जिव्हारी लागलेला घाव…

प्रवीण बर्दापूरकर  

राजकारण आणि राजकारण्यांवर लिहिण्याचा कंटाळा आला म्हणून या आठवड्यात साप्ताहिक स्तंभाचं लेखन केलं नाही मात्र , त्या कंटाळ्याला राजीव सातव याच्या मृत्यूच्या बातमीची जिव्हारी लागणारी फळं येतील असं चुकूनही वाटलं नव्हतं…

खरं तर , कालच सकाळी वाटलं होतं की एखादा एसएमएस पाठवून राजीव सातवच्या प्रकृतीची चौकशी करावी पण , ते टाळलं कारण तसं करणं प्रशस्त वाटलं नाही ; मग संध्याकाळी त्याला पुन्हा व्हेंटिलेटरवर घेतलं असल्याची बातमी कळली पण , तो बाहेर येईल अशी वाटलेली खात्री खोटी ठरली .

हे कांही मरणाचं वय नव्हतं म्हणून कोरोनापुढे हतबल किंवा ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ वगैरे वगैरे सांत्वनाचा महापूर आला तरी राजीवच्या मृत्यूचं समर्थन होऊच शकणार नाही…

■■

राजीवची भेट होऊन किती वर्ष झाली असतील ? ते वर्ष बहुदा १९८१ असावं . १९८०च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातून सूर्यकांता पाटील आणि रजनी सातव विजयी झालेल्या होत्या . सूर्यकांता आणि माझ्यात सख्खी मैत्री . विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी त्या दोघी नागपूरला आलेल्या होत्या . विधिमंडळाच्या वृत्तसंकलनाचं माझं ते पहिलंच वर्ष होतं . त्या अधिवेशनात आमदार निवासात सूर्यकांता पाटीलला भेटायला गेलो तेव्हा रजनी सातव यांची ओळख तिनं करुन दिली  .

त्यावेळी राजीव भेटला ; थोडा लाजराबुजरा वाटलेला राजीव असेल जेमतेम दहा-बारा वर्षांचा .

पुढे रजनी सातव मंत्री झाल्या . सत्तेत असणार्‍या भोवती फार घुटमळण्याचा स्वभाव नसणं शिवाय माझ्याकडे बीट म्हणून काँग्रेस नव्हतं म्हणून आमची ओळख पुढे सरकली नाही , जुजबीच राहिली .

पुढे विधी शिक्षण घेतांनाच राजीव राजकारणात आला ; आधी महाराष्ट्र आणि मग राष्ट्रीय युवक काँग्रेसचा अध्यक्ष झाला .

आमच्या त्या काळात अगदीच दोन-तीन भेटी झाल्या त्याही विमानतळ वगैरेवर ; अशा भेटींचं स्वरुप औपचारिकच असतं पण , दिसलो की लगेच आपल्याकडे येण्याचा त्याचा उमदेपणा कायम लक्षात यायचा   .

त्यात लक्षात आलेली बाब म्हणजे दिल्लीत असूनही राजीवचं मराठी वाचन चांगलं होतं  ; माझ्या लेखनावरही त्याचे अधून-मधून फोन येत .

■■

महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत तो अपडेट असायचा पण , महाराष्ट्रात यावं असं मात्र त्याला वाटत नसल्याचं लक्षात येत असे .

गांधी कुटुंबीयांच्या तो अतिशय निकटचा असल्याची चर्चा त्याकाळात काँग्रेस वर्तुळात होती ; त्यावेळची एक आठवण आहे –

लोकमत वृत्तपत्र समुहाचा राजकीय संपादक म्हणून मी राजधानी दिल्लीला जून २०१३त पडाव टाकला .

तोपर्यंत काँग्रेसच्या राजकारणात राजीव सातव एक बडं प्रस्थ झालेला होता ; युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होता आणि खूप व्यस्त असायचा .

लोकमतमधील विकास झाडे या सहकार्‍याकडे राजीव सातवला भेटण्याची इच्छा व्यक्त केली .

