तो स्पर्श …ती नजर

हिनाकौसर खान-पिंजार

 

प्रसंग १ – मी अकरावीत होते. घर ते कॉलेज एकच बस नव्हती. मी राहायला बिबवेवाडी अन कॉलेज गोळीबार मैदान. स्वारगेटला बस बदलून पुढे जावे लागत असे. शाळेच्या प्रवासात बसची गरज पडत नसे. म्हणजे अंतर होते पण सगळेच पायी जात असत. ज्या दिवशी बसने जायला मिळे तो दिवस म्हणजे चैन असे. त्यामुळे कॉलेजच्या पहिल्या दोन दिवस तर आजोबा सोडायला आले. तिसऱ्या दिवशी मात्र आता माझा मी प्रवास करणे अपेक्षित होते. बस, गर्दी यांची अद्याप सवय झाली नव्हती. कॉलेज ही अद्याप नीट सुरु झाले नव्हते. त्यादिवशी लवकरच कॉलेज सुटले. बारा एकची वेळ होती. स्वारगेटला मी अप्पर इंदिरानगर बसमध्ये चढले. खिडकीच्या बाजूला बसले. माझ्या शेजारी एक पंचविशीतला तरुण बसला. बस सुरु झाली तसा त्याचा हात आमच्या दोघांमधील मोकळ्या जागेत आला. हळूहळू त्याचा हात माझ्या मांडीला स्पर्श करू लागला. चुकून धक्का लागला समजून मी आक्रसून बसले. पण हळूहळू करत त्याने त्याचा हात थेट माझ्या मांडीवरच ठेवला. पाठीतून एक जोरदार कळ गेली. मला काहीच सुचेनासे झाले. बधीर झाल्यासारखी अवस्था झाली. काही क्षण असेच गेले. मला काहीच सुधारत नव्हते. हात झिडकारला पाहिजे हे हि मला सुचले नाही. पण त्याने पुढच्या क्षणी हाताने दाब निर्माण केला अन मी एकदम ताडकन उभी राहिले. त्या जागेवरून बाहेर पडताना, त्याच्या पायावर जोरात पाय मारला. ते हि कसे सुचले कोणास ठाऊक. बस मध्ये फार गर्दी नव्हती. एक दोन सीट रिकामे हि होते पण मी शेवटपर्यंत बसले नाही. तो संपूर्ण दिवस विचित्र ग्लानीत असल्यासारखा गेला. त्याने स्पर्श केलेल्या माझ्याच मांडीचा भाग मला नकोसा वाटत होता. त्यानंतर पुढचे काही दिवस बसने प्रवास करायची भीतीच बसली.

