दिल धड़कने का सबब याद आया

 -सफल प्रेमाच्या असफल गोष्टी

– सानिया भालेराव

तिने जागं होताना सवयीने हात त्याच्या अंगावर टाकला. डोळे उघडताना सगळ्यात आधी मला तुझा चेहेरा दिसायला पाहीजे हा तिचा हट्ट असायचा. जाग येतानाचा क्षण फार विलक्षण वाटायचा तिला. झोपेतून जागं होतानाचे ते काही सेकेंद मन एकदम निरभ्र असतं आपलं. ना काल सरून गेलेल्या दिवसाचं ओझं असतं तेव्हा मनावर ना एका नव्या दिवसाची सुरवात करायची आहे याचं दडपण. अर्धवट डोळे किलकिले करून त्याच्याकडे बघणं, त्याच्या गालावरून हलकेच हात फिरवून, त्याच्या दाढीवर हळुवार बोटं फिरवून शेवट त्याच्या ओठांवर करून दिवस सुरु व्हायचा तिचा. पण आज मात्र तो बाजूला नव्हता. दिवस सुरु झालाच मुळी मणभर ओझं घेऊन.

मनाने साथ नाही दिली तरी आपलं शरीर किती सिन्सिअरली रोजच्या गोष्टी करत असतं याची जाणीव तिला झाली. फ्रेश होऊन कॉफी करायला तिने घेतली. चहाची निस्सीम भक्त असणारी ती आज कॉफीशिवाय दिवसही सुरु करू शकत नव्हती. एखाद्याला आपलंस करावं म्हणजे किती ह्याचं काही मोजमाप असतं का असा प्रश्न पडला तिला. खास तमिळनाडू मधल्या येरेकाउड्ड मधून त्याच्या आवडीची कॉफी पावडर मागवून घ्यायचा तो. मग रोज रात्री न चुकता स्टीलच्या फिल्टरमध्ये तो ही कॉफी पावडर आणि पाणी टाकून ठेवायचा. ते डिकक्शन आणि दूध घालून उकळलेल्या कॉफीचा घमघमाट सकाळी सगळं घर व्यापून टाकायचा आणि मग तिच्याही नकळत हा घमघमाट तिच्या आयुष्याचा एक भाग बनून गेला. एव्हाना तिच्या कॉफीला उकळी आली होती, तिने चटकन गॅस बंद केला. भावना उतू जात असताना असं एखादं स्विच मिळेल का आतला विस्तव बंद करणारं असाही विचार तिच्या डोक्यातून चमकून गेला आणि का कोण जाणे तिने ते फिल्टर, कॉफी पावडर सगळं एका पिशवीत गुंडाळून ठेवलं. आज घरी येताना चहाची पावडर घेऊन येऊया असं तिनं स्वतःला बजावलं. इतकं अडकायचं नाही ठरवलं होतं आपण पण मग तरीही का अडकतो आपण असे नऊशे नव्याण्णव प्रश्न तिच्या मनात रुंजी घालत होते. आज नकोच जायला ऑफिसला असं म्हणून तिने एक फोन करून तब्येत बरी नसल्याचं कळवलं आणि पुस्तकांच्या शेल्फकडे वळली.

तो त्याच्याबरोबर पुस्तकंही घेऊन आला होता. म्हणाला होता माझ्याबरोबर आता यांनाही जागा द्यावी लागेल तुला तुझ्या आयुष्यात. तेंव्हा फार सहज वाटलं होतं ते सगळं पण आज तो नाहीये तर कसं सगळं जीवावर उठल्यासारखं झालंय. वेगळं होताना फार समंजस असल्याचा आव आणला आपण.. पण खरंच आहोत का समंजस असा प्रश्न पडला तिला. तुझं राहीलेलं सामान परत एका बॉक्समध्ये घालून ठेवते, सवडीने घेऊन जा असं किती सहज म्हणालो काल त्याला आपण!आज उद्यात येतो म्हणाला. त्याचं नक्की काय काय राहीलंय आपल्याकडे याचा हिशोब कसा लावणार आहोत आपण? तो त्याच्या वस्तू घेऊन जाईलही पण आठवणी …त्यांचं काय? त्या पुसून टाकून रितं होता येणार आहे का आपल्याला?

