विशाखापट्टणम : पूर्वेकडील गोवा

-राकेश साळुंखे

विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशाच्या नियोजित तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे. या शहराचा  इतिहास इ. स. पूर्व 600 वर्षापर्यंत जातो. सम्राट अशोकाच्या   विरुद्ध ८ वर्षे युद्ध करणारी  कलिंग राजवट  येथीलच होती. या राजवटीनंतर सातवाहन, ईश्वाकू ,वेंगी चालुक्य , पल्लव , चोल ,  गंग , ओरिसाचे गजपति घराणे,  या राजघराण्यांनी येथे राज्य केले. प्राचीन काळापासून व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले  हे  शहर आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न होते.  पूर्वेकडील किनारपट्टीवरील व्यापारासाठी व संरक्षणाच्यादृष्टीने असलेले या शहराचे महत्व आजदेखील टिकून आहे.  या शहराचे  वैशिष्टय म्हणजे येथे बऱ्याच प्राचीन बुद्धिस्ट  साइट्स आहेत. पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात येथे स्तूप व संबंधित इमारतींचे अवशेष सापडले आहेत.

    इतिहासाचा जाज्वल्य वारसा असणारे असे हे शहर  विशाखा, विशाखापट्टणम , विझाग , इसाखपट्टणम वगैरे नावाने ओळखले जात जाते.  हे पूर्व किनारपट्टीवरील चेन्नईच्या खालोखाल मोठे शहर आहे. हे शहर देशातील  सर्व प्रकारच्या लोकांची  वस्ती(cosmopolitan) असलेले शहर आहे. येथे अगदी अँग्लो इंडियन्स ही आहेत.  विशाखापट्टणमला विमानतळ , बंदर व रेल्वे स्टेशन आहे.
मला विशाखापट्टणम ला जाण्याची संधी 2018 मध्ये मिळाली , आम्ही मित्रांनी 2018 साली  दिवाळीच्या सुट्टीत विशाखापट्टणम आणि ओडिशातील भुवनेश्वर , पुरी, धौली आणि कोणार्क मंदिर ही पाहण्यासाठी टूर आयोजित केली होती. काही जण पुण्यातून रेल्वेने  तर काही जण  पुण्यातून विमानाने निघाले होते. पण रेल्वेतून ग्रुपने जाण्याची  मजा  वेगळीच होती.निसर्गरम्य परिसरातून प्रवास करता येतो.  सकाळी 7.30 ला  गोदावरी ओलांडली त्यानंतर  2-3 तास जी विस्तीर्ण भात शेती पाहायला मिळाली ते दृश्य अप्रतिमच . पूर्वी कोकणात खाचराची भात शेती व शिमोग्याची सपाटीवरची  वेगवेगळ्या रूपातील भात शेती पाहिली होती. पण इतकी विस्तीर्ण आणि नजर पोहाचेपर्यंत सपाट क्षेत्रावरील भात शेती प्रथमच पाहत होतो . सुगी जवळ आल्याने जणू काही सोनेरी रंगच  दूरवर पसरलाय असे वाटत  होते . हे  दृश्य पाहिल्यावर रेल्वेने पोहाचायला जास्त वेळ लागला तरी  त्याचे काही वाटले नाही. विशाखापट्टणमला सकाळी  11.30 च्या दरम्यान पोहोचलो. आम्ही ठरवलेली  मिनी बस आम्हाला घेण्यासाठीआली होती. रेल्वे स्टेशन पासूनच शहर स्वच्छता प्रेमी असल्याचे जाणवू लागले होते. गूगल वर माहिती सर्च केली तर ते भारतातील 9 व्या  क्रमांकाचे स्वच्छ शहर आहे ही माहिती मिळाली. दोन दिवस विशाखापट्टणम पाहून आम्ही ओरिसाला निघणार होतो. दोन दिवसांत भरपूर पहायचे होते.

कैलासगिरी  VMRDA थिएटर आणि संग्रहालय

कैलासगिरी एका टेकडीच्या माथ्यावर वसलेले असून विशाखापट्टणमला येणाऱे पर्यटक हमखास येथे भेट देतात.   विशेषत: भीमनीपट्टणमच्या दिशेने असलेला मोहक  नैसर्गिक दृश्याचा आनंद लुटता येतो.  शहराच्या उत्तर काठावरील एक आकर्षक  कैलासगिरी टेकडीवरुंन   लांब किनारपट्टी आणि  शहराचे  नेत्रदीपक दृश्य दिसते. थंड वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी छतासह आणि सिमेंटच्या जागांसह  टेकडीवर विविध ठिकाणी सोई केलेल्या आहेत .कैलासगिरी  हे एक आकर्षक सहलीचे ठिकाण म्हणून विकसित केले गेले आहे. येथील धवल रंगातील भव्य शिवपार्वतीचे पुतळे पाहण्यासारखे आहेत. रात्रीच्या वेळी पूर्णपणे उजळलेल्या शहराला पाहणे हे अत्यंत आनंददायक दृश्य आहे. एक छोटासा ट्रेकच येथेच  होतो. येथेच एक ऑडिटोरियम आहे त्यात आंध्र प्रदेशचा इतिहास सांगणारी शिल्पे व चित्रेही आहेत. येथेच एक शहाजी राजांचे तसेच सरफोजी राजेंचे अनोखे चित्र आढळले.

