पुरुष असाही! पुरुष तसाही!

#Media Watch Diwali Ank

#मीडिया वॉच दिवाळी अंक २०१६

हर्षदा परब

स्त्री पुरुष हा भेद फार उशीरा लक्षात आला. शरिर वेगळ असतं हे दिसत होतं पण ते वेगळं का हे विचारायला आणि त्याची उत्तर

#Media Watch Diwali Ank
#Media Watch Diwali Ank

शोधायला माध्यमं नव्हती. जशी मोठी झाले वाचन झालं तसं हा लिंगभेद विसरुन जगायला शिकलं पाहिजे हा विचार मी स्वतःहून स्विकारला. पण लिंग बदल आणि त्यानुसार त्या व्यक्तीचे येणारे अनुभव यात फार बदल असतो असंही नाही. वयानुसार आपली जशी दृष्टी बदलते तसा दृष्टीकोनही बदलतो. मग ती स्त्री असो किंवा पुरुष त्याच्या वागण्या, बोलण्याचे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे अर्थ लावायला लागतो. मग आपल्या लक्षात येतं अरे स्त्री – पुरुष म्हणून पाहण्यापेक्षा माणूस म्हणून याकडे पाहिलं तर अनेक गोष्टी सोप्या होतात. मग स्त्रिया हे करत नाहीत आणि पुरुष हे करतात अशा चर्चा संपून जातात. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या गुण-दोषांनुसार त्याचे वर्तन असतं ही समज येते. मला वाटतं स्त्री-पुरुष भेदाची दरी दूर करण्यासाठी ‘समानते’शी जोडलेला हा विचार स्विकारायला पाहिजे… असो

आायुष्यात प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी किंवा समज येईपर्यंत बरंच घडून गेलं होत. त्यामुळे होणारा आनंद असो किंवा त्रास, लागणारी रुखरुख असो किंवा जणावणारा कोरडेपणा सगळं काही अनुभवलं होतं. त्यामुळे पुरुष बाप, भाऊ, मुलगा नवरा, पती, मित्र या समाजाच्या दृष्टीने सेफ असलेल्या नात्यांप्रमाणे लव्हर, कोणतंही नातं नको असलेला पण चांगलं वागणारा, जबाबदारी नको पण आपल्या शरिरासह येणारे सर्व फायदे उपभोगण्यासाठी आपल्या आयुष्यात आलेला, संबंध ठेवण्यासाठी धडपडणारा किंवा गरजेपरुता संबंध ठेवून नामानिराळा होणारा अशी बरीच पुरुषाची रुप पाहिली, काही अनुभवली आणि काही ऐकली. त्यातून समजलेला पुरुष मांडेन.

सुमित्राचा एक किस्सा. ती माझ्याकडे नाईट आऊटसाठी आली तेव्हा सांगितलेला… तिच्या शब्दात सांगितला तर जास्त सोप्प होईल म्हणून तसाच मांडतेय.

खरंतर आमचं तसं काही वेगळं नातं नव्हतं. पण तो काळजी करतो, फोन करतो, मनमोकळं बोलतो. जेव्हा भेटतो तेव्हा छान वाटतं. भरपूर गप्पा मारतो. अगदी भरपूर भांडतोही. वाचन, विचार, मुद्देसूद मांडणी अशी आमची विचार समृद्ध करणारी मांडणी. अशा सगळ्या जमेच्या बाजूंमुळे आमची मैत्री वाढत गेली. मग कॉफी हाऊस, टपऱ्या, हॉटेल अशा भेटी वाढतच होत्या. मला माहित नाही मी केव्हा त्याच्या प्रेमात पडले. पुन्हा… हो ना मी पुन्हा पुन्हा प्रेमात पडले होते. कितव्यांदा ते माहित नाही. पण प्रेमात पडले होते आणि तो प्रेमात आहे का हे विचारणं मला योग्य वाटत नव्हतं. पण कित्येक वर्षात आतून छान फिलिंग येत होतं. आम्ही एकत्र शॉपिंग करायचो. त्याला चांगले दिसतील असे माझ्या चॉईसचे कपडे घेण्याचा त्याचा हट्ट असायचा. इतके जवळ होतो पण कधी अंगाला स्पर्श नाही किंवा त्याने माझ्याकडे चुकीच्या नजरेने माझ्याकडे पाहिल्याचं मला जाणवलंही नाही. पण तो भेटला नाही की हुरहूर वाटायची. आपण पिकनिकला जाऊयात ना? आमची ओळख झाल्यापासून त्याने अनेकदा हा हट्टा केला होता. पाऊस सुरू झाला. म्हटलं जाऊयात पिकनिकला. प्लान कर. आम्ही त्या दिवशी लोणावळ्याला गेलो. एकटी रहायची सवय असल्याने भाड्याने घेतलेलं घरही छान वस्तीतल. जिथं लोक तुमच्या कपड्याकडे, गाड्यांकडे आणि बिलॉन्गिग्सकडे बघतात. तुमच्या घरी कोण राहतं? तुमच्या मनात काय चाललंय असे विचार त्यांना डाऊन मार्केट वाटतात. त्यामुळे तुमच्यावर वॉच नसते कुणाची. किंवा कळलं तरी फार विचारणा किंवा चर्चा होत नाहीत. स्टेटस टॅबू युनो. त्यदिवशी माझ्याबरोबरच तो ही घरी आला. कोणाला आक्षेप असण्याचं कारणच नव्हतं. दिवसभर केलेली मज्जा थकून गेलो होतो. रात्री गझला, कविता, गप्पा आणि सोबतीला वाईन. मस्त सुरू होतं सर्व आणि तो अचानक जवळ आला. मला हवंच होतं ते. खुप छान होतं ते सारं. मग अशा अचानक होणाऱ्या कार्यक्रमांची गणतीच उरली नाही. अगदी त्याने विचारावं ‘आज येऊ का घरी’ आणि मी त्या रोमॅण्टीक क्षणासाठी छान तयारी करावी. खूप वर्ष उलटली. कधी वाटलंही नाही विचारावं तूझं माझ्यावर प्रेम आहे का. कारण, हा अपमान झाला असता. काळजी घेणं, मर्जीशिवाय जवळ न येणं, समजून घेणं, पुन्हा या सर्वाची कुठेही वाच्यता न करणं, कोणालाही याबाबत कळू न देणं. आमची दोन टोकं आम्ही जपली होती. अचानक तो तुटक वागू लागला. फोन टाळू लागला. कुठं काय झालं हे कळेचना. आमचे वर वर खटके उडायचे पण ते फार मनाला लावून न घेण्या इतपत दोघंही मॅच्युअर होतो. मग त्याच्या मित्राची मदत घेतली. त्याने बोलणं सुरू केलं. पण तुटकपणा कायम होता. काहीच कळत नव्हतं. एकदा असंच कॉफी शॉपमध्ये त्याच्या मित्राने बोलावलं आणि सांगितलं अगं त्याचं लग्न ठरलंय. मला हसूच आलं. गंमत वाटली. त्याने मला न सांगण्या इतपत त्यात काय होतं. घरातले असे हट्ट आणि अशा चूका करतात. तेव्हा आपली मर्जी वगैरे विचारत नाही. पण त्याने सांगितलं असतं तर मी प्रयत्न केले असते. मी बोलले असते त्याच्या घरातल्यांशी. मी तसं त्याच्या मित्राकडे बोलूनही दाखवलं.

