पुन्हा पुन्हा खुणावणारे कन्याकुमारी…

-राकेश साळुंखे

   भारताच्या दक्षिणेकडचे शेवटचे टोक व पर्यटकांना पुन्हा पुन्हा खुणावणारे ठिकाण म्हणजे कन्याकुमारी. दक्षिण भारत ट्रीप ही कन्याकुमारीला भेट दिल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. भारताचा उत्तर-दक्षिण प्रवास काश्मीर ते कन्याकुमारी असा घडतो,हे आपण शालेय जीवनापासून वाचत किंबहुना अनुभवत आलो आहोत. माझा काश्मीरला जायचा योग अजून तरी जुळून आला नाही.  परंतु कन्याकुमारीला मात्र वारंवार भेटता आले आहे.

  कन्याकुमारी हे नाव त्या ठिकाणी असणाऱ्या कुमारी अम्मन मंदिरावरून पडले आहे. पूर्वी हे ठिकाण द केप कामोरीन या नावाने ओळखले जात होते. स्थानिक भाषेत कन्नीकुमारी असा उच्चार केला जातो. पूर्वीपासून हे कला,व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते. चेरा, चोल, पांड्य,नायक इ. राजांनी या भागावर राज्य केले आहे. कन्याकुमारी भारतातील सर्व मोठ्या शहरांना रेल्वेने जोडले गेले आहे. केरळची राजधानी तिरुवनंतपुरमपासून कन्याकुमारी फक्त ६७ किमी अंतरावर आहे. मी २००२ साली माझ्या घरच्यांबरोबर केरळ ट्रीप केली होती. त्यावेळी पहिल्यांदा कन्याकुमारीला जायचा योग आला होता. केरळ दर्शन करून तिरुवनंतपुरमला मुक्काम करून आम्ही कन्याकुमारी ला गेलो होतो. केरळमधील शिस्तबद्ध ट्राफिकचा अनुभव तिरुवनंतपुरम ते कन्याकुमारी या रस्त्यावर देखील आला होता. वाहता रस्ता असूनही कुठेही गाड्यांची एकमेकांना ओव्हरटेक करण्याची घाई किंवा चढाओढ दिसत नव्हती. आजूबाजूचा परिसर बघत निवांतपणे प्रवास केला होता.

परतीच्या प्रवासातील एक आठवण सांगावी वाटते, कन्याकुमारी पाहून पुन्हा तिरुवनंतपुरमला यायला निघालो असता पाऊस सुरू झाला होता. डिसेंबर महिन्यातील अवकाळी पाऊस असल्याने पावसाला चांगलाच जोर होता. सगळीकडे पाणी-पाणी झाले होते.  वाटेत एके ठिकाणी जेवणासाठी थांबलो. जेवण झाल्यानंतर गाडी जवळ आलो असता गाडी चिखलात रुतून बसली होती . काही केल्या ती जागची हलेना. मग दुसऱ्या गाडीची मदत घेऊन तिला ओढायचे ठरले.  पण मदतीसाठी एकही गाडी थांबेना. ड्रायव्हर म्हणाला, आपली गाडी केरळ पासिंगची आहे आणि आपण तमिळनाडूमध्ये आहोत त्यामुळे केरळ पासिंगचीच गाडी आपल्याला मदत करेल. तो म्हटल्याप्रमाणेच झाले. हे पाहून खूप आश्चर्ययुक्त वाईट वाटले होते. पण त्यानंतर एकदा मुन्नार ट्रीपमध्ये आलेल्या आणखी एका अनुभवाने माझा भारतीय एकात्मिकतेवरचा विश्वास कमी झाला.

  त्यावेळी मी आणि माझा केरळला स्थायिक असलेला भाचा मुन्नारला जाण्यासाठी तिरुवनंतपुरमजवळील एका गावात बसची वाट बघत उभे होतो. त्यावेळी एका फळवाल्याकडे फळे घेण्यासाठी गेलो.  तेव्हा चांगली फळे दे. खराब फळ देऊ नको… असे माझ्या भाच्याने म्हणताच त्या फळविक्रेत्याला राग अनावर झाला. तो माझा भाचा तमिळी असल्याचे समजून तो तमिळी लोकांना मल्याळी भाषेत शिवीगाळ करू लागला. मला काहीच समजत नव्हते कारण दोघेही मल्याळी भाषेत बोलत होते. ‘तो तमिळी नाही महाराष्ट्रीयन आहे आणि तो केरळमध्ये बरीच वर्ष झाली राहतोय’,हे माझा भाचा त्याला समजावत होता. तो मात्र काही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हता, मग मात्र आम्ही तिथून काढता पाय घेतला. एकीकडे आपण सारे भारतीय एक आहोत असे म्हणायचे आणि दुसरीकडे असे चित्र पदोपदी आपणा सर्वांनाच दिसत असते. हे खरंच खूप क्लेशदायक आहे.

पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर अशा तीन सागरांच्या संगमावर वसलेले कन्याकुमारी आपल्याला नक्कीच वेगळा अनुभव देणारे आहे. सूर्योदय व सूर्यास्त दोन्ही पहायला मिळणारी  किनारपट्टी दुसरीकडे कुठेही नाही.  मात्र यासाठी आपली इच्छाशक्ती जोरदार असावी लागते. कारण येथे बऱ्याचदा आकाश ढगाळच असते. क्वचितच स्वच्छ आकाश पहायला मिळते. पहिल्यांदा मी गेलो तेव्हा अवकाळी पावसाच्या गडद छायेमुळे ढग दाटून आले होते, त्यामुळे दोन दिवसांच्या मुक्कामातही सूर्यदर्शन काही झाले नव्हते. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा गेलो त्या प्रत्येक वेळी पहिली कसर भरून निघाली.  मात्र या सूर्य दर्शनासाठी प्रत्येक वेळी खूपच कसरती कराव्या लागल्या आहेत. एकदा तर हॉटेलच्या टेरेसवर गर्दी झाल्याने कॅमेऱ्यात सूर्योदयाचा सीन शूट करण्यासाठी पाण्याची टाकी ठेवलेल्या हॉटेलच्या टोपीवर तेथे रोवलेल्या काचांची पर्वा न करता गेलो होतो. मनाजोगते शूटींग झाल्याने खूप आनंद झाला होता, पण तो आनंद फार काळ टिकला नाही .मेमरी कार्ड भरल्याने ते रिकामे करण्यासाठी म्हणून नेट कॅफेत गेलो ,तर तिथे त्यातील डेटा करप्ट झाला.  ते पाहून मन इतके खट्टू झाले की अजूनही ती आठवण मनाला उदास करते कारण तेथून परतल्यावर तो डेटा रिकव्हर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण तो मिळाला नाही.

   कन्याकुमारीचा किनारा खडकाळ असून तेथे मोठमोठे खडक आहेत. इतर किनाऱ्यांसारखा हा किनारा नाही. तीन समुद्राच्या संगमाचे दृश्य अप्रतिम दिसते. तिन्ही समुद्रांचे पाणी वेगवेगळ्या रंगांचे दिसते. या संगमावरचे पाणी किंवा तेथील लाटा अनुभवणे हे शब्दात वर्णन करता येत नाही. प्रत्येकाने ते स्वतः अनुभवले पाहिजे. या ठिकाणी समुद्र स्नानासाठी भाविकांची खूप गर्दी असते. यात्रा काळात येथे खूपच गर्दी होते. या समुद्र संगमावरच किनाऱ्याला लागून कन्याकुमारीचे ( भगवती अम्मन ) मंदिर आहे. हे मंदिर पांड्य राजाच्या काळात बांधले आहे, असे म्हणतात. मंदिरातील शांत वातावरण मनाला भावते. मंदिरातील कठड्यावर बसून समुद्राची गाज आपण तासनतास ऐकत मनःशांती अनुभवू शकतो. मंदिरामध्ये शंख – शिंपल्यांपासून बनवलेल्या असंख्य वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात.

