दार्जिलिंग :द टेस्ट ऑफ टी

-राकेश साळुंखे

  तीनेक वर्षांपूर्वी भूतानला गेलो होतो. त्यावेळी आमच्या टूर पॅकेजमध्ये मी दार्जिलिंगचा समावेश केला होता. दार्जिलिंगला जायचे खूप दिवसांपासून मनात होते मग संधी मिळताच ती साधली. पुणे ते दिल्ली व पुढे दिल्ली ते बागडोगरा विमानप्रवास करून बागडोगरामधून आमच्या टूर ऑपरेटरने अरेंज केलेल्या टॅक्सीने दार्जिलिंगला गेलो. दार्जिलिंगला जवळचा एअरपोर्ट बागडोगरा आहे तर जवळचे रेल्वे स्टेशन जलपैगुडी आहे.

         शिवालीक पर्वतरांगांमध्ये वसलेले दार्जिलिंग म्हणजेच तिबेटी भाषेत दोर्जे  लिंग (शिवाचे स्थान)  होय. ब्रिटिशांनी 19 व्या शतकाच्या सुरुवातीला दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित केले. इंग्रज अधिकारी उन्हाळ्यात सुट्टी घालवण्यासाठी या ठिकाणी येत असत . ब्रिटिशांनी 1835 नंतर रस्ते विकसित करून हे शहर मुख्य प्रवाहाला जोडले .

    जेव्हा आम्ही दार्जिलिंग(हिमालयाच्या )  च्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा दुपारचे  4 वाजले होते तरी तिन्हीसांज झाल्यासारखे वातावरण झाले होते. आपल्या पूर्वेकडे हा भाग असल्याने तेथे अंधार लवकर पडतो.आमची गाडी जेव्हा घाट चढू लागली तेंव्हा वळणदार घाटामध्ये प्रत्येक वळणावर काळजाचा ठोका चुकत होता.  एकीकडे तळही न दिसणाऱ्या दऱ्या तर दुसरीकडे शिखर न दिसणारे पर्वत हिमालयीन प्रवासाची चुणूक दाखवत होते. घाटातील रस्ता खूपच अरुंद असल्याने जणूकाही वाहनचालकाची परीक्षा चालली आहे असे वाटत होते. वाटेत जरा रुंद जागा असली  की तिथे घरे दिसायची. दरीच्या बाजूला असणारी ही घरे मनात धडकी भरवत होती. या घराचा मागचा दरवाजा बहुतेक दरीतच उघडत असावा.  जवळपास प्रत्येक घरात बाहेरील एका छोट्या रूममध्ये चहा, कोल्ड्रिंक्स, मोमोजचे स्टॉल लावलेले दिसत होते. आम्हीही एके ठिकाणी चहाचा स्वाद घेतला. तेथेच आम्हाला मातृसत्ताक जीवनपद्धतीची ओळख झाली व पुढील सर्व प्रवासात ती आणखी गडद होत गेली. आम्ही जेथे चहा घेतला ते नेपाळी जोडपे होते. काम मिळवण्यासाठी ते भारतात आले व येथेच स्थायिक झाले होते. अशी बरीच नेपाळी माणसे पुढेही भेटली. चहाच्या निमित्ताने गाडी बाहेर पाऊल ठेवल्याबरोबर हिमालयीन थंडगार वाऱ्याने आमचे स्वागत केले. अजून तर थोडाच घाट चढला होता व बराच चढायचा बाकी होता. गूढरम्य घाटातून शांतपणे आमचा प्रवास सुरू होता. वाटेत गाव (दहा ते बारा घरांचा समूह ) लागले की तेवढेच बरे वाटायचे.

