माध्यमांची फोकनाडबाजी !

-प्रवीण बर्दापूरकर

थापा किंवा फोका मारणे किंवा पुड्या सोडण्याला वऱ्हाडी भाषेत ‘फोकनाड‘ असा शब्द आहे . अशा फोका मारणाऱ्यांना ‘फोकनाड्या‘ असं विदर्भात संबोधलं जातं . ‘शरद पवार युपीएचे चेअरमन होणार‘ आणि ‘राज्यातल्या काही मंत्र्यांकडे मुंबईच्या महापालिकेच्या पाण्याची मोठी थकबाकी‘ या दोन पूर्णपणे फसलेल्या बातम्यांमुळे किमान महाराष्ट्रातली माध्यमे ’फोकनाडी‘ पत्रकारिता तर करत नाहीयेत ना असा प्रश्न जर कुणाला पडला तर त्यात काही गैर नाही . विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्या आणि बर्‍याच प्रमाणात मुद्रीत , अशा  दोन्ही माध्यमांची विश्वासार्हता दिवसेंदिवस संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली असतांना , त्या विश्वासार्हतेची लक्तर वेशीवर टांगली जात असताना आणि अर्थकारण संकटात सापडून माध्यम जगतातील अनेकांचे अस्तित्वच धोक्यात आलेले असतांना गेल्या आठवड्यातल्या पूर्णपणे फसलेल्या या दोन बातम्यांनी अशी ‘फोकनाड पत्रकारिता’ चौथा स्तंभ (?) भरभक्कम करणार की आणखी पोखरणार आहे , असा प्रश्न आता निर्माण झाला आहे .

शरद पवार हे नि:संशय मोठे नेते आहेत . शरद पवार यांनी देशाचं आणि युपीएचं नेतृत्व करावं , असं  मराठी माणसाला वाटणं स्वाभाविकही आहे . ती कदाचित पवार यांची इच्छा असेल किंवा नसेलही , परंतु एक मराठी माणूस म्हणून शरद पवार यांच्याविषयीच्या निखळ प्रेमापोटी ज्या आशा-अपेक्षा महाराष्ट्रीयन जनता बाळगते , त्यामुळे हे घडणं स्वाभाविक आहे . शिवाय शरद पवार यांच्याकडे ती क्षमताही आहे असं म्हणण्यास वाव आहे . राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्याइतका समंजस आणि अनुभवी नेता आता अपवादानेच एखाद-दुसरा असू शकेल .  ६० पेक्षा जास्त वर्षांचा त्यांचा राजकारणातला वावर आहे . राजकारणाच्या पलीकडचे शरद पवार हे कर्तृत्ववान बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहेत . कला , क्रीडा आणि साहित्य अशा क्षेत्रात त्यांनी त्यांचा ठसाही उमटविलेला आहे . शेतीविषयक क्षेत्राची त्यांची जाण थक्क करणारी आहे . त्यांचा लोकसंग्रह अफाट आणि महत्वाचा म्हणजे तो across the party आहे . त्यांची काम करण्याची याही वयातली क्षमता स्तिमित करणारी आहे . इतकं सगळं ठासून ज्या व्यक्तिमत्त्वामध्ये भरलेलं आहे ते व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रीय जनतेचं आवडतं असणं अतिशय स्वाभाविक आहे , त्यात गैर काहीच नाही .

पण , मुख्य मुद्दा हा आहे की , हा एवढा मोठा नेता देशाचं नेतृत्व करण्याइतका राजकारणाच्या किंवा सरकारच्या पातळीवर देशाचं नेतृत्व करण्याइतका राजकीयदृष्ट्या सक्षम आहे का , या प्रश्नाचं उत्तर ठामपणे हो असं मिळत नाही , याची जाणीव माध्यमांना होणार किंवा नाही , हा खरा मुद्दा आहे . देशाचं नेतृत्व करायचं तर दिल्ली ठाण मांडून बसावं लागतं . ज्या दिवशी ‘शरद पवार हे युपीएचे चेअरमन होणार‘ अशा ‘पुड्या’ रेशमाच्या वस्त्रात बांधून माध्यमातून सोडल्या गेल्या  किंवा पवारांच्या हितशत्रूंनी त्या सोडल्या किंवा राष्ट्रवादीच्या गोटातूनच सोडल्या गेल्या किंवा एखाद्या पवार भक्त पत्रकारला पडलेलं ते दिवास्वप्न होतं ( ही शक्यता जास्त आहे ! ) , अशा चारही शक्यता गृहीत धरल्या तरी , त्याच्या आधी किती दिवस सलग शरद पवार दिल्लीत होते आणि ही पुडी सोडली गेली त्यानंतर किती दिवस शरद पवार दिल्लीत होते ? या प्रश्नाचा नीट शोध पवार यांच्याविषयी अवास्तव अपेक्षा बाळगणाऱ्यांनी घ्यायला हवा .

