तो ये दांव लगा ले!

युवकांनो, चाकोरीच्या वाटेवर चालणं सोडून द्या आणि वेगळी वाट चोखाळण्याची हिंमत बाळगा… कल्पकतेच्या जोरावर कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त संपन्न बना. असं करायचं असेल, तर नावीन्यपूर्ण विचार आणि परिश्रम याशिवाय पर्याय नाही…
तुम्ही हिंमत करून आयुष्याचे फासे टाकले तर आणि त्याला मेहनतीची जोड दिली, तर तुम्हाला कधीही काहीच कमी पडणार नाही. भौतिक गोष्टी तर मुबलक असतीलच; पण आयुष्य रंगतदारपणे व धडाडीनं जगण्याचा आनंदही खूप मिळेल!

    संदीप वासलेकर

saptrang
अनेक युवकांशी गप्पा मारण्याची संधी मला सतत मिळत असते. त्यात मला खूप आनंद मिळतो. आपण जे काही अनुभवलेलं आहे, ते वाटलं तर पुढच्या पिढ्यांतल्या अनेकांचा फायदा होईल, या विचारानं समाधानही मिळतं; परंतु अनेकदा युवकांचे स्वतःच्याच भविष्याबद्दलचे विचार ऐकून मन विषण्णही होतं. त्यांचा स्वतःवरच फारसा भरवसा नाही, असं वाटत राहतं.

बरेच युवक व्यवस्थापनक्षेत्रातली पदवी (MBA) मिळवून; विशेषतः फायनान्स या विषयात प्रावीण्य मिळवण्याचे बेत आखतात. अनेक जण बांधकाम क्षेत्रातले इंजिनिअर, तर काहीजण संगणकक्षेत्रातले प्रोग्रॅमर व इंजिनिअर होण्याची अभिलाषा बाळगून असतात. अनेक जण स्टॉक मार्केट, बॅंका व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी शोधतात. काहीजण डॉक्‍टर होऊन एखादं हॉस्पिटल उभारण्याचा विचार करतात. अमेरिकेत स्थायिक व्हावं, असंही अनेकांच्या मनात असतं. हे करण्याची ज्यांची क्षमता नाही, ते एखाद्या बीपीओत अथवा सरकारमध्ये कारकुनी किंवा तांत्रिक काम शोधतात.
हे सगळं पाहिल्यावर मला वाटतं, की जग पुढं चाललं आहे; पण या युवकांना मागं मागं चालण्यातच आनंद मिळतोय की काय? की पुढं पाहून उडी घेण्याइतका यांचा स्वतःवरच विश्‍वास नाही? आजच्या समस्त युवक- युवतींना माझं आवाहन आहे ः ‘जरा पुढं येणारे बदल ओळखा व स्वतःचं भवितव्य बनवा.’

दुनिया अब बदलेगी, तकदीर बना ले
अपने पे भरोसा है तो ये दांव लगा ले

येत्या १५-२० वर्षांत होणारा एक मोठा बदल जलव्यवस्थापन या क्षेत्रातला असेल. भारतात व जगाच्या इतर भागांत पाण्याची भयंकर कमतरता भासेल. त्यामुळं पाण्याचं शुद्धीकरण, गढूळ पाण्यातून स्वच्छ पाण्याची निर्मिती, पाण्याचं सूक्ष्म व्यवस्थापन करून दर टन उत्पादन करण्यासाठी लागणारी गरज कमी करणं अशा पाण्यासंबंधीच्या क्षेत्रात खूप मोठा व्यवसाय करण्यास वाव मिळेल. १९८० च्या दशकात अशा छोट्या छोट्या सॉफ्टवेअर कंपन्या निघाल्या व त्यातून १९९० च्या दशकात ‘इन्फोसिस’, ‘विप्रो’, ‘आयगेट’ आदी सॉफ्टवेअर कंपन्या मोठ्या झाल्या. त्याप्रमाणे २०१५-२०२५ या काळात जलव्यवस्थापनासंबंधी व्यवसाय करणाऱ्या कंपन्या स्थापन होतील व २०१५-२०४५ च्या दरम्यान त्यांतल्या काही कंपन्या जगातल्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या होतील.
युवकांनो, तुम्ही जर सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर झालात, तर अजून १५-२० वर्षांनी पांढरेपेशे कामगारच राहाल; पण जर जलव्यवस्थापनात प्रावीण्य मिळवलं, तर अजून १५-२० वर्षांत तुम्ही जलसम्राट होऊ शकाल! मात्र, ते करण्यासाठी एका नवीन क्षेत्रात येण्याची हिंमत करा… व अपने पे भरेसा है तो ये दांव लगाना होगा ।