अग तूला कळत कसं नाही. त्याला तुझ्याशी लग्न करायचं नाही.

ओके ठीक आहे. त्याला लिव्ह इन वगैरे वर विश्वास आहे. आय अॅम ओके विथ इट

नाही तुझा गैरसमज झालाय. तो हे लग्न करतोय.

काय

हो अगं. अरे लग्न प्रेम वगैरे असलेल्या मुलीबरोबर करतात अस त्याचं म्हणणं…मग हे अचानक…

त्याचं हे लव्ह मॅरेज आहे.

मी खळकन तुटले. डोळ्यातून घळाघळा अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या. माझ्या शरिराशी खेळणारा, मित्रत्त्वाचं नातं जपणारा आणि त्यानंतर मला विश्वासात न घेता लग्नाला तयार होणारा पुरुष?

सुमित्राला त्याच्या मित्राकडून कळलं होतं की जेव्हा सुमित्राबरोबर तो गझल आणि वाईनमध्ये भिजलेल्या रात्री उपभोगत होता. तेव्हाच त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीवर त्याचं प्रेमप्रकरण रंगात आलं होतं. इतकं की कधी त्याने तिला घरी नेऊन तिची घरातल्यांशी ओळख वगैरे करुन दिली होती. त्याच्या मित्राने त्याचं हे प्रेम त्या दोघांमधलं हळुवार नात वगैरे असल्याचं सांगितल्याने सुमित्राला जे कळायचं ते कळून गेलं होतं.

माझ्या घरी नाईट आऊटसाठी आलेल्या सुमित्राने हा प्रसंग मला सांगितला त्या रात्री ती शांत होती. बहुधा या प्रकरणाला महिना दो महिने उलटून गेल्यानंतर तिने हे सगळं सांगितलं होतं. एखादी गोष्ट सांगावी तसं सविस्तर, हावभाव करुन सांगत होती.

