…पर्याय राहुल गांधीच !

-प्रवीण बर्दापूरकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त तसंच भाजप समर्थकांच्या पचनी पडणार नाही आणि काँग्रेसजनांना रुचणार नाही , तरी स्पष्टपणे सांगायलाच हवं- २०१४च्या तुलनेत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीचा पराभव वगळता राहुल गांधी यांची कामगिरी चांगली…च राहिली आहे , असं माझं ठाम मत आहे . काँग्रेसच्या लोकसभेतील जागा ४४वरुन ५२वर पोहोचल्या म्हणजे कॉर्पोरेट भाषेत “राहुल गांधी यांचा केआरए ( key result area ) दर १८ टक्के आहे आणि तो पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे , xx पास हो गया” अशी राहुल गांधी यांची जी हेटाळणी भक्तांकडून समाज माध्यमांवरुन केली जात आहे , ती असुसंस्कृत आणि ती तशी करणारांची पातळी दर्शवून देणारी आहे .

मुळात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हा सामनाच विषम होता . एक तेल लावलेला जोशात असणारा जय्यत तयारीचा मल्ल तर दुसरा राजकारणाच्या आखाड्यात गेल्या पांच वर्षात जेमतेम तयार झालेला ; एक सत्ताधारी तर समोरचा विरोधी पक्षात ; एकाकडे विपुल साधन सामग्री आणि विजयाचा मोठ्ठा विश्वास तर दुसरीकडे चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकात  मिळालेल्या विजयानं गाफीलपणा ठासून भरलेला . कांही नवख्यांची आणि मोठ्या प्रमाणात  बाजार बुणग्यांची फौज घेऊन राहुल गांधी एकटे लढत होते तर नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमित शहा , सुषमा स्वराज , नितीन गडकरी , राजनाथ सिंह अशी किमान ५०वर नेत्यांची आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची मोठी फौज होती . भाजपचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यांचा प्रचार आटोपून आणि अन्य राज्यात धाव घेत होते ; ( उदाहरणार्थ , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी  उत्तरप्रदेश , कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सभा ; खरं तर मराठी भाषकांच्या बैठका घेतल्या आणि भाजपचा प्रचार केला .) तर काँग्रेसचे नेते/मुख्यमंत्री मात्र त्यांच्या आप्तस्वकीयांच्या प्रचारात मग्न होते . वानगीदाखल उदाहरण द्यायचं तर मतदान आटोपल्यावर दोन तासातच अमित शहा , नितीन गडकरी , राजनाथ सिंह , सुषमा स्वराज  असे भाजपचे ४०वर नेते अन्य राज्यात प्रचार सभा घेतांना दिसले ; इकडे राजीव सातव , अविनाश पांडे , ज्योतीरादित्य शिंदे , सचिन पायलट , रणदीप सुरजेवाला , रजनीताई पाटील प्रियंका गांधी-वड्रा अशा मोजक्या आणि तुलनेन नवख्यांना हाताशी धरुन आणि अज्ञात समर्थकांच्या भरवशावर राहुल गांधी धावाधाव करत होते .