जलव्यवस्थेशी संबंधित असलेला दुसरा एक विषय म्हणजे कृषिसंशोधन. जे भारतीय युवक कमीत कमी पाण्यात, क्षारपाण्यात व कठीण परिस्थितीत कोणत्याही पिकाचं भरपूर उत्पादन काढतील, ते स्वतः तर संपन्न बनतीलच; पण लाखो लोकांवर ऐश्वर्याची उधळण करतील. या दिशेनं गेलात तर अमाप वाव आहे; पण तुमच्यात हिंमत आहे? ‘एक डाव लावण्याइतका’ स्वतःवर भरवसा आहे का?
… आणि राज्यकर्त्यांनो, युवकांना कृषिसंशोधनात येण्यासाठी प्रोत्साहन देण्याची दूरदृष्टी तुमच्यात आहे का? अथवा कृषिविद्यापीठाच्या जागेवर भूतकाळात जमा होणाऱ्या उद्योग-धंद्यांचे कारखाने काढण्यास परवानगी देण्याइतक्‍याच तुमच्या वैचारिक मर्यादा आहेत?

* * *
मी गेल्या काही लेखांत पर्यटनाचा उल्लेख केला होता. भारतात एक कोटीदेखील परदेशी पर्यटक दरवर्षी येत नाहीत. युरोपमध्ये १५ ते ६० कोटी येतात. भारतातील युवकांनो, तुम्ही पर्यावरण, इतिहास, संस्कृती यांचं ज्ञान प्राप्त करून त्याला कल्पक उद्योजकतेची जोड दिलीत तर भारताचं परकीय चलन ५० पट वाढेल इतका मोठा व्यवसाय तुम्ही करू शकाल. पण पुढं पाहण्याची हिंमत आहे का तुमच्यात? पर्यटन म्हणजे केटरिंग नव्हे.
पर्यटनासाठी लागणारी स्वच्छता व पायाभूत सोई तातडीनं वाढवण्याची सरकारकडं मनीषा आहे का? स्वच्छता म्हणजे रोज पहाटे पाच वाजता नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामगारांनी खरोखर रस्त्यावर व चौकात जाऊन केलेली सफाई. काही प्रसिद्ध व्यक्तींनी संध्याकाळी पाच वाजता टीव्हीसमोर मारलेली, वरवर दिसणारी केलेली सफाई नव्हे! युवकांना माझा एक साधा प्रश्न आहे. बांधकाम अभियंता बनून झाडं तोडून, डोंगर सपाट करून, अर्धवट रिकाम्या असलेल्या इमारती बांधण्यात तुमचा उत्कर्ष आहे? की सुंदर झाडं, बगीचाभोवती स्थानिक इतिहासाला व संस्कृतीला उजाळा आणणारी छोटी हॉटेलं व प्रेक्षणीय स्थळं तयार करून तिथं मोठ्या प्रमाणात पर्यटक आणण्यात तुमचा जास्त उत्कर्ष आहे? उतर सोपं आहे…. पण ‘एक डाव लावण्या’साठी आत्मविश्‍वासाची कमतरता आहे.

* * *
येत्या काही वर्षांत तंत्रज्ञानात बदल होऊन ३-D प्रिंटिंगसारखं नवं तंत्रज्ञान वापरलं, तर तुम्ही अनेक नवीन प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करणारे कारखाने अगदी कमी भांडवलात सुरू करू शकाल. ठाण्यात एक करण चाफेकर नावाचा २४-२६ वर्षांचा मुलगा आहे. त्याच्याकडं इंजिनिअरिंगची पदवी नाही; पण तो घरात बसून ३-D प्रिंटिंगचं मशिन तयार करतो. बाकीचे लोक ३-D वापरून वस्तू कशा बनवता येतील ते पाहतात; पण करण चाफेकर हा जगातला सर्वांत अद्ययावत असं मशिनच स्वतः तयार करतो. त्यानं या खटाटोपाला १८-२० वर्षांचा असताना सुरवात केली. त्या वेळी त्याचं भांडवल होतं सुमारे एक लाख रुपये.

