अस्तु-समाधानी आणि शांत जगण्याचा मंत्र

मला (बि)घडवणारे चित्रपट- ६

– सानिया भालेराव

मराठी भाषेतला कुठला चित्रपट निवडावा यावर खूप विचार केला. पण एक चित्रपट काही केल्या डोक्यातून जाईचना! काही चित्रपट आपल्याला एवढे भारावून टाकतात कि त्या अनुभवाबद्दल लिहिताना खूप गलबलून व्हायला होतं. लिहायला बसलं कि नुसतं मन सैरभैर होऊन जातं . जे आपण ह्या चित्रपटातून मनात टिपलं ते आपण खरंच जगतो आहोत का ह्या विचाराने अस्वस्थ व्हायला झालं.जे मी लिहिणार आहे त्यातलं थोडं का होईना मला जगता यायला पाहिजे असा विचार कित्येक महिने डोक्यात घोळत होता. मग जेव्हा हळूहळू जगण्यात बदल केला तेंव्हा ह्या चित्रपटाबद्दल लिहायला घेतलं. इतका प्रभावी हा चित्रपट आहे . असा चित्रपट ज्याने जगण्याच्या संकल्पना अंतर्बाह्य बदलून टाकल्या. ह्या चित्रपटात कित्येक अनसेड गोष्टी आपल्याला समृद्ध करून जातात. चित्रपटाच्या नावातंच त्याचं सार आहे. चित्रपट आहे अस्तु- So be it!

…………………………………………………………………………………………………………………………………………….

२७ नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड्सनी सन्मानित सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘अस्तु’ हा चित्रपट! अल्झायमर्सने ग्रस्त संस्कृत भाषेचे विद्वान डॉक्टर चक्रपाणी शास्त्री अप्पा (डॉक्टर मोहन आगाशे ) त्यांची मुलगी इरा ( इरावती हर्षे ) आणि चन्नम्मा (अमृता सुभाष) ह्या तिघांच्या भोवती फिरणारी ही गोष्ट! आपल्या मुलीच्या घरी राहायला आलेले अप्पा उतारवय आणि त्यात अल्झायमर्स असल्यामुळे काहीसे विचित्र वागत असतात. त्यात त्यांच्या नातीला आणि घरातल्या इतरांना त्यांचे हे वागणे थोडे त्रासदायक वाटायला लागते. एक दिवस इरा बरोबर बाहेर गेले असताना काही कारणामुळे गाडीत एकटे बसलेले अप्पा रस्त्यावरून जाणाऱ्या एका हत्तीला पाहून चकित होतात आणि लहान मुलासारखे त्याच्या मागे निघून जातात. इरा परत येऊन बघते तर अप्पा गायब! मग त्यांची शोधाशोध, पोलीस स्टेशनच्या चकरा आणि त्यांच्या भूतकाळातल्या आठवणी ह्यामधून जाणारं इराचं कुटुंब अस्वस्थ करून सोडतं. इकडे अप्पा मात्र ज्या हत्तीमागे जातात ते पोहोचतात थेट त्याच्या मालकांपर्यंत. त्या हत्तीला पोसणारं एक गरीब कुटुंब… चन्नम्माचं! चन्नमा , तिचा नवरा आणि दोन पोरं असं हे कुटुंब. थकलेले आणि भुकेजलेले. अप्पा चन्नम्माला आई अशी हाक मारतात आणि चन्नम्मा त्यांना अत्यंत सहजपणे आपल्या कुटुंबात सामावून घेते. त्यांची करुणा, सहृदयता आणि त्यांच्यातली माणुसकी आपल्याला कुठेतरी स्पर्शून जाते. पुढे काय होतं ह्यासाठी हा चित्रपट पहाच!

ह्या चित्रपटाची मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे हा चित्रपट जरी अल्झायमर्सबद्दल सजगता निर्माण करणारा असला तरी त्याला खूप पदर आहेत.म्हातारपणी आईवडील लहान मुलांसारखे होऊन जातात. त्यांना आपण कितपत जपतो? आपण कुठपर्यंत त्यांच्यात अडकतो आणि वयाप्रमाणे त्यांच्या शरीराचा आणि मनाचा ह्रास आपण कसा आणि कितपत हाताळू शकतो ? अश्या बऱ्याच प्रश्नांना ह्या चित्रपटाने हात घातला आहे. वडिलांना असं बघताना होणारा त्रास आणि त्यांना सांभाळताना होणारी आपली चिडचिड ह्या द्वंद्वात अडकलेल्या इराशी आपण रिलेट करू शकतो . निरभ्र आकाशासारखं मन असणारी चन्नम्मा खूप भावते. हत्तीला अंघोळ घालताना , बाळाला निजवताना गाणारी चन्नम्मा, तिचे सूर काळीजाला थंडावा देतात. आनंदी जगायला काय लागतं ह्यावर विचार करायला भाग पडतो हा चित्रपट आणि चन्नम्मा. ह्या चित्रपटात अतिशय कॅड कॅटेगरी मध्ये मोडणारा मिलिंद सोमण पुसटसा लक्षात राहतो, म्हणजे हा चित्रपट आणि त्यातली पात्र , कथा किती प्रभावशाली असू शकते ह्याचा विचार करा!!!!

