बुधवारी संध्याकाळची वेळ… दिवस मावळतीकडे सरकत होता… मात्र, आज शेगावात ‘सूर्यास्त’ काहीसा लवकरच झालेला होता. हा ‘सूर्यास्त’ होता एका सेवेचा, एका ध्यासाचा, एका सचोटीचा, एका निर्मोही वृत्तीचा… गेल्या सात दशकांपासून शेगावच्या मातीचा, संत गजानन महाराजांच्या सेवा विचारांच्या एका ‘सेवाधारी’ सूर्याचा आज ‘सूर्यास्त’ झाला होता. त्यामुळे शेगाववरच्या सुर्यानंही आज स्वत:ला दु:खामूळे काहीसं ढगांआड कोंडून घेतलं होतं. अन सुर्याचे अश्रू पावसाच्या रूपानं अख्ख्या शेगाववर बरसायला लागलेत. याचवेळी हाच पाऊस बरसत होता शेगावकरांच्या डोळ्यांतून… अन जगभरातील तमाम गजानन भक्तांच्या डोळ्यांतूनही… अश्रूंच्या रूपानं… अन या दु:खाचा कारण होतं शिवशंकरभाऊ नावाच्या कर्मयोग्याचं निधन. शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचं बुधवारी 4 ऑगस्टला वयाच्या 82 व्या वर्षी हृदयाशी संबंधित आजारानं निधन झालं आहे.
जागतिक पातळीवर शेगावला दोन गोष्टींनी ओळख दिली. पहिली ओळख दिली आहे संत गजानन महाराजांनी… तर दुसरी ओळख दिली आहे ‘संत श्री. गजानन महाराज संस्थान’ या नावानं उभ्या केलेल्या सेवेकार्याच्या वेगळ्या आदर्शानं… काल बुधवारी ‘शिवशंकर ‘भाऊ’ पाटील नावाचं सेवाकार्याचं धगधगतं ‘अग्नीकुंड कायमचं शांत झालं. काल तब्बल साडेसात दशकांच्या एका सेवेचा, सेवाधारी’ साधकाची देह पंचत्त्वात विलीन झाला. मात्र, जातांना शिवशंकरभाऊ सेवाकार्याचा अनोखा आदर्श एक अध्यात्मिक व्यवस्थापनातील एक ‘मॉडेल’ जगासमोर ठेवून गेलेत.
काही व्यक्ती हे संस्थेला मोठं करतात. काही संस्था या त्यातील व्यक्तींना मोठं करीत असतात. तर अलिकडच्या काळात काही लोक स्वत:चं हित साधत स्वत:लाच ‘त्या’ संस्थेपेक्षा मोठं करीत असल्याचं आपण सर्रास पहात असतो. परंतू, शिवशंकरभाऊ हे व्यक्तीमत्व यातील पहिल्या प्रकारातलं. आपल्या संस्थेला स्वत:ची ‘आई’ समजत तिला जपणारं, तिची सेवा करीत तिचं नाव मोठं करणारं. म्हणूनच शिवशंकरभाऊंची ‘आयडियालॉजी’, ‘व्हिजन’ अन याच्या जोडीला अगदी चोख असणारं ‘मॅनेजमेंट’ यातून जगभरात अध्यात्मिक सेवाकार्यातलं ‘शेगाव मॉडेल’ हा आदराचा ‘ब्रँड’ही ठरलं आहे. मात्र, हा ‘ब्रँड’ घडवणारे शिवशंकरभाऊ आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी निर्मोही राहिलेत. ही संस्था सर्वसामान्य गजाननभक्तांची, गरिबांची आहे, हे तत्व त्यांनी कायम पाळलं. या ‘निर्मोही’ वृत्तीच्या सेवाकार्यातील आधुनिक संतानं अगदी संस्थानमधील पाण्याच्या थेंबालाही कधी स्पर्श केला नाही. संस्थानात येतांना त्यांनी कायम आपली पाण्याची बाटली घरूनच आणण्याचा ‘दंडक’ तहहयात जपला.
