निकालानंतरची धुळवड !

-प्रवीण बर्दापूरकर

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले ; केंद्रात नवीन सरकार अस्तित्वात आलं आणि नेहेमी जे घडतं ते म्हणजे , निवडणुकीनंतरचं कवित्व म्हणा की धुळवड आता सुरु झाली आहे . यात आधी परस्परांविषयी व्यक्त केलेल्या अति(?)आपुलकी/आदराच्या भावना आणि आता व्यक्त केलेला उद्वेग, तळतळाट असा विरोधाभास आहे . ( अशा दोन परस्पर विरोधी भावना एकत्र व्यक्त केल्या जाण्यासाठी इंग्रजीत ऑक्सीमोरॉन ( OXYMORON ) असा शब्द आहे ; उदाहरणार्थ- Seriously Funny ; त्यात गंमतीत Happily Married चाही उल्लेख केला   जातो , असे अनेक शब्दप्रयोग आहेत पण , ते असो . ) विरोधाभास असला तरी त्यामुळे कांहीना आक्रोश केल्याचा , कांहीना चूक सुधारल्याचा तर कांहीना कुणावर तरी दोषारोप करण्याचं समाधान मिळतं आणि इकडं लोकांचं मात्र झकास मनोरंजन होतं .

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्ष किती गोंधळलेला आहे याचं सुरस उदाहरण म्हणून राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पक्षाध्यक्षपद सोडण्याचा व्यक्त केलेला मनोदय आणि आणि त्यांची सुरु असलेली मनधरणी असून ती देखील एक प्रकारची धुळवडच आहे . पक्षाच्या राज्य शाखांनी राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदी काम राहावं यासाठी केलेले ठराव , हा तर हुजरेगिरीचा कळसच म्हणायला हवा . पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्याचा क्रूस उचलण्यासाठी राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त एकही कर्तृत्ववान म्हणा की धमक असणारा म्हणा , नेता काँग्रेसमध्ये नाही हे समोर आलेलं चित्र विदारक आहे . हा पक्ष ‘गांधी’विना किती विकलांग , अगतिक आणि लाचारही आहे , ही या चित्राची दुसरी बाजू या पक्षाला असणारं भवितव्य किती अंधारलेलं आहे हे दाखवणारी आहे . म्हणूनच बहुदा तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसच्या १८ पैकी १२ सदस्यांनी पक्षांतर केलं असावं…गोव्यातील चार आणि महाराष्ट्रातले दहापेक्षा जास्त विधानसभा सदस्य भाजपच्या गळाला लागलेले आहेत या बातम्यात तथ्य असावं !

देशातले एक बहुआयामी , चतुर , दूरदर्शी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणार्‍या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमधेही कांही कमी धूळवड साजरी केली जातेय असं नाही . ‘कन्या हरली तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल’, असं म्हणून त्यांनी निकालाआधीच धुळवड साजरी केली . लोकसभा निवडणूक जिंकायची होती म्हणून भाजपनं चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकात पराभव ओढावून घेतला , असं अगम्य विधान त्यांनी केलं . मतदान यंत्राबद्दल संशय येण्याचे झटके आजकाल शरद पवार यांना अधूनमधून येतात मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल अजित पावर मात्र नि:शंक आहेत ; सांगलीच्या संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दल वाचाळवीर जितेंद्र आव्हाड सतत टीकेचा जोरदार सूर लावतात तर उदयनराजे आणि जयंत पाटील भिडेंचे समर्थक आहेत . शरद पवार या संदर्भात कांहीच बोलत नाहीत .  भिडेंसह आशा अनेक मुद्द्यांबद्दल पक्षाची नेमकी भूमिका काय किंवा नेमकं कोण बरोबर आहे , याबद्दल खुलासा होत नसल्यानं कार्यकर्ते काम गोंधळलेले असतात…हा असा कधीच न शमणारा गोंधळ धुळवडच नाही का ?

ज्यांच्या चड्डीची कायम हेटाळणी केली त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकासारखं चिकाटीनं काम करायला हवं , असा सल्ला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना देत आणखी एक गोंधळ उडवून दिला आहे . ‘आता आम्ही काय प्रात:शाखेत जाऊन चिकाटी आणि शिस्तीचे धडे गिरवायचे का’ , असा सवाल राष्ट्रवादीतल्या आमच्या एका मित्रानं केला . पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात मान-पानावरुन संशयकल्लोळ निर्माण करणार्‍या साहेबांना तर आता उपरोधही समजेनासा झालाय . नथुराम गोडसे यांच राष्ट्रभक्त म्हणून होणारा गवगवा आणि त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांना मिळालेलं यश पाहता , या देशाला आता महात्मा गांधी यांची गरज नसणारं , उपरोधानं ठासून भरलेलं एक ट्विट करणार्‍या सनदी अधिकार्‍यावर कारवाईची मागणी शरद पवार यांनी करणं हा याचा कडलोट तर होताच पण , त्यापुढे जात शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत , हे त्यामुळे समोर आलं ते फारच वाईट व पवार यांच्या प्रतिमेला तडा देणारं ठरलं . (महा)राष्ट्रवादीचे समर्थक असणार्‍या बुद्धीजीवींची त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली .

