मी हिजडा…मी लक्ष्मी!

‘बिग बॉस’, ‘दस का दम’, ‘सच का सामना’ आदी लोकप्रिय कार्यक्रमांतून घराघरात ओळखल्या जाणार्‍या लक्ष्मी त्रिपाठी यांचं हे आत्मकथन सध्या प्रचंड गाजते आहे. प्रथमच एका हिजड्याने आपल्या आयुष्याची उघडी-नागडी कहाणी जगासमोर मांडण्याचं धैर्य दाखविल्याने हे पुस्तक कमालीचं वेधक झालं आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच हिजड्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे कंगोरे लोकांसमोर आले आहे. सांपत्तिक स्थिती उत्तम असलेल्या एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला लक्ष्मीनारायण…किशोरवयात आल्यानंतर स्वत:तील बदल जाणवल्याने त्याला आलेली प्रचंड अस्वस्थता…तडफड़..तगमग. आपण ‘तो’ नाही ‘ती’ आहे, हे लक्षात आल्याने संपूर्णत: बदललेलं आयुष्य…त्यातले धक्के, टक्के-टोणपे…सहन कराव्या लागणार्‍या वेदना…प्रचंड लैंगिक शोषण…

बलात्कार…प्रेमप्रकरणं…समाजाचे चांगले-वाईट अनुभव…पुढे कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यावर ताठ मानेनं जगत असलेलं आयुष्य, हा सारा प्रवास या पुस्तकात कमालीच्या पारदर्शकतेने आला आहे. आज लक्ष्मी त्रिपाठी सेलिब्रिटी आहे. हिजडेपणामुळे तिला जे भोगावं लागलं त्यातून तिने हिजड्यांच्या प्रश्नांवर लढणं सुरू केलं. प्रत्यक्ष कृतीतून ती प्रश्नांची उत्तरं शोधत गेली. त्यातून महाराष्ट्र, देश आणि थेट जागतिक पातळीवर अगदी संयुक्त राष्ट्रसंघात ती पोहोचली. ‘छक्का’ वा ‘हिजडा’ म्हणून समाज सातत्याने ज्यांची हेटाळणी करतो, असा हिजडा स्वकर्तृत्वाच्या आणि कुटुंबाच्या पाठिंब्यावर किती उंच भरारी घेऊ शकतो, याची कहाणी म्हणजे लक्ष्मीची कहाणी आहे. तिचा तो सारा प्रवास मुळातूनच वाचण्याजोगा आहे.

हिजड्यांबद्दलच्या समाजाच्या चुकीच्या समजुती दूर करण्याचा लक्ष्मी आणि तिचे सहकारी सातत्याने प्रय▪करीत आहेत. वेगळी लैंगिकता, वेगळी सेक्शुआलिटी असलेला मुलगा, मुलगी कोणाच्याही घरात जन्माला येऊ शकतो. त्या पोरांना समजून घ्या. ते सुद्धा समाजाचा एक भाग आहेत. त्यांच्यातही सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच भावना असतात. कौशल्य असतात. ते सुद्धा समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:ची छाप उमटवू शकतात, याबाबत लक्ष्मी ठिकठिकाणी माहिती देत फिरते. मुळात हिजडा या प्रकाराबाबतच आपल्याकडे फार कमी माहिती आहे. तथाकथित शहाणी माणसं त्यांच्यापासून कायम दूर राहण्याचाच प्रय▪करतात. आपल्यापैकी कोणी सहज हिजड्यांशी बोलताना दिसलं, तर लोक किती विचित्र नजरेने पाहतात, याचा अनुभव अनेकांना असेल. माणसं हिजडा का होतात? त्यांना काय-काय सहन करावं लागतं? याबाबत बहुतांश माणसं अनभिज्ञ असतात. ‘हिजडा’ हा मूळ उर्दू शब्द आहे. ‘हिजर’ या अरेबिक शब्दावरून तो आला आहे. हिजर म्हणजे आपली जमात सोडलेला. जमातीतून बाहेर पडलेला. ‘हिजडा’ जन्म घेतो तो पुरुष म्हणूनच. लहान असताना तो पुरुष म्हणूनच वाढतो मात्र त्याची लैंगिकता वेगळी असते. मोठा होतो तसं तसं त्याचे हावभाव, हालचाली स्त्रीसारख्या व्हायला लागतात. त्यांना स्वत:लाही ते जाणवायला लागतं. मनाने स्त्री, शरीराने मात्र पुरुष, असा प्रकार असतो. त्यातून होणार्‍या गोंधळामुळे आपण कोण? हे त्यांना अनेक दिवसपर्यंत समजत नाही. पुढे आतून जाणवणार्‍या बदलामुळे अशी व्यक्ती पुरुषत्वाच्या सार्‍या खुणा मिटवायला सुरुवात करते. केसं वाढविणं, तुळतुळीत दाढी करणं, साडी, सलवार घालणं, छातीचे उभार कृत्रिमरीत्या वाढविणं असे अनेक प्रकार तो करतो. त्यातूनच त्याला ‘हिजडा’ अशी ओळख मिळते. इंग्रजीत यांना युनक (ए४ल्ल४ूँ) म्हटलं जाते.