प्रसंग 2-

२०१० ची गोष्ट आहे. साधना साप्ताहिकासाठी मी मुस्लीम तरुण तरुणीचे मानस हा विषय घेऊन काही शहरांतील मुस्लीम वस्तीमध्ये फिरणार होते. पहिल्यांदाच मी आपले शहर सोडून एकटीने प्रवास करणार होते. पुणे ते नगर प्रवास चांगला झाला. नगर ते औरंगाबाद हि. पुढे मला लातूरला जायचे होते. औरंगाबाद ते लातूर साधारण पाच तासांचा प्रवास आहे अशी एक जुजबी माहिती होती. औरंगाबाद येथील काम संपल्यावर ठरवले कि त्याच दिवशी लातूरला पोहोचावे. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच कामाला सुरुवात करता येईल. औरंगाबाद येथे मी ज्यांच्याकडे थांबले होते त्यांनी हि मी वेळेत पोहचू शकेन अशी खात्री दिली आणि त्या वयस्क गृहस्थांचा निरोप घेऊन बस stand वर आले. साडे तीन होत होते. चारची बस मिळाली तरी मी नऊपर्यंत पोहोचेन असा अंदाज होता. पण चारची बस आली नाही. नुकतीच माझ्या पत्रकारितेच्या कामाला दीड वर्ष झाले होते. त्यामुळे प्रवासाबाबत करावा लागणारा पूर्वअभ्यास कमी होता. मी एकूणच माझ्या कामाबाबत हि नवखी आणि अपरिपक्व होते. हे सगळं आज विचार करता वाटते, कि त्या दिवशी वेळेत बस मिळाली नाही तेव्हा मी परत जायला हवे होते पण एकदा आपण एखाद्याच्या घरातून बाहेर पडलो आहोत तर पुन्हा कसे जाणार असा काही विचार मनात आला आणि मी अतीतटीने बसची वाट पाहत राहिले. पुढे साडेचार, पाच, साडे पाच करत शेवटी सहाची एस. टी. आली. एस. टी.मध्ये प्रचंड गर्दी होती. बऱ्याच वेळेपासून प्रवासी थांबले होते. त्यामुळे एकच झुंबड उडाली. आत अजिबात जागा नव्हती. मी ती एस. टी. सोडू शकत नव्हते. बसायला अर्थात जागा मिळाली नाही. एस. टी. सुरु झाल्यावर कंडकटर तिकीट काढण्यासाठी उठला आणि मी त्या जागी बसले. थोड्या वेळेत औरंगाबादेतील पुढच्या एका stand वर प्रौढ वयाचा व्यक्ती चढला. चाळीशीच्या आसपासचा. त्याच्या हातात कसली तरी टोपली होती. आत शिरायला जागा नव्हती त्यामुळे तो दारातच पायऱ्यांवर उभा राहिला. गलिच्छपणे हसत त्याने त्याच्या हातातील टोपली माझ्या सीटखाली सरकवली आणि एक सारखा बघत उभा राहिला. त्याची नजर अत्यंत अत्यंत घाणेरडी होती. तो ज्या पद्धतीने खालून वर वरून खाली पाहत होता ते भयंकर होते. त्याचे केवळ डोळेच नव्हे तर संपूर्ण शरीरच डोळे बनून गेले होते. इतकी वासना टपटपत होती. त्याची नजर आपल्याला स्कॅन करून छिन्न विच्छिन करत आहे असा फील येत होता. प्रवासात मी एकटी आहे हे मला त्याला अजिबात जाणवू द्यायचे नव्हते. त्याच्याकडे रागाने पहिलं तर तो अधिकच घाणेरड हसू लागला. माझ्याशेजारी एक आजी बसल्या होत्या त्या मला धीर देत होत्या. दुर्लक्ष कर. सावध बस असं काही काही सुचवत होत्या. त्याची नजर इतकी बेक्कार होती कि आजीनाही त्याला काही बोलायची भीती वाटली. तरी आजूबाजूच्या बायकांनी त्याला झापायचा प्रयत्न केला पण तो आडमुठेपणा करू लागला. त्याला पायऱ्यांच्यावर आत ये म्हणून सांगितले. मागे जा किंवा driverच्या केबिनमध्ये बस म्हणून दरडावले तरी तो हलत नव्हता. मग त्याने त्याची टोपली आहे का पाहण्याच्या बहाण्याने माझ्या पायाला स्पर्श केला. नुसता ओझरता स्पर्श नव्हे तर त्याने काही सेकंद हात पायाशी घासला. मी एकदम दचकून पाय वर केला. तर त्यावर हसून पुन्हा काही नाही टोपली आहे का पाहत होतो अशी बतावणी केली. टोपली घेऊन उभा रहा असं मी रागाने सुनावल्यावर मग तुमच्या मांडीवर ठेऊ का असं काहीतरी उत्तरला. मनातून मी चांगलीच घाबरून गेले होते. conductor आल्यावर त्याला जागा दिली. मी उभी राहिले तसा तो वर सरकला. मागे येऊन उभा राहिला. गर्दी इतकी होती कि कोणी कोणाला इकडे तिकडे व्हा सांगू शकत