दिल्लीमध्ये ठाण मांडून न बसता राजकीय किंवा सरकारचं नेतृत्व एखाद्या  व्यक्तीकडे येणं पूर्णपणे अशक्य आहे . दिल्लीच्या दरबारी राजकारणात मांड ठोकायची तर ’डोक्यावर बर्फ , जिभेवर खडीसाखर आणि चेहऱ्यावरची सुरकुती न हलू देता’ राजकारण करण्याची शैली असावी लागते , ती शरद पवार यांच्याकडे निश्चित आहे . तडजोडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांचं नाव कोणत्याही क्षणी कोणत्याही पदासाठी पुढं येऊही शकतं किंवा अनेक प्रश्नांच्या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांचं मत आजमावलं जातं हेही खरं असलं तरी , शरद पवार यांची राजकीय ताकद मात्र पाहिजे असायला हवी तेवढी नाही हे प्रामाणिकपणे मान्य करायला महाराष्ट्रातील माध्यमं आणि माणसांनी आता ती शिकलं पाहिजे . शिवाय युपीएत मोठा पक्ष काँग्रेस आहे आणि या पक्षाचे नेते राहुल गांधी गेल्या सुमारे सहा-साडेसहा वर्षात देशभर फिरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , नरेंद्र मोदी आणि भाजपशी थेट पंगा घेतला मात्र , याकाळात शरद पवार मात्र नरेंद्र मोदी यांच्याशी ‘नुरा कुस्ती’ खेळत होते . असा पंगा घेणारे राहुल गांधी  एकमेव नेते आहेत . राहुलच या पदाचे प्रबळ आणि समर्थ दावेदार असल्याचे वास्तव कसं विसरता येईल ?

===

पंतप्रधान होण्याची मनीषा सर्वात प्रथम शरद पवार यांनी जाहीर केली ती पी. व्ही. नरसिंहराव यांच्या विरोधात शड्डू ठोकून . ( तेव्हा नागपुरात ती बातमी आम्ही घनघोर चर्चा करत सेलिब्रेट केली होती ; होतो असा भाबडेपणा कधी कधी ! ) तेव्हापासून शरद पवार यांचं पंतप्रधानपद महाराष्ट्रासाठी एक ‘विलोभनीय आणि भावनात्मक मिथक’  ठरलेलं आहे हे . याआधी एकदा लिहिलेला/भाषणात अनेकदा सांगितलेला एक अनुभवच पुन्हा सांगतो , म्हणजे दिल्लीत काय वातावरण आहे हे स्पष्ट होईल . मनमोहनसिंग यांच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या काळातला हा प्रसंग आहे . एकदा दिल्लीत असतांना दोन पत्रकार मित्रांसोबत कॉंग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका बड्या नेत्यांकडे ( पुढे ते देशाचे घटनात्मक प्रमुख झाल्यानं थेट नाव टाळलं आहे !) रात्रभोजनाला जाण्याची संधी मिळाली . हे सगळे एकमेकांच्या फारच निकटचे आहेत हे त्यावेळी सहज लक्षात येत होतं . गप्पात एकानं विचारलं , ‘दादा , तुमच्यात पंतप्रधान पदाचं सर्व मेटल आहे पण , एकदा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर तुम्ही शांत झाला का आहात ?’ त्यावर ते चाणक्य नेते जे म्हणाले होते त्याचं सार असं- ‘एक म्हणजे , माझ्या स्वत:च्या राज्यातूनच एकहाती संख्याबळ माझ्या पाठीशी नाही आणि दुसरं म्हणजे तर मला गांधी कुटुंबाचा पाठिंबा नाही ; तो असेपर्यंत मीच काय कुणीही कॉंग्रेसकडून पंतप्रधान होऊ शकत नाही !’