आज शेगाव संस्थान, मंदिर, भक्तनिवास, आनंदसागर, शेगाव संस्थानचं अभियांत्रिकी महाविद्यालय, संस्थानचे चाळीसवर सेवा प्रकल्प म्हणजे सामाजिक कार्य आणि अध्यात्मिक व्यवस्थापनातील मैलाचा दगड. शेगाव संस्थानमधील व्यवस्थापन हे आपल्या देशातच नव्हे तर अगदी अमेरिकेतील ‘हॉवर्ड’सारख्या नामवंत विद्यापीठालाही त्याची भूरळ पाडणारं. हा सेवाकार्याचा ‘एव्हरेस्ट’ निर्माण करण्यामागे होती शिवशंकरभाऊंची दृष्टी अन द्रष्टेपण. हे सर्व करतांना सर्वसामान्य भक्तांचा विश्वास हा सर्वोच्च मानत भाऊंनी कायम तो जपण्याचा शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्यातील हे प्रसंग हे त्यांच्यातील निर्मोही संतप्रवृत्ती आणि द्रष्टेपणाची साक्ष, विचारांची व्यापकता याची साक्ष देणारे होते. त्यातील काही निवडक प्रसंगावरून शिवशंकरभाऊंची महानता अन मोठेपण आपल्या लक्षात येईल.
प्रसंग पहिला
वर्ष 1998 मधला कोणता तरी दिवस होता… ‘त्या’ दिवशी शिवशंकरभाऊ आपल्या सहकाऱ्यांसोबत मंदिरातील कार्यालयात बसलेले होते. पुढे भाऊ बोलायला लागलेत… “आपल्याला शेगावात एक भव्य-दिव्य प्रकल्प उभारायचा आहे… ‘आनंदसागर’… अगदी नावासारखा आनंदाचा सागर करूयात या प्रकल्पाला. 650 एकरांत माणसाला स्वर्गाची अनुभूती देणारं काम आपल्याला शेगावात उभं करायचं आहे”. भाऊ बोलत असतांना सारे सहकारी अगदी स्तब्ध होते. त्यांना समजतच नव्हते की, 650 एकरावर काम कसं उभं होणार?. कारण, हे काम करायला तर लागणार होते अब्जावधी… अन संस्थानकडे त्यावेळी शिल्लक होते फक्त 30 लाख रूपये. हे सारं ऐकतांना भाऊ मात्र अगदी निश्चिंत अन निश्चल होते. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज अन आत्मविश्वास पाहून सहकारीही अचंबित होते. भाऊंनी अगदी मंदसं स्मित केलं. अन म्हणाले की, “आनंदसागर नक्कीच उभा राहिल, अन आपण सर्व मिळून हे घडवून दाखवू”. भाऊंच्या या आत्मविश्वासाने सर्व सहकारी नव्या उर्जेनं कामाला लागलेत.
हा प्रकल्प हातात घेतल्यावर तज्ञांची मतं तर प्रचंड नाउमेद करणारी होती. या प्रकल्पाचा खर्च अन तो पुर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी त्यांनी सांगितला की, हा प्रकल्प कधीच पूर्ण होणार नाही, असं समोरच्याला वाटायचं. कारण यासाठीचा खर्च सांगितला जायचा 300 ते 500 कोटींच्या घरात… अन पुर्णत्वासाठीचा कालावधी सांगितला गेला 15 वर्षांचा… या सर्व परिस्थितीत 8 एप्रिल 1999 ला ‘आनंदसागर’च्या कामाला सुरुवात झाली. यासाठी बँकेचं 15 कोटींचं कर्ज घेतलं गेलं. अन सुरू झाला कामाचा झपाटा. हे सुरू झालेलं काम गजानन भक्तांमूळे कधीच आर्थिक कारणांनी थांबलं नाही. अन अवघ्या तीन वर्षांत भाऊंच्या कठोर देखरेखीत हा हेवा वाटावा असा प्रकल्प उभा राहिला. तो दिवस होता 12 डिसेंबर 2002. देशाचे उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांनी या भव्य अशा प्रकल्पाचं उद्घाटन केलं. अन या प्रकल्पाचे तिकिट ठेवण्यात आलं अगदी सर्वसामान्य अन गरीब गजानन भक्तांच्या खिशाला परवडेल असं. ‘आनंदसागर’ या ‘मॅजिक’ उभारणीतील खरे ‘किमयागार’ होते शिवशंकरभाऊ. हे काम म्हणजे भाऊंचे दृष्टी, नियोजन, कणखरपणा आणि द्रष्टेपणाचे उदाहरण होते. अगदी पहिल्याच वर्षी हा प्रकल्प देशभरातील 17 लाख लोकांनी पाहिला होता.