लिव्ह इन मोमेन्ट असं झेन फिलॉसॉफीने सांगितल्यासारखं जगणारे अप्पा कायम अस्तु अस्तु असं म्हणतं. “अस्तु” ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो “असो” किंवा असूदे ! इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर so be it! असं अस्तु आपल्याला खरंच म्हणता येतं का ? ह्या एका गोष्टीने मला कित्येक महिने पछाडले. आयुष्यात वादळं आली, प्रश्न निर्माण झाले कि आपण काय करतो? अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपला मूड जातो , आपण डिस्टर्ब होतो. कुणाच्या हातून एखादी चूक झाली तर आपण उसळतो. बाईने कप फोडला, पोळ्या कडक झाल्या, घर नीट पुसलं नाही, मुलांना तोंड दुखेस्तोवर समजावून सांगूनही त्यांनी ऐकलं नाही, बॉसने सुट्टी सुट्टी दिली नाही, ऐनवेळेस कामाच्या बाईने सुट्टी मारली, ऑफिसात शनिवारीही वर्किंग ठेवलं अश्या अगणित लहान सहान बाबींनी आपण त्रासून जातो. अश्या वेळी “अस्तु” म्हणता आलं तर ? मुळात आपण कदाचित थोड्या सरावाने दुसऱ्यांना माफ करायला शिकतो देखील. पण स्वतःचं काय? असे कित्येक प्रसंग असतात जे आपल्याला आयुष्यभर हॉंट करतात. मी तेंव्हा असं वागायला पाहिजे होतं , मी असं बोलायला हवं होतं किंवा मी असं वेड्यासारखं बोलले म्हणून असं झालं , मी तसं केलं असतं तर असं झालं नसतं अँड सो ऑन. ही मानगुटीवर बसलेली भूतकाळाची भुतं खूप त्रास देतात. आपण आपल्याकडून झालेल्या आणि न झालेल्या चुकांवरून स्वतःला अगणित वेळा शिक्षा करतो. स्वतःवर अन्याय करतो . मी मूर्खासारखी वागले , मी अमुक मी ढमुक असं म्हणून स्वतःच स्वतःचा जाच करतो. सर्वप्रथम आपल्याला स्वतःला माफ करता यायला पाहिजे. देव , भक्ती , श्रद्धा ह्या गोष्टी तर आहेतच पण सर्वात महत्वाचं आहे ते आपण स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला माफ करायला शिकणं. आणि हाच ह्या चित्रपटाचा आत्मा आहे, असं मला वाटतं.

आजवर ज्या काही चुका झाल्या आहेत , भूतकाळातल्या ज्या गोष्टींनी पछाडलं आहे त्यांनां एकदा “अस्तु” म्हणून टाकूया.. स्वतःला माफ करून आयुष्य जसं येईल तसं जगायचं , ह्या आत्ताच्या क्षणात… हेच काय ते आयुष्य! बाकी जे पुढे येईल ते तेंव्हा बघू . समाधानी आणि शांत जगण्याचा फार मोठा मंत्र अप्पा आणि चन्नम्मा देऊन जातात.ह्या चित्रपटातून जर आपण हे घेऊ शकलो तर कित्येक ओझ्यांपासून आपण मुक्त होऊ शकू . “अस्तु” ह्या छोट्याश्या शब्दात दडलेली गहन फिलॉसॉफी आयुष्य बदलणारी ठरू शकते. सो आजपासून आत्तापासून स्वतःसाठी जगूया… स्वतःच्या पाठीवर स्वतःच थोपटून “अस्तु” असं म्हणून बघा तरी…आयुष्य नव्याने उमजू लागेल मग!

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे .)

[email protected]

 

हे सुद्धा नक्की वाचा-

नवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषेhttp://bit.ly/2LgHILE

जगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा – ‘कास्ट अवे’!– http://bit.ly/2VVvmcR

‘द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी–  http://bit.ly/2UAWW2m

९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट http://bit.ly/2G2DlQ1

Previous articleस्त्रीसत्ताक राज्यपद्धतीच्या अस्तित्वाबाबत शंकाच!
Next articleमोहब्बत को समझना है तो नासेह ख़ुद मोहब्बत कर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here