     तिथून बाहेर पडल्यावर मी त्या पत्रकार मित्रांना म्हणालो , तुम्ही दिल्लीचे पत्रकार आमच्या पवारसाहेबांना ‘मराठा पॉवर’ म्हणता , ‘ग्रेट मराठा’ म्हणता , मुत्सद्दी आणि व्यासंगी राजकारणी म्हणता तरीही त्यांचं नाव पंतप्रधान म्हणून म्हणून तुम्ही गृहीत का धरत नाही ? त्यावर पत्रकार मित्र म्हणाला , ते अजून पूर्ण दिल्लीकर झालेले नाहीत आणि त्या पदासाठी अजून त्यांची तयारी नाही . ( आजही पक्कं स्मरणात आहे , त्यानं he is a spring chicken असा शब्दप्रयोग केलेला होता आणि तो मला तेव्हा मुळीच रुचला नव्हता ) . त्यावर देवेगौडा यांना काय एका रात्रीत सर्वज्ञान प्राप्त झालाय का असा वाद मी घातला तेव्हा महाराष्ट्राचे लोक पवारांबाबत ‘अंध आणि नाहक इमोशनल आहेत’ , असा शेरा त्यानं मारला होता . काही वर्षांपूर्वीची ही हकीकत असून अजूनही त्या स्थिति मुळीच फरक पडलेला नाही !

===

१९८० साली शरद पवार यांचे विधानसभेवर ५५ उमेदवार निवडून आले आणि २०१९ साली हा आकडा ५६ वर पोहोचलेला आहे . म्हणजे चाळीस वर्षांत शरद पवार यांच्या राजकीय ताकदीची ‘नौका’ ५० ते ६० च्या आसपासच हेलकावत राहिली ही वस्तुस्थिती आहे आणि ती कटू असली तरी ती स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही . याच चार दशकांच्या काळात ममता बॅनर्जीनी पश्चिम बंगाल कसा पादाक्रांत केला हे आपण पाहिलं आणि तोही स्वबळावर . उत्तर प्रदेशात मुलायम सिंग आणि नंतर त्यांचा पुत्र अखिलेशनी स्वबळावर सत्ता स्थापन केली . मायावती स्वबळावर सत्तेत आल्या . आंध्रात जगमोहन रेड्डी त्यांच्या ताकदीवर सत्तेत आले . तामिळनाडूत अम्मा जयललिता सलग तीन वेळा सत्तेवर आल्या . महाराष्ट्रात मात्र शरद पवार यांचा आधी समाजवादी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर तर सोडाच ,परंतु सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष म्हणून सुद्धा स्थान मिळवू शकला नाही , हे आपण लक्षात घेतलं पाहिजे . ज्या पक्षाचा नेता आणि पक्ष एखादा राज्यामध्ये स्वबळावर उभा राहू शकत नाही , त्या पक्षाचा नेता देशाचं नेतृत्व कसं काय करु शकतो ? ती एक निष्फळ ( Abortive ) चर्चा आहे , असा प्रश्न अशा बातम्या देताना माध्यमांना पडत कसा नाही ?  शरद पवार याचं नेतृत्व असं देशव्यापी किंवा एक सक्षम राजकीय मोठी शक्ती असलेलं नाही हे लक्षात न घेताच माध्यम हे बातम्या चालवतात आणि त्यातून आपलीच विश्वासार्हता वेशीवर टांगून घेतात हे काही चांगलं नाही .

===

गेल्या आठवड्यात दोन दिवस महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या मुंबईतील बंगल्यांवर असलेल्या ’पाण्याची थकबाकी’ ही बातमी गाजवली गेली . पत्रकारांचे स्त्रोत किती कच्चे असतात याचे अप्रतिम उदाहरण म्हणून या बातमीकडे बघायला हवं कारण कोणताही गाजावाजा न करता , कोणताही आव न आणता , कोणतीही खवचट कमेंट न करता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पाण्याची थकबाकी‘ या बातमीत काहीही तथ्य कसं नाही , हे विधिमंडळाच्या सभागृहातच सांगून टाकलं . ज्या पक्षाची  महापालिकेत सत्ता आहे आणि त्याच पक्षाचे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचीही पाण्याची थकबाकी आहे असं बातम्यांमध्ये म्हटलेलं होतं आणि त्याचा खुलासा महापालिकेने तातडीने केला की मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे अशी कोणतीही थकबाकी नाही . तरीही या बातम्या चालत राहिल्या .