भाजपचे वेगवेगळे गट वेगवेगळ्या राज्यात काम करत होते आणि त्यांचं अत्यंत सूक्ष्म नियोजन होतं ; इकडे अमेठीतून राहुल गांधी पराभवाला सामोरे जाणार आहेत याचा अंदाजच काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील कोअर टीमला नव्हता . काँग्रेसच्या नियोजनात तारतम्याचा  अभाव कसा होता तो बघा- शरद पवार , सुशीलकुमार शिंदे यांना दिवसभरत जेवढे लोक भेटतात , जेमतेम तेवढे लोक ज्यांच्या सभेला जमतात अशा जनाधार नसलेले पण , सुशिक्षित , बुद्धीवंतात चांगली प्रतिमा असणार्‍या पृथ्वीराज चव्हाण , कुमार केतकर यांच्या सारख्यांना काँग्रेसनं त्या वर्गात बैठका घेण्याची जबाबदारी टाकायची सोडून ग्रामीण भागात सभा दिल्या ; केतकर यांनी फक्त ज्या गावांची नावं ऐकली असतील अशा उदगीर , शिरुर ताजबंद , उमरगा अशा गावात जाहीर सभा काँग्रेसनं लावल्या , असं हे गलथान नियोजन . तरी २०१४च्या निवडणुकीतला नवखेपणा आणि पक्षाच्या बुजुर्ग नेत्यांची साथ नसतांना ‘वेडात दौडले वीर सात’च्या चालीवर राहुल गांधी देशभर प्रचारासाठी फिरत राहिले . या काळात त्यांनी १४५ जाहीर सभा घेतल्या आणि किमान २० रोड शो केले . अहमद पटेल , दिग्विजय सिंह , कमलनाथ , चिदंबरम , मोतीलाल व्होरा , अशोक गहलोत , शीला दीक्षित , कपिल सिब्बल , मणीशंकर अय्यर , सलमान खुर्शिद , सुशीलकुमार शिंदे , असे काँग्रेसचे एकापेक्षा एक दिग्गज (?) नेते कुठे होते , त्यांनी किती व कुठे प्रचार केला हा एक संशोधनाचा विषय आहे . पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाचा अपवाद एकमेव वगळता गांधी घराण्यातल्या अगदी कुणीही सत्ता मिळवून द्यावी आणि ती सुखनैव उपभोगावी ही बांडगुळी मानसिकता म्हणजे काँग्रेस असं समीकरण गेल्या सुमारे चार दशकात झालेलं आहे ; अशा आणि बहुसंख्य मतलबी आणि खूषमस्कर्‍यांचा कळप म्हणजे काँग्रेस पक्षाचं विद्यमान स्वरुप असून या मतलब्यांनी काँग्रेसच्याच्या विचारावर श्रद्धा असणारा कार्यकर्ता पक्षातून कधीच हद्दपार केला आहे तर दुसरीकडे देशातील जनमनावर काँग्रेस आणि गांधी घराण्याची असणारी मोहिनी असे वास्तव आहे . आज अडचणीत असला तरी काँग्रेस पक्ष कधीच संपणार नाही हे चांगलं ओळखून असलेल्या या मतलबी काँग्रेसजनांना म्हणूनच राहुल गांधी हे नेता म्हणून हवे आहेत ;  अशी ही एकंदरीत काँग्रेस नावाची विद्यमान गुंतागुंत आहे . म्हणूनच  पक्षाध्यक्षपद/लोकसभेतील गटनेते आणि पर्यायानं लोकसभेतील विरोधीपक्षनेतेपदी असो वा नसो , या पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एक ‘गांधी’ हवा आहे आणि ती काँग्रेसची अपरिहार्य अगतिकताच आहे . म्हणूनच  राहुल गांधी यांना पर्याय कोण , या प्रश्नाचं उत्तर ‘राहुल गांधी’ , हेच आहे !