मनातले सारे प्रश्न बाजूला ठेवून त्याचं सामान भरायला तिने सुरवात केली. एक एक करत पुस्तकं भरत होती ती. एका पुस्तकात बुकमार्क घालून ठेवलं होतं त्याने. तिने सहज म्हणून ते पान वाचायला घेतलं. पुस्तक वाचताना आवडत्या वाक्याच्या खाली रेष मारायची त्याची सवय तिला अजिबात आवडायची नाही. ‘किती घाण दिसतं ते पुस्तक’ ती त्याला म्हणाली होती. दुसरं कोणी वाचायला घेतलं तर त्याला कसं वाचावंसं वाटेल ते? त्यावर तिला जवळ ओढून तो म्हणाला होता ‘माझं आहे ते पुस्तक.. त्यातले अनुभव माझे त्याच्यावर दुसऱ्या कोणाचाही हक्क नाहीये. मी हवं ते करीन’ आणि त्याने पेनने तिच्या ओठाखाली रेष मारली. ती वितळून गेली होती तेंव्हा.. आज मात्र त्याचा काय अर्थ लावावा हे समजत नव्हतं. हे सगळं डोक्यात चालू असताना त्या पानावरच्या निळी रेष मारलेल्या ओळीवर तिचं लक्ष गेलं… “Do not allow me to forget you.” मार्केजचं ‘ऑफ लव्ह अँड आदर डेमन’ ह्या पुस्तकातलं वाक्य! ‘मला तुझा विसर पडेल असं घडू देऊ नकोस’…. असं शक्य आहे का? कोणाला जर एखादं नातं नको असेल, इमोशनल गुंतवणूक नको असेल आणि नात्यातला जुनेपणा नको असेल तर त्याला थांबवून धरता येऊ शकतं का? विसर पडणे ही माणसाला मिळालेली फार मोठी देणगी आहे. ज्यांना विसर पडतो.. माणसांचा,जागेचा, स्पर्शाचा, आठवणींचा ते किती भाग्यवान लोकं असतील नाही? प्रत्येक वेळेस पाटी कोरी. प्रत्येक अनुभव हा नवीन. किती छान असेल असं जगणं! “काही लोकं ज्या गोष्टी विसरायच्या असतात त्यांनाच आयुष्यभर उराशी बाळगून जगतात.. सॅडीझम दुसरं काय? असं पथेटिक कसं जगू शकतात लोकं?” ती त्याला एकदा म्हणाली होती.. त्यावर ‘वेदनेतूनच आनंदाचा प्रवास होतो’ असं तो तिला हसून उत्तरला होता. आपण त्याला विसरूच शकलो नाही, त्याच्या आठवणी येतंच राहील्या तर कसं होणार आपलं? शरीराला एकवेळ तृप्त करता येईलही पण हे जे मनात काहीतरी गळून पडलं आहे, सतत डोळ्यात पाणी येतं आहे, काहीतरी मागे सुटून गेलं आहे, खोलवर जखम झाली आहे आणि ती भळाभळा वाहते आहे त्याचं काय करणार आहे मी?

अडकून पडू नकोस असं एकशे अकरा वेळेला बजावलं होतं पण त्याचा उपयोग झाला आहे का? एव्हाना संध्याकाळ होत होती. वाफाळता चहा हातात होता. पण आता चहाची ती चव सुद्धा नको वाटत होती. सवय.. कोणत्याही गोष्टीची सवय होऊ द्यायची नाही असं आपण कितीदा घोकलं होतं पण ठरवून जर भावनांना कंट्रोल करता आलं असतं तर मग काय राहीलं असतं? चहा बाजूला ठेवला तिने.. प्रेमाची किंमत चुकती करावी लागते हे उमजत होतं तिला .. .तिने एक एक करत सगळं सामान भरलं. त्याचा एक शर्ट मात्र तिने स्वतःकडेच ठेवून घेतला. रात्रीचा काळोख जसा जसा गडद होत गेला तसं तसं तिचं मन कावरं बावरं व्हायला लागलं. सगळं अवसान गळून पडलं तिचं. त्याला मेसेज लिहायला घेतला होता पण कुठून सुरवात करावी तिला कळेचना.