सुमित्राची सिगारेट संपू द्यायची नाही आणि हातातला ग्लास रिकामा होऊ द्यायचा नाही हे तिने मला बजावलं होतं. ते मी अगदी नेमाने करत होते. जसं एखाद्याला जेवण वाढावं तसं. पण सुमित्राचं असं कोरडं राहणं मला पटत नव्हतं. तिने रडावं, चिडावं, राग व्यक्त करावं असंच मला वाटत होतं. पण नाही. सुमित्रा शांत होती. माझ्या प्रश्नार्थक नजरेला त्याही अवस्थेत हेरुन. ग्लास खाली ठेवत ती म्हणाली. माझं रडून, ओरडून स्वतःला त्रास करुन झालंय. आधीच्या ईतर प्रकरणांमध्ये झालं तसं करतेय. उत्तर शोधतेय त्याने असं का केलं याचं. कारण उत्तर देण्यासाठी तो कधी भेटणार नाही याची खात्री आहे. सुमित्रा शांत होती आणि माझी आत घालमेल सुरू होती. तिचं असं उथळ वागणं तिचं नव्हतं हे लक्षत आलं त्या रात्री. ती चांगली वाटते दारू प्यायला, बिछान्यात झोपायला. उधळून देण्याच्या तिच्या स्वभावाला लोक बोल्ड स्वभावाची म्हणून स्तुती करतात. पण घरात असा लाव्हा नको म्हणून शरिराशी खेळून साधूसंताप्रमाणे दुसऱ्या बाईशी लग्न करुन मोकळे होतात. मी पण सुमित्रासारख एक उत्तर शोधत होते. उदात्ततेचा विचार मांडणाऱ्या, पुरुषाच्या डोक्यातले नागडे विचार असं एका स्त्रिचं जग उधळून लावतात. सुमित्रा अजूनही सावरु शकली नाही या धक्क्यातून. पण कधी दिसणार नाही ते. ती हसते. पुरुषांबरोबर त्याच मोकळेपणाने वागते. सलगी करायला येणाऱ्या प्रत्येक पुरुषाची नस न नस ओळखते. मग ही पोरगी प्रेमात कशी पडते हे उत्तर मात्र मला सापडत नव्हतं. सारखं वाटत होतं काळजी करणारं आणि काळजी करण्यासाठी कोणी तरी असाव ही भूक भागवण्यासाठी ती हा सगळा त्रास सहन करते? की शरिराची भूक तिलाही आहे. ज्यासाठी ती हे सगळं सहन करते… मला उत्तर सापडत नव्हत. जे आजही सापडलेलं नाही.

दारावरची बेल वाजली. जाग आली. घड्याळात दहा म्हणजे बाई आली. गॅलरीतच झोप लागली होती. अंग दुखत होतं. कमला बाईच होती. आली आणि सगळं आवरलं. नाक लाल झालेलं आणि डोळे सुजलेले. म्हटल. बाई बरं नाही वाटतं? नाही ताई. आज तिची धुसफूस नव्हती. माझ्यावर चिडणं नव्हतं. मी रात्री जेवले का नाही म्हणून रागावली नाही. कमला बाई काय आज माझा राग नाही आला का? एक नाही की दोन नाही. कमला बाई ज्या दिवशी माझ्यावर रागवत नाही तो दिवस तिच्या आयुष्यातला वेगळा दिवस असतो हे मला सवयीनं मिळालेलं उत्तर. मीच तिला चहा करुन दिला. ती माझ्याबरोबर चहा घेते. नाश्ता करु का म्हणून तिनं विचारलं. पण आज माझ्या समोरच्या खुर्चीत बसून चहा घेतानाची तिची ऐट दिसत नव्हती. मग विचारल का गं पोरीला नवीन मोबाईल कसा घेशील ठरलं का तुझं? कमला बाईंचा बांध फुटला.

काय विचारू नका ताई. काय करू कळत नाही.

काय झालं. थरथरणारी कमलाबाई मी कधीच पाहिली नव्हती. मी एकटी असते म्हणून माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या पुरुषांना जरब बसविण्याची जबाबदारी स्वखुशीने घेणारी. कमलाबाई थरथरताना मी पहिल्यांदा बघत होते. तिला वाटत नाही म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवायला मी घाबरते. कधी फणकारेल सांगता येत नाही. ताई पोरीने वाट लावलीय.

काय झालं गं

ताई कुठल्या तरी मुलाबरोबर लफडं केलं.

कमलाबाई या वयात हे चालतच. होतं फार मनावर घेऊ नका. पोरगा चांगला आहे का? होईल सगळं व्यवस्थित. आत्ताची मुलं अशी अफेअर करण्यात आणि त्यातून बाहेर पडण्यात हुशार असतात. प्रॅक्टिकल विचार करतात ती सर्वाचा.

ताई. थोडं डेंजर झालंय.

म्हणजे

सुनिताने… दोनदा सुनिता बोलून त्या थांबल्या. पण त्यांना काही राहवलं नाही.

ताई सुनिताने त्या पोराला दोन फोटो पाठवलेत.

असे फोटो एस्चेंज होत राहतात कमलाबाई. प्रेमात असतात. तेव्हा छान वाटतं त्यांना.

ताई कपडे नसलेले फोटो एक्स्चेंज होतात?

कमलाबाईंच्या प्रश्नाने आता माझी ट्युब पेटली होती.

कुठल्या तरी पोराच्या प्रेमात प्रेम सिद्ध करण्यासाठी सुनिताने तिचे कपडे न घातलेले फोटो पाठवले होते आणि आता तो ते फोटो डिलिट करायला तयार नव्हता. सुनिताच्या बापाला कळलं तर पोरीचा जीव घेईल म्हणून कमलाबाई एकटीच या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होती. ज्याने ती खचली होती. सुनिता मात्र हादरली होती. कमलाबाईंना हे प्रकरण कसं हाताळावं हे कळतं नव्हतं. थोड्या वेळाने त्या मुलाचा नंबर वगैरे घेऊन त्याला झापलं. म्हटलं पोलिस घेऊन येतेय तुझ्या घरी. तर नको म्हणाला.

मग माझ्या घरी बोलावलं.