राहुल गांधी यांची कामगिरी तुलनेनं चांगली राहिली हे म्हणण्याचं आणखी कारण म्हणजे विरोधी पक्षांच्या महाआघाडीतील नेते आणि त्यांच्या पक्षाची पार निराशाजनक कामगिरी . ही विरोधी आघाडी सक्रियपणे अस्तित्वात आली नाही कारण त्या आघाडीचे कथित सुत्रधार , ‘कन्या विजयी झाली नाही तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल’ फेम शरद पवार महाराष्ट्रात ( त्यातही बारामती आणि मावळ मतदार संघात ) अडकून पडले तरी त्यांची लोकसभेची एक जागा कमीच झाली . ‘थयथयाट’फेम ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालात तब्बल १८ जागा भाजपनं जिंकल्या , उत्तरप्रदेशात मायावती यांचा हत्ती पराभवाच्या चिखलात फसला तर अखिलेश यादव यांची सायकल पंक्चर झाली , विदूषकी चाळे करणारे ‘चारा घोटाळा’ फेम लालूप्रसाद यादव यांचा बिहारमधे धुव्वा उडाला , कर्नाटकात जनता दल युनायटेड या एका राज्यापुरत्या मर्यादित असलेल्या पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं , ‘मतदान यंत्र कांगावा फेम’ चंद्राबाबू नायडू आंध्रप्रदेशात साफ उताने पडले , गवगवा झालेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीला विजयाचा किरणही दिसला नाही आणि कम्युनिस्टांचा पार पालापाचोळा झाला…या सर्व थोर आणि अखिलेश वगळता पंतप्रधानपदाचं ( ती नावं दस्तुरखुद्द शरद पवार यांनी जाहीर केलेली असल्यानं शंकेला वावच नाही ! ) दिवास्वप्न पाहणार्‍या नेत्यांच्या आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षांच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी एका राज्यापुरते  मर्यादित राहिले नाहीत ; देशातील विरोधी पक्षात मीच एकमेव राष्ट्रीय नेता आहे ,  ही प्रतिमा या निवडणुकीत निर्माण करण्यात राहुल गांधी यांना यश आलं ; त्यांची कामगिरी किमान का होईना , देशभर चढती राहिली ; बोलण्यात कांही चुका झाल्या तरी एकमेव राहुल गांधी हेच नरेंद्र मोदी यांच्यासमोर जोशात उभे राहिले आणि यापुढेही उभे राहू शकतात हेच समोर आलेलं आहे . अपेक्षित विजय मिळाला नाही तरी लोकशाहीचा संकोच/अवमान होईल असं कोणतंही वक्तव्य न करता त्यांनी पराभव उमदेपणानं स्वीकारला .

राजकारणात निवडणुकांतील जय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात हे कोणी समजावून सांगण्याइतके राहुल गांधी आता कच्चे खिलाडी नाहीत . पराभवाची चाहूल त्यांना लागलेली नव्हती , असंही म्हणता येणार नाहीच ( पाचव्या फेरीच्या काळातच भाजपचा विजय असल्याचा ठाम संदेश फलोदी , आग्रा आणि सूरत सट्टा बाजारानं दिलेला होता . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अंदाज भाजप २९८, मित्र पक्ष ४८, एकूण ३४६ असा असल्याचं संघातील एका सूत्रानं १२ मे रोजी पाठवलेल्या मेलमधे  नमूद केलेलं होतं ! हे आंकडे अमेरिकेतील रवींद्र मराठे तसंच पत्रकार संजीव कुळकर्णी , श्रीकांत उमरीकर आणि डॉ. मिलिंद देशपांडे आशा कांही मोजक्या मित्रांशी मी शेअर केले होते )

काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी कामाला लागण्याचे मनसुबे राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहेत . २०२४च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर ३३३ जागा मिळवण्याच्या दृष्टीकोनातून  ( संदर्भ हिंदुस्तान टाईम्स या दैनिकाच्या २९ मे २०१९च्या अंकातील बातमी ) भाजपनं आखणी सुरु केलेली असतांना राहुल आणि काँग्रेस यांच्यासमोरील आव्हानं मोठी आहेत . राहुल गांधी यांच्या सभांना देशभर मोठा प्रतिसाद ( त्यांच्या दक्षिणेतील एका सभेचं छायाचित्र सोबत दिले आहे ) मिळाला आहे ; राजकीय सभांना गर्दी ‘जमवावी’ लागते असा सरसकट युक्तीवाद कोणत्याही पक्षाच्या कुणाही नेत्याच्या बाबतीत खरा नसतो , असा गेल्या एक पत्रकार म्हणून चार दशकांचा माझा अनुभव आहे . ‘जमवलेली’ गर्दी जास्तीत जास्त ३० ते ४० टक्के असू शकते ; राज ठाकरे यांच्या सभेला तर १५/२० टक्केही लोक ‘आणलेले’ नसतात असं एका अत्यंत ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍यांनं सांगितलं होतं . प्रतिसाद पाठिंब्यात बदलवण्यात राज ठाकरे अयशस्वी ठरले . देशभर मिळालेला प्रतिसाद पाठिंब्यात परावर्तीत करण्यासाठी राहुल गांधी यांनाही निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत . देशभरात काँग्रेसच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील किमान १५०-२०० तरी तरुण गेले असावेत आणि पक्षानं दिलेल्या विविध जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या . अशा काहींच्या संपर्कात मी होतो . देशात नरेंद्र मोदी यांच्या खालोखाल राहुल गांधी यांची क्रेझ आहे हे या तरुणांनीही सांगितलं ; त्या पार्श्वभूमीवर हा ‘प्रतिसाद ते पाठिंबा’ हा मुद्दा कळीचा आहे .