नव्हते. त्या आजीचा उगीच आधार वाटत होता पण तिचा stop लगेच होता. तिने मला प्रेमाने हळू हळू शंभर सूचना केल्या होत्या. तोवर खरतर ती आजी आणि मी एकत्र आहोत असा त्याचा समाज होता. ती उतरल्यावर काय असा मोठा प्रश्न होता. त्या उतरल्या. त्याच्या लक्षात आले, त्याने धाकाकाबुक्की करायला सुरुवात केली. बाहेर भरपूर अंधार होता. बसमध्येहि. मनात ही. आपण उगीच निघालो इथून सुरु झालेले विचार आयुष्यात पुन्हा कधीही पत्रकारिता करायची नाही इथवर आले. का आपण हि assignment करत आहोत? परत कधीच कुठे हि एकटीने जायचे नाही. आयुष्यात कधीच मी अशा फिरस्तीचे विषय घेणार नाही असे काय विचार डोक्यात येत होते. इतकी टोकाची भावना वाटावी अशी हतबलता, भीती मनात दाटून आली होती. पुढे काही जणांनी त्याच्या आडमुठेपणाकडे दुर्लक्ष करत त्याला driverच्या केबिनमध्ये ढकलले. पण त्याची नजर काही हटली नव्हती. तो बीडला उतरला आणि मला फार सुटल्यासारखे झाले. लातूरला पोहचायला बारा वाजले. मध्ये गाडी pancture देखील झाली होती. पण माधव बावगे सरांच्या घरात शिरल्यावर हळू हळू मनातील भीती कमी होत गेली. पण रात्री बराच वेळ झोप काही लागली नाही.
…………..
सुदैवाने माझ्याकडे हे सगळं सांगण्याची जागा होती. जवळची मैत्रीण आणि मित्र होते. दुसरा प्रसंग मी जेव्हा माझ्या मित्राला सांगितला त्याने तो शांतपणे ऐकून घेतला आणि म्हणाला, ‘पुढच्यावेळेस जाताना नीट तयारी करत जा. सगळी माहिती घेत जा. अंदाज बांधताना हि स्वतःच्या अंदाजावर राहू नको.’ तो असं म्हणतो न म्हणतो मी त्याला म्हणाले, ‘ह्या आता मी नाही जायची कुठे? एकटी तर अजिबातच नाही.’ तो यावर मान डोलावत हसला. तो खिजवत होता अन मी चिडत. पण माझ्या आयुष्यात या प्रसंगांच्या आधी आणि नंतरची चांगले पुरुष होते. आहेत. त्यांचा मैत्रीपूर्ण व्यवहार पुरुषांना एकाच फुटपट्टीवर मोजण्यापासून रोखू शकला. त्यांच्यावर विश्वास टाकता येतो अशी भावना हळू हळू घर करत गेली. त्यामुळे कदाचित या प्रसंगाचा परिणाम लवकर संपला. मी पटकन आपल्या नियमित आयुष्यात व्यस्त होऊ शकले. पण खर सांगू हे दोन्ही प्रसंग किंवा अजून जे काही लहान मोठे आले त्यांचा परिणाम जरी उरला नाही तरीही या माणसांची outline मनातून गेली नाही. औरंगाबादला चढलेला मनुष्य कसा मोठ्या डोळ्यांचा. ढेरपोट्या, आडवा चांगलाच पसरलेला होता. गालावरची दाढी त्याची भयानकता तीव्र करत होती. हे असं डोक्यात राहूनच जातं. पण तितकं तीव्रतेने नाहीच. दुसऱ्या घटनेच्या वेळेस अजिबातच एकटीने फिरणार नाही किंवा फिरस्ती गरजेची असेल असे विषयच करणार नाही इतका टोकाचा जो विचार आला होता तो कालांतराने कधीतरी गळून पडला. पुढे मी पुन्हा एकटीने प्रवास केला. आपले शहर सोडूनच नव्हे तर राज्य हि. पुढे ही करत राहीन. मात्र एक आहे. मी जेव्हा केव्हा नव्या ठिकाणी एकटीने जायचं ठरवते, त्याच्या आदल्या रात्री मला अजिबात झोप येत नाही. पोटात एक वियर्ड फिलिंग असते. मनात किंचित भीतीचा भाव. मेंदूत excitement आणि प्रवासाबाबतची साशंकता. माझे डोळे मिटतच नाहीत. कुठेतरी मेंदूने या अनुभवांचे जाळे अजून जपून ठेवले असावेत. प्रवासाच्या आदल्या रात्री ते मला असे घेरून टाकतात. त्यावेळी फार म्हणजे फार निराशावादी वाटायला लागते. मग पुढच्या दिवशी माझा प्रवास सुरु होतो. चांगली माणसे भेटू लागतात आणि अलवारपणे हि भीती, वियर्ड फिलिंग नामशेष होत जाते…!

#metoo

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

Previous articleमहात्मा गांधी आणि संगीत
Next article‘मी टू’…एका संपादकाचा कबुलीजबाब !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here