वीस एक वर्षाचा नुकतंच मिसरूड फुटलेले पोरगा. कमलाबाईने पोरीला त्या मुलाबरोबरचं लफड सोड असं सांगितलं म्हणून मग याने सुनिताचे असे फोटो मागवून तिला बदनाम करण्याचा घाट घातला होता. त्याला चांगलं खडसावलं. फोटो समोर डिलिट करायला लावले. पोलिसात तक्रार दिलीय. घरी किंवा मित्राच्या कॉम्प्युटरवर फोटो टाकला असशील तर पोलिस येऊन उचलतील असं सांगितलं. एरियातला पोरगा असल्याने त्याला माझी पोलिसांबरोबर चांगली ओळख असल्याचं माहित होतं. त्याच्या आईला फोनवरुन सगळा प्रकार सांगितला. मुलगा चांगला घरातला असल्याने कमलाबाईसारख्या मुलीच्या प्रेमात पोराने पडावं वगैरे घरातल्यांना मानवणारं नव्हतंच. त्यांनाही पुढे हे प्रकरण कसं पोलिसात वाढेल वगैरे सांगितलं. पोलिसांच्या भितीमुळे आणि घरातल्यांच्या दबावामुळे सुनिताला भेटणार नाही असं सांगून तो गेला. पण, कमलाबाईला कायमचा घोर राहून गेलाय. पोरीचे असे फोटो कधी वापरले तर ? तिची समजूत काढणं कठीण होतं. न जाणत्या वयात असं प्रेम सिद्ध करायला लावणारे अनेक मजनू असतात. हे पत्रकारीतेत आलेल्या शहाणपणामुळे मला तितकंसं मोठं प्रकरण वाटत नव्हतं. पण कमलाबाईने मात्र पोरीला गावी नेऊन सोडण्याचं पालुपद सारखं लावलं होतं. पोरीला नादाला लावलं असं तिचं म्हणणं होतं. माझ्या मते मुलीची चूक जास्त होती. प्रेम सिद्ध करायला कपडे काढून फोटो पाठवायला लावणाऱ्या पोराच्या मेसजला उत्तर म्हणजे ‘आपलं प्रेम संपलं’. ‘पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केलास तर थोबाड रंगवीन’, ‘घरी सांगीन’, ‘हा मेसजे पोलिसात दाखवेन’ वगैरे असायला हवं. पण पोरीने कपडे काढून फोटो पाठवणं म्हणजे तिलाही त्याची गरज आहे हे सांगणारं नाही का ?

हॅरी पॉटरचं पुस्तक वाचायला लागले. 19 वर्षांनंतर जे.के. रॉलिंगने लिहिलेली हॅरीची आठवी गोष्ट. ‘हॅरी पॉटर अॅण्ड कर्स्ड चाईल्ड’. त्या टाईम टर्नर नावाच्या यंत्राचा वापर करत हॅरी, रॉन, हर्मायनी हे बालपणीचे मित्र, त्यांचा शत्रू ड्रॅको मालफॉय आणि त्यांची पोर अॅल्बस आणि स्कॉर्पियस काही जुन्या प्रसंगात जाऊन ते प्रसंग बदलण्याचा प्रयत्न करतात…. गोष्ट रंगवण्याची जे.के.ची हातोटी इतकी मनाला भुरळ घालते की तिच्या कथेतल्या काही गोष्टी वास्तवात अस्तित्त्वात असाव्यात असं वाटतं. मला ती टाईम टर्नरची संकल्पना हॅरी पॉटरच्या चित्रपटात पाहिली तेव्हाच आवडली होती. पुन्हा एकदा आठवण झाली आणि भेटेल त्याला असं टाईम टर्नर मिळालं तर काय बदलाल हा प्रश्न विचारण्याचा एक नियम झाला. प्रत्येकाला काही ना काही तरी बदलायचं होतं अगदी माझ्यासकट. एका मित्राने सांगितलं ‘मला माझ्या आयुष्यातलं काहीच बदलायचं नाही. मी खुप आनंदी आहे.’ मी पण खुष झाले. आहे त्यात आनंदी असणारे खुप कमी लोक असतात. रहा बाबा सुखी रहा असं म्हटलं तर मी कसली. मग मी माझ्या सवयीने त्याची थोडी फिरकी घेतली. ‘तू खोटं बोलतोयस. तू आनंदी नाही.’ त्याने माझ्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. हे त्याचं रागवणं असतं. त्याच्या बायकोने सांगितलेला सल्ला मला आठवला. तोच मित्र काही दिवसांपूर्वी कॉफी शॉपमध्ये भेटला. त्यानेच बोलावलं. मला वाटलं नेहमीसारखी काहीतरी बातमीची टिप देणार आहे. कॉफीच्या वेळी त्याची अस्वस्थता मला स्पष्ट लक्षात येत होती. पण त्याला छेडणं मला परवडणारं नव्हतं. त्या दिवशी बातमीची खुप मोठी गरज होती. त्याच्या एका सहकारी मैत्रिणीबरोबर पिक्चरला गेला होता तो.