काही मुलं जन्मत:च हिजडा म्हणून जन्माला येतात, अशी आपल्याकडे समजूत आहे. पण हे अजिबात खरं नाही. हिजडा कसा तयार होतो, याची शास्त्रीय कारणं समजून घेणं गरजेचं आहे. गर्भधारणा होताना . क्रोमोसोम एकत्र आले तर मुलगी आणि क्रोमोसोम असले तर मुलगा हे समीकरण आता सगळ्यांना माहीत आहे. मात्र पहिले सहा आठवडे लिंगाचं स्वरूप मुलगा आणि मुलगी दोघांतही सारखंच असतं. त्यानंतर क्रोमोसोमवरचा २१८ हा जीन कार्यान्वित होतो. त्यातून मग जननेंद्रिय विकसित व्हायला आणि हार्मोन्स तयार व्हायला सुरुवात होते. पुरुष हार्मोन्स अँड्रोजन तयार होतात. त्यात टेस्टास्टरॉन हे हार्मोन मोठय़ा प्रमाणावर असतात. ते स्त्री गर्भातही थोड्याप्रमाणात असतं. स्त्री गर्भाच्या बाबतीत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन ही हार्मोन्स तयार होतात. त्यानंतर बाह्य जननेंद्रिय विकसित होतात. बहुसंख्य वेळा या नैसर्गिक प्रक्रिया सुरळीत पार पडतात. मात्र काही वेळा लिंग निश्‍चिती होण्यास थोडा गोंधळ होतो. पहिल्या प्रकाराला म्हणतात ‘टर्नर सिंड्रोम.’ यात गर्भाचा क्रोमोसोम किंवा नसतो. तोड असतो. वडिलांकडून येणारा आणि गर्भाला पुरुषत्व देणारा क्रोमोसोम नसल्याने बाह्य जननेंद्रिय स्त्रीची विकसित होतात. मात्र अंतर्गत जननेंद्रिय विकसित होण्यासाठी दोन आवश्यक असतात. त्यामुळे अंडकोष व गर्भाशय विकसित होत नाही. त्यामुळे तिला मूल होत नाही. दुसरा प्रकार असतो अँड्रोजन ‘इन्सेन्सिटिव्ह सिंड्रोम.’ यात टेस्टास्टरॉन हार्मोनला गर्भ प्रतिसाद देत नाही. गर्भ पुरुष असेल (.) तर त्यामुळे त्याची पुरुष जननेंद्रिय विकसित होत नाहीत. जन्माला आलेल्या मुलाला जननेंद्रिय स्त्रीची असतात, पण अंडकोश, गर्भाशय नसतात. मात्र स्तन वाढू लागतात. ती पाळी न येणारी, मूल न होणारी स्त्री म्हणूनच वाढते. जेनेटिकली मात्र ‘.’ म्हणजे तो मुलगा असतो. तिसर्‍या प्रकारात पुरुष हार्मोनची अँड्रोजनची पातळी खूप वाढते. गर्भ पुरुषाचा असेल तर प्रश्न येत नाही; पण स्त्रीचा असल्यास जन्मणारी मुलगी पुरुषी पद्धतीची असते. चौथ्या प्रकारात पुरुष हार्मोन, टेस्टास्टरॉन खूप कमी प्रमाणात निर्माण होतात. स्त्री गर्भ असल्यास प्रश्न येत नाही, गर्भ पुरुषाचा असला तर मात्र जननेंद्रिय पुरुषाची असून विचार, भावना यात मात्र स्त्रीत्व दिसतं. अशांना स्त्रीसारखं राहायला, वागायला आवडतं. वयात आलं की या मुलांना पुरुषांचंच आकर्षण वाटू लागतं. हिजड्यांच्या संदर्भात नेमका हा चौथा प्रकार घडतो. जे हिजडे होतात त्यांच शरीर पुरुषाचं असतं भावना मात्र स्त्रीच्या असतात. ही शास्त्रीय प्रक्रिया एकदा समजली, तर हिजडा कोणाच्याही घरी जन्माला येऊ शकतो, हे लक्षात येईल.

