‘त्यांचं’ आणि कुणाचंच ‘सेम’ नव्हतं…!!

– मीडिया वॉच दिवाळी अंक -२०१८


-मल्लिका मेहर

दिलीपकुमारनंतर सहज नंबर येतो तो राज कपूरचा. हे गृहस्थ फार लवकर कामाला लागले. हेमा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले. मुलगी अतिशय देखणी, पण खानदान तोलामोलाचे नाही. म्हणून साहजिक कुटुंबाने नाकारली. या मुलीशी नंतर सप्रू नावाच्या नटाने लग्न केलं. राज-नर्गिस प्रकरण पुन्हा (त्यांना झालेल्या मुलीसह) ‘चावून चोथा’ झालेले. त्यामानाने राज-वैजयंती प्रकरणातले तपशील फार लोकांना माहीत नाहीयेत. दोघं इतके पुढे गेले होते की राज कपूरची बायको त्याला सोडून, मुलाबाळांसह मुंबईच्या ‘नटराज’ हॉटेलमधे शिफ्ट झाली होती. वर्षातून तीन वेळा वैजयंतीला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरची गरज लागायची. डॉक्टर बाली राजचा मित्रच होता. अखेर राजने त्याच्याशीच लग्न करण्याचा सल्ला तिला दिला आणि मग या नटराजाने आपला कुटुंबकबिला ‘नटराज हॉटेल’मधून घरी आणला.  

दिलीप आणि राजनंतर अर्थात देव आनंद. याचं आणि सुरैयाचं अनेक दिवस एकमेकांवर प्रेम होतं. पण तिच्या आजीला हिंदू नातजावई नको होता. सुरैया आजन्म अविवाहित राहिली. देव’ने कल्पना कार्तिकशी लग्न केलं. पहिल्या दोन-चार वर्षात दोघांचं पटेनासं झालं. पण देव पहिल्यापासून decent man – सभ्य गृहस्थ म्हणून प्रसिद्ध होता. त्याने या बेबनावाचा तमाशा केला नाही. कल्पनाचं नाव ‘नवकेतन’ची एक निर्माती म्हणून येत राहिलं. पण ती राहिली कायम लंडनमधे. तसंही, देवला पुन्हा लग्न वगैरे करायचं नव्हतंच. तात्पुरत्या गरजा भागवायला अनेक होत्या, पण त्याला प्रेम म्हणता येणार नाही. सहज आठवलं, ‘देव-फाईंड’ टीना मुनीमच्या चेहऱ्यात सुरैयाच्या तरुणपणाची झलक आहे. 

*******************************************

लफडी करणं ही माणसाची आदिम करमणूक आहे. माणसाची निर्मितीच मुळात ‘अॅडम’ आणि ‘इव्ह’च्या लफड्यातून झाली. त्यांचं लग्न झालेलं नव्हतं, म्हणजे इव्हचं ‘फळ खाणं’ हे लफडंच की नाही? असे, लग्नाशिवाय ‘फळं खाणाऱ्यांच्या’ किश्शांना फार पूर्वीपासून बाजारात बहुत ‘उठाव’ असतो. त्यातून सिनेजगत म्हणजे लै भारी. ‘ही आपल्याला मिळावी’ आणि ‘हा आपल्याला मिळावा’ ही छुपी मनशा, सिनेमे बघणाऱ्या बहुतेकांच्या मनात असते. त्यामुळेच आपल्या मनात असलेले ‘ही’ आणि ‘हा’ कुणाला मिळालेत हे समजून घेण्याची इच्छा वाढीला लागते. आज आपण काही अशा किश्शा/घटनांचा मागोवा घेणार आहोत, ज्याबद्दल प्रेक्षकांना फार कमी किंवा अजिबात माहीत नाहीये.

“कितीही कष्ट करून कथा-पटकथा बनवा, जोपर्यंत गोष्ट कमरेखाली जात नाही तोपर्यंत सिरियल पकड घेत नाही,” एक मालिका लेखक तळमळून बोलत होते. त्यांच्या बोलण्यात तथ्य आहेच. माणूस कितीही सुसंस्कृत झाला तरी शेकडा ७०-७५% लोकांचं लक्ष तरी इतरांच्या ‘कमरेखालच्या प्रदेशात’ असतं. त्यातून आमच्या सिनेजगतात असणारे लोक म्हणजे ‘सार्वजनिक मालमत्ता’ असतात. त्यांची लफडी आणि प्रकरणे तर फारच चवीने वाचली जातात.

