यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ‘शिवसेना विरूद्ध शिवसेना’ 

-टीम मीडिया वॉच

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ यावेळी चर्चेत आला तो भाजप नेतृत्वाखालील महायुतीने उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या  दिवसापर्यंत उमेदवारीसाठी घातलेल्या घोळामुळे. लोकसभेच्या निर्मितीपासून १९७१ आणि १९९६ या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता जिल्ह्यात १९९९ पर्यंत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यातही  १९९६ चा अपवाद वगळता १९८० ते १९९९ पर्यंत उत्तमराव पाटील हे सहा वेळा काँग्रेसचे खासदार राहिले आहेत. २००९ पासून यवतमाळ-वाशिम मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून शिवसेनेच्या भावना गवळी या येथील खासदार आहेत. शिवसेना फुटल्यानंतर गवळी शिवसेना शिंदे गटात गेल्या. मात्र पक्षाने यावेळी त्यांना उमदेवारी नाकारून ऐनवेळी खा. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना महायुतीची उमेदवारी दिली. महाविकास आघाडीकडून संजय देशमुख रिंगणात आहे. वंचितच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज बाद झाल्याने अपेक्षित असलेली तिहेरी लढत न होता, दुहेरी लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच मित्रपक्षामुळे काँग्रेस या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आहे. 

१. शिवसेना विरूद्ध शिवसेना

यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ निर्मितीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यापूर्वी यवतमाळमध्ये काँग्रेसचे तर वाशिममध्ये शिवसेनेचे प्राबल्य होते. राज्यातील बदललेल्या समीकरणानंतर महायुतीविरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असली तरी यावेळी प्रथमच शिवसेनेतील उबाठा आणि शिंदे हे दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री हेमंत पाटील आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे संजय देशमुख हे रिंगणात आहेत. राजश्री पाटील या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. संजय देशमुख हे मूळ शिवसैनिक आहेत. विविध पक्ष फिरून ते नवीन राजकीय समीकरणे जुळताच पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे मूळ लढत ‘शिवसेना विरूद्ध शिवसेना’ अशी होत आहे.

२. जातीय प्राबल्यावर होणार निवडणूक 

या मतदारसंघात जातीय समीकरणांवर निवडणूक लढली जाते, असा इतिहास आहे. येथील माजी खासदार उत्तमराव पाटील, राजाभाऊ ठाकरे, भावना गवळी हे सर्वजण कुणबी समाजाच्या जातीय समीकरणांवर तर हरिभाऊ राठोड हे बंजारा समाजाच्या जातीय प्राबल्यावर येथून निवडून गेले आहेत. यापूर्वी भावना गवळी यांना कुणबी, मराठा समाजासह बंजारा समाजाचीही साथ मिळायची. त्यामुळे त्यांच्या मताधिक्यााात सातत्याने वाढ झाली. मतदारसंघात कुणबी, बंजारा, आदिवासी या समाजाच्या मतांचे प्राबल्य आहे. त्यानंतर ओबीसी, दलित, मुस्लीम या समाजाचे प्राबल्य आहे.

३. ‘डिएमके फॅक्टर’ कळीचा मुद्दा 

निवडणुकीस जातीय समीकरणांची किनार लाभल्याने विकासाच्या मुद्यांऐवजी कुणबी विरूद्ध देशमुख अशी रंगत यावेळी लढतीत आली आहे. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील तिरळे कुणबी समाजातील आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे देशमुख (कुणबी) समाजाचे आहेत. महायुतीने अन्य समाजाचा उमदेवार दिला असता तर संजय देशमुख यांचा मार्ग सोपा होता. मात्र राजश्री पाटील यांच्या उमेदवारीमुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मतदारसंघात कुणबी, मराठा विरूद्ध देशमुख अशी थेट विभागणी झाल्याचे बघायला मिळते. २५ वर्षानंतर तिरळे कुणबी समाजाला संधी मिळाल्याने ‘तिरळे कुणबी फॅक्टर’ने उचल खाल्ली आहे. शिवाय संजय देशमुख हे कुणबी नसल्याच्या वावड्या विरोधकांनी उठवल्या आहेत .