काँग्रेस पक्ष मागासवर्गीय आणि मुस्लिमांचे लांगुन-चालन करतो असे आरोप/दावे सातत्यानं करण्यात आलेले आहेत ; परिणामी हिंदू मोठ्या प्रमाणात काँग्रेसपासून दूर गेले ( आणि अखेर भाजपकडे वळले ) . इकडे प्रत्यक्षात आमच्यासाठी काँग्रेसनं केलं काय , असा सवाल उपस्थित करत हे समाजही म्हणजे मतदार काँग्रेसपासून दूर गेले . म्हणजे एकूण तीन जनाधार काँग्रेसपासून दुरावले . ते तिन्ही जनाधार पुन्हा काँग्रेससोबत जोडून घेणं हेही राहुल गांधी यांच्या समोरचं एक आव्हान आहे .

संघटनेची पुनर्बांधणी करणं आणि त्यासाठी खुर्च्या अडवून बसलेल्या मतलबी , खूषमस्कर्‍यांना कठोरपणे दूर करावं लागणार आहे . त्यासाठी ‘कामराज योजने’ची पुनरावृत्ती करायची वेळ आलेली आहे . राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडीयमवर उपाध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताना कार्यकर्त्याला पुन्हा मानसन्मान , महत्व देण्याचा मनोदय व्यक्त केला होता ; त्यासाठी एक योजनाही जाहीर केली होती पण त्या योजनेला वर्षानुवर्षे सत्तेच्या खुर्च्या बळकावलेल्यांनी याच मतलबी आणि खूषमस्कर्‍यांनी  विरोध केला होता . अशा सर्वांना नारळ दिल्याशिवाय कार्यकर्त्याला प्रतिष्ठा मिळणार नाही आणि संघटनेची पाळंमुळं गाव-वाडी-तांड्यापर्यंत घट्ट होणार नाहीत .

चांगले सल्लागार निवडून मोजकं पण, नेमकं बोलण्याचं भान राहुल गांधी यांना बाळगावं लागणार आहे . निवडणूक आणि आधीच्या काळात राहुल गांधी यांची जीभ अनेकदा घसरली हे समोर आलं . एकीकडे द्वेष न बाळगता प्रेमाची भाषा करायची आणि दुसरीकडे न्यायालयानं न दिलेल्या निर्णयाचे हट्टीपणे हवाले देणं , पंतप्रधानांना चोर म्हणणं , नरेंद्र मोदी आणि भाजप फेकत असलेल्या आरोपांच्या जाळ्यात अलगद सापडणं…हा विरोधाभास आहे . त्यामुळे समोरच्याला हल्ला करण्याची संधी आपोआप मिळते .

गेल्या पांच वर्षात राहुल गांधी हे आश्वासक नेते म्हणून समोर आलेले आहेत . काँग्रेसचं निवडणुकीच्या खडकावर आपटून भरकटलेलं काँग्रेसचं जहाज राजकारणाच्या सागरात पुन्हा आपणच डौलानं हांकू शकतो अशी खात्री राहुल गांधी यांनी दिलेली आहे , याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही . सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी संसदीय लोकशाहीत प्रआणि प्रभावी बळ विरोधी पक्ष हवाच असतो . काँग्रेसला तसा प्रभावी , प्रबळ पक्ष म्हणून उभा करण्यासाठी राहुल गांधी यांना शुभेच्छा .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799
हे सुद्धा वाचा-

राहुल समोरील आव्हाने bit.ly/2IchzL4 (info)

 राहुल गांधी आणि बिलंदर काँग्रेसजन ! bit.ly/2G12Jp2  

Previous articleकमलाचे जाणे व लखनऊचे अध्यक्षपद
Next articleएक लडकी को देखा तो ऐसा लगा…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.