प्रसंग दुसरा
17 जानेवारी 2009… अमेरिकेच्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध ‘सिटी बँके’चे अध्यक्ष विक्रम पंडीत यांनी शेगावला भेट दिली. गजाननभक्ती आणि येथील सेवाकार्याची महती ऐकून ते शेगावात आले होते. ते येथील सेवाकार्य अन ‘आनंदसागर’ची भव्यता पाहून पार भारावून गेलेत. त्यांनी संस्थानचे सेवाकार्य आणि विकासकार्यासाठी बँकेकडून संस्थानला 700 कोटी देऊ केलेत. मात्र, शिवशंकरभाऊंनी येथील सेवाकार्यासाठी त्यातील फक्त 70 कोटीच स्विकारलेत. विक्रम पंडीत यांचं भारावलेपण भाऊंच्या या गोष्टीनंतर आणखीनच वाढलं. यावर भाऊ म्हणालेत, “दान हे आवश्यक तेव्हढंच घ्यावं, अन ते त्याची वेळेवर परतफेडही करावी”. या घेतलेल्या 70 कोटींची पुढे संस्थानने अगदी वेळेवर परतफेडही केली. भाऊंच्या याच सचोटीच्या व्यवहारातून कधीकाळी 25 लाखांची वार्षिक उलाढाल असलेल्या या संस्थानची वार्षिक उलाढाल अगदी 200 कोटींवर गेली आहे. या संपूर्ण व्यवहारात अगदी ‘पै अन पै’चा हिशेब मंदिरातील फलकावर ठळकपणे लिहिला जातो. दर शुक्रवारी मंदिरातील दानपेटींतील संपूर्ण रक्कम आणि वस्तूंची रांगेतील भक्तांपैकी काहींच्या उपस्थितीत मोजली जाते. दानपेटींतील चिल्लर दानावरूनच संस्थानप्रती गरिब भक्तांची श्रद्धा आणि विश्वास असल्याची भावना भाऊ कायम बोलून दाखवायचे.
सेवाभाव आणि सेवाकार्य हीच शेगाव संस्थानची ओळख
शेगाव संस्थानची ओळख राज्यासह देशात आहे ती येथील स्वच्छता आणि शिस्तशीर कारभारासाठी. ‘सेवा हिच साधना’ असे शेगाव संस्थानचे ब्रीदवाक्य. या ब्रीदवाक्यावरच संस्थेच्या आभाळाएव्हढ्या सेवाकार्याची इमारत उभी आहे. शिवशंकरभाऊ म्हणजे फक्त एक नावच नाही. तर त्यांच्या रूपानं येथे उभं राहिलं होतं व्यवस्थापनाचं अगदी चालतं-बोलतं विद्यापीठ अन सेवाकार्याचा ‘विश्वकोश’च. पांढरा शुभ्र पायजमा, सदरा, डोक्यावर गांधी टोपी अन् गळ्यात पांढरं उपरणं अशा साध्या वेषातील भाऊंच्या व्यवस्थापन शैलीचं महाराष्ट्र, देश अन जगालाही कायम कुतूहल वाटलं आहे. करोडोंची उलाढाल होणाऱ्या संस्थानमधील एका एका पैशांचा हिशेब अन काटेकोर नियोजनातून त्यांनी शेगाव संस्थानवरचा भक्तांचा विश्वास कायम दृढ केला. संस्थानमधील पैसा हा गरिबांचा आहे. तो त्यांच्यावरच खर्च झाला पाहिजे हा त्यांनी स्वत:सह संस्थेवर घालून दिलेला दंडक. त्यामूळेच देशभरात चाळीसवर सेवा कार्यातून शेगाव संस्थान राष्ट्रउभारणीचं काम करीत आहे.
