‘मैत्री’ आली धावून!

-रघुनाथ पांडे

लॉकडाऊने सर्वांना जखडून ठेवले. निराश्रित, घरात अडकलेले ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षणासाठी घरापासून लांब आलेले विद्यार्थी कुठे विद्यार्थिगृहात तर कुठे भाड्याच्या खोलीत स्वत:ला कोंडून होती. अनेक मुले-मुली. सगळ्यांची परवड सुरू झाली… अशांच्या मदतीला धावली… ती मैत्री!! त्या मैत्रीची ही विक्रमी गोवर्धन कथा. ७१ दिवसांचा मैत्री परिवार संस्थेचा भोजनदानाचा सेवायज्ञ अखंडित सुरू होता. नागपुरात सेवाभावाचा विक्रम प्रस्थापित झाला.
………………………………………………………….

मैत्रीचे विणलेले घट्ट धागे संकटात मदतीला आपोआप धावून येतात. नागपुरात याच धाग्यांनी विक्रमाची एक अभूतपूर्व कथा विणली आहे. कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झाला आणि आधाराचे छप्पर एकेक करत उडू लागले. एका अकल्पित मानवी संवेदन कथेला निराधार यातनांची किनार लागली. काळजी, भय आणि चिंतेने सगळेच ग्रासले. कोणीच कोणाचा नाही… असा विचित्र योग कोरोनाने आणला. भीतीच्या सावटात अंतर वाढत गेले. पायाखालची जमीन सरकावी असेच सगळे जाणवू लागले!! निराश्रित, घरात अडकलेले ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षणासाठी घरापासून लांब आलेले विद्यार्थी कुठे विद्यार्थिगृहात तर कुठे भाड्याच्या खोलीत स्वत:ला कोंडून होती. अनेक मुले-मुली. या सगळ्यांची परवड सुरू झाली… लॉकडाऊन नावाच्या परग्रहावरील अवजड शब्दाने या सर्वांना जखडून ठेवले. अशांच्या मदतीला धावली… ती मैत्री!! त्या मैत्रीची ही विक्रमी गोवर्धन कथा.

लॉकडाऊनच्या २२ मार्चपासून सुरू केलेल्या व्यवस्थेला मूर्तरूप आले २५ मार्चपासून. त्या दिवसापासून पुढचे तब्बल ७१ दिवसांचा मैत्री परिवार संस्थेचा सेवायज्ञ अखंडित सुरू होता. नागपुरात सेवाभावाचा एक विक्रम प्रस्थापित झाला. ३१ मेपर्यंत दोन लाख ३० हजार ८८७ डबे पुरवण्यात आले. तर एक लाख ७३ हजार फक्त पोळ्या वाटपाचाही विक्रम मैत्री परिवार संस्थेने पूर्ण केला. नियोजन, व्यवस्था आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने सेवेचा हा उपक्रम विलक्षण आहे.मैत्री परिवार संस्था गेली अनेक वर्षे गरजूंच्या मदतीसाठी, निराधारांच्या आधारासाठी, कुपोषितांपर्यंत औषधाचे वितरण करण्यासाठी सतत काम करते. मागील अडीच महिन्यांत कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गरजूंपर्यंत अन्न पोहोचवण्याचे केलेले काम सेवाभावाचा उत्कृष्ट परिचय म्हटला पाहिजे.
देशात टाळेबंदी झाली व हातावर कमवणारे गरीब संकटात सापडले. यात काही एकाकी जगणारे ज्येष्ठ नागरिक होते तर शिक्षणासाठी भाड्याने अथवा विद्यार्थिगृहात राहणारे विद्यार्थीही होते. मेस बंद झाल्याने बाहेर निघणे बंद झाले आणि प्रत्येक दिवस ढकलताना मग, विद्यार्थ्यांची उपासमारच सुरू झाली.

मैत्री परिवारच्या लक्षात ही दारुण परिस्थिती आली आणि कामाला सुरुवात झाली. त्यासाठी छायाचित्रकार विवेक रानडे, श्रीपाद इंदोलीकर, गजानन रानडे, हरीश जोगळेकर, माधुरी यावलकर, वृषाली शिलेदार, मृणाल पाठक, मनीषा गर्गे, शिरीष कुलकर्णी, विजेश दुबे, श्रीकांत गंगाथडे, देवेंद्र कोल्हेकर, रोहित हिमते व अमन रघुवंशी अशी तरुणांची फळी उभी राहिली.