हल्ली अशी सेन्सेशनल लफडी फार होत नाहीत. कारण एक तर जीवनमूल्ये बदलली आहेत, त्यामुळे आयुष्याकडे बघण्याची नजर बदलली आहे. म्हणून सगळं सोपं झालंय. पण जुन्या काळात..?? अबब.. माध्यमं फार नव्हती. पण या गोष्टी खूप चवीने चघळल्या जायच्या. माणसाचं आदिम मनोरंजन, त्यातून तो कधीच सुटला नव्हता, नाही. पण पूर्वी ‘अडकणे’ फार होते.. आज ते तेवढे नाहीये.

आपण जुन्या जमान्यातल्या अप्रसिद्ध पण खऱ्या घटनांचा मागोवा घेणार आहोत.

अभिनयाच्या शहनशहापासून सुरुवात करू. दिलीपकुमार. दिलफेंक गडी. त्याचे किस्से सांगण्याआधी त्याला शह देणाऱ्याचा किस्सा सांगायला पाहिजे. ‘मुगलेआझम’ बनत होता. म्हणजे तो तसा अनेक वर्ष ‘बनत’ होता. तो सुरु झाला तेव्हा त्यात ‘बहार’ची भूमिका करणारी निगार सुलताना ही निर्माता के.आसिफची एकुलतीएक बायको होती. पण मुगलेआझम’ संपत आलं त्या दरम्यान के.आसिफने दिलीपकुमारच्या अख्तर नावाच्या बहिणीवर मोहिनीमंत्र टाकला आणि तिच्याशी निक़ाह करून घेतला. दिलीपकुमारला याचा इतका राग आला की तो सिनेमाच्या प्रीमियरला आलाच नाही. हा प्रीमियर काही साधासुधा नव्हता. हत्तीवर ठेवलेल्या चांदीच्या अंबारीतून सिनेमाची प्रिंट मुंबईच्या ‘मराठामंदिर’ सिनेगृहात आणली गेली. त्या मिरवणुकीत खुद्द के.आसिफ आपल्या नव्यानवेल्या दुलहनसह हजर होते. इतर कलावंत होते, पण शहजादा सलीम गायब होते.

दिलीपकुमारला कदाचित हा धक्का लागला असेल की मी एवढा ‘मुरलेला’ असतांना या माणसाने माझ्या नाकाखालून माझी बहीण पळवली आणि मला कळलं कसं नाही?? चांगलाच मुरलेला होता दिलीपकुमार या खेळात.

‘ज्वार-भाटा’ हा चाळीसच्या दशकातल्या सुरुवातीच्या वर्षातला सिनेमा. दिग्दर्शक अमेय चक्रवर्ती. किशोरकुमारची सगळ्यात पहिली बायको रुमा गुहा ठाकुरता ही नायिका होती. दिलीपकुमार होताच. याच सिनेमात. मृदुला नावाची एक नटी होती. नाजूक, कपाळावर चोरट्या बटांची छानदार महिरप असलेली. साहेब तिच्या प्रेमात पडले आणि तिला घेऊन आपल्या मूळ गावी पळून गेले. म्हणजे नंतरच्या पाकिस्तानात. काही महिन्यात हा ताप उतरला. दोघं परत आली. आपापल्या कामाला लागली. पण मृदुलाची कारकीर्द डगमगली. ती ‘लफडेबाज’ ठरवली गेली. पोटासाठी नगण्य, छोट्यामोठ्या भूमिका मानहानीसह करायला लागली. अगदी कालपरवापर्यंत करत होती. आता कुठेय माहीत नाही.

