संघानं भाजपवर छडी उगारली आहे , मारली नाही अजून !

प्रवीण बर्दापूरकर

धी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि आता इंद्रेशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी  स्वभावाबद्दल केलेल्या सूचक इशारावजा वक्तव्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंध मधुर राहिलेले नाहीत , नात्यात तणाव आलेला आहे , हे आता पुरेसं उघड झालं आहे . हे संबंध ताणले गेल्याची जी चर्चा कांही पत्रकारांच्या लेखना/बोलण्यात गेल्या दोन वर्षात अनेकदा आली त्यात तथ्य असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.

      ‘लोकसत्ता’साठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे बीट मी अनेक वर्ष सांभाळलेलं आहे आणि त्याआधी ‘उदरनिर्वाहा’ची गरज म्हणून ‘तरुण भारत’ या दैनिकात नोकरी करतांना संघाशी संबधित व्यक्ती आणि घटनांचं वृत्तसंकलन जास्तीत जास्त माझ्या वाट्याला कसं यायचं हे याआधी अनेकदा लिहिलेलं आहे म्हणून त्याची पुनरुक्ती करत नाही . त्या काळात रा. स्व. संघातील अगदी ‘व्यवस्थे’त असणाऱ्या स्वयंसेवकापासून अनेकांशी जवळचा संपर्क प्रस्थापित झाला. (त्यापैकी अजूनही अनेक संपर्कात आहेत .) त्यामुळे संघ पूर्ण कळलेला नसला तरी संघाची कार्यपद्धती बऱ्यापैकी जवळून ठाऊक असणाऱ्या पत्रकारांपैकी अस्मादिक एक आहेत . संघ वर्तुळातून भाजपच्या पाठिंब्यावर मायावती मुख्यमंत्री होणार , मोहन भागवत सरसंघचालक होणार , इथपासून ते अनेक ‘एक्सक्लुझिव्ह’ राजकीय बातम्या मिळवण्यात त्या काळात अनेकदा यश आलेलं आहे . त्या अनुभवाच्या आधारे सांगतो , राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला सध्या इशारा दिला  आहे , अजून खरा धडा शिकविलेला नाही ,असाच मोहन भागवत आणि इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे , हे लक्षात घ्यायला हवं.

 संघाच्या कार्यपद्धतीत बहुसंख्य वेळा थेट कृती नाही तर सूचक इशारा दिला जात असतो आणि तो इशारा समजून घेतला गेला नाही तर मग थेट धडा शिकवला जातो . म्हणजे आधी छडी केवळ उगारायची आणि तरी ऐकलं नाही तर मग मारायची असा  हा प्रकार आहे ! संघ हा एक ‘परिवार’ आहे आणि त्या परिवारात अनेक संस्था , संघटना काम करतात . वरवर  कितीही नाही म्हटलं तरी भारतीय जनता पक्ष हा त्या परिवारांचा एक भाग आहेच . या परिवारात संघच सर्वोच्च स्थानी असतो .  कोणत्याही सत्तेत परिवारातील कुणीही कितीही वरिष्ठ पदावर असला तरी कुणीही संघापेक्षा मोठा (श्रेष्ठ?) नसतोच हे लक्षात घ्या . या मोठेपणावरुन भाजप आणि संघातील संबंधात असे ताणतणाव या आधीही निर्माण झालेले आहेत , त्यांची भरपूर चर्चाही वेळोवेळी झालेली आहे . त्या प्रत्येक वेळी संघ आधी इशारा देतो आणि मगच धडा शिकवतो .  या आधीही हिंदुत्ववादी अजेंडा आणि  सत्तेची पर्वा न करता संघानं भाजपला धडा  शिकवलेला आहे असाच अनुभव आहे .