अगं तिकिटं काढली. पण बाकी सगळे गळाले. उरलो आम्ही दोघेच. रिकामं थिएटर शेवटच्या खुर्च्या. पण ती म्हणाली. आपण बघू रे पिक्चर. दोघांचे फोन सतत वाजत होते. क्लाएंट्स, बायको. अगदी सगळे फोन अटेंड केले. शक्य ते रिप्लाय दिले. पिक्चरमध्ये लक्ष नव्हतंच. पिक्चर संपायला पाऊण तास होता तेव्हा दोघेही शांत बसून पिक्चर बघत होतो. मग माहित नाही पण हसताना तिने हातात हात दिला आणि तिचा हात सोडावासा वाटला नाही. मग आम्ही किस केलं. मग मी तिला जवळ ओढलं… त्यानंतर पिक्चर संपल्यावर बाहेर पडलो तर ती पाठीमागे न बघताच निघून गेली. त्यानंतर रात्री एक वाजेपर्यंत बोललो. तिला गिल्टी वाटत नाही. तिला एक क्लायंट मिट होती म्हणून ती निघून गेली असं सांगतेय.

मी म्हटलं तूझं काय. मलाही काही गिल्ट वाटत नाही. काळोखात जवळ यावंस वाटलं आणि ती होती. बस्स… स्पॉण्टेनियस होतं गं ते सगळं. पण पुन्हा भेटायचं ठरलंय आमचं. कॉफी शॉपमध्ये… बोलू सविस्तर.

गिल्ट नाही मग मला का सांगतोयस? कोणी बघितलं वगैरे का?

नाही. पण, मला बोलायचं होतं गं कोणाशीतरी मित्राशी बोललो असतो तर भोसडीच्यांनी वारंवार खुणा करुन तिला बेजार केलं असतं. आम्ही हे सगळं सिक्रेट ठेवणार आहोत. तू कोणालाच सांगणार नाहीस अगदी श्रेयालाही हे माहित आहे म्हणून बोललो. मी आनंदी आहे गं. तूला त्यादिवशी सांगितलं अगदी तस्सा. घर सांभाळणारी बायको, दोन लेकरं… सगळं छान आहे. पण त्यादिवशी.

इट्स ओके वरद…

या प्रसंगानंतर आणखी एक उत्तर शोधतेय. आपण सुखी आहोत हे उत्तर त्यावेळच्या मनस्थितीत आपण दिलेलंल उत्तर असतं का? की वरद फसवतोय त्या मुलीला. बॅकसीटवर बसून जे त्याने त्या मुलीबरोबर केलं ते त्याच्या बायकोबरबर करणं त्याला असंस्कारक्षम वगैरे वाटत असेल किंवा तसे क्षण त्याच्या आयुष्यात कधी आलेच नसतील आणि ते मिळताहेत म्हणून त्याने ते उपभोगण्याचा निर्णय घेतला असेल. तिलाही तसंच वाटत असेल का? वरद म्हणतो त्याप्रमाणे ते दोघेही गिल्टी नाहीत? मग वरदने त्या क्षणाला बळी पडून बायकोला फसवलं का? की तिने तिच्या बॉयफ्रेण्ड किंवा नवऱ्याला फसवलं का?

या प्रसंगांमधून मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक वेळी पुरुषाला दोषी का ठरवावं. बाईची बिल्कूल चूक नाही असं प्रत्येक वेळी कसं असेल. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्यानंतर स्त्रिच्या वाट्याला येणारं दुःख वगैरे मुद्दे पूढे करुन आपण अनेकदा स्त्री चं खच्चीकरण करत असतोच की. धैर्याने जाब विचारायला, झालेल्या अन्यायाविरोधात लढायला किंवा फसवणाऱ्या पुरुषाला भर चौकात हाणणाऱ्या बायका दिसल्या तर ते वावगं नाही. मात्र प्रत्येक वेळी पुरुषाचाच दोष आहे असं आरोप पुरुषांवर करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही.

माझ्याबरोबर घडलेला एक किस्सा सांगते. फार पूर्वी मी जिथे काम करायचे आमच्याबरोबर एक मुलगा होता. माझं त्याचं छान जमायचं. आम्ही गप्पाही मारायचो. माझी मैत्रिण आणी मी ऑफिसातून चालत असताना एकदा आमच्या मागे तो चालत आला. माझ्या मैत्रिणीने छोटं टीशर्ट घातलं होतं. तो तिच्या सीट कडे बघत होता. मला जाणवलं. तिला ते ऑक्वर्ड वगैरे वाटलं. मी मात्र तिला थांबवून त्या मुलाला पुढे जाऊ दिलं आणि तिला सांगितलं आपण दोघी मिळून त्याच्या सीटकडे पहायचं. मुलींप्रमाणे मुलांना नजर जाणवते हे मी तेव्हा अनुभवलं. तो मुलगा काही अंतर चालल्यावर मागे वळला आणि आम्हाला सॉरी म्हणाला. पुन्हा किमान तुमच्याबरोबर तरी असं करणार नाही असं म्हणाला. त्याने त्याची चूक मान्य केली हे एवढंच मला हवं होतं. आम्ही आजवर भेटलो की छान बोलतो. त्या प्रसंगानंतर आमच्यात कडवटपणा आला नाही.

