‘तानाजी’ चे शिन्मासमीक्षण

-बालाजी सुतार

तानाजी पाह्यला. शिन्मासमीक्षण म्हणून उदाहरणार्थ दोनतीन गोष्टी. मुख्य गोष्ट म्हणजे ओम राऊत या गृहस्थांनी डायरेक्शन म्हणजे अगदी तंतोतंत डैरेक्षण केले आहे. पुलंच्या नामू परटाच्या भाषेत सांगायचं तर ‘क्यामेरा नुसता असा गार गार गार घुमिवलेला आहे’. दोन डोंगरांच्या मधल्या अतिशय अरुंद घळीतून किंवा फॉर द्याट म्याटर कसल्याही भकी-बरगडीतल्या फटींतून सटासट थ्रीडीत घुसणारा क्यामेरा म्हणजे निव्वळ जबरी गोष्ट आहे. बाकी यातली तानाजीची गोष्ट (रायबाच्या लग्नाचं निमंत्रण आणि कोंढाण्याची मोहीम हा एकमेव मुद्दा वगळता) मूळ तानाजीच्या गोष्टीच्या केप ऑफ गुड होपला इतका लांबलचक वळसा घालून गेलेली आहे, की शिवसेनेच्या ‘कशातच काही नसण्याच्या केप ऑफ गुड होपला’ तसलाच भलामोठ्ठा वळसा घालून शिवसेनेचा मुख्यमंत्री घडवून आणणा-या संजय राऊतांचीच आठवण व्हावी. राऊत-राऊत भाई भाई असतीलही कदाचित, आपल्याला माहित नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे आजे देवगण यात नेहमीसारखा म्हणजे अग्गदी सिंघमसारखाच दिसला आणि वागलासुद्धा आहे. एका दृश्यात तो भगवी ड्रेसभूषा करून खुद्द महाराजांवर लाकडी दांडका फेकतो आणि वर महाराजांनाच एक सणसणीत भाषणही देतो तेव्हा तर तो महाराजांच्या पुढ्यात उभा नसून पणजीला जयकांत शिक्रेपुढे ‘आता माझी सटकली’ म्हणतोय की काय, असाच भास होतो. त्यामानाने सैफ अली खानाने रंगवलेला उदेभानडाकू जोरकस वाटतो. (आम्ही मराठवाडेकर कसल्याही व्हिलनला ‘डाकू’च म्हणतो. यात डाकूंचा किंवा उदेभानुचा किंवा डैरेक्टरचा किंवा रैटरचा उपमर्द करण्याचा हेतू नाही, हे आगाऊ सावधगिरीस्तव इथे नोंदवून ठेवतो आहे, ते असो-) या दोघांतली लाष्टची फायटिंगही कोणत्याही हिंदी शिन्माच्या आजवरच्या चक्करम्याड कीर्तीस साजेशीच आहे. म्हणजे आमच्या लहानपणी पायात इस्प्रिंगचे बुटं घालून मिथुन चक्रवर्ती खालून तिस-या मजल्यावरच्या डाकूवर जंप खायचा तसलीच, पण तंतोतंत आडवी जंप हवेतल्या हवेत खाऊन तलवारीच्या एकाच रपाट्यात सैफ अलीखान आजे देवगणचं तलवारीसकट मनगट छाटतो आणि त्याच्या दुस-या हातातल्या ढालीवर इतके भयानक भयानक वार करतो की तितक्या माराने पाकिस्तानच्या मिल्ट्रीतल्या सबंध हत्तीदळातले तमाम हत्ती स्वखुशीने मरून गेले असते. इतका आडमाप मार खाऊनही एक हात गमावलेला आजे देवगण जोर एकवटून उठतो आणि जी तोफ ओढायला एरवी हत्ती वापरलेला दाखवला आहे, ती नागीण तोफ किल्ल्याचा बुलंद तट केवळ अंगच्या बळाने रेटून फोडून सैफ अलीखानासकट कितीतीतीतरी हजारो फूट खोल दरीत ढकलून देऊन उदेभानाचा किलेरकट काटा काढतो आणि जागच्या जागी भगवा फडकावतो. मग महाराज येतात आणि ‘गड आला पण सिंह गेला’ वगैरे होतं, हा भाग इतका अतोनातच प्रेक्षणीय झालेला आहे की आपण स्वत: खुद्द इतिहासातच पोश्टग्राज्वेट केलेलं असूनही आपल्या अंगावर शहारा उमटतो, यातच काय ते समजा. बाकी सूर्याजी-शेलारमामाचं लढणं, ‘मी सगळे दोर कापलेले आहेत, तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही पळून जाताय? अरे, ठ्यां तुमच्या जिनगानीवर’ वगैरे चौथीच्या इतिहासातल्या पुस्तकातल्या गोष्टी समूळ बाद करण्यात आलेल्या आहेत.