    घाट चढून वर दार्जिलिंगमध्ये पोहचायला संध्याकाळचे सात वाजले. शहरात बऱ्यापैकी सामसूम दिसत होती. चढ-उताराच्या अरुंद रस्त्यावरून आमची टॅक्सी जात होती. एके ठिकाणी गाडी थांबवून ड्रायव्हरने जेवण करून या… मी येथेच थांबतो असे सांगून आम्हाला उतरवले. जवळच बाजारपेठ असल्याने लोकांची लगबग दिसत होती, त्यामुळे जरा हायसे वाटले. येथे सर्रासपणे जेवणात बीफ, पोर्क खाल्ले जाते असे ऐकून असल्याने शाकाहारी हॉटेल शोधून तेथे शिरलो. हॉटेलमध्ये फारशी गर्दी नसूनही जेवण मिळण्यास बराच वेळ लागत होता. आमच्या आजूबाजूला बसलेली मंडळी उठून जात होती पण तिकडे कोणाचे लक्ष नव्हते. मला याचे आश्चर्य वाटले, पण नंतर चौकशीअंती कळले की त्या भागातील ते एकमेव शाकाहारी हॉटेल होते. आम्ही जेवून गाडीकडे निघालो असता वाटेत उबदार कपड्यांची बाजारपेठ लागली.आपल्याकडे मे मधील उन्हाळा सुरू असल्याने आम्ही स्वेटर वगैरे काही बरोबर घेतले नव्हते. तेथे मात्र डिसेंबर  महिन्यातील थंडीपेक्षाही जास्त वाटावी इतकी थंडी वाजत होती. त्यामुळे स्वेटर घेणे गरजेचे झाले होते.  किफायतशीर किमतीत  मिळालेल्या स्वेटर्सचा आनंद घेत गाडीजवळ पोहोचलो.

आम्हाला जेवण करून यायला जवळपास दोन तास लागले होते परंतु ड्रायव्हर मात्र न कंटाळता आमची वाट पहात असलेला दिसला. त्याने आमच्या जेवणाची व खरेदीची विचारपूस केली व गाडी हॉटेलच्या दिशेने न्यायला सुरुवात केली. आता मात्र सगळे रस्ते ओस पडले होते.  तुरळक वाहतूक तेवढी दिसत होती. तेवढ्यात अचानक पाऊस सुरू झाला. हिमालयातील लहरी हवामानाचा अनुभव जो की ऐकून होतो तो यायला सुरुवात झाली. थंडी, वारा, पाऊस सगळ्याचा एकदमच मारा सुरू झाला होता. गाडीत हीटर असल्याने हा मारा सुसह्य होता पण हॉटेल जवळ उतरताना मात्र आमची चांगलीच तारांबळ उडाली. थोडफार भिजतच रूम गाठली. रूममध्ये जातोय तोपर्यंत लाइट गेले. जनरेटर, इन्व्हर्टरचीही सोय उपलब्ध नव्हती फक्त मेणबत्तीचा सहारा होता. कपडे भिजल्याने हाडे गोठतील इतकी थंडी वाजत होती. बोलण्यासाठी तोंड उघडले की प्रथम दात वाजायचे व मग आवाज फुटायचा.  आता ते आठवून हसू येते. पण त्यावेळी मात्र आमची भयंकर परिस्थिती झाली होती.

       सकाळी लवकर बाहेर पडायचे होते. त्यामुळे सहालाच उठलो तर बाहेर चांगलेच फटफटीत उजाडले होते. पाऊसही थांबला होता. दार्जिलिंग मधील काही मोजकी पर्यटनस्थळे पाहण्याचा आमचा प्रोग्रॅम होता.  पटकन नाश्ता करून बाहेर पडलो तर पुन्हा हवामान बदलले व पावसाची भुरभुर सुरू झाली. आमचे हिरमुसले चेहरे पाहून ड्रायव्हर म्हणाला पाऊस थांबेल काळजी करू नका. प्रथम आम्ही जपानी पीस पॅगोडा पहायला गेलो. जगात शांती रहावी यासाठी हा स्तूप फुजी गुरूने उभारला आहे. भारतात असणाऱ्या सहा शांती स्तुपांपैकी हा एक आहे.  तेथे जाईपर्यंत पाऊस थांबला. नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे मुळातच हिरवा असलेला तेथील निसर्ग आणखीनच हिरवा दिसत होता. त्या हिरव्या पार्श्वभूमीवर पांढराशुभ्र पॅगोडा उठून दिसत होता. या ठिकाणी सुंदर बगीचा असून थोडे वर चढून गेल्यावर एक चौथरा आहे. तेथून पूर्ण दार्जिलिंग नजरेच्या टप्प्यात येते. निसर्गाच्या कुशीत वसलेले दार्जिलिंग येथून पहाणे म्हणजे एक पर्वणीच वाटली. येथून हिमालयीन पर्वतरांगेतील कांचनगंगा शिखराचे दर्शन घडते. इतर पर्यटकांप्रमाणेच आम्हीही हे शिखर पाहण्यास उत्सुक होतो.  परंतु धुक्याचा दाट पडदा असल्याने आम्हा सर्वांची निराशा झाली होती. मात्र थोड्या प्रतीक्षेनंतर एकदाचे धुकं हटले व सूर्याच्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेलं कांचनगंगा शिखर दृष्टीस पडले. काही क्षणांचे हे दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारे  ठरले.  शिखरावर पडलेले , चमचमणारे बर्फ सोनेरी मुकुटाप्रमाणे दिसत होते. काही क्षण हे शिखर चमकून लगेचच धुक्यात गायब व्हायचे. हा लपंडाव पहायलाही  मजा येत होती. या परिसरात कमालीची शांतता व स्वच्छता होती. तेथील एका कट्ट्यावर थोडावेळ बसून मनःशांतीची अनुभूती घेत ताजेतवाने झालो. तेथून आम्ही जैविक उद्यान पहायला निघालो. त्या उद्यानाजवळ पोहोचलो आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. छत्र्या घेऊन गाडीबाहेर आलो. परंतु छत्र्यांना न जुमानणाऱ्या पावसात भिजण्यापेक्षा गेटजवळील एका शेडमध्ये थांबणे आम्ही पसंत केले. खूप वेळ झाला तरी पाऊस काही थांबण्याचे नाव घेईना. शेवटी छत्र्या उघडून थोडेफार भिजत उद्यानात फिरायचे ठरवले.