बाईच्या स्वातंत्र्यावर तुमच्याबरोबर गप्पा मारणारे पुरुष तुम्ही छोटं टिशर्ट घातलं की जिन्समधून दिसणाऱ्या तुमच्या पृष्ठ भागाकडे पाहतातच, स्लिवलेस घातल्यावर हात वर करुन आळस दिलात तर तुमच्या काखा पाहणारे किंवा तुमच्या शेजारी बसून तुमच्या काखेच्या भागातून छाती दिसते का हे बघणारे पुरुष सर्रास दिसतात. मी एक उपाय करते असे पुरुष पाहताना त्यांचं निरिक्षण करते. माझ्या अशा प्रतिक्रियेने ते अडखळतात. त्यांना काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नाही. पूर्ण, अर्धे, पारदर्शी, छोटे कपडे कसेही असोत बाईला नजरेने स्कॅन करणाऱ्या पुरुषांची कमी नाही. अगदी ओळखीच्या बाईलाही हसून विचारपूस करुन तिची पाठ फिरली कि त्यांच्या नजरेचा स्कॅनर मागून फिरतोच. मुद्दाम सांगावंस वाटतं बायका पुरुषांकडे पाहत नाहीत असंही नाही. पाहतात की. अगदी पुरुषांसारखं स्कॅनही करतात. पण गपचूप. अगदी नकळत. त्यामुळे पुरुषांना ऑक्वर्ड वगैरे वाटत नाही एवढचं. तरुण पोर जसं नाक्यावर उभं राहून पोरींची छाती आणि पृष्ठभाग पाहतात. तशाच पोरीही मुलांचे आर्म्स, छाती, हेअर स्टाईल वगैरे न्याहाळतात. आम्हा काही डेंजर पोरींचा ग्रुप होता आम्ही मुलांचे थाईस पहायचो. पोरींच्या गप्पांवेळी अम्ही म्हणायचो पण हे पारच लेच्या-पेच्या आहे तो. अशी पोरं कोणाला आवडतात. पोरी पर्सनॅलिटी बघतात म्हणजे काय फक्त पुरुषांचे मॅनर्स बघतात का? बायकांमध्ये रंगलेल्या गप्पा कधी ऐकल्या की वाटतं आपल्या पुरुषाव्यतिरिक्त इतर पुरुषाकडे पाहत नाहीत वगैरे हे यांचं ढोंग तर नाही नाही. ‘अगं त्याला टक्कल पडलं आता’, ‘आता भरपूर थोराड दिसतो नाही मंजूचा नवरा’. ‘बाई त्या भोसलेचं काय पोट सुटलंय’, ‘सुदर्शन भावोजी बोलायला लागले की काय तोंडाचा वास सुटतो त्यांच्या’ ‘ आता यांचा भाऊ कवळ्या लावतो.’ ही वाक्य ऐकतो तेव्हा वाटतंच ना यांनी समोरच्या पुरुषाबद्दल इतक्या सहजपणे वक्तव्य केलं याचा अर्थ त्यांनी त्या त्या पुरुषांकडे पाहिलं असणारचं नाही. तसंच त्यांच्यात वर्षानुवर्षे होणाऱ्या बदलांवर त्यांच लक्ष आहे हे सुद्धा लक्षात येतं अशा वाक्यांवरुन. जावई अंगा-पिंडाने छान आहे हो हे वाक्य काय जावयाला फक्त फोटोत बघून करतात का बायका? याचा अर्थ एकमेकांकडे बघणं स्त्री-पुरुषांमध्ये कॉमन आहे.

मान्य आहे काही पुरुष स्त्रियांकडे इतक्या बारीक नजरेने पाहतात की जणू नजरेने रेप करतील की काय? अशा बारीक निरिक्षणातून लेखक, कवींनी स्त्रीच्या सौंदर्याची केलेल्या वर्णनाची आपण तारीफ करतोच ना. अगदी बायकाही करतात. पुरुषांबरोबर बायकांनाही आवडतं असं लिखाण. काय शब्दात मांडलंय वगैरे तारीफ करतो. अनेक कवी, ऐकले वाचले. बायकांच्या सौंदर्याची वर्णन अशी भन्नाट करतात की जे बात. त्याने वर्णन केलेल्या बाईच्या प्रेमातच पडायचं बाकी राहतं किंवा तिचा हेवा वाटतो. पण त्यासाठी त्याने बाईला जवळून पाहिलंच असेल की नाही. मला तर काही कविंची वर्णन, ऐकून वाचून वाटत राहतं सालं याने बाईला कुठल्या तरी फटीतून किंवा भोकातून चोरून पाहिलंय. माझा एका मित्र कविता करतो. त्याने अशीच साडी नेसणाऱ्या बाईवर केलेली कविता ऐकवून दाखवली. मी त्याला म्हटलं. च्यायला बायकोला साडी नेसताना पाहून केलीस की काय. त्याच्या तोंडून पटकन निघालं छ्या…. पुढचं काय ते समजून जा. मी त्याला नेहमी चिडवते… ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ पुढे विचारते पण मग आज काय काय पाहिलं.