संस्थानने पंढरपूर आणि त्र्यंबकेश्वर येथे गजानन महाराजांची भव्य मंदिरं उभारलीत. राज्यातील कपिलधारा, आळंदी, औंकारेश्वर, गिरडा आदी ठिकाणी संस्थानच्या शाखा सुरू केल्या. मात्र, हे सारं काम व्यवस्थित अन डोळ्यांत तेल घालून करणारी एक समर्पित यंत्रणा त्यांनी शेगावात तयार केली. हे सारं करतांना संस्थानला नवतंत्रज्ञानाची जोड दिली. त्यामुळे संस्थानचा कारभार चालविण्यासाठी त्यांनी ‘सॅप’ तंत्रज्ञानाचा वापर करीत स्वत:च्या संस्थेचं स्वत:चं सॉफ्टवेअर खुप आधीच बनवून घेतलं होतं. सातपुड्यातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाची सोय, मतिमंद विद्यार्थ्यांसाठी उभारलेली शाळा, वारकरी शिक्षण संस्था या गोष्टी त्यांच्यातील संवेदनशीलतेची साक्ष देणाऱ्या आहेत.
शेगावातील यात्राेत्सवात लाखाे भाविक येतात. मात्र, कुठेही अव्यवस्था दिसून येत नाही. प्रत्येक भाविकाला महाप्रसाद मिळेलच, याची खात्री असते. अतिशय कमी खर्चात निवास व्यवस्था, मोफत प्रवास व्यवस्था, नाममात्र शुल्कामध्ये वैद्यकीय उपक्रम हे सारे प्रकल्प राबवितांना जे व्यवस्थापनशास्त्र वापरले गेले आहे तो पॅटर्न देशभरात कुठल्याही संस्थेत दिसत नाही. याचा प्रत्यय 2010 मध्ये झालेल्या गजानन महाराज संजीवन समाधी महोत्सव कार्यक्रमात सर्व गजानन भक्तांना आला.
सुमारे 20 हजार सेवेकरी एका वेळेस येथे सेवा देत असतात. प्रत्येक भक्ताला ‘माऊली’ म्हणत त्यांनी दिलेली सेवा हा सेवाभावातील आपुलकीचा सर्वोत्कृष्ट नमूना आहे. शिवशंकरभाऊंनी आपल्यातला सेवा भाव इतक्या प्रभावीपणे या सेवाव्रतींना कायम प्रदान केला. त्यामुळेच कुठलाही मोबदला न घेता हे सेवेकरी संस्थानात पडेल ते काम करत असतात. सगळे कष्ट उचलत असतात व आलेला भाविक श्रद्धेने नतमस्तक होऊन समाधानाने व निश्चिंत होवुनच परत जाईल, यासाठी कार्यरत असतात. आज 11000 पेक्षा जास्ती सेवेकरी प्रतीक्षा रांगेत उभे आहेत. सेवा ज्यात कोणतंही मानधन दिलं जात नाही तर सेवा संपल्यावर एक प्रसादाचा नारळ घेऊन सेवेकरी आपल्या पुढच्या मार्गाला प्रस्थान करतो.
स्वच्छता हे तर या संस्थेचं महत्वाचं तत्व आहे. गजानन मंदिर असो वा भक्तनिवास, आनंदसागर सारखा 650 एकर इतक्या प्रचंड जागेत वसलेला प्रकल्प असो वा महाराष्ट्रातील सर्वोत्तम असणारं अभियांत्रिकी कॉलेज. ह्या सगळ्याच ठिकाणी कागदाचा एकही चिटोरा आणि झाडावरून गळलेलं पान मिळणं मुश्कील, इतकी कमालीची स्वच्छता येथे राखली जाते. आपलं कार्य फक्त तितकंच मर्यादित न ठेवता 40 पेक्षा जास्त उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले गेले आहेत. आजबाजूच्या 1000 पेक्षा अधिक गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारी संस्थेने उचलली आहे.