     चाळीस एकर क्षेत्रावर ही बोटॅनिकल गार्डन विस्तारलेली आहे. ऑर्किडसाठी प्रसिद्ध असलेल्या या गार्डन मध्ये 50 प्रकारचे ऑर्किडस पाहायला मिळतात. विविध प्राणी देखील येथे आहेत. सैबेरिअन वाघ व लाल पांडा हे येथील मुख्य आकर्षण आहे. त्या ठिकाणी प्राण्यांच्या पिंजऱ्याची रचना अशा प्रकारे केली आहे की त्या प्राण्यांना हा पिंजरा म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवासच वाटावा व ते मोकळेपणाने तेथे रहावेत. इतर प्राण्यांबरोबर सैबेरिअन पांढरा वाघ सहजपणे दिसला. पांडा मात्र झाडाच्या ढोलीत जाऊन बसला होता तो काही बाहेर यायचे नावच घेईना. नावाला छत्री डोक्यावर होती पण पावसाने आम्हाला चांगलेच भिजवले होते, तरीही आम्ही व आमच्यासारखीच काही पर्यटक मंडळी त्याची वाट पहात त्याच्या निवासासमोर उभे होतो. बऱ्याच वेळाने तो त्याच्या ढोलीबाहेर आला आणि मुखदर्शन देऊन पुन्हा गायब झाला. काही सेकंदाच्या या त्याच्या दर्शनावरच समाधान मानून आम्ही त्या गार्डन बाहेर पडलो.  बाहेर आलो तर गाडी दिसेना , ड्रायव्हर ला फोन केला तर तो खाली पार्किंग मध्ये थांबला होता व तेथपर्यंत आम्हाला चालत जायचे होते. पाऊस तर थांबायचे नाव घेत नव्हता. आम्ही सगळे भिजल्याने चांगलेच गारठलो होतो.  त्यामुळे चहा प्यायच्या इराद्याने तेथीलच एका छोट्या ठेल्याकडे गेलो. तर तेथे गरमागरम वाफाळलेले मोमोज दिसले.  तिकडे गेल्यावर मोमोजचा स्वाद नक्की घ्या असे बऱ्याच जणांनी सांगितले होते. त्यावेळी ही डिश आमच्या साताऱ्यासारख्या छोट्या शहरात तशी दुर्मिळच होती. तिबेट तसेच नेपाळ मधील हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ नाश्ता किंवा जेवणातही खाल्ला  जातो.  पाऊस व थंड हवा आशा वेळी मिळालेले गरमागरम मोमोज अन त्यासोबत चा आल्याचा चहा यामुळे आमची थंडी कुठल्याकुठे पळाली. हा ठेला चालवणारे जोडपेही नेपाळीच होते.

