक्टर साहेबा बाबत ईतरही बाबी माहीत झाल्या डाॅ कसारे हा मदत करनारा संवेदनशिल डाॅक्टर आहे…. एवढेच माहीत होते,
  परंतू सरांचे काम खुप मोठे आहे. . ….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here