परिवर्तनाच्या दुष्काळातला अंकुर-अमर हबीब

भाऊ तोरसेकर
गेल्या जानेवारी महिन्यात पत्रकार दिनाच्या निमीत्ताने मी अंबाजोगाई येथे प्रथमच गेलो. पण तिथल्या कार्यक्रमापेक्षा दोन गोष्टी मला खुप भावल्या. एक होता माझा फ़ेसबुक मित्र बालाजी सुतार याचा धाकटा पोरगा मैत्रेय. केवळ त्याच्या फ़ोटोवरून मला आवडलेले हे बाळ प्रत्यक्षात हवे तितके खोडकर व मस्तवाल निघाल्याचा आनंद अपुर्व होता. दुसरी तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे अमर हबीब. तब्बल चार दशकानंतर हा माणूस पुन्हा भेटला. मध्यंतरी एकदाही कुठे संपर्क नाही की बोलाचाल नाही. १९७०च्या मध्यास आणिबाणीपूर्व काळात जयप्रकाशांच्या संपुर्ण क्रांतीने झपाटलेल्या आमच्या तरूण पिढीचा तो एक कार्यकर्ता. मराठवाड्यातला इतकेच ठाऊक होते आणि यावर्षाच्या आरंभी तो अकस्मात पुन्हा भेटला. नुसता भेटला नाही तर कालपरवाच शेवटचे भेटलो असू; अश्या गप्पा त्याने सुरू केल्या. तेव्हा मुंबईत मंत्रालयाला घेराव घालण्याच्या आंदोलनात १९७४ सालात आमची भेट झालेली. कमलाकर सुभेदार, जगन्नाथ कोठेकर, विकास देशपांडे अशा समाजवादी मित्रांच्या गोतावळ्यात मराठवाड्याचे दोन तरूण तेव्हा आमच्या सोबत होते आणि कायमचे लक्षात राहिले. एक अण्णा खांदारे आणि दुसरा अमर हबीब. तिथे कुठल्याशा कारणास्तव मुंबई कॉग्रेसच्या कचेरीवर आम्हा पन्नास साठ तरूणांनी धडक दिली. त्यात अण्णा जखमी झाला आणि आझाद मैदान पोलिस ठाण्यात त्याला डांबलेले होते. तेव्हा सख्खा भाऊ जायबंदी झाल्यासारखा बेचैन झालेला अमर हबीब मी कधीच विसरू शकणार नाही. किंबहूना तितका त्याचा बेचैन चेहरा कधी कुणी बघितलाही नसेल. तेव्हा असो की आज, मला हबीब बेफ़िकीर मस्तवाल माणूस वाटत राहिला. त्याला कधीच जगाची वा जग काय म्हणेल याची फ़िकीर असलेली मला दिसली नाही. जे काही विचार वा तत्वज्ञान त्याने स्विकारले वा आत्मसात केले, त्याचे लाभ-तोटे याकडे वळूनही बघणे ज्याला शक्य झाले नाही, असा हा माणूस. म्हणूनच मला अमर मस्तवाल वाटतो. जानेवारीत इतक्या वर्षानंतर भेटलो तर त्याने आठवण काढली ती थेट कॉग्रेस कार्यायलातल्या हाणामारीची.