दोन घटना सांगतो- पहिली घटना अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांनाची आहे . वाजपेयी तेव्हा लोकप्रियतेच्या कळसावर होते ; इतके कळसावर की , तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन त्यासमोर फिके पडले होते . ज्येष्ठ  संपादक शेखर गुप्ता यांच्या एनडीटीव्ही या प्रकाश वृत्त वाहिनीवरील ‘वॉक द टॉक’ या कार्यक्रमात बोलतांना सुदर्शन यांनी अटलबिहारी वाजपेयी ‘सुमार’ पंतप्रधान असल्याचं वक्तव्य केलं . त्याचा खरपूस समाचार तेव्हा ‘लोकसत्ता’नं घेतला होता . नंतर  ( आधी अनौपचारिक आहे असं सांगितलं गेलेल्या आणि मग त्या चर्चेवर आधारित बातमी करायला हरकत नाही असं सुचवल्या गेलेल्या ) सुदर्शन  यांनी वाजपेयी यांच्याविषयी जे विस्तृत मतप्रदर्शन केलं ते ‘मळमळ’ या सदरात मोडणारं असल्याचं माझं मत झालं . ( त्या चर्चेत सहभागी होण्याचं आमंत्रण मलाही होतं ) त्यावर ‘सुदर्शन यांची मळमळ’ असा अग्रलेख ‘लोकसत्ता’त प्रकाशित झाला होता . तो वाद तेव्हा बराच गाजला ( या संदर्भात तेव्हा मी लिहिलं होतं आणि त्याचा प्रतिवाद आजवर झालेला नाही . ती हकीकत माझ्या ‘लेखणीच्या अग्रावर’ या पुस्तकात पान क्रमांक १७५ वर विस्तारानं आहे .)  त्याच काळात नागपूरला झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात व्यासपीठावर केवळ वाजपेयी होते आणि लालकृष्ण अडवाणी , प्रमोद महाजन , मुरली मनोहर जोशी या नेत्यांना चक्क श्रोत्यांच्या रांगेत बसवण्यात आलं होतं . ‘परिवारात संघच सर्वोच्च आहे’, हाच तो इशारा होता . नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया शायनिंग’ ही प्रचार पार काळवंडवून टाकत संघ परिवार मतदानापासून लांब राहिला होता , परिणामी बहुमत न मिळाल्यानं भाजपला केंद्रीय सत्तेतून पायउतार व्हावं लागलं .

भाजपचा निर्णय पटला नाही की संघ निवडणुकीपासून न बोलता अलिप्त राहतो , या माझ्या म्हणण्याला पुष्टी देणारी दुसरी घटना सांगतो . लोभस व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या आमच्या अटलबहादूर सिंग या उमद्या मित्रानं लढवलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी हे घडलं . कट्टर राम मनोहर लोहियावादी असणारे आणि राजकारणात असूनही सुसंस्कृत, सुविद्य असणारं  अटलबहादूर सिंग हे अख्ख्या नागपूरचं  लाडकं  व्यक्तिमत्व . त्यांची अपक्षांची एक आघाडी होती , निवडणुकीत १२/१४ नगरसेवक निवडून आणण्याची त्या आघाडीची क्षमता होती . त्या बळावर नागपूर महापालिकेचं सत्ताकारण अटलबहादूर सिंग यांनी प्रदीर्घ काळ चालवलं . तेही दोन वेळा महापौर झाले . नागपूर लोकसभा मतदार संघात भाजप आणि संघाची अडीच-पावणेतीन लाख मते आहेत हे अनेकदा सिद्ध झालेले आहे . ही अधिक अटलबहादूरसिंग यांची मते मिळवून तेव्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर या लोकसभा मतदार संघातून भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकतो असं वाटत असल्यानं ( रा. स्व. संघाचे तत्कालीन ‘ब्ल्यू आइड बॉय’ ) नितीन गडकरी यांच्या हट्टापोटी भाजपनं अटलबहादूर सिंग यांना २००४च्या निवडणुकीत उमेदवारी दिली . मात्र उमेदवार म्हणून अटलबहादूर सिंग संघाला मान्य नव्हते . परिणामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मतदार मतदानाला बाहेर पडलेच नाही , म्हणे त्यांना तसा आदेश नव्हता . अनेक बूथ आणि ‘पन्ना प्रमुख’ यांनी हे तेव्हा खाजगीत कबूल केलं होतं . त्या निवडणुकीत नागपूर मतदार संघात अटलबहादूरसिंग यांचा ( आणि देशात भाजपचा ) दारुण पराभव झाला . भाजपाच्याच मतदारांनी अटलबहादूर सिंगचा ‘चिवडा’ केला . त्याप्रसंगी ओलावलेले अटलचे डोळे आजही आठवतात.

दिल्लीत विधानसभा निवडणुकीत किरण बेदी यांच्या पराभवाच्या चर्चा ऐकल्यावर मला अटलबहादूरसिंग यांची आठवण झाली होती ; तेव्हाही नेमकं असंच घडलेलं होतं . हे या आधी लिहिलेलं आहे आणि त्याचा साधाही प्रतिवाद तेव्हा झालेला नव्हता कारण तसा तो करण्याची संघाची कार्यशैली नाही . कर्कश प्रतिवादाचं पर्व सुरु झालं ते पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर . ‘ट्रोल्स’च्या असंख्य टोळ्याच सोशल मीडियावर मग जन्माला घातल्या गेल्या .