टाळेबंदी हा उपायच अनोळखी; पण सावधपणे विचार झाल्यावर लक्षात आले की, प्रथम पोलिसांवर कामाचा ताण येणार. हे ओळखूनच पोलिसांच्या सुविधेकडे लक्ष वेधण्याचे ठरले. शहरातील पोलिसांना २२ कॅन पाणी आणि १०० डबे पोहोचवण्याची सुरुवात २५ मार्चपासून झाली. त्यानंतर फेसबुकवरून विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या गरजेची खातरजमा करण्यात आली. २७ मार्चपासून विविध विद्यार्थिगृहांत अथवा भाड्याच्या खोलीत अडकलेल्या आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषत: जे एकाकी राहतात व घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यांची तपासणी करून २७५ जेवणाचे डबे पोहोचवण्यात येऊ लागले. नागपूरच्या १४ वेगवेगळ्या भागात संस्थेचे कार्यकर्ते डबे पोहोचविण्याचे काम करू लागले. सुमारे १०० कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले. सरकारने आखून दिलेली स्वच्छतेची सर्व मानके पूर्ण करून दररोज भात, वरण, भाजी आणि सहा पोळ्या असा अन्नसाठा २७ मार्चपासून दररोज पुरवला जाऊ लागला. याचवेळी दिवसागणिक गरजूंची मागणी वाढू लागली.
पहिल्या नियोजनातील व्यवस्था अपुरी पडत गेली. मात्र, उमेद वाढू लागली. मैत्री परिवाराच्या सुरेंद्रनगरातील छात्रावासातील किचनसह १५ एप्रिलपासून धरमपेठ येथील वझलवार लॉन येथे दोन्ही वेळा प्रत्येकी हजार डब्यांची सकाळी व रात्री व्यवस्था केली गेली. पाठोपाठ २१ एप्रिलपासून अत्रे ले-आऊट राजराजेश्वरी मंदिर परिसरात तिसरं किचन सुरू केलं आणि तिथे दोन्ही वेळेस ५०० गरजूंना जेवण पुरवण्यात येऊ लागले. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण भोजन देताना प्रत्येक दिवशी वेगवेगळी भाजी भोजनात देण्याचा प्रयत्न होत होता. इतकंच नव्हे, तर रामनवमी, हनुमान जयंती, आंबेडकर जयंतीला गोड पदार्थ दिले गेले. तिन्ही किचन मिळून संस्थेच्या २०० कार्यकर्त्यांची फौज अहोरात्र झटत होती.

पश्चिम नागपुरातील घराघरातून हजारो पोळ्या दररोज संकलित होत होत्या. २५ कार्यकर्ते पोळ्या संकलनाचे काम करत होते. लोकसहभागातून घरगुती पोळ्यांची बँक तयार झाली. या बँकेमधून दररोज सुमारे २० हजारांवर पोळ्या दिल्या गेल्या. सर्वच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू घरगुती पौष्टिक सात्त्विक जेवण मिळत असल्याने समाधानी होते.
याचवेळी सरकारने रक्तदानाची गरज असल्याचे आवाहन केले. त्यावेळी ज्यांना डबा पोहोचवण्यात येतो अशा अनेक तरुणांना मैत्री परिवाराने रक्तदानाचे आवाहन केले. तरुणांनी होकार दिला. २१ एप्रिलपासून नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या प्रत्येक शाखेत मेयो इस्पितळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांना सुरुवात झाली. ५०० बॅग्ज रक्त संकलन केले गेले. अन्नदानाच्या या कार्यात पुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा ठरला.
सुमारे ६० लोकांना रोजगारही दिला गेला. ४५२ दिव्यांगांना आणि १४८ गरजूंना दैनंदिन आवश्यक सामग्रीची किट देण्यात आली. तर श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या ५९४२ मजुरांना पुरीभाजीचे डबे पुरवण्यात आले.
मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके, मकरंद पांढरीपांडे यांच्या पुढाकारातून झाली; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, डॉ. पिनाक दंदे यांच्यासारख्या अनेकांनी या कामात सहयोग दिला. मदतीचा हा गोवर्धन पॅकिंग विभाग, वितरण विभाग, पोळ्या संकलन विभाग, किचन सहकार्य विभाग, आॅनलाइन सेवा विभाग या प्रकारच्या विविध व्यवस्थांनी उचलला.
संकट कोणतेही असो, माणुसकी श्रेष्ठ असते. तीच कणखरपणे संकटावर मातही करते. मैत्रीची धावून येण्याची हीच भावना आहे.

(लेखक पुण्यनगरीच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक आहेत.)
संपर्क : ९८१८२१३५१५)

Previous articleबजाज म्हणाले ते खरंच आहे !गुजरात मॉडेलचा पोपट मेलाय !
Next articleयाज्ञसेनी द्रौपदी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here