गुरूनाथ कुलकर्णी तेव्हा मुंबईच्या युवक कॉग्रेसचे अध्यक्ष होते आणि amar habibत्यांच्याच कार्यालयात ही समाजवादी झुंड घुसली होती. इतक्या वर्षांनी हबीबने त्याचे स्मरण करून दिले आणि मधली चाळीस वर्षे कुठल्या कुठे भुर्रकन उडून गेली. तेव्हाचे विशीच्या आसपास घुटमळणारे आम्ही उपटसुंभ तरूण अवघे जग बदलून टाकू शकतो, अशाच मस्तीत असायचो. आज साठीच्या आसपास आलो तरी हबीबमधला तोच आवेश जसाच्या तसा आढळला आणि कमालीचा सुखावलो. कालपरवा केजरीवालच्या लोकपाल आंदोलनात किंवा नंतरच्या आम आदमी पक्षाच्या चारशे जागा लढवण्याचा वेडसरपणात हबीब तितक्याच उत्साहाने सामील झाल्याचे मला फ़ेसबुकवरून दिसत व कळत होते. पराभवाची शाश्वती असलेली लढत देण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्याने जशीच्या तशी आजही जपलेली आहे. आणि म्हणूनच त्यानंतरच्या दोन पिढ्यातल्या लढ्याची व चळवळींच दुर्दशा मला छळते. चार दशकांपुर्वीचा हबीब आणि आम्ही त्याच्यासारखे टोळभैरव जग बदलण्याच्या मस्तीत होतो. काहीही अशक्य वाटत नव्हते आम्हाला. मी तेव्हा नवखा पत्रकार होतो. आज ज्येष्ठ म्हटला जाणारा निवृत्त पत्रकार आहे. पण राजकारणाचे चढउतार बघताना माझ्यातला भाबडेपणा कुठल्या कुठे लुप्त झाला आहे. राजकारणातली बदमाशी व त्यातच लयाला गेलेल्या चळवळी व सच्चाई; मला सतत यातना देत असतात. नेते व पुढारी यांच्या चेंगराचेंगरीत कार्यकर्ता जमिनदोस्त होऊन चिरडला गेला व नामशेष झाला आहे. पर्यायाने चळवळ नावाला अर्थ उरलेला नाही. हे दारूण वास्तव सतत बघणारा व त्याचे अरुण्यदुदन करत बसलेला मी, जानेवारीत हबीबला भेटलो. तेव्हा मला जितका मैत्रीचा उमाळा आला तितकाच त्याचा रागही आला. अजून त्या विचार व आकांक्षेला कव्टाळून बसलेल्या हबीबमध्ये मला तो हरवलेला कार्यकर्ता खुणावू लागला आणि परिवर्तनाचे नवे स्वप्न दाखवू लागला होता. त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मलाही पुन्हा चळवळ छेडण्यासाठी भुरळ घालतेय याचाच राग आला. आमच्या मुलाच्या वयातले वैफ़ल्यग्रस्त वा निराशाग्रस्त लोक नित्यनेमाने भेटतात किंवा परिस्थितीला शरण जाऊन तडजोडीत स्वत:ला बाजारात विकून चांगली किंमत मिळवलेलेही रोज भेटतात. हबीब त्याला अपवाद आहे, म्हणून मला त्याचा राग आला. त्याच्या प्रामाणिकपणा व झुंजारपणात रमण्याच्या कुवतीच्या भाबडेपणाचा संताप आला. कारण तीच त्याची मनोवृत्ती मलाही पुन्हा चळवळीविषयी आशा दाखवू लागली होती.