गंमत म्हणून सांगते काही बायका पुरुषांनी आपल्याकडे पहावं म्हणून अनेक खटपटी लटपटी करतात. तसेच काही पुरुषही असतात. जे बायकांनी त्यांच्याकडे पहावं म्हणून क्लृप्त्या शोधतात. फरक इतकाच की पुरुषाने त्याला हव्या असलेल्या बाईव्यतिरिक्त इतर बाईने पाहिलं तरी तो तिचं पाहणं पॉझिटिव्हली घेतो. तो त्या लबाईला लाईन देणार नाही, तिच्याशी बोलणार नाही. पण रागवणार वगैरे नाही. बाई दुसऱ्या पुरुषाने पाहिलं तर बघ कसा लाळ गाळतोय, मेला सारखा मलाच बघतोय. इथले सगळे मेले टकमक बघतात वगैरे प्रतिक्रिया देतात. कोणीतरी आपल्याकडे पहावं म्हणून केलेला खटाटोप अमूक एकासाठी किंवा अमूक समूहासाठी अशी पाटी आपण लावतो का? मग एखाद्यासाठी केलेला दिखावूपण दुसऱ्याने पाहिला तर आरडाओरडा का केला जातो?

एक मात्र पाहिलंय काही पुरुष मैत्रिणींबरोबर जितके मोकळे वागतात तितके घरातल्या बायकोबरोबर नाही. मुंबईत कॅफे एक्सेलसियर हे ईराण्याचं दुकान आहे. त्याच्या समोरच एक्सेलसियर थिएटर आहे. या थिएटरमध्ये येणारी कपल्स किंवा , काही दारूड्यांचे ग्रुप कॅफेएक्समध्ये असलेल्या पोटमाळ्यावर बसतात. अर्थात प्रायव्हसीसाठी. माझ्या एका मित्राला मी सहज विचारलं काय रे लग्नापूर्वी बायकोला फिरायला आणशील तेव्हा इथे नेशील का… तो फणकारुन म्हणाला. बायकोल इथे कशाला आणू? माझ्या ओळखीत एक कपल आहे. नवरा बायको दोघेही दारु पितात. पण खासगीत दारु प्यायची असं नवऱ्याने बायकोला सांगितलेलं काही वर्षांपूर्वी तीसुद्धा हे सगळं पाळत होती. जोवर तिने त्याच्या ऑफीसमधल्या पार्टीचे फोटो पाहिले नव्हते. त्यानंतर अर्थात नवऱ्याला तिने सगळं सविस्तर विचारलं. त्या फोटोत त्याच्या शेजारी बसलेल्या मैत्रिणीने वाईन घ्यावी म्हणून हिच्या नवऱ्याने तिला कसं पटवून दिलं की वाईन म्हणजे दारु नाही. ऑफीस पार्टीमध्ये थोडी घेतली तर काहीच हरकत नाही असं कसं समजावलं आणि मग तिने एक ग्लास वाईन घेतली असा किस्साही त्याने तिला सांगितला. आता त्याची बायकोही ऑफीसच्या पार्टीत दारू पिते. तिने इतर कोणाचंच ऐकलं नाही नवऱ्याचं ऐकलं जे त्याने त्याच्या मैत्रिणीला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. आणकी एक प्रसंग या वर्षी मुंबईत भरपूर पाणी भरलं होतं. तेव्हा सेण्ट्रल लाईन बंद होती. एकाच स्टेशनला नोकरी करणारे नवरा-बायको ऑफीसला जाण्याची तयारी करत होते. पण नवऱ्याने चार दोन मित्र-मैत्रिणींना फोन लावला आणि एका गाडीतून जाण्याची तयारी सुरू केली. सर्व कोऑर्डिनेशन करताना त्याच्या हे लक्षात नाही आलं की आपली बायको कशी ऑफीसला जाईल?

तसंच बायका पण त्यांच्या नवऱ्यांबरोबर मोकळे पणाने वागताना मी पाहिलेलं नाही. भावोजींनी बघा माझ्या साडीची तारीफ केली नाहीतर तुम्ही. तुमचं मेलं कुठे लक्ष माझ्याकडे. असा अनुभव शेअर करताना नवरा जर असं वाक्य ‘ आज तुझ्या बहिणीने मला मी सुंदर दिसतो असं म्हटलं’. तर बायका पचवतात का हे सत्य?

एक कपल मला माहित आहे ज्यामध्ये मुलासाठी हट्ट करणाऱ्या नवऱ्याला डिव्होर्स देणारी बायको मला माहिती आहे. तसंच मुल नको, अगदी अॅडॉप्शननेही नको असं सांगणाऱ्या माझ्या मैत्रिणीने नवऱ्याला फक्त त्या एका कारणासाठी सोडणं नकोसं वाटतंय म्हणून आई-वडील पाठिशी असतानाही तसा निर्णय घेतलेला नाही. माझ्या मित्राच्या बायकोची, तिच्या लांब केसांची, तिच्या मोहक हालचालींची मी एकदा तारीफ केली. तेव्हा माझ्या मित्राने मला स्पष्ट शब्दात सांगितलं ‘मी माझ्या कुठल्याच मित्राला म्हटलं नाही पण तुला सांगतोय माझ्या बायकोपासून दूर रहात जा. ‘