आज, तू नाहीयेस तर कशातच मन लागत नाहीये माझं.. एखाद्यावर जडतं का रे इतकं प्रेम? वेगळे होणार आहोत हे दोघानींही ठरवलं आहे आपण… पण जमणार आहे का मला ते अशी शंका यायला लागली आहे. प्रेम करण्यासाठी एकत्र राहावंच लागतं का? एकमेकांपासून दूर राहून आत्म्याला स्पर्श करणारं प्रेम करू शकू का आपण? वरवरचं वाटत होतं हे सगळं आधी.. इतकं गहीरं कसं झालं रे? की माझ्या मनाचे चोचले आहेत हे? हे प्रेम वगैरे नसेलच का प्रत्यक्षात? हे केवळ शरीराच्या वासनेपुरतंच मर्यादित असेल का? का हे पोहोचलं आहे माझ्या आत्म्यापर्यंत? दुसरा कोणी येऊ शकेल का ह्या रिकाम्या जागेत आता? अशा जागा भरता येतात का रे? माणसांना असे पर्यायी माणसं असू शकतात? तुला मिळेल का माझ्याजागी कोणी दुसरा पर्याय? एखादं नातं नको होऊन जातं जे आधी खूप हवंहवंसं वाटत असतं म्हणजे नेमकं काय होतं रे? हाडामासाच्या,मन असणाऱ्या एखाद्या जीवावरून अचानक आपलं मन उडून जातं तेंव्हा नक्की काय होतं असेल रे? असं एका झटक्यात येतं का ठरवता की आता नको हा माणूस माझ्या आयुष्यात? इतकं अनप्रेडिक्टेबल आणि तकलादू असतं प्रेम? तुझ्याशिवाय राहताही येत नाहीये आणि तुझ्याबरोबर राहणंही शक्य नाहीये. काय करायचं अशा वेळी? परत एकदा करायचा का प्रयत्न एकत्र राहायचा? हे समंजसपाणाचं ढोंग का करावं मी? म्हटले तुला नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय.. हक्क आहे माझा तुझ्यावर.. तर चालेल का ते? आणि त्याच्याने पडणार आहे का फरक? मला विसरू देऊ नकोस हे किती खोटं विधान आहे. असं कोणी कोणाला बांधून नाहीरे ठेवू शकत. वर्षानुवर्षे एकत्र राहून दोघांना कधीकाळी आपलं प्रेम होतं एकमेकांवर ह्याचा सुद्धा विसर पडतोच की ! मग शाश्वत आहे तरी काय? मेसेज मोठाच होत चालला होता. तिने टाईप करणं थांबवलं. ही वेळ योग्य आहे मेसेज पाठवण्याची. एव्हाना घरी येऊन पुस्तक वाचत बसला असणार तो. तिने पाठवला मेसेज आणि त्याचा शर्ट घालून ती झोपायला आली. शफाकत अलीची गझल.. नासिर काजमी यांचे शब्द.. गझल ऐकता ऐकता तिचे डोळे वहात होते.

दिल धड़कने का सबब याद आया
वो तिरी याद थी अब याद आया

आज मुश्किल था सँभलना ऐ दोस्त
तू मुसीबत में अजब याद आया……….

त्याच्या मोबाईलमध्ये लाईट लागला.. फार आशेने त्याने मोबाईल उघडला. “तुझं राहीलेल सामान भरून ठेवलं आहे, घेऊन जा”. फक्त एकच ओळ.. त्याने पुन्हा पुन्हा ती वाचायचा प्रयत्न केला. डोळ्यात साचलेल्या पाण्यामुळे त्याला आता अक्षरं अस्पष्ट दिसायला लागली. त्याने मोबाईल बाजूला भिरकावला. पाकिटातून तिचं कानातलं काढून उशीच्या बाजूला ठेवलं.. झोप येण्याची वाट तो बघू लागला…

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात .  वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे )

[email protected]

Previous articleबौद्धिक एकारलेपण, रेजिमेंटेशन हे भाजप, संघाचे प्रमुख वैशिट्य
Next articleमार्क्स, लेनीन समजून घेताना …
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.