त्यानंतर कामिनी कौशल. दिलीप-कामिनी प्रकरण अनेक वर्षं गाजलं. पण त्याच सुमारास कामिनीच्या मोठ्या विवाहित बहिणीचं अकाली निधन झालं. दोन छोट्या मुली माघारी सोडून ती वारली. कुटुंबियांच्या आग्रहाला बळी पडून कामिनीला आपल्या बहिणीच्या नवऱ्याशी – कॅप्टन सूद याच्याशी लग्न करावं लागलं. पण त्यानंतरही ती दिलीपकुमारला भेटत राहिली. तिच्या भावाने मुंबईच्या लोकलमधे दिलीपकुमारवर रिव्हॉल्वर रोखून त्याला धमकी दिली आणि हे प्रकरण संपलं असं म्हणतात. काहीजण म्हणतात, मधुबाला भेटली आणि हे प्रकरण संपलं. काहीही असेल. पण यातली गंमत अशी की याच कथेवर बी.आर.चोप्रा यांनी ६३ साली ‘गुमराह’ हा सिनेमा बनवला. त्या सिनेमातल्या ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जायें हम दोनों’ या गाण्याच्या मागे साहिरच्या प्रेमभंगाची अशीच एक दिलचस्प कथा आहे.

साहिर लुधियानवी आणि गायिका सुधा मल्होत्रा अनेक वर्षे प्रेमात होते. लग्न करू शकले नाहीत, सुधाचं लग्न झालं. त्यानंतर एका फिल्मी समारंभात दोघं समोर आले. सुधाच्या डोळ्यात पाणी. तिने विचारलं, काय झालं हे आपलं?? साहिर म्हणाला, ‘वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमक़िन, उसे इक़ खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा!’ सुधा म्हणाली, काहीतरी बोलू नकोस, मला रडू येईल. लोक बघताहेत. साहिर हसला, ‘चलो इक़ बार फिर से अजनबी बन जायें हम दोनों,’ असं म्हणाला आणि रवाना झाला तिथून. एक अमर रचना आणि त्यातली अजरामर लाईन अशी जन्माला आली.

आपण दिलीपकुमारबद्दल बोलत होतो. मधेच साहिर आला. हे शायर लोक असेच ज़ालिम  असतात. मनात जरासा दुभंग सापडला की त्यात शिरतात, तसा हा आपल्या लेखात शिरला.

तर.. दिलीपकुमार..!!

कामिनी कौशलच्या लग्नानंतर ’५१ ते ’५६ ही पाच वर्षं दिलीप-मधुबाला प्रेमात होते. ही लव्ह स्टोरी इतकी प्रसिद्ध आणि चावून चोथा झालेली आहे की त्याबद्दल वाचायचा सोडा, लिहायचाही कंटाळा येतो. यात सगळ्यात गमतीशीर भाग म्हणजे ट्रॅजिडी किंगच्या मिठीतून बाहेर पडलेली मधुबाला थेट जाऊन पडली ती कॉमेडी किंग किशोरकुमारच्या मिठीत.

मृदुला ते अस्मां जहांगीरपर्यंत अक्षरश: अनेक प्रेम-प्रकरणं दिलीपकुमारच्या खात्यात जमा आहेत. अगदी देविकाराणीपासून. नसीमबानो, म्हणजे सायराबानोच्या आईशीही साहेबांनी एक शॉर्टटर्म म्हणजे एखाद वर्षाचे प्रकरण केले होते. त्यामुळे दिलीप-सायरा लग्न झाल्यावर सायराचा जन्म त्याच काळातला तर नाही ना, असा घोर काही विघ्नसंतोषी हितचिंतकांना लागला होता.

दिलीपकुमार हा अतिशय तहजीबदार माणूस आहे. पडद्यावर प्रेम करतांना त्याच्या डोळ्यात एक आश्वासन दिसतं. त्याचा आधार वाटतो. त्यामुळे विशिष्ट क्लासच्या बायकांना आणि अभिनेत्रींनाही तो नेहमी आपलासा वाटला. अभिनेत्री कशाला, दस्तुरखुद्द मी पण ‘मरते’ त्याच्यावर. फिर औरों की बात ही क्या!!