धुंदीतल्या माणसाला लाभ-तोटे कळत नाहीत. काय मिळवले किंवा गमावले त्याचे लौकिकार्थ त्याच्या हिशोबी नसतात. त्याला कार्यकर्ता म्हणतात. शरीरामध्ये तरूणपणी जो उत्साह संचारतो, तो देह थकत जाताना मावळत जातो. पण त्याच उत्साहाने मनाचा ताबा घेतला, मग त्याची धुंदी होत असते. परिणामांचा त्यावर प्रभाव पडत नाही आणि वयाला झुगारत त्या व्यक्तीच्या आयुष्याचा ताबा कार्यकर्ता घेत असतो. ज्याला कुठले पद, अधिकार, लाभ वा हव्यास बाधा करत नाही. ‘आपल्यासाठी’ असा विचारही ज्याच्या मनाला शिवत नाही, अशी धुंदी म्हणजे एकप्रकारची मस्तीच असते. तो मस्तवालपणा अंगात मुरला, मग व्यक्तीगत लाभ-तोटे निरर्थक होऊन जातात आणि आपण काय केले वा किती जग बदलले, त्याची नशा आयुष्यावर स्वार होत जाते. अमर हबीब त्याचे मुर्तीमंत स्वरूप आहे. त्याच्यासारख्या आजच्या पिढीतल्या कार्यकर्त्याला कोणी जगू देत नाही, की त्याची जोपासनाही होऊ देत नाही. विचार तत्वज्ञान व त्यातून बदलणारे जग, अशी परिवर्तनाची लढाई पोटाला चिमटा घेऊन लढणारे कार्यकर्ते आणि त्यांची अपुर्‍या साधनांनी चाललेली झुंज म्हणजे चळवळ; असा १९७० पर्यंतचा नवलाईचा जमाना होता. चार दशके पुढे आल्यावरही हबीब तिथेच पाय रोवून उभा आहे. चळवळींना गिळंकृत करून एनजीओ नावाचे श्वापद मोकाट फ़िरते आहे, त्याचा थांगपत्ता नसलेला हबीब म्हणूनच जितका आवडतो तितकाच त्याचा हेवाही वाटतो. मरगळून गेलेल्या चळवळीच्या जमान्याला कुरवाळत आशावाद जपत तो मस्तीत आहे. तसे नसते तर लोकपाल वा अरविंद केजरीवाल याच्या नादाला हबीब लागला नसता. त्यातला फ़ोलपणा त्यालाही कळला असेल. पण प्रस्थापिताला आव्हान देण्याची मस्ती मनातून संपत नाही, म्हणून लोकपालात हबीब ठिणगी शोधून तिला फ़ुलवायला पुढे झाला. मग त्यातला फ़ोलपणा अनुभवला म्हणून बाजूलाही झाला. पण स्वत:च्या अंतरात्म्यातली ठिणगी जशीच्या तशी तेवत आजही तो भविष्यातल्या परिवर्तनाची स्वप्ने बघतोच आहे.

यानिमीत्ताने हबीबपेक्षा त्याच्यासह आधीच्या पिढीतल्या कार्यकर्त्याचे स्मरण मला अगत्याचे वाटते. घरचे खाऊन, वर्गण्या काढून पदरमोडीने झुंजणारा तरूण हे चळवळीचे स्वरूप होते. विचार तत्वज्ञान वा पक्ष संघटना वेगवेगळ्या असतील. त्यांना पैसे लागत नव्हते, खर्चासाठी त्यांचे काहीही अडत नव्हते. कुणाकडे तोंड वेंगाडून देणग्या गोळा कराव्या लागत नव्हत्या की कुठल्याही आंदोलन लढ्यासाठी खर्चाची आखणी वा बजेट नसायचे. परिवर्तनाच्या चळवळीत सर्वच पक्षांमध्ये कार्यकर्त्याची इच्छा इतकीच पुंजी होती. नोकर्‍या करणारे वा कमावते असायचे तेच सहकार्‍यांच्या खर्चाचा बोजा उचलायचे आणि कुणाचीही कसलीही अपेक्षा नसायची. वडीलधारे वा जाणत्या नेत्याने पाठ थोपटावी, यापेक्षा अधिक कसली आकांक्षा नव्हती. कार्यकर्ता हा पेशा नव्हता तर ‘खाज’ होती. ती खाजच आता कुठल्या कुठे गायब झाली. आता चळवळींना, लढे आंदोलनांना स्वयंसेवी नावाच्या पेशाने गिळंकृत