या मंदिराजवळच महात्मा गांधींचे स्मारक आहे. गांधींच्या अस्थी विसर्जनासाठी येथे आणल्या होत्या, त्यावेळी त्यांचा अस्थिकलश  ज्या ठिकाणी ठेवण्यात आला होता तेथेच हे स्मारक 1956 साली बांधले आहे. या स्मारकाची रचना अशी केली आहे की 2 ऑक्टोबर ला गांधी जयंतीच्या दिवशी सूर्याची पहिली किरणे रक्षा ठेवलेल्या भागावर पडतील. या स्मारकाला ‘गांधी मंडपम’ म्हणतात.
पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या रॉक मेमोरियलला मला पहिल्यांदा म्हणजे 2002 साली भेट देता आली नव्हती. त्यावेळी शबरीमलाची यात्रा असल्याने किनाऱ्यावर भाविकांची स्नानासाठी गर्दी उसळली होती. काळ्या कपड्यातील त्या गर्दीला पाहून घाबरून माझा 4 वर्षाचा मुलगा हॉटेलवर जाण्यासाठी रडू लागला होता. त्यावेळी फेरीबोटींची संख्या कमी असल्याने नंबर यायलाही  वेळ लागत होता, त्यामुळे शेवटी मुलाला घेऊन आम्ही हॉटेल गाठले. नंतर मात्र तेथे जाण्याचा बऱ्याचदा योग आला.

येथे खोल समुद्रात दोन भव्य खडकांवर दोन भव्य स्मारके आहेत. त्यातील पहिले विवेकानंद रॉक मेमोरिअल होय. हे स्मारक दोन भागात विभागले आहे. एक भाग म्हणजे श्रीपाद मंडपम जेथे देवी कुमारी यांचे पदचिन्ह आहे. दुसरा भाग म्हणजे जेथे स्वामी विवेकानंद ध्यान धारणेसाठी बसायचे तो होय. हे स्मारक लाल दगडात बांधले आहे. स्मारकाचे प्रवेशद्वार अजिंठा वेरूळ लेण्यांची आठवण करून देते. या स्मारकामध्ये विवेकानंदांची  ब्राँझ धातूमध्ये बनवलेली मूर्ती सजीवच वाटते. येथे जाण्यासाठी फेरीबोटी आहेत. गर्दी नसेल तर इथली शांतता मनाला वेगळ्याच जगात घेऊन जाते आणि विवेकानंदांनी ध्यान धारणेसाठी ही जागा का निवडली हे लक्षात येते.  पर्यटकांनी गजबजलेले हे ठिकाण चुकवू नये असेच आहे.

  या स्मारकापासून जवळच दुसऱ्या एका मोठ्या खडकावर तमीळ संतकवी तिरुवल्लूवर यांची 133 फूट उंचीची मूर्ती आहे.  किनाऱ्यावरूनच ती आपले लक्ष वेधून घेते. तिरुवल्लूवर यांची तुलना महान तत्वज्ञ सॉक्रेटिस, रुसो इ. बरोबर केली जाते. तिरुवल्लूवर यांनी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी तमिळ भाषेत तिरुकरुल नावाचा ग्रंथ लिहिला आहे. यामध्ये अत्यंत सोप्या भाषेत जीवनोपयोगी गोष्टी सांगितल्या आहेत. 133 अध्याय या ग्रंथात आहेत. त्यामुळेच त्यांच्या पुतळ्याची उंचीही  133 फूट आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या या पुतळ्याकडे  आपल्याला नेहमी जाता येत नाही. समुद्राचे पाणी कमी झाले की तेथील खडक उघडे पडतात त्यामुळे अशावेळी तिथे फेरीबोटी जात नाहीत . मला त्या स्मारकाला भेट देण्याची संधी अजून तरी मिळाली नाही. 2004 साली आलेल्या त्सुनामीच्या लाटा या स्मारकालाही धडकल्या होत्या. शांत, प्रसन्न, आश्वासक भाव असलेला चेहरा लांबूनही मनाला भावतो.

कन्याकुमारीला राहण्यासाठी भरपूर हॉटेल्स आहेत. मराठी भाषा समजणारी व बोलणारी लोक बऱ्याचदा भेटतात. पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा तिथे महाराष्ट्रीयन हॉटेल मॅनेजर भेटला होता. इतक्या दूर मराठी माणूस भेटल्याने  एखादा आप्तस्वकीय भेटल्याचा आनंद झाला होता. असे हे कन्याकुमारी.कितीही वेळा गेलो तरी पुन्हा नव्याने भेटणारे, नवी अनुभूती देणारे..

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Top 10 place to visit in Kanyakumari

Previous articleआपण, जग आणि चार्वाक : उत्तरार्ध
Next articleआद्य धर्म आणि धर्मव्यवस्था…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.