 आता जे इशारे मोहन भागवत आणि इंद्रेशकुमार यांनी दिले आहेत , तो संघाच्या कार्यशैलीचा एक भाग आहे . गेल्या दोन वर्षांपासून संघ आणि भाजप यांच्या संबंधात ताण निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत म्हणजे मोदी-शहा संघाचं वर्चस्व झुगारु पाहत आहेत किंवा ते संघाला जुमानत नाहीत  (मीही या स्तंभात त्या संदर्भात एकदा सूचन केलेलं होतं ! ) आणि त्या  इशाऱ्यांची दखल भाजप म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतली नाही . उलट ‘संघाच्या पाठिंब्याची आता गरज नाही ‘ ,संघटन सचिव पदावरुन स्वयंसेवकाला हाटवण्याचा निर्णय ,  निष्ठावंतांना निवडणुकीत डावलणं , राम मंदिर निर्मितीचं श्रेय घेणं , अशा संघाला आव्हान देणाऱ्या निर्णयांची त्यात भरच पडली . म्हणूनच संघांनं डोळे वटारले , परिणामी उत्तरप्रदेश , महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या केवळ तीन राज्यात लोकसभा निवडणुकीत २०१९ च्या तुलनेत २०२४मध्ये भाजपला तब्बल ५९ जागा कमी मिळाल्या आणि स्वबळवरचं बहुमत गमावण्याची नामुष्की या पक्षावर आली ; सत्ता आली पण  त्यासाठी एनडीएतील अन्य पक्षांचा टेकू भाजपला घ्यावा लागला . स्वत:ला ईश्वराचा अंश म्हणवून घेण्याची मजल मारणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा ईश्वर संघ आहे , हेही संघांनं दाखवून दिलं आहे .

महाराष्ट्रात तर भाजपच्या जागा अर्ध्यापेक्षा जास्त कमी झाल्या . संघाच्या मुखपत्रानं त्याचं खापर अजित पवार यांच्या (महा )राष्ट्रवादीवर फोडलेलं असलं तरी तेच एकमेव कारण नाही . शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष फोडल्यामुळे जनमानसात व पक्षातही  असणाऱ्या नाराजीवर अनेकदा बोललं आणि लिहिलं गेलं पण , भाजप ( पक्षी : अमित शहा यांच्या वरदहस्तामुळे देवेंद्र फडणवीस ) त्याकडे साफ दुर्लक्ष करत मनमानी केली . मनमानीचं उत्तम उदाहरण संघ आणि भाजप  कार्यकर्त्यांचा विरोध डावलून अमरावतीची जागा नवनीत राणा यांना देणं आहे . देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात केवळ नागपूर आणि अकोला मतदार संघात विजय मिळाला त्यात नागपूरचा विजय नितीन गडकरी यांचा आहे . ‘आम्ही भाजपला नाही तर गडकरी यांना मतदान केलं.’ असं सांगणारे नुकत्याच झालेल्या नागपुर चकरेत  पायलीला पन्नास भेटले ! सरसंघचालक मोहन भागवत यांच्या चंद्रपुरातही भाजपला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली .

बाय द  वे , शेतकऱ्यांची नाराजी , जरांगे फॅक्टर सोबतच जातीयवादी ध्रुवीकरणही मोठ्या प्रमाणात झालं ; ते सर्वच पक्ष आणि नेत्यांनी केलं पण , त्याच खापर एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडलं जाणं म्हणजे ताकाला जाताना भांडं लपवण्यासारखं आहे पण , ते असो , तो कांही आजचा विषय नव्हे .

महायुतीला धक्का देणारी  लोकसभा निवडणूक संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे . महाविकास आघाडीत तर आत्तापासूनच भांड्याला भांडं लागल्याचे आवाज सुरु झाले आहेत . संघानं दिलेला इशारा लक्षात घेऊन महायुतीला आणि त्यातही विशेषत: भाजपला     ( पक्षी : अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस ) फारच सावध पाऊले टाकावी लागणार आहेत . सत्तेसाठी वाट्टेल तशा कोलांट उड्या मारताना मिळालेल्या  इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर संघ उगारलेल्या छडीचा प्रहार केल्याशिवाय राहणार नाही . थोडक्यात ताकही फुंकून पिण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांवर आलेली आहे , हाही मोहन भागवत आणि आता इंद्रेशकुमार यांनी दिलेल्या इशाऱ्याचा आणखी एक अर्थ आहे .

(लेखक नामवंत पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleमतदारांचा सांगावा
Next articleही गर्दी ‘रस्त्यावर’ का उतरत नाही?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.