बाईच्या मर्जीविरुद्ध तिच्या शरिरावर झोपणारा नवरा गुन्हेगार आहे. तर मग, नवऱ्याची ईच्छा नसताना शरिर संबंध ठेवायला भाग पाडणारी बाई गुन्हेगार नाही का? चाणक्य म्हणतो बाईला सेक्सची ईच्छा पुरुषापेक्षा अधिक असते. पण, फार क्वचित नवऱ्यावर जबरदस्ती करणाऱ्या बायकोवर किंवा बाईवर गुन्हा झालेल्या घटना समोर येतात. आता काही जण याला स्त्रीमधलं संयमीपण वगैरे सांगून अशा घटना कमी घडत असाव्यात असा अंदाज व्यक्त करतील. मध्यंतरी सावधान इंडिया फाइट बॅक या कलर्सवरच्या सिरियलमध्ये अशीच एक केस दाखवली होती. ज्यामध्ये ती महिला पुरुषाला कॉटला बांधून जबरदस्तीने त्याच्याशी सेक्स करण्याचा प्रयत्न करते आणि तो ओरडत असतो. त्याचं तिच्यावर प्रेम नाही म्हणून. ट्रान्सजेंडरची अशी गोची आहे. ज्यांनी त्यांचं वेगळं अस्तित्त्व किंवा होमोसेक्शुअॅलिटी समाजाच्या भितीने स्विकारलेली नाही ते पुरुष समाजाला दाखविण्यासाठी लग्न करतात, पोर झालं नाही म्हणून समाजाच्या नजरेत आपली लैंगिकता येऊ नये म्हणून सेक्स करतात त्यांना मुलंही होतात. मग हा त्या पुरुषांवर अन्याय नाही का? कित्येक ट्रान्सजेंडरशी बोलताना समोर आलेली ही बाब पुरुषावरही अन्याय, अत्याचार होत असल्याची जाणीव करुन देतो. एखादा लग्न झालेला पुरुष नोकरी करत नाही म्हणून त्याची बायको त्याला डिव्होर्स देऊ शकते. पण एखादी बाई घरी बसली म्हणून तिचा नवरा तिला डिव्होर्स देऊ शकेल का?

काही पुरुषांना किंवा स्त्रियांना सवय असते अरे ‘तो’ सेफ आहे ना असं विचारायची. पण मला कायम वाटतं आपल्यासाठी सेफ असणारा माणूस मग तो पुरुष असो किंवा स्त्री समोरच्या व्यक्तीसाठी सेफ आहे का हे आापण नाही ठरवू शकत. दोन व्यक्तींचं वागणं आणि तेव्हाचा प्रसंग ठरवतो ते एकमेकांसाठी सेफ ठरतील की नाही ते?

माझ्या आयुष्यात सर्वात जास्त समजून घेतलं ते माझ्याबरोबरच्या मित्रांनी. त्यांनी त्यांच्याबरोबरच्या आर्ग्यूमेंटचं कधी भांडवल नाही केलं. भांडण झाल्यानंतरही माझी एखादी चांगली स्टोरी आली तर चांगली बातमी म्हणून मेसेज केला. उलट लहानपणापासून मुलींचे तितचे चांगले अनुभव नाही. तुम्ही चांगले दिसत नाही, चांगले कपडे घालत नाही म्हणून टाळणाऱ्या मुली असतात. ट्रेनच्या डब्ब्यात पुरुषांच्या डब्ब्यात एखाद्या गरोदर किंवा मुल बरोबर असलेल्या बाईला जितकी लवकर जागा मिळेल क्वचित तसं महिलांच्या डब्यात घडतं. पुरुषांच्या डब्यात त्या बाईचा नवरा बरोबर असेल तर एखादा पुरुष दया येऊन तिच्या नवऱ्यालाही तिच्या शेजारी बसू देईल. बायकांच्या डब्यात मात्र पोटं काढून फिरतात कशाला? पोरं घरी ठेवून फिरायचं. असे प्रश्न मारुन बाईला हैराण करतात. चांगल्या शिकल्या सवरल्या बायकाही असे प्रश्न करतात… फक्त लिंगो विल चेंज… अदरवाईज दीस वुमन आर मॅड आय टेल यू. व्हाय दे आर ट्रॅव्हल इन ट्रेन? इन प्रेग्नन्सी टू ट्रॅव्हल इन रश्ड ट्रेन इज सो डेंजरस यु नो…

कोडी पडावी तशी माणसं आयुष्यात भेटत असतात. एक माणूस, एक कोड, उत्तर किंवा प्रश्न असंच असतं नाही? माणसांचं कोडं सोडविण्यासाठी लक्षात घेतलं पाहिजे आपल्या समोर दिसतो तो चेहरा कधीच खरा नसतो. त्यात भेसळ असते. तेचं दाखवलं जातं जे दुसऱ्याने पहावं असं त्याला वाटत असतं. मग तो पुरुष असो किंवा स्त्री.

९६१९१९६७९३

हे सुद्धा आवर्जून वाचा

पुरूष: रोस्टेड सॅण्डवीच–हिनाकौसर खान-पिंजार- http://bit.ly/2r5noTZ

लिंगा-लिंगातला भाव …..अभाव ?-योजना यादवhttp://bit.ly/2OopG8F

पुरुष असाही! पुरुष तसाही!- हर्षदा परब – http://bit.ly/2quw8TN

कळालेल्या पुरुषाचा कोलाज-शर्मिष्ठा भोसले-  http://bit.ly/2qq4es1

पौरुषत्वाचा खरा अर्थ उलगडलाय, त्या पुरुषांसाठी- सानिया भालेराव- http://bit.ly/2r3YyUw

Previous articleलाजिरवाणे, संतापजनक!
Next articleडीपी के मोहताज रिश्तों की दुनिया..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here