आपली बातमी चुकली किंवा आपल्या बातमीच्या संदर्भामध्ये काही अतिरिक्त आणि आपल्या बातमीच्या तपशीलाविषयी प्रतिवाद करणारी माहिती समोर आली तर , चूक मान्य करण्याचा किंवा त्या संदर्भात खुलासा करण्याची किंवा त्यांची बाजू तपशीलवार मांडण्याचा उमेदपणासुद्धा माध्यमात राहिलेला नाहीये , हे अतिशय वाईट आहे . ही दोन उदाहरणं केवळ प्रातिनिधिक म्हणून घ्यायला हवीत . माध्यमांचे सध्या बातम्या देणारे स्त्रोत किती कच्चे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत आणि त्यामुळे किती बातम्या खोट्या ठरल्या आणि त्या बातम्या देणारे पत्रकार सपशेल तोंडघशी कसे आपटले याची असंख्य उदाहरणे ( मंत्री मंडळाचा विस्तार , राहुल गांधी नांदेडहून लढणार , अक्षयकुमार निवडणूक लढवणार ) देता येतील . प्रश्न तो नाही . प्रश्न हा आहे की , आपण यातून काही शिकणार आहोत की नाही ? आपल्या बातम्या अचूक का  ठरत नाहीत ? हा प्रश्न सर्वच माध्यमातील ज्येष्ठांना पडत नाही का ? अचूक बातमी कशी मिळवावी या संदर्भात ते फिल्डवरच्या पत्रकारांना मार्गदर्शन करण्यामध्ये कमी तर पडत नाहीत ना ? असे प्रश्न माध्यमातील ज्येष्ठांना पडायलाच हवेत .

खरं म्हणजे आपल्याला प्रश्न मुळात पडायला हवेत आणि त्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया आपल्यात सुरु असायला पाहिजे . प्रश्न कधीच संपत नसतात . एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की त्या उत्तरातून दुसरा प्रश्न निर्माण होतो . प्रश्न निर्माण होण्याची आणि उत्तरं शोधण्याची ती एक न संपणारी  मालिका असते आणि त्या मालिकेभोवती आपलंही आयुष्य फिरत असतं . माध्यमांमध्ये सध्या उलटचं घडतांना दिसतंय . माध्यमं इतरांना प्रश्न विचारतात ; परंतु स्वत:च्या अचूकतेविषयी स्वत:ला प्रश्न विचारत नाही , स्वत:च्या अचूक भाषेविषयी स्वत:ला प्रश्न विचारत नाहीत , पत्रकारितेची जी काही मूल्ये आहेत त्या आधारे बातमी दिली जाते की नाही , हाही प्रश्न ते स्वत:ला विचारत नाहीत आणि आपण कुणाचे तरी प्रवक्ते झालो हे समजून घेण्याचं त्यांचं भान हरपलं आहे…असं हे सर्व चिंताजनक आहे . ही मालिका अशीच जर सुरु राहिली तर विशेषत: प्रकाश चित्र वाहिन्यांची मोठ्या आणि कांही प्रमाणात  मुद्रीत माध्यमांची पत्रकारिताच  ‘फोकनाड’ ठरेल . त्यापुढे जाऊन उद्या माध्यमांची अवस्था रेल्वेत गाणं म्हणून त्या आधारे भीक मागून उदरभरण करणाऱ्या वर्गाशिवाय वेगळी राहणार नाही , हा इशारा माध्यमांनी वेळीच समजून घ्यायला हवा .

गंभीरपणे काम करणार्‍या पत्रकारांनो , माफ करा स्पष्ट लिहिल्याबद्दल पण , हे तुम्हाला उद्देशून नाहीये-प्रब

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

 

Previous articleआणखी किती वर्षे मनुस्मृती जाळणार?
Next articleमालदीव: पृथ्वीला पडलेले निळेशार स्वप्न
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here