ही लाष्टची फायटिंग थ्रीडीमध्ये मात्र भयानक वाटते फार. तिथे लढाईत एकमेकांकडे फेकले जाणारे खूंख्वार भाले, तलवारीचे सपासप वार आपल्या स्वत:च्या अंगावर इतक्यांदा येतात की निदान सातआठ वेळा मी स्वत: जबर जखमी होता होता वाचलो. शेजारी बसलेल्या एका अनोळखी सुंदरीच्या (अंधारात नीटसं दिसलं नाही, पण अनोळखी असली ती सुंदरीच असणार असा मला विश्वास आहे.) दिशेने येणारे दोनतीन बाण तर मी स्वत: पुढाकार घेऊन अत्यंत तडफदारपणे माझ्या स्वत:च्या छातीवर झेलले.

असो.

आजे देवगण किंवा सैफ अली खान किंवा त्या दोघांमधली लाष्टची फायटिंग हे काही आपल्या शिन्मा बघायला जाण्याचं मुख्य कारण नव्हतं. आपले सख्खे दोस्त कैलाश वाघमारे या शिन्मात एका कळीच्या भूमिकेत आहेत, म्हणून आपण तिकडं गेलेलो. तर गेल्यावर ‘कशाला गेलो?’ असं झालं. कारण की आमच्या दोस्ताने त्यात आजे देवगणच्या साईडकडून फितुरी करून सैफ अलीच्या साईडला जाऊन दगा करणा-याची भूमिका केलेली. त्यामुळे शिन्मा बघायला थेटरात आलेले मर्दप्रेक्षकगण आजे देवगणची तारीफ कमी आणि कैलासरावांना शिव्या जास्ती घालताना दिसले. वाईट वाटलं! आपल्या दोस्ताला डाकूच्या भूमिकेत बघून कुणाला आनंद होईल, च्यायला? आज ना उद्या, हा शिन्मा बssघबघून जाज्वल्य तानाजीभक्त झालेल्या एखाद्या टोळक्याच्या हातचे चारसहा तरी सटके बिनबोभाट खाणार तुम्ही. कैलासभाऊ! लिहून ठेवा, तंतोतंत!

बाकी शिन्मात इतिहास वगैरे शोधण्याचा प्रयत्न करणं ही गोष्ट तुम्हाला जबर वैफल्याकडे घेऊन जाणारी ठरू शकते. तेव्हा त्या फंदात नच पडलेलं बरं!

आजे देवगण आणि सैफअलीखान यांच्यातल्या वैयक्तिक दुश्मनीची ऐतिहासिक कपडेपट वापरून केलेली ष्टोरी, अशा अंगाने या शिन्माकडे पाहत राहणे, हीच एक गोष्ट इष्ट आणि हितावह आहे.

करिता हे दोन शब्द लांबलेले शिन्मासमीक्षण इथे संपले असे जाहीर करतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

(लेखक प्रतिभावंत कथाकार व कवी आहेत)

9325047883

Previous articleराजकारणातले विरोधाभास , विसंगती आणि चमत्कृती !
Next articleसॉक्रेटीसः पहिला सत्याग्रही
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. बालाजी भौ राज्या शिनेमा पाहू वाटून रायल होत आता खट्टू झालं बॉ मन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here