शेगाव संस्थानचे स्वत:चे अत्याधुनिक किचन बघण्यासारखे आहे. दर ताशी चाळीस हजार पोळ्या करणारे मशीन तेथे आहे. ते मशीन जर बंद पडले तर ताशी दहा हजार पोळ्या बनवणारी दोन मशिन्स पर्यायी व्यवस्था म्हणून आहेत. एका वेळी शंभर किलोंचा भात, पंच्याहत्तर किलो भाजी, पन्नास किलो डाळ, शंभर डिशेस शिरा-पोहे-उपमा इत्यादी सर्व करणारी अवाढव्य मशीन्स अव्याहतपणे भक्तांना अन्न पुरवत असतात.
शेगाव संस्थानाची भक्तनिवास व्यवस्था म्हणजे संपूर्ण जगाला दिलेला एक धडा आहे. ज्या भक्तांनी श्रद्धेने जे दिलं तेच त्यांना त्यांच्या सेवेसाठी परत दिलं.पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अश्या खोल्या आणि सुविधा अतिशय कमी पैश्यात भक्तांसाठी वर्षभर उपलब्ध आहेत.
‘निर्मोही’ अन संतप्रवृत्तीचा माणूस ‘शिवशंकरभाऊ’
राज्यातील अन देशांतील अनेक धार्मिक स्थळे ही दुर्दैवाने भ्रष्टाचाराची कुरणं बनली आहेत. मात्र, शेगाव या सर्व गोष्टींना कायम अपवाद राहिलं आहे. याचं कारण म्हणजे शिवशंकरभाऊंची ‘निर्मोही’ अन ‘संतप्रवृत्ती’. या माणसानं कायम समाजाला देण्याचाच वसा जपला. इतकं अमर्याद साम्राज्य, पैसा अन अधिकार असतांना या माणूस कायम ‘सेवक’ अन ‘सेवेकऱ्या’च्याच भूमिकेत राहिला. त्यामुळेच शेगाव हे ‘भक्तांचं ठिकाण’ म्हणून नावारूपाला आलं. भाऊच्या निर्मोहीपणाचे अनेक किस्से आहेत. ते कधीचेच आमदार, खासदार, मंत्री होऊ शकले असते. मात्र, त्यांनी ख-या सेवाभावाला कायम आपलंसं समजलं. सत्तरच्या दशकात भाऊ थेट जनतेतून शेगावच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेत. त्यावेळी त्यांची लोकप्रियता पाहून तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी भाऊंना काँग्रेसकडून आमदारकीची केलेली ‘ऑफर’ भाऊंनी विनम्रपणे नाकारली. त्यानंतर अनेकदा भाऊंची शिफारस ‘पद्म’ पुरस्कारांसाठी करण्याचं ठरवलं गेलं. मात्र, भाऊंनी ‘मज पामराशी काय थोरपण’ अशा विनम्र अन निर्मोही वृत्तीने हे पुरस्कारही नाकारलेत. त्यांच्या ठायी गजाननभक्तांचा विश्वास हाच कायम मोठा पुरस्कार होता.
शिवशंकरभाऊंचं जाणं हे एका विचारांचं, एका वैभवशाली वारशाचं, एका ध्येयाधिष्ठीत कर्मयोग्याचं जाणं आहे. मात्र, शिवशंकरभाऊ हे फक्त एक व्यक्तीच नव्हते. तर ते होते अध्यात्मातील व्यवस्थापनात क्रांती आणणारा ‘आधुनिक क्रांतीकारक’, एक विचारांचं विद्यापीठ, कर्मयोग सांगणारा एक निर्मोही समाजसेवक अन एक संवेदनशील माणूस. जेंव्हा-जेंव्हा शेगावच्या इतिहासाची पानं उलगडली जातील, तेंव्हा-तेंव्हा या प्रत्येक पानांवर शिवशंकरभाऊ पाटील यांच्या आभाळभर कामाचा सुगंध दरवळत राहील. शेगाव संस्थान त्यांच्या पश्चातही सेवेचा हा वैभवशाली वारसा असाच चालवत राहील, हिच सदिच्छा. मानवतेच्या या कर्मयोगी आधारवडाला ‘एबीपी माझा’ची भावपूर्ण श्रद्धांजली अन सलाम!…