थोट्टलकोंडा : बुद्धिस्ट साईट


थोट्टलकोंडा ( सेनगिरी) ह्या बुद्धिष्ट साईट चा शोध अलीकडे नौदलाच्या बेस कॅम्प  साठी जागा शोधताना  एरियल सर्वे मध्ये लागला. 1988 ते 1993 दरम्यान केलेल्या उत्खननामध्ये एक मोठा स्तूप, धान्याची कोठारे आणि बांधकामचे अवशेष सापडले. थोट्टलकोंडा म्हणजे पाण्याचे कुंड असलेला डोंगर . येथे 9 पाण्याचे कुंड आहेत . पावसाचे पाणी  यात साठवले जात होते.  इसवी सन पूर्व 2 रे शतक ते इसवी सन 2 ऱ्या शतकापर्यंतचा काळ हा थोट्टलकोंडा चा भरभराटीचा होता , हीनयांन पंथाचा येथे प्रभाव होता.  येथे जवळपासस 100 बुद्धिस्ट भिक्षूंना राहण्याची व्यवस्था होत  असावी, खालील बंदरातून रोम या शहराशी  व्यापारासाठीचा  संबंध येत होता. येथे रोमन व सातवाहन नाणी ही सापडली आहेत. अश्या या  ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे ठिकाणाला एक गालबोट लागले आहे ते म्हणजे आता हा स्तूप ढासळलेला आहे. 2000 वर्ष शाबूत असलेला हा स्तूप आत्ताच ढासळतो याचे राहून राहून  खेद ही वाटतो.
येथे वराह आणि नरसिंह या दोन्ही कल्पित अवतारांचे मंदिर आहे. आम्ही मंदिर पाहिले. नेहमीप्रमणे येथे  ही फोटोग्राफीला परवानगी नव्हती . आत जाताना मोबाइल व कॅमेरा काउंटर ला  ठेऊन आत प्रवेश मिळतो. टेकडीवर असलेले हे प्राचीन मंदिर मात्र शांत व एक छोटी सहल घडवणारे आहे.

विशाखापट्टणमचे बीचेस

भीमीली बीच आणि टेकडी हा बीच विशाखापट्टणम पासून 23 किमी वर आहे, भीमीली बीच हा जेथे गोस्थानी नदी समुद्राला मिळते तेथे आहे, येथे बीच वर बुद्धाच्या चेहऱ्याचे भव्य शिल्प आहे. या भागात उत्खननात पुरातन  बुद्ध धम्माच्या तेथील अस्तित्वाचे अवशेष मिळाले आहेत. हा भाग आधी भूमिनीपट्टणम या नावाने ओळखला जात होता , हे नाव महाभारतातील भीम या प्रसिद्ध व्यक्तिमत्वावरून पडले असे म्हणतात . हा प्रदेश भीमाच्या अधिपत्याखाली होता असे म्हटले जाते.प्राचीन काळापासून  येथे व्यापारी  बंदर ही होते. इंग्रज व डच व्यापार  याचा बंदरातून चालत होता .1754 मध्ये नागपूरकर रघुजी भोसले यांच्या भास्करराम या सेनाधिकाऱ्याच्या सैन्याने भूमिनीपट्टणम वर हल्ला केला होता . त्यानंतर डचांनी येथील गढी मजबूत केली  होती .  येथली टेकडीची माती आणि समुद्रकिनाऱ्याची वाळूची पुळण ही लाल रंगाची आहे व ती भारतीय जिओलॉजीकल हेरिटेज मध्ये मोडते . ऋषिकोंडा  बीच हा विशाखा पट्टणम मधील व आंध्र किनारपट्टीवरील  सगळ्यात प्रसिद्ध व लोकप्रिय बीच. येथे खूपच  गर्दी असते. सुंदर सोनेरी वाळूच्या पुळणीचा किनारा असून  वॅाटरस्पोर्ट्स अँक्टिविटी ही येथे भरपूर चालतात. येथे बरेच हॉटेल्स असून स्थानिक मासे ही चांगले मिळतात.