करून टाकले आहे. त्यात एक व्यावसायिकता आलेली आहे. ज्या समस्या वा प्रश्नांसाठी कुठून तरी निधी मिळतो. त्यावर लढे चळवळी उभ्या रहातात. कायकर्ता, त्याची झुंजण्याची इच्छा वा न्यायाची आकांक्षा अशा पायावर चळवळी उभ्या नाहीत. चळवळ म्हणुन जे काही आज आहे वा दाखवले जाते, त्याला निधीच्या कुबड्यांवर उभे रहावे लागते. देशातील वा परदेशी भांडवलदार उद्योगपतींच्या खिरापतीवर आजच्या परिवर्तनाच्या लढ्यांचे अजेंडे ठरतात वा बदलले जातात. या लढ्यांनी अनेकांना नामवंत केले आणि कार्यकर्ता हा पगारी वेठबिगार होऊन बसला आहे. मैदानात झुंजण्यापेक्षा प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे हा संघर्षाचा आखाडा बनला आहे. जनतेचा अशा कुठल्याही चळवळीशी संपर्क उरलेला नाही. अशा चळवळी वा स्वयंसेवी कार्यात कुठे भिंग घेऊन शोधले तरी अण्णा खांदारे सापडत नाहीत. सापडतात ते अनुदानाच्या फ़ायली घेऊन सरकारी कचेर्‍या वा उद्योगांच्या दारात उभे असलेले ख्यातनाम समाजसेवक. त्यांनी देवू केलेल्या तुटपुंज्या पगारावर धरणी, मोर्चे व लढ्यात हजेरी लावणारे पोटार्ही आशाळभूत कार्यकर्ते. त्यात कुठे अमर हबीब भेटत नाहीत. हे वास्तव नित्यनेमाने बघताना आजही तसाच कार्यकर्ता रहाण्यात धन्यता मानलेला अमर हबीब मला भावतो तितकाच मस्तवाल वाटतो.

जणू जग बदलले वा कितीही बदमाश झाले तरी त्याला फ़िकीर नाही. तो आजच्या या जगात वा युगात वावरतच नसावा, इतका बिनदिक्कत परिस्थिती झुगारून त्याला हव्या असलेल्या जगात रमतो. मला तितके स्वप्नाळु होऊन आजचे वास्तव नाकारायला जमत नाही, म्हणून हबीबचा राग येतो. सभोवारचे जग भूकंपात उध्वस्त होऊन पडलेले असतानाही कोणी त्यात उरलेसुरले शोधून नव्याने संसार थाटायच्या तयारीत असावा, तसा हाडाचा कार्यकर्ता अमर हबीब म्हणून आवडतो. तितकाच त्याचा रागही येतो. त्याच्या आशावादाचा हेवा वाटतो. विशीतल्या नवतरूणाला लाजवणारी इच्छाशक्ती अंतरंगात जपून व जोपासून असलेले कित्येक अमर हबीब आजही माझ्या नजरेत भरण्याइतके जवळपास नसतील. पण हयात नक्कीच असतील. कदाचित हबीबप्रमाणे तेही हाती लागणार्‍या नव्या पिढीतल्या तशा मातीला आकार देवून तोच प्रामाणिकपणा व झुंजारवृत्ती जोपासतही असतील. मिळवण्याच्या या जीवघेण्या स्पर्धेत गमावणार्‍यांकडे कोणाचे लक्ष जाणार? पण त्या स्पर्धेचा शेवटचा पल्ला गाठला मग जी गर्दी संपेल, त्यातून अमर हबीबने जपलेला तोच संघर्षाच्या चळवळीचा अंकूर नव्याने पालवी फ़ुटून परिवर्तनाची नवी हिरवाई समाजाला अनुभवायला नक्की मिळेल असे वाटते. या वयात मला आशावादी बनवू शकणारा अमर त्याच्या भोवतालात किती लोकांमध्ये आशावादाचे बीज पेरून बसला असेल? उगाच तो इतका बिनधास्त आहे का?
भाऊ तोरसेकर
लेखक जेष्ठ्य पत्रकार आहेत

#Amarhabib

Previous articleआरक्षणाबद्दल काही …
Next articleबरे झाले, शेषराव बरळ‍ले.
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here