विकास झाडे यानं ठरवल्याप्रमाणं एक दिवस एका पावसाळ्यातल्या कलत्या दुपारी साडेचारच्या सुमारास आम्ही कार्यालयात पोहोचलो तर राजीव सातव कार्यालयात नव्हता पण , परिचय देताच त्याचे स्वीय सहायक लगबगीने खुर्चीतून उठले आणि मोठ्या अदबीनं आम्हाला त्यांनी राजीवच्या कार्यालयात नेऊन बसवलं .

‘साब राहुलजीके पास गये है . आप के आने की खबर उन्हे देता हूं,’ असं म्हणत तो बाहेर गेला आणि पाचच मिनिटात परत येऊन त्यानं सांगितलं की ‘साब निकले है , बस दस मिनिट में पहुचेंगे .’

राजीव आला त्यानं अतिशय नम्रपणे झुकून नमस्कार केला आणि तातडीच्या कामासाठी जावं लागल असं अपराधी स्वरात सांगत आम्हाला वाट बघावी लागली याबद्दल दिलगिरी व्यक्त केली .

सत्ताधारी पक्षाचा आणि त्यातही काँग्रेसचा एक महत्त्वाचा नेता समोरच्याला वाट पहावी लागली म्हणून दिलगिरी वगैरे व्यक्त करतो याचं अप्रूप ओसरायच्या आंत , राजीव त्याच्या टेबला पलीकडच्या  राखीव खुर्चीत न बसता माझ्या शेजारी बसला .

संकोचून त्याला त्याच्या खुर्चीत बसण्याची विनंती केली तर तो म्हणाला , सर , तुम्ही खूप सीनियर आहात . माझी आई बोलली आहे . मीही वाचतो तुमचं लेखन…’ वगैरे .

राजीव सातव नावाचा हा तरुण नेता कसा सुसंस्कृत आणि डाऊन-टू-अर्थ आहे , याचा तो अनुभव  सुखावणारा होता  ; हाच अनुभव नंतरच्या प्रत्येक भेटीत येत राहिला , तो बहुदा त्याच्यावरचा मातृसंस्कार असावा !

मी दिल्ली सोडली , औरंगाबादला स्थायिक झालो आणि आमच्या भेटी खूप कमी झाल्या तरी संपर्क कायम राहिला .

■■

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राजीव सातव हेच दोन उमेदवार विजयी झाले .

राजीव दिल्लीत आणखी रमला आणि काँग्रेसच्या राजकारणात राहुल गांधी यांचा कट्टर समर्थक म्हणून आकंठ बुडाला ; काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय समित्यावर आणि पंजाब , गुजरात विधानसभा निवडणुकांत त्यानं कळीच्या जबाबदार्‍या पार पाडल्या .

राहुल गांधी यांचा साधेपणा आणि पक्षाविषयी त्यांना असणारी तळमळ याविषयी राजीव अनेकदा बोलत असे ; ‘पक्षाचा तोंडवळा पूर्ण बदलायला हवा आणि बनेल बुझुर्गांना बाजूला सारायला हवं , या माझ्या मताशी तो सहमत होता पण , हे लगेच घडणार नाही , राजकीय पक्षात लगेच असं कसं घडत नसतं हे तो सांगायचा .

गुजरात विधानसभा निवडणुकीत राजीववर फार मोठी जबाबदारी होती आणि तिकडे ठिय्या मारुन त्याने ती निभावली . भाजपशी ‘अरे ला कारे’ करुन तुरुंगाची वारीही करुन आला पण , डगमगला नाही . ( त्या काळात एकदा दमणला गेलेलो असतांना त्याला फोन केला तेव्हा ही त्याची तुरुंगवारीची  हकीकत समजली ! )

‘गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्ता संपादन नाही करणार पण , नरेंद्र मोदी आणि भाजपला काँग्रेस ‘होम स्टेट’मधे जेरीस आणेल हे नक्की ‘, हे त्याचं म्हणणं तंतोतंत खरं ठरलं .

मात्र , पक्षात मिळालेलं स्थान आणि गांधी कुटुंबीयाशी असणार्‍या जवळीकीबद्दल तो फारसा बोलत नसे ;  त्या जवळीकीचा तोराही त्याच्या वागण्यात नसे .