रामकृष्ण रोड आणि बीच
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही रामकृष्ण बीचवर गेलो. हा बीच रोड तेंव्हा वाहनांसाठी बंद होता . पार्किंग मध्ये उतरून आम्ही चालू लागलो. खूप जण  मॉर्निंग वॉक साठी आले  होते. रस्त्याच्या एक बाजूला सुंदर इमारती आणि दुसऱ्या बाजूला स्वच्छ समुद्रकिनारा होता. चालून झाले बरेच लोक रागी चे सूप पित होते, रागी म्हणजे नाचणी , शेजारील ओरिसाने नाचणीच्या उत्पादनात आघाडी घेतली आहे. व कुपोषणावर मात केली आहे असेही ऐकण्यात आले होते . खनिजानी समृद्ध अशा या नाचणीचे अर्थात लोकल भाषेत रागीचे पेय आम्ही पिले नसते म्हणजे नवलच ! रागीचा आस्वाद घेत गप्पा मारत होतो, तेंव्हा गायकवाड नावाची एक महाराष्ट्रियन व्यक्ती  तेथे आमची मराठी ऐकून आमच्या गप्पांमध्ये  मिसळला. त्यानींही बरीच माहिती सांगितली  व  जी ठिकाणे  पाहायला हवीत ती सुचवली, त्यातीलच एक अनोखे ठिकाण म्हणजे भीमिळी .

पाणबुडी संग्रहालय

VMRD INS कुरसुरा पाणबुडी संग्रहालय. बीच रोडवर मोठया दिमाखात उभी असलेली कुरसुरा पाणबुडी विशाखापट्टणमची शान आणि ओळख आहे. या पाणबुडीला तत्कालीन सोव्हिएत संघातून मागविण्यात आले होते.  ३१ वर्षे केलेल्या गौरवशाली सेवेदरम्यान या पाणबुडीने ७३,५०० समुद्री मैलाचे अंतर पार पाडत नौदलाच्याकार्यात सहभाग घेतला. ‘आयएनएस कुरसुरा’ने १९७१च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली.ही पाणबुडी पाहण्यासाठी तिकीट असून तिची माहिती एक निवृत्त नौदल अधिकारी देत असतो.

२७ फेब्रुवारी, २००१ रोजी पाणबुडीला सेवेतून निवृत्त करण्यात आले. त्यानंतर कुरसुरा पाणबुडीला आर. के. समुद्र किनाऱ्यावर विशाखापट्टणमस्थित एका पाणबुडी संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले. याचे उद्घाटन ९ ऑगस्ट, २००२ रोजी करण्यात आले आणि २४ ऑगस्ट, २००२ रोजी नागरिकांसाठी ते खुले करण्यात आले.समुद्रातून या पाणबुडीला इथपर्यंत आणण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागला. लोकांना पाणबुडीच्या प्रवासाची माहिती व्हावी यासाठी हे  पाणबुडी संग्रहालय उभारण्यात आले आहे.

एअरक्राफ्ट म्युझियम
कुरसुरा पाणबुडी म्युझियम समोरच एअरक्राफ्ट म्युझियम आहे. विशाखापट्टणम शहर विकास प्राधिकरणाने सुमारे १४ कोटी रुपये खर्च करून हे अनोखे संग्रहालय तयार केले आहे.  या संग्रहालयात तुम्ही टी यू १४२ या विमानाच्या आत जाऊनही पाहू शकता. या संग्रहालयात बऱ्याच गॅलरी आहेत, जिथे प्रतिकृतींच्या सहाय्याने भारतीय हवाई दलाचे कार्य अधोरेखित करण्यात आले आहे. नागरिकांना खास करून मुलांना हे म्युझियम आकर्षित करते.

विशाखापट्टणम पाहून आम्ही ओडिशा कडे पुढील प्रवासास निघणार होतो . तेव्हा आम्हाला सोडून बस ड्रायवर जगदीश निघाला,  आम्हीही आत  स्टेशन मध्ये गेलो होतो. ट्रेन लवकरच येत होती. तेवढ्यात जगदीश आम्हाला शोधत परत आला आणि म्हणाला ही सॅक बसमध्ये विसरलेली होती . पाहतो तर माझीच सॅक , माझे सामान सहसा कधीही विसरत नाही पण त्या  दिवशी विसरले होते आणि त्यात कॅमेरा आणि डॉक्युमेंट्स होती. . जगदीश चे आभार मानून त्याला बक्षीसी ऑफर केली पण त्याने ती घेतली नाही व म्हणाला,” मघाशीच तुम्ही मला चांगली टीप दिलीय . माझ्या लक्षात लवकर आले म्हणून बरे , ट्रेन सुटल्यावर खूप अवघड झाले असते किंवा तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही मला दोष दिला असता “. तेवढ्यात रेल्वे फलाटावर आली. जगदीशचा निरोप घेऊन डब्यात चढलो . अश्या तऱ्हेने विशाखापट्टणम च्या सुखद आठवणी घेऊन ओडिशाकडे निघालो.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleनर्गिस: चंदेरी पडद्याला पडलेलं ‘राज’वर्खी स्वप्न!
Next articleयदुनाथ थत्ते
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here