कोणत्याही गोष्टीचं उत्पादन करायचं म्हणजे भरमसाठ प्रमाणात माल निर्माण करून कमीत कमी किमतीत विकायचा हा आपल्याकडं गोड गैरसमज आहे. जगातल्या घड्याळांच्या उत्पादनापैकी फक्त तीन टक्के उत्पादन स्वित्झर्लंडमध्ये होतं; परंतु स्वित्झर्लंडचे घड्याळ-उत्पादक ९० टक्के आवक कमावतात. कमीत कमी उत्पादन करून जास्तीत जास्त अर्थार्जन कसं करता येईल, यात स्वित्झर्लंडसारख्या देशाचा हातखंडा आहे.
भारतातल्या युवकांनो, तुम्हीसुद्धा नवीन प्रकारचं उत्पादन करा. कल्पकतेच्या जोरावर कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त संपन्न बना. मात्र, असं करायचं असेल, तर नावीन्यपूर्ण विचार, परिश्रम करण्याची हिंमत करा.
* * *
येत्या काही वर्षांत सौर ऊर्जा, अन्नधान्यापासून विविध पदार्थ बनवणं, धान्याचा साठा करण्याचं तंत्रज्ञान, अनेक प्रकारचे प्रशिक्षण अशा अनेक अभिनव वाटा समोर येतील. त्यांवर तुम्ही मार्गक्रमण करणार की केवळ MBA (finance) आणि सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर होण्याचा संकुचित विचार करणार?
ज्यांना इंजिनिअर होण्यात खरच रस आहे, त्यांच्यासाठी भारत सरकारनं अवकाश तंत्रज्ञानाचा नवीन मार्ग खुला केला आहे. कुणीही विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट फॉर स्पेस टेक्‍नॉलॉजी’ या संस्थेची स्पर्धापरीक्षा देऊन तिथं प्रवेश मिळवू शकते. तिथं यश मिळालं तर ‘इस्रो’मध्ये काम करण्याची संधी मिळेल. मंगळयान, चांद्रयान, चंद्रावर भारतीय व्यक्‍तीचं वास्तव्य अशा प्रकल्पांत काम करण्याची संधी मिळेल. इंजिनिअर बनून चंद्रावर अथवा मंगळावर भारताचे
वाहतूक-संबंध निर्माण करण्यात जास्त मजा आहे, की इंजिनिअर झाल्यावर व्यवस्थापनात दुसरी पदवी घेऊन बॅंकेत काम करून चार बेडरूमच्या घरात राहण्यात जास्त मजा आहे?
* * *
अवकाश तंत्रज्ञानाइतकीच इतरही अनेक मजेशीर क्षेत्रं आहेत. अलीकडं भारतानं विघटनावर आधारित अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ओबामा, पुतीन, टोनी ॲबेच यांच्याशी मोठे करार केले गेले आहेत. येत्या काही वर्षांत त्यानुसार भारत अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करेल. दुर्दैवानं त्यातली बरीचशी गुंतवणूक निष्प्रभ होण्याचा धोका आहे. येत्या १५-२० वर्षांत विघटनाऐवजी अणुमीलनावर आधारित नवीन अणुशक्ती उदयाला येईल. त्या साठी वेगळं विज्ञान व तंत्रज्ञान लागेल. आज १५-१६ वर्षं वय असलेल्या मुला-मुलींनी जर अणुमीलन तंत्रज्ञान आत्मसात केलं, तर येत्या १०-१५ वर्षांत त्यांना भारतात व जगात प्रचंड मागणी येईल. मात्र, एका नवीन दिशेनं जाण्यासाठीचा भरवसा स्वतःवर आहे का?
इथं उल्लेख केलेल्या विषयांशिवाय इतरही अनेक असे मार्ग आहेत, की जर युवकांनो, तुम्ही हिम्मत करून आयुष्याचे फासे टाकले व त्याला मेहनतीची जोड दिली, तर तुम्हाला कधीही काहीच कमी पडणार नाही. भौतिक गोष्टी तर मुबलक असतीलच; पण आयुष्य रंगतदारपणे व धडाडीनं जगण्याचा आनंदही खूप मिळेल.
* * *

मी काही हे स्वप्नरंजन करत नाही. माझा स्वतःचा अनुभव खूप सकारात्मक आहे. १९८०-८१ च्या दरम्यान म्हणजे, अर्थव्यवस्थेचं उदारीकरण होण्याच्या एक दशक आधी रिझर्व्ह बॅंकेची परदेशी-प्रवासावर अनेक बंधनं असण्याच्या युगात मी इंटरनेटशिवाय; इतकंच काय तर पुस्तकांशिवाय, ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या नवीन विषयाची बांधणी मनात केली. डोंबिवलीतल्या काकूशेटच्या चाळीत रात्री लेंगा घालून मी फेऱ्या मारत मारत व मन आणि हिंमत ही केवळ दोन साधनं वापरून आराखडे बांधले. ३०-३५ रुपयांची आतापर्यंत गुंतवणूक करून काही लेटरहेड छापली व ६०-७० देशांत कार्य पसरवलं! पैसे, तंत्रज्ञान, साधनं यापैकी काहीही नसूनही कसलीच कमतरता मला कधी भासली नाही. कारण, मी स्वतःलाच दिवस-रात्र सांगत राहिलो… (साहिर लुधियानवी आणि गीता दत्त यांचं स्मरण करून…) ः
‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले
अपने पे भरोसा है तो ये दांव लगा ले
लगा ले, दांव लगा ले ।’

(सौजन्य दैनिक सकाळ)

Previous articleनारायणभाई देसाई यांच्या सहवासात
Next articleसारेच संघाचे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here