‘लुज टॉक’ तर त्याच्या स्वभावच नव्हता .

मोजकं बोलावं , ठाम बोलावं आणि कार्यरत राहावं हेच राजीवचं व्रत राहिलं ; विरोधी पक्षात आहे म्हणून वचावचा बोलणं , एकारला कर्कशपणा करणं , पोरकट वागणं राजीवनं कधीच केलं नाही ;  ऋजू वागणं आणि बोलणं हे त्याचं वैशिष्ट्य राहिलं त्यामुळेच बहुदा चार वेळा संसद रत्न म्हणून गौरवलं गेलं .

■■

राजकारणात असंख्य चांगल्या आणि वाईट घडामोडी एकाच वेळी घडत असतात . त्याचा एक भाग म्हणजे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचे मृत्यू झाले ; मराठवाड्याला राजकीय पोरकेपणा आला .

मराठवाड्यात अनेक नेते आहेत ; विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचेही वारसदार त्यात आहेत पण , अजूनही मराठवाड्याचा तो राजकीय पोरकेपणा संपलेला नाही .

तो राजकीय पोरकेपणा संपवण्याची क्षमता राजीव सातवमध्ये होती ; राज्याचं नेतृत्व करण्याची कुवतही त्याच्यात होती .

हे मी अनेकदा लिहिलं , जाहीरपणे सांगितलं आणि राजीवशीही दोन-तीन वेळा बोललो पण , त्याला दिल्लीतच राहायचं होतं ; ‘माझी गरज दिल्लीत जास्त  आहे’ , असं त्यावर त्याचं म्हणणं असायचं आणि केसातून हात फिरवत तो हे ठामपणे सांगायचा .

‘उद्याचा मराठवाडा’ या दैनिकाचा एक दिवाळी अंक संपादित करतांना महाराष्ट्राचं भावी नेतृत्व असा विषय घेतला होता ; त्यात राजीव सातव यांचं नाव अर्थातच होतं आणि लिहिण्याची जबाबदारी संजीव कुळकर्णी या नांदेडच्या ज्येष्ठ पत्रकार मित्रावर सोपवली होती .

पण , राजीव सातव तर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आकंठ बुडलेला होता , त्याला वेळच मिळत नव्हता हे संजीवनं सांगितलं .

अखेर मी फोन केला आणि वडीलकीच्या नात्यानं जरा लटकं रागावलो तेव्हा ‘सॉरी , सॉरी’ म्हणत राजीवानं संजीवला वेळ दिला , त्याच्याशी गप्पा मारल्या आणि  तो लेख सिद्ध झाला ; फोन केला की राजीवचा असा सकारात्मक प्रतिसाद माझ्याही अंगवळणी पडलेला होता .

खूप मोठी राजकीय मजल मारण्याआधीच राजीव सातवला मृत्यूनं कवटाळलं आहे .

राजीव सातव माझ्यापेक्षा वयानं बावीस वर्षानं लहान आणि मोठी राजकीय कर्तबगारी असणारा ; ऋजू , उमदा म्हणूनच त्याचा अकाली मृत्यू जिव्हारी घाव घालणारा आहे .

■■

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी  यांची हत्या झाली तेव्हा लोकसभेत बोलताना ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब उपाख्य मधु दंडवते जे म्हणाले ते जरा बदलून सांगायचं तर-

मतदारांनी प्रतिनिधी , लोकसभेनं उमदा सदस्य , राजकारण्यांनी नेता गमावला तरी आपल्या अपेक्षा आणि दु:खाचं सोडा . रजनीताईं सातव यांनी खूप वर्षापूर्वी डॉक्टर पतीला अकाली गमावलं ; आता कर्तृत्व बहरात येऊ लागणार्‍या पुत्राला  गमावल्याचा घाव लागलेल्या मातेचं  ; अकाली वैधव्य आलेल्या पत्नीचं आणि पितृछत्र गमावलेल्या पुत्र व कन्येचं सांत्वन कोण आणि कसं करणार ?

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here