पण काही प्रकरणं सपशेल आपल्या कारकिर्दीला टेकू मिळावा म्हणून (त्याकाळातही) होत होती. नाहीतर प्रेमात पडावं असं काय होतं निर्माता मेहबूब खानमधे? पण अशा प्रकरणांत बायका बहुतेक तोंडघशीच पडलेल्या दिसतात. या निर्मात्यानेही त्याच्याभोवती गोंडा घोळणाऱ्या शीला नाईक नावाच्या छोट्या भूमिका करणाऱ्या मुलीशी लग्न करून तिला मुंबईच्या भेंडी बाजारात एका खोलीत पडदानशीन करून ठेऊन दिलं. नायिका होणं सोडाच, सिनेमात काम मिळण्याची पण मुश्कील झाली. तिच्यावर एवढ्या पाबंदी होत्या की ती एक दिवस तिथून पळून गेली. डान्सर होती. अतिशय कुरळ्या केसांच्या दोन कानावर दोन छोट्या पोनी बांधणारी ही शीला नंतर अनेक गाण्यात एक्स्ट्रामधे दिसली.

एक्स्ट्रामधल्या मुली बहुतेकवेळा हिरोची शिकार ठरतात. हा मामला परस्परसंमतीचा असतो. स्वार्थ साधला गेला नाही की बोंब मारायची असते. हे धोरण आजही वापरलं जातंच की. अगदी सर्वसामान्य समाजातही सर्रास हे होतं. पण यातही काही मुली मनापासून प्रेमात पडतात आणि शेवटी गर्तेत जातात. अशीच एक शम्मी कपूरच्या बहुतेक गाण्यात एक्स्ट्रामधे सतत दिसणारी डान्सर.. शम्मी कपूरबरोबर संबंध असलेली. या संबधातून तिला एक मुलगी झाली. शम्मी लग्न करणार नव्हताच. ती मुलगी नंतर हिंदी सिनेमात नायिका म्हणूनही आली. पण अशा मुलांची नावं माहीत असली तरी सांगणं नको वाटतं. म्हणूनच शीला नाईक-मेहबूब खानच्या मुलाचं नाव पण मी नाही सांगितलं.

शम्मी कपूर याबाबतीत इतका निगरगट्ट होता की मुलगी कह्यात येत नाहीये हे कळल्यावर तो तिला सेटवर त्रास द्यायचा, जाहीर मानहानी करायचा. एकदा सेटवर बसल्या-बसल्या एका मोठ्या नामचीन नायिकेच्या पायाच्या नडगीवर आपल्या टोकदार बुटांनी प्रहार करून-करून रक्त काढलं होतं त्याने. असो.

आपण शम्मीवर कुठे पोचलो एकदम? दिलीपकुमारनंतर सहज नंबर येतो तो राज कपूरचा. हे गृहस्थ फार लवकर कामाला लागले. हेमा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले. मुलगी अतिशय देखणी, पण खानदान तोलामोलाचे नाही. म्हणून साहजिक कुटुंबाने नाकारली. या मुलीशी नंतर सप्रू नावाच्या नटाने लग्न केलं. राज-नर्गिस प्रकरण पुन्हा (त्यांना झालेल्या मुलीसह) ‘चावून चोथा’ झालेले. त्यामानाने राज-वैजयंती प्रकरणातले तपशील फार लोकांना माहीत नाहीयेत. दोघं इतके पुढे गेले होते की राज कपूरची बायको त्याला सोडून, मुलाबाळांसह मुंबईच्या ‘नटराज’ हॉटेलमधे शिफ्ट झाली होती. वर्षातून तीन वेळा वैजयंतीला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरची गरज लागायची. डॉक्टर बाली राजचा मित्रच होता. अखेर राजने त्याच्याशीच लग्न करण्याचा सल्ला तिला दिला आणि मग या नटराजाने आपला कुटुंबकबिला ‘नटराज हॉटेल’मधून घरी आणला.