औरंगाबाद वगळता मुस्लिमांची मतं बहुजन वंचित आघाडीला मिळालेली नाहीत असे आरोपांच्या रंगाचे फुगे उडवत ( शरद पवार यांना बारामतीचे नेते ठरवून मोकळे झालेले ) अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निकालानंतरच्या निवडणुकीत नाराजीचा राग आळवला आहे . बहुजन वंचित आघाडीच्या वाट्याला अपयश का आलं या बद्दल प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या मीमांसेवर अद्याप एमआयएमनं प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही पण , ती आली की ही धुळवड आणखी रंगत जाणार यात शंकाच नाही . एकंदरीत काय तर बहुजन वंचित  आघाडीत ‘ऑल इज नॉट वेल अँड विल नॉट बी वेल’ हेच संकेत या धुळवडीतून मिळालेले आहेत . तिकडे उत्तरप्रदेशात मायावती आणि अखिलेश यांच्यातही राजकीय धूळवड सुरु झालेली आहे . समाजवादी पार्टीसोबतची युती न तोडता पोटनिवडणुका स्वतंत्र लढवण्याचा मनोदय व्यक्त करतानाच यादवांची मतं न मिळाल्याचा आक्रोशी रंग मायावती यांनी उधळले आहेत . ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष तिकडे ‘जय बांगला’ ची पोस्टकार्डस पाठवण्याची धुळवड ( इकडे आपण मात्र ‘जय महाराष्ट्र म्हटलं की सगळ्यांचं पित्त खवळत ! ) खेळतोय . ही देशभ्राता सुरु असलेली अशी सर्वपक्षीय धूळवड लक्षात घेता , हे सर्व नेते आणि त्यांचे पक्ष नरेंद्र मोदी-अमित शहा तसंच भाजपच्या विरोधात एकत्र येणार कधी आणि लढणार कधी , असा प्रश्न पडतो .

महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या पराभवापेक्षा जास्त धुळवड रंगली आहे ती औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाची . हिंदू विरुद्ध मुस्लिम विरुद्ध मराठा असे अनेक रंग त्यात मिसळवले जात आहेत . या मतदार संघातून एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा झालेला विजय अनेकांना खुपला आहे पण , त्यांचा हा विजय अनपेक्षित नाही . गेल्या निवडणुकीच्या आधीपासून चंद्रकांत खैरे ( आणि काँग्रेसच्या राजेंद्र दर्डा ) यांच्या पराभवाची उघड चर्चा औरंगाबादेत होती . २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेत तरले तरी खैरे यांनी त्या विजयात दडलेली पराभवाची टांगती तलवार गंभीरपणे घेतलीच नाही . मे २०१५त दिल्ली सोडून आम्ही औरंगाबादला स्थायिक झालो तेव्हापासून खैरे यांच्या संभाव्य पराभवाबद्दल ( तोपर्यंत राजेंद्र दर्डाही विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले होते ) ऐकत होतो . त्यातच रावसाहेब दानवे यांच्या जावयानं केलेल्या विरोधाला तुच्छ लेखण्याची चूक चंद्र्कांत खैरे यांना भोवली . या सर्व चुकांना जातीय आणि धार्मिक रंग देणं गैर आहे . त्यामुळे या शहराच्या शांततेला तडे जाऊ शकतात . शिवाय एमआयएमला अनेकांनी मतं दिलेली नाहीत ; इम्तियाज जलील नावच्या उच्चशिक्षित , सुसंस्कृत व्यक्तीला अनेक मुस्लिमेतरांची मतं मिळालेली आहेत , ही वस्तुस्थिती एकदा नीट समजून घ्यायला हवी .

निकालानंतरची ही धूळवड आता आणखी पांच-सहा महिने उडतच राहणार आहे . होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवड खेळतांना शरीराला अपायकारक रंग न उधळण्याची दक्षता घ्यावी लागते ; राजकीय धुळवडीत जात आणि धार्मिक द्वेषाचे रंग उधळले जाऊ न देण्याची दक्षता सर्वांनीच घ्यायला हवी कारण त्यापेक्षा सामाजिक सौहार्द जास्त महत्वाचं आहे !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799
Previous articleमोदींच्या विजयाची राजकीय व सामाजिक त्रैराशिके
Next articleमाणसं तोडत राहिलो तर चळवळी मोठ्या होणार कशा?-डाॅ.आ.ह.साळुंखे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.