      आता पाऊस थोडा कमी झाला होता. आम्ही दार्जिलिंगचे सुप्रसिद्ध चहाचे मळे पहायला निघालो. आंतरराष्ट्रीय स्तरावर दार्जिलिंगचा चहा दर्जेदार मानला जातो. 1856  मध्ये येथे चहा उत्पादनाला सुरुवात झाली. येथील चहा उत्पादकांनी ब्लॅक टी व चहा पत्तीवर जी किनवन fermentation प्रक्रिया करतात त्याची जी पध्दत शोधली आहे ती जगभरात उत्कृष्ट मानली जाते. यापूर्वी मी भारतामधील (मुन्नार, उटी आणि द. भारताच्या इतर भागातील ) तसेच श्रीलंका, व्हिएतनाम या देशातील मळे पाहिले होते पण तरीही या भागातील चहाचे मळे पाहण्याची उत्सुकता मला लागली होती. पावसाच्या भुरभुरीतच एके ठिकाणी रस्त्यावर आम्हाला उतरवले. तेथे एका बाजूला डोंगरकडा तर दुसऱ्या बाजूला छोटी छोटी हॉटेल्स होती. आता येथे कुठे मळा असेल असा प्रश्न मला पडला तोच आमच्या वाटाड्याने एका छोट्या रस्त्याने त्या हॉटेल्सच्या मागे नेले. पाऊस व धुकं यामुळे पुढचे दृश्य अस्पष्ट होते. जेंव्हा धुके हटले तेंव्हा समोर पसरलेल्या विस्तीर्ण मळ्याचे दर्शन झाले. खाली डोंगर उतारावर खूप लांबपर्यंत हिरवेगार चहाचे मळे पसरले होते. धुक्याची चादर पांघरलेले मळे आमच्यासारखेच गारठलेले वाटले. तेथे थोडा वेळ थांबून फोटोग्राफी करून व दार्जिलिंगच्या ब्लॅक टी ची चव घेऊन टॉय ट्रेन पहाण्यासाठी निघालो.

        वर्ल्ड हेरिटेज असणारी ही ट्रेन पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहे. यामधून प्रवास करण्याची खूप इच्छा होती परंतु वेळेअभावी ती अपूर्ण राहिली. दार्जिलिंग पासून 5 किमी अंतरावर बटासिया लूप (Batasia loop ) हे ठिकाण आहे. जेथे ही ट्रेन एका टेकडीभोवती इंग्रजी आठ च्या आकारात फिरते. तेथे ही ट्रेन आम्ही जवळून पाहिली. या ठिकाणी भारतीय सेनेतील गोरखा जवानांचे वीर स्मारक आहे. सुंदर फुलझाडे असणारी येथील बाग , दूरवर दिसणारी बर्फाच्छादित हिमशिखरे या पार्श्वभूमीवर टॉय ट्रेन पहाणे हा सुद्धा एक सोहळाच वाटला. येथूनही आपल्याला कांचनगंगा शिखर दिसते. जेंव्हा ही ट्रेन या ठिकाणी आली तेव्हा तेथे एकदम आंनदी व उत्साही वातावरण निर्माण झाले. ट्रेन मधील व ट्रेनच्या  बाहेरील सगळेच आनंदाने एकमेकांना हात हलवून अभिवादन करत होते.  ट्रेन चा आकार, वाफेवर चालणारे त्याचे इंजिन व हॉर्न चा आवाज हे सगळेच गाण्यातील  आगीनगाडीची आठवण करून देत होते. पुढच्या दार्जिलिंग भेटीत या ट्रेन मधून प्रवास करायचाच हे त्याक्षणी मनात मी  पक्के केले.

     दुपारचे तीन वाजत आल्याने पोट भुकेची जाणीव करून देत होते. मग आम्ही पुन्हा एकदा एका नेपाळी रेस्तराँमध्ये गेलो व फ्राईड राईस, नूडल्स वर हात साफ केला. येथे शाकाहारी जेवणात भात, नूडल्स, बटाटे यांचा वापर जास्त करतात. पदार्थांची चव थोडी वेगळी वाटली. मसालेदार व तिखट खाणाऱ्यांसाठी  हे जेवण फारच मिळमिळीत ठरेल असे वाटले. जेवण करून पुढे भूतानला पोहचायचे असल्याने दार्जिलिंग दौरा आटोपता घेतला. आता आमची गाडी सिलिगुडीच्या दिशेने धावू लागली. घाट उतरून जेव्हा आम्ही खाली सपाटीला लागलो, तेंव्हा रस्त्याच्या दुतर्फा मैलोनमैल पसरलेले चहाचे मळे पाहून आश्चर्य युक्त आनंद झाला. आतापर्यंत मी पाहिलेले मळे हे फक्त डोंगरउतारावर होते. सपाटीवरचे मळे प्रथमच पहात होतो. पुढे लांबचा पल्ला गाठायचा असल्याने या मळ्यांमध्ये उतरण्याचा मोह मात्र टाळला. दार्जिलिंग ला खूप काही पहाण्यासारखे, अनुभवण्यासारखे आहे. या भेटीत राहून गेलेलं पुढच्या भेटीत नक्की पूर्ण करायचे असे मी तेंव्हाच ठरवून टाकले आहे.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleकेवळ प्रेम पुरेसं आहे…?
Next articleफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here