दिलीप आणि राजनंतर अर्थात देव आनंद. याचं आणि सुरैयाचं अनेक दिवस एकमेकांवर प्रेम होतं. पण तिच्या आजीला हिंदू नातजावई नको होता. सुरैया आजन्म अविवाहित राहिली. देव’ने कल्पना कार्तिकशी लग्न केलं. पहिल्या दोन-चार वर्षात दोघांचं पटेनासं झालं. पण देव पहिल्यापासून decent man – सभ्य गृहस्थ म्हणून प्रसिद्ध होता. त्याने या बेबनावाचा तमाशा केला नाही. कल्पनाचं नाव ‘नवकेतन’ची एक निर्माती म्हणून येत राहिलं. पण ती राहिली कायम लंडनमधे. तसंही, देवला पुन्हा लग्न वगैरे करायचं नव्हतंच. तात्पुरत्या गरजा भागवायला अनेक होत्या, पण त्याला प्रेम म्हणता येणार नाही. सहज आठवलं, ‘देव-फाईंड’ टीना मुनीमच्या चेहऱ्यात सुरैयाच्या तरुणपणाची झलक आहे.

दिलीप-राज-देव या तिघांच्या महत्वाच्या प्रकरणांबद्दल आपण बोललो. बाकी ‘छुट्टी मजुरी’ तर कधीही कुठेही चालते. फक्त सिनेजगतातच नाही, अगदी आपल्या नोकरी करणाऱ्या मध्यवर्गातही. मध्यंतरी म्हणजे तरी पंधरा-वीस वर्षापूर्वी अशी एक बातमी वाचल्याचं आठवतंय की दक्षिण मुंबईत, जिथे सगळा सरकारी आणि खाजगी कार्यालयांचा पसारा आहे, तिथले आणि थेट गिरगावपर्यंतचे सगळे ‘चादर बदलू’ लॉजेस लंच टाईममधे फुल भरलेले असतात. पण या प्रकारांना प्रेम नाही म्हणता येणार. बॉसला खुश करण्याची खेळी, (बॉस बाई/पुरुष कुणीही असो, त्यात फरक नाही करता येत.) किंवा निव्वळ टाईमपास म्हणूनही हे खेळ खेळले जातात. ‘खेळ’ म्हंटल्यावर त्याला इतर कसलेही ठप्पे लावणं, त्यातून नैतिकतेच्या अपेक्षा ठेवणं चूकच.

पी.एल. संतोषी नावाचे निर्माते (आपल्या राजकुमार संतोषीचे वडील) रेहाना नावाच्या नटीच्या एवढ्या प्रेमात होते की चेनाच्या जंगलात चित्रीकरण सुरु असतांना तिला उकडलेली अंडी हवी होती म्हणून त्या काळात, साठ वर्षापूर्वी ५० रुपयांना एक या भावाने तिथल्या लोकल रहिवाश्याकडून डझनभर अंडी त्यांनी खरेदी केली होती. एक लक्षात घ्या, त्या दिवसात वीस रुपये पगारात पाच माणसांचे कुटुंब चालत होते.

‘काय जमाना आलाय,’ असं म्हणण्यातही अर्थ नाही. प्रेमात पडण्याची दीवानगी कधी नव्हती?? शोभना समर्थ नावाची एक अतिशय देखणी नटी होती. हे माहीत असलेली पिढी काही वर्षात संपून जाईल. शोभनाबाईंचं मोतीलाल नावाच्या नटावर प्रेम होतं. एकीकडे कुमारसेन समर्थांशी संसार सुरु होता. दुसरीकडे हे. मोतीलाल म्हणजे, ‘जिन्दगी ख्वाब है’ हे ‘जागते रहो’मधलं गाणं ज्याच्यावर चित्रित झालं तो. आपल्याकडे जे काही चार-पाच ओरिजिनल अभिनेता होते/आहेत, त्यातला पहिला. आणि शोभना समर्थ म्हणजे नूतन-तनुजाची आई. काजोलची आजी. (जिज्ञासूंनी तनुजा आणि मोतीलालची चेहरेपट्टी, खासकरून कपाळावर असलेली ‘हेअर लाईन’ ताडून बघावी.) तर, ही दोघं नाकापर्यंत प्रेमात होती. एकदा काहीतरी भांडण झालं. शोभना बाई रुसून आपल्या लोणावळ्याच्या बंगल्यात जाऊन बसल्या. मोतीलालना प्रवेश बंद. आता करणार काय?? मोतीलालने ‘आय एक सॉरी,’ असं लिहिलेली हजारभर पत्रकं छापून घेतली. एक हेलीकॉप्टर भाड्याने घेतलं आणि त्या पत्रकांची बरसात शोभना बाईंच्या बंगल्यावर झाली.