‘हिजडा’ होण्याची प्रक्रिया मोठी आणि कठीण असते. एखाद्याने हिजडा व्हायचं ठरवलं की, कुठल्या घराण्याचा हिजडा व्हायचं हे त्याला ठरवावं लागते. साधारण: तो ज्या भागात राहतो, त्यातील घराणं तो निवडतो. भेंडीबाजारवाला, बुलाकवाला, लालनवाला, लखनौवाला, पुनावाला, दिल्लीवाला, हादीर इब्राहिमवाला अशी हिजड्यांची मुख्यत: सात घराणी आहे. हिजडा यापैकी एका घराण्यातील गुरूची निवड करतो. तो गुरू हिजडा होऊ इच्छिणार्‍याची ‘रीत’ करतो. हा एक विधी असतो. ‘रीत’ होताना त्या त्या घराण्याचा दुपट्टा डोक्यावर दिला जातो. साडी दिली जाते आणि घराण्याची निशाणी आणि नियम समजावून सांगितले जातात. त्यानंतर भीक मागण्याचं, टाळ्या वाजविण्याचं, गोड बोलण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. हिजड्यांच्या काही घराण्यांमध्ये ‘निर्वाण’ झाल्याशिवाय परिपूर्ण हिजडा झाल्याचे मानत नाही. निर्वाण हा प्रकार भयंकर असतो. यात हिजड्यांचा लिंगछेद केला जातो. हा एक पूजाविधी असतो. तिथे पुजारी एका वारात लिंग कापतात. ही जखम भरून यायला खूप वेळ लागतो. (काही जणांचा त्यात मृत्यू होतो.) त्या जखमेवर तेल आणि वनऔषधींचा लेप लावला जातो. मात्र निर्वाण करण्याची जबरदस्ती कोणावर केली जात नाही. ते केलं म्हणजेच हिजडा होतो, असंही मानलं जात नाही. हिजड्यांचे असे अनेक वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण विधी आहेत. (लक्ष्मीचा प्रवास शब्दांकित करणार्‍या पत्रकार वैशाली रोडे यांनी अतिशय मेहनतीने ही सारी माहिती आणि संदर्भ गोळा केले आहेत.) आपल्या पुराणात, रामायण-महाभारतात हिजड्यांचे अनेक उल्लेख आढळतात. असं सांगितलं जाते की, प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा सारे अयोध्यावासी त्यांना निरोप द्यायला शहराच्या वेशीपर्यंत आले होते. तिथे निरोप घेताना रामाने सर्व स्त्री-पुरुषहो, आपण आता परत जा, असे सांगितले. मात्र प्रभू रामचंद्रांनी स्त्री-पुरुषांनाच परत जायला सांगितले असल्याने आपण कसे परत जायचे, म्हणून हिजडे प्रभू रामचंद्र वनवासाहून परत येईपर्यंत १४ वर्षे वेशीबाहेरच राहिले. प्रभू रामचंद्र परत आल्यानंतर हे पाहून ते सद्गदित झाले. त्यांनी हिजड्यांचा हा त्याग पाहून आजपासून तुम्ही कोणालाही जो काही आशीर्वाद द्याल, तो फळाला येईल असा वर दिला. या कथेचा समाजमनावर खूप पगडा आहे. त्यामुळे उत्तर भारत व इतरही ठिकाणी मुलांचा नामकरण विधी, लग्नसमारंभ व इतरही कौटुंबिक कार्यक्रमात हिजड्यांना ‘बधाई’साठी (आशीर्वाद) आवर्जून बोलावलं जातं.

पुराणकथेत जरी हिजड्यांना खूप मान मरातब असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी वर्तमानात मात्र त्यांना आताआतापर्यंत साधं माणूस म्हणून जगण्याचे अधिकारही नाकारले गेले होते. १९९४ पर्यंत त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. सर्वांत प्रथम तामिळनाडू या राज्याने त्यांना हा अधिकार दिला. अजूनही अनेक राज्यांत हिजड्यांना साधं रेशनकार्डही मिळत नाही. स्त्री आणि पुरुष या दोन्ही प्रवर्गात बसत नसल्याने त्यांची नोंद नेमकी काय करायची, याचा पेच शासकीय बाबूंना पडत असतो. त्यामुळे शासकीय कागदपत्रं व योजनांचा लाभ मिळण्यात त्यांना खूप अडचण जाते. लक्ष्मी व तिच्या सहकार्‍यांनी या विषयात वारंवार आवाज उठविल्याने आता ‘तृतीयपंथीय’ वा ‘इतर’ (थर्ड जेंडर)असा वेगळा पर्याय देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही त्यांच्या अनेक समस्या आहेत. समस्या हळूहळू दूर होतील. मात्र समाजाने आम्हाला इतरांसारखंच एक माणूस म्हणून स्वीकारावं, एवढाच लक्ष्मीचा आग्रह आहे.

संदर्भ : ‘मी हिजडा… मी लक्ष्मी’ – :

लक्ष्मी नारायण त्रिपाठी, शब्दांकन : वैशाली रोडे, मनोविकास प्रकाशन, पुणे

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-८८८८७४४

Previous articleअनमोल कोहिनूरची रंजक कहाणी
Next articleती आली अन् तिने जिंकले!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here