४. वंचितचा नसल्याचा लाभ कोणाला? 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासह १७ उमेदवार रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे एरवी काँग्रेसच्या मतांचे विभाजन करणारा वंचितचा उमेदवार रिंगणात नाही. मात्र ओबीसी व बंजारा समाजाचे नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड हे बसपाकडून निवडणूक रिंगणात आहेत. ते प्रचारात कुठेही दिसत नसले तरी त्यांच्या उमेदवारीचा थोडाफार फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारास बसण्याची शक्यता आहे. वंचितचा उमदेवार किमान एक लाखांच्या घरात मते घ्यायचा. यावेळी वंचितच्या धरसोड वृत्तीमुळे प्रकाश आंबेडकरांशी एकनिष्ठ मतदारांमध्येही चीड बघायला मिळत आहे. ही चीड महाविकास आघाडीने ‘कॅश’ केल्यास लढत अधिक चुरशीची होणार आहे.

५. भावना गवळींना डावलल्याने काय होईल?

यवतमाळ लोकसभा मतदारसंघात २००४ पर्यंत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये यवतमाळ-वाशिम हा मतदारसंघ अस्तित्वात येवून तो शिवसेनेच्या ताब्यात गेला. शिवसेनेच्या भावना गवळी या २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये निवडून आल्या. त्यांनी २००९ मध्ये काँग्रेसचे हरिभाऊ राठोड, २०१४ मध्ये शिवाजीराव मोघे (काँग्रेस) व २०१९ मध्ये माणिकराव ठाकरे (काँग्रेस) या दिग्गजांचा पराभव केला होता. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपूर्वी भावना गवळी या दोनवेळा वाशिमच्या खासदारही राहिल्या आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर भावना गवळी शिवसेना शिंदे गटात सहभागी झाल्या. मात्र पक्षाने त्यांना उमदेवारी नाकारल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या. मुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी दूर करत त्यांना राजश्री पाटील यांच्या प्रचारात सक्रिय केले. परंतु, त्यांनी मनापासून काम केले की नाही, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. भावना गवळींना उमेदवारी नाकारल्याने वाशिम जिल्ह्यातील त्यांचा घाटोळे कुणबी समाज अद्यापही तळ्यात-मळ्यात आहे. हा समाज संजय देशमुख यांच्या पाठीशी उभा राहू शकतो.

६. राजश्री पाटील कोण आहेत?

महायुतीच्या उमदेवार राजश्री हेमंत पाटील यांचे माहेर यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील सारंगपूर हे आहे. लग्नानंतर त्यांचे वास्तव्य नांदेड येथे आहे. त्यामुळे महायुतीने जनतेवर बाहेरचा उमेदवार लादल्याची हवा विरोधकांनी केली. परंतु, राजश्री पाटील यांनी लग्नापूर्वीच यवतमाळात स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. त्या शालेय जीवनापासूनच वक्तृत्व, क्रीडा स्पर्धेत आघाडीवर राहायच्या. मराठा सेवा संघाच्या फर्ड्या वक्त्या म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे. बास्केटबॉल, टेनीक्वाईट या खेळांमध्ये सातवेळा राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले. दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चमूचे नेतृत्व त्यांनी महाविद्यालयीन जीवनात केले आहे. गोदावरी मल्टीस्टेट बँकेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांत या बँकेच्या शाखा आहेत. जवळपास १५ हजार तरूणांना बँकेच्या माध्यमातून रोजगार दिला आहे. नांदेडमध्ये त्यांनी ५० हजार महिलांच्या बचत गटाची चळवळ उभी केली. नीती आयोगाने भारतातील १०० कर्तृत्ववान महिलांना सन्मानित केले, त्यात महाराष्ट्रातून एकमेव राजश्री पाटील यांचा समावेश आहे. राजश्री पाटील यांच्या अशा अनेक जमेच्या बाजू आता त्यांच्यासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे त्या बाहेरच्या उमदेवार आहेत, हा मुद्दा प्रचारात गौण ठरला असून, माहेरवाशीन, यवतमाळची लेक, कर्तृत्व, वक्तृत्व या मुद्द्यांवर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