आजची मुलं म्हणतात, एवढ्या खर्चात दुसरी एखादी पटली असती. पण राव, प्यार करनेवाले पैसा नहीं देखते!!

प्रेमाची ही सफर मराठी नट्यांपर्यंत आलेली आहेच. ‘आम्ही मराठी म्हणजे सुसंस्कृत, असलं काही आम्ही…’ वगैरे म्हणणाऱ्यांना आणखी काही धक्के देऊ. स्नेहप्रभा प्रधान आणि जागतिक कीर्तीचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर शिरोडकर यांच्याबद्दल मी काही बोलायला नको. बाईंनी त्यांच्या ‘स्नेहांकित’ या आत्मचरित्रात त्याचे सुतोवाच केलेले आहे. आपण वत्सला देशमुख या मराठी नटीबद्दल बोलू. स्व. रंजना देशमुख यांच्या या मातोश्री. संध्या शांताराम म्हणजे पूर्वाश्रमीच्या विजया देशमुख यांच्या थोरल्या भगिनी.

मग रंजनाचं आडनाव देशमुख कसं??

बडोदे संस्थानात हे देशमुख कुटुंब होतं. दोघी मुली पोरसवदा वयात गुजराती नाटकात कामं करायला लागल्या. जुन्याजीर्ण लोकांना बहुतेक आठवत असेल, संध्या या नटीला व्ही. शांताराम यांनी मुंबईच्या भांगवाडी गुजराती थिएटरमधे ‘गाडा नो बैल’ या गुजराती नाटकातच सर्वप्रथम पाहिलं होतं. हे देशमुख कुटुंब बडोद्यात होतं तेव्हा त्या नाटक कंपनीत चुन्नीलाल राजस्थानी नावाचा एक तबलजी होता. ‘तरगाला’ म्हणजे आपल्याकडच्या ‘भाट’ जातीसदृश जात. या जातीतले लोक गाणे-बजावणे करतात. या राजस्थानीच्या प्रेमात वत्सला देशमुख पडल्या. त्यांना तीन मुलं झाली. रंजना, श्रीकांत आणि आणखी एक मुलगा. नंतर त्यांना कळलं की तो माणूस पूर्वीच विवाहित होता. इतरही वाईट शौक होते. वत्सला बाईंनी काडीमोड घेतला आणि देशमुख बाबा आपलं कुटुंब घेऊन मुंबईत आले. वत्सला बाईंच्या मुलांना बाईंचं माहेरचं आडनाव मिळालं. असो.

लेखात अनेक ठिकाणी मी म्हंटलय, हे प्रकार काही नवीन नाहीत. पण तरी ते चघळायला आवडतात. विशेषत: भारतीयांना. त्यांचं depressed sex – बळजबरी दाबून ठेवलेल्या लैंगिक भावना याला कारणीभूत आहेत. आपल्या घरात भरपूर जेवण असलं तरी काहीतरी चटकदार आपल्याला हवं असतं. ते आपण बाहेरच्या गप्पांत, सोशल मंचावर, पडद्यावर, पुस्तकात शोधतो. सार्वजनिक जीवनात असणाऱ्या लोकांना पैशासोबत प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत असते. त्यांची लैंगिक आणि प्रेमाची प्रकरणे चघळली जाणे हा त्याच पॅकेजचा साईड इफेक्ट आहे. आपण ते चघळलं म्हणजे ते वाईट आहे असा त्याचा अजिबात अर्थ नाही. सगळी प्रकरणे, सगळी लफडी, ही त्या-त्या काळात दोन संबंधितांना आनंदच देत असतात. आणि जगण्यात आनंद शोधणं यात काहीच गैर नाही. ज्यांना हे जमत नाही ते लोक नावं ठेवतात. पण प्यार करनेवाले कब किसीका सुनते हैं?? प्यार तो प्यार होता है. प्रेम हे प्रेमच असतं, फक्त.. त्यांचं आणि कुणाचंच सेम नसतं!

(लेखिका नामवंत सिने पत्रकार आहेत)
**

Previous articleकुक्कू !
Next articleसेवालय – रवी बापटले लेख
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here