बरंच मागे जाऊन सांगायच तर , १९६७-६८ चे ते दिवस होते . औरंगाबादच्या पांडुरंग कॉलनीत एका छोट्याशा खोलीत आम्ही राहात होतो . वडिलांचं नुकतंच निधन झालेलं होतं . आमच्यासाठी तो काळ कठीणच नाही तर विपन्नावस्थेचा होता . त्या काळात वडिलांचे एक दूरचे मावस काका उत्तम क्षीरसागर आणि प्रभाकर क्षीरसागर यांचा आम्हाला खूपच आधार मिळाला . या दोघांमुळेच मला शिक्षणाची गोडी लागली . सर्वच क्षीरसागर बंधू उच्चशिक्षित होते . उत्तम क्षीरसागर यांना आम्ही आबा म्हणत असू तर मित्र वर्तुळात त्यांना महाराज म्हणत . ते अभिजात साहित्य प्रेमी ,वाचक आणि कलासक्त होते . त्यांची ऊठबस त्या काळात ना. धों. महानोर , भास्कर लक्ष्मण भोळे , चंद्रकांत पाटील , नेमाडे अशा मंडळीत होती . भालचंद्र नेमाडे यांच्या गाजलेल्या ‘कोसला’ या कांदबरीच्या पहिल्या आवृत्तीचं मुखपृष्ठ महारांजांनीच रेखाटलं होतं . महाराजांकडेच मी या सर्वांना बघितले . महानोर वगळता ही सर्व मंडळी तेव्हा नुकतीच प्राध्यापकी पेशात स्थिरावत होती , तरुण होती आणि तिशीच्या उंबरठ्यावर म्हणजे माझ्यापेक्षा वयाने १२-१४ वर्षांनं ज्येष्ठ होती . यापैकी भोळे आणि महानोरांशी माझी बऱ्यापैकी गट्टी जमली . पुढे या दोघांचंही अपार ममत्व मला लाभलं . १९७७ साली पत्रकारिता करण्यासाठी मी औरंगाबाद सोडलं आणि १९८१ साली नागपूरला पडाव टाकल्यावर भोळे आणि महानोरांची छत्रछाया माझ्यावर पुन्हा पसरली . तेव्हापासून या दोघांच्याही मी अतिशय नियमित संपर्कात आलो आणि प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या या दोघांतही असलेला माणूस मला सतत दिसत राहिला . तेव्हा आम्ही बजाजनगर मधील ‘आनंद मंगल’ या फ्लॅट्समध्ये राहत असे . तिथल्या टेरेसवर मित्रांच्या मैफिलीत काव्य गायनांसाठी महानोर यांना दोन वेळा आमंत्रित केलं . कोणतेही आढेवेढे न घेता ते आले इतके ते साधे होते , निगर्वी होते .नागपूरची थंडी पण पेटवलेल्या शेकोटीच्या उबेत महानोर रंगले . आधी भास्कर लक्ष्मण भोळे गेले आणि आता ना.धों . महानोरही…
अखंड गप्पाष्टक हे महानोरांचं आणखी एक व्यसन . त्यांच्या पोतडीत असंख्य हा शब्द थिटा पडावा इतक्या असंख्यांच्या आठवणी , हकिकती आणि किस्से होते . त्यामुळे अनेकदा तर किती सांगू आणि किती नको अशी महानोरांची अवस्था होत असे . एका कोजागिरी निमित्त नागपूरच्या ‘आधार’ या संस्थेनं ना . धों . महानोरांच्या जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता . प्रारंभी छोटासा सत्कार , स्वागत आणि मग त्यांची जाहीर मुलाखत मी घ्यावी असं नियोजन होतं . ‘पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे’ असा तो कार्यक्रम होता . नागपूरला पोहोचायला महानोरांना जरा उशीर झाला आणि ते थेट कार्यक्रम स्थळीच पोहोचले . त्यामुळे कार्यक्रमाच्या स्वरुपाबद्दल बोलणं झालं नाही . शुभदा फडणवीसचं प्रास्ताविक आटोपल्यावर भास्कर लक्ष्मण भोळेंच्या हस्ते महानोरांचा सत्कार करण्यात आला . या दरम्यान हळूच त्यांना जे सात-आठ प्रश्न काढले होते तो कागद मी दाखवला . जाहीर मुलाखत सुरु झाली आणि माझ्या पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात महानोर सलग सव्वा तास बोलले . हकिकती , आठवणी आणि काही कवितांचं गायन अशी एक सुरेल लय त्यांच्या कथनाला लाभली होती . श्रोते मंत्रमुग्ध झाले , त्या संध्याकाळचा आसमंत महानोरांच्या त्या सुरेल कथनानं उजळून निघाला . महानोर एकदाचं बोलायचे थांबले आणि मला म्हणाले , ‘विचार तुझा पुढचा प्रश्न’ .