–शर्मिला कलगुटकर, प्रतिनिधी , महाराष्ट्र टाइम्स
स्मृती मॅडम,
नमस्कार. काही वर्षांपूर्वी आम्हाला मासिक पाळी येते, त्यामुळे पोटात , कंबरेत जबर दुखते. पायातून क्रॅम्प जातात. ओटीपोटातून कळा येतात. भयंकर ब्लिडिंग होतेय, हे मित्रांना सांगण्याची हिंमत नव्हती. आम्हाला त्यात लाज वाटायची. पण आमच्या या शारिरिक क्रियेकडे विटाळ म्हणून न पाहता ती नैसर्गिक प्रक्रिया म्हणून पाहा, हे सांगण्याचा सहजपणा आम्ही जाणीवपूर्वक मिळवला आहे. आमच्या सहकाऱ्यांना, मित्रांना प्रसंगी त्रास होत असेल तेव्हा तो मोकळेपणाने सांगण्याचं धाडस आमच्याकडे आता आहे. मासिक पाळी असताना रक्ताने भरलेले पॅड घेऊन शेकडो बाया या शहरात, देशात काम करत असतात. पोटाची भ्रांत मिटवण्यासाठी डोक्यावर रणरणत्या उन्हात ओझी वाहतात. बाळाला दूध पाजतात. दणकून फिल्डवर्क करतात.धावत्या गाड्या पकडतात.रात्रीची जागरण प्रवास करतात. रांधतात, राबतात. डेडलाईनवर काम करतात. तुमच्या तोडीस तोड काम करत असतात. त्यामुळे त्या शेकडो हजारो ठिकाणी या पॅडससह जातात. तुम्ही ज्या हिडीस शब्दांत शंका उपस्थित केली तेवढी मात्र त्या करत नाहीत.
अशा शेकडो महिलांना या पॅडस् मध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे जंतुसंसर्ग होतो. तो गर्भाशयापर्यंत जातो. सातत्याने मूत्रमार्गाचा संसर्ग होऊन या देशातील साडे अकरा टक्के महिलांची गर्भाशय काढावी लागतात. याची तुम्हाला कल्पना आहे काय, त्यासाठी तुम्ही काय केलंय..मासिक पाळीच्या काळात घरगुती हिंसा, बलात्काराला सातत्याे तोंड देणाऱ्या बायांशी तुम्ही कधी बोलला आहात. या देशातल्या अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक शौचालये नाही. पॅड बदलण्यासाठी जागा नाही, उपलब्धता नाही. जी शौचालये आहेत तिथे कचरा टाकण्याची जागा नसल्याने सॅनेटरी नॅपकिन त्याच ठिकाणी फेकले जातात. त्या रक्ताळलेल्या पॅडस काढण्याचं काम याच देशातल्या कचरावेचक महिला करतात हे तुम्हाला माहित आहे का.
मासिक पाळी हा केवळ लैंगिकतेशी, प्रजननक्षमतेशी जोडलेला मुद्दा नाही. त्याच्याशी अनुषंगाने असलेल्या शेकडो गोष्टी या स्त्रियांच्या आत्मसन्मानाशी निगडित आहे याची तुम्हाला कल्पना आहे का..
आजही पॅड वापरण ही या देशातल्या मोठ्या वर्गातल्या महिलांसाठी चैनेची बाब आहे. कारण 260 रुपयांचे पॅड महिन्याला वापरण्याइतका पैका त्यांच्याक़डे नाही. शेकडो आश्रमशाळांमध्ये वयात येणाऱ्या मुलींना महिन्याला देण्यात येणारे चार पॅड त्या पाच दिवसाला एक या हिशेबाने वापरतात. यात अनेकींच्या शाळा सुटतात. पोटातल्या वेदनांनी कळवणार्या मुली, महिला पेनकिलर खाऊन कामंकरतात. त्यातून वंधत्वापासून गर्भाशय निकामी होण्यापर्यंतच्या शेकडो शारिरिक तक्रारी उद्भवतात. आज जे पॅड परदेशातून येतात त्यांची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था या शहरात नाही. कचऱ्याच्या गाड्यातून डम्पिंगवर जाणाऱ्या पॅ़डस हाताने वेगळ्या करणाऱ्या बाया खरजेने भरलेल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या या पॅडच्या किंमती आजही अवास्तव आहे. जीएसटी रद्द व्हावा यासाठी उपोषण करावं लागतं हे दुर्देव…
या देशातल्या कोणत्याही ठिकाणी निर्भिडपणे, सन्मानाने, एकटं, कुणाही सोबत जाण्याचा, संवाद साधण्याचा,सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळवण्याचा हक्क हा संविधानाने दिलेला आहे. तरीही तो अनेक वर्ष नाकारण्यात आला. मंदिरात कुणी जावे कुणी जाऊ नये, कसे जावे, कोणते कपडे घालावे, कसे घालू नये हा पूर्ण संपूर्ण वैयक्तिक प्रश्न आहे ते स्वातंत्र्य ज्याचं तिला, त्याला असायलाचं हवं..पॅ़ड घेऊन मित्राच्या घरी जाणाऱ्याही शेकडो स्त्रिया आहेत. तुमच्या बोलण्याचा अर्थ मी सरळ लावला आहे (बिटविन दि लाईन )मध्ये याचा एक वेगळा अर्थही निघतोच.
यापुर्वी वेळोवळी तुम्ही उधळलेली मुक्ताफळं अनुभवल्यानंतर तुम्ही म्हणता ते खरंच आहे.
हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है !
आवरा ! Happytobleedmindwell
–शर्मिला कलगुटकर, प्रतिनिधी , महाराष्ट्र टाइम्स
ही बाई अजूनही सिरीयल मधून बाहेर यायला तयार नाही.
सरकार म्हणते यांना मंत्री करतो …अन करतातही
धन्य ….