७. संजय देशमुख यांच्याकडे लोकसंपर्क भक्कम

येथून निवडणूक रिंगणात असलेले महाविकास आघाडीचे उमदेवार संजय देशमुख यांच्याकडे राजकीय अनुभव आणि लोकसंग्रह या दोन्ही जमेच्या बाजू आहेत. मात्र त्यांचा राजकीय संधीसाधूपणा नागरिकही विसरले नाहीत. शिवसेना, काँग्रेस, अपक्ष, भाजप पुन्हा शिवसेना उबाठा असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. राजकीय लाभासाठी पक्ष बदलणे, यामुळे त्यांची राजकीय विश्वासार्हता कमी आहे. दोनेवळा अपक्ष आमदार व राज्यमंत्री असताना असंख्य शैक्षणिक संस्थाची निर्मिती हा चर्चेचा विषय ठरला होता. राज्यभर त्यांच्या शैक्षणिक संस्थांचे जाळे पसरले आहे. मात्र राजकाणात अलिकडे कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी ज्या काही पद्धती वापरल्या जातात, त्यात देशमुख यांचा हात आखडता येत असल्याने हक्काचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अभाव, काँग्रेसमधील उणीदुणी महाविकास आघाडीत जाणवत आहे. ग्रामीण भागात भाजप विशेषत: केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांबाबत नाराजी असल्याने त्याचा फायदा संजय देशमुख यांना होण्याची शक्यता आहे. शिवाय जनमाणसांत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूतीही देशमुख यांना पोषक आहे.

८. महायुतीकडे भक्कम राजकीय पाठबळ  या मतदारसंघात  यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद, कारंजा आणि वाशिम या सहाही विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीचे आमदार आहेत. त्याचा फायदा निवडणुकीत राजश्री पाटील यांना होत आहे. याशिवाय राजश्री पाटील यांच्या उमदेवारीमुळे महायुतीने कुणबी विरूद्ध देशमुख असे विभाजन करण्यात यश मिळविले. मंत्री संजय राठोड यांच्यासोबत बंजारा समाज असल्याने ही मतेसुद्धा महायुतीच्या बाजूने आहेत. यवतमाळ शहरात भाजपचे आ. मदन येरावार यांचे प्राबल्य व संघाचे गठ्ठा मतदान आहे. त्याचा फायदाही राजश्री पाटील यांना मिळणार आहे. राळेगाव या आदिवासी राखीव विधानसभा मतदासंघात भाजपचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके तर पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. इंद्रनील नाईक व भाजपचे विधान परिषद सदस्य नीलय नाईक हे सोबत आहे. महायुतीस भक्कम राजकीय पाठबळ असुनही ग्रामीण भागात भाजप आणि मोदींबद्दल असलेली नाराजी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

९. ओबीसी, दलित, अल्पसंख्याक मते निर्णायक

मतदारसंघात वर्चस्व असलेले ओबीसी, तेली, माळी शिवाय धनगर यांच्यासह अनुसूचित जाती व अल्पसंख्याक समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. यावेळी अल्पसंख्याक आणि दलित मते महायुतीच्या बाजूने नसतील असे चित्र सर्वत्र दिसत आहे. मात्र येथे वंचितचा उमेदवार नसल्याने ही मते महाविकास आघाडीच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. दलित, अल्पसंख्याक मतांमुळे महाविकास आघाडीचा फायदा होईल, असे दिसते. सरकारवर नाराज असलेल्या विविध घटकांची नराजी दूर करण्यात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना मोठे परिश्रम घ्यावे लागत आहे.

१०. मित्र पक्षांची मर्जी सांभाळण्याची कसरत – एरवी निवडणुकीत दोन किंवा तीन पक्ष मुख्य लढतीत असायचे. त्यामुळे आपले कार्यकर्ते सांभाळून ठेवणे उमदेवारांना सोपे होते. यावेळी मात्र उमेदवारांची विचित्र स्थिती झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शकले झाल्याने हे पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीत आहेत. आपला कार्यकर्ता कोणत्या गटातला आहे, हेच उमेदवारांना कळायला अनेक दिवस लागले. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना स्वत:च्या पक्षासह मित्र पक्षातील पदाधिकारी, नेत्यांची मर्जी साभांळण्याची कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी मानापमान, व्यवहारांवरून संघर्षाची स्थिती निर्माण होत आहे. अशावेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मनधरणी करून, संयम ठेवत, गोड बोलत, खिसा सैल सोडत काम करवून घेण्याची वेळ दोन्ही घटकातील उमेदवारांवर आली आहे.