उन्हाळा आला की हमखास कामठवाड्याचे बसस्टँड आणि तेथील मैघणेंच्या हॉटेलातील रांजण डोळ्यासमोर येतो. गत महिन्यात कामठवाड्याच्या स्टँडवर उतरलो. सवयीप्रमाणे मैघणेंच्या हाॅटेलात शिरलो. पाणी पिण्यासाठी रांजणावर गेलो. तर मागून आवाज आला, आताही रांजणातीलच पाणी पिशील काय? चमकून मागे बघितले… एक जण हातात बिसलेरी (कोणत्याही मिनरल वाटरला गावात बिसलेरीच म्हणतात.) घेऊन उभा. थंडगार पाणी पोटात रिचवले. दोन सेकंद डोळे बंद केले अन् चाळीस वर्षापूर्वीचे दृश्य डोळ्यासमोर तरळले.
आमचे कामठवाडा तसे पाण्यासाठी समृद्ध. गावात पाण्याने चबडब भरलेल्या अनेक विहिरी. गावाला खेटूनच उन्हाळ्यातही खळखळून वाहणारी दातपाडी नदी. (आमच्या गावच्या नदीला दातपाडी का म्हणतात ते पुढे कधी तरी सांगेन) जवळच गोखी नदी. पाथ्रडला बांधलेल्या धरणाचे बॅक वाटर. असे समृद्ध चित्र. त्या काळात गावात अन् शिवारातील विहिरी कधी आटल्याचे कानावर आले नाही. दातपाडीची एक धार तर वर्षभर सुरु राहायची. बंटीच्या डोहात अन् वडाखाली तुडुंब पाणी. उन्हाळाच काय, कधीही मनात येईल तेव्हा नदीवर जायचे आणि मनसोक्त पोहायचे.
तिसरी- चवथीत असू. शाळेला दीड वाजता मधली सुटी झाली की, थेट नदीवर. पाच सहा सोबती असायचे सोबत. काढले कपडे की टाक नदीत उडी. छातीभर पाण्यात मनसोक्त डुंबायचे. वेळेचेही भान नसायचे. कुणी तरी सांगायचे घंटी वाजली. मग लगबगीनं कपडे घालयाये, शाळेकडे धूम ठोकायची. पण अनेकदा पोहण्याचा मोह अंगलट यायचा. घरी माहिती होऊ नये म्हणून संपूर्ण कपडे काढून तसेच नदीत उतरायचो. एकदा कुणी तरी गुरूजींना सांगितले पोट्टे नदीत पोहत आहे. मग काय गुरुजी दहा-बारा जणांची फौज घेऊन नदीवर. इकडे आम्हाला पत्ताच नाही. गुरुजींनी चूपचाप नदीच्या थडीवरचे आमची खाकी पँट व पांढरा शर्ट ताब्यात घेतले. कुणाला तरी गुर्जी दिसले. निसर्गावस्थेत आम्ही नदीबाहेर. गुर्जीच्या हातात नेहमीचा रुळ होता. सवयीप्रमाणे आम्ही हात पुढे केला पण…गुर्जींनी यावेळी हातवर नाही तर उघड्या ढुंगणावर दणका दिला. ढुंगण चोळत आम्ही कपडे घतले व घरी धूम ठोकली. तर घरीही वार्ता गेलीच होती. घरच्यांनीही चांगलेच कुथाडले.
अशा अनेक आठवणी दातपाडीसोबतच्या. जामवाडीला धरण झाल्यापासून दातपाडी डिसेंबरमध्ये कोरडी पडते. उन्हाळ्यात तर नदीत केवळ खडक दिसते. कधीकाळी लेकरांच्या मनसोक्त डुंबण्याच्या आनंदात सहभागी होणाऱ्या दातपडीच्या डोळ्यातील अश्रू आटले. गावातील विहिरी म्हणजे गावाची जलसमृद्धी. पाण्याने भरलेल्या विहिरीतून पाणी काढणे म्हणजे दिव्य. सकाळपासून खिराड्यांचा खळखळाट सुरु राहायचा. मोठ्या खटल्याच्या घरातील गडीमाणसं कावडीने पाणी भरायचे. कुणी फक्त देवपूजेसाठी एक कळशी पाणी न्यायचे. मायमाऊल्या भल्या पहाटेपासून पाणी भरायच्या. सुखादुखाच्या गोष्टी व्हायच्या. सासू-सुनांच्या चुगल्याही व्हायच्या. कधी कडाक्याचे भांडण होऊन उनीदुनी निघायची. पण त्यात वेगळाच आनंद होता.
वीस वर्षापूर्वी गावात नळ आले अन् विहिरींची उपयोगीता संपली. खिराडींचा खडखळाट नाही की बायांचा कल्ला नाही. कमी जास्त एक शतक गावकऱ्यांची तहान भागविणाऱ्या विहिरी मुक्या झाल्या. काही विहिरी बुजविल्या तर काही विहिरी अडीअडचणीच्या काळात कामी येतील म्हणून कशाबशा अस्तित्व टिकवून आहे.
विकतचे पाणी म्हणजे आश्चर्य वाटण्याचा तो काळ. गावातील कुणी नागपूरला जाऊन परत आला की सांगायचा, ‘बर्डीवर २५ पैशात मशीनचे थंड पाणी विकत मिळते.’ पाणी विकत घ्यावे लगते हे ऐकतानाच गावातील अनेकांच्या घशाला कोरड पडायची. पण आता गावातील हाॅटेलात पाच-सहा ब्रँडच्या मिनरल वाटरच्या बाॅटल सहज मिळतात. घरोघरी थंडपाण्याच्या कॅनचा रतीब आहे. कधी काळी धर्म असलेले पाणी आता विकत घ्यावे लागत आहे. पण कुणाला त्याचे अप्रुप नाही. गेल्या तीन दशकातील हा बदल मोठा लक्षणीय आहे.
नदी-नाल्याचे ओंजळीने पाणी पिऊन लहानपणी कधी आजार जवळ आला नाही. पण आता बाहेरचे पाणी पिले की, कुरबुरी सुरू होतात. लहानपणी मित्रांसोबत जंगलात भटकायला गेलो की खळखळणाऱ्या ओढ्याचे पाणी प्यायचो. तर कधी ओढ्याच्या पात्रात इरा खोदायचो. (इरा म्हणजे ओढ्याच्या रेतीत छोटासा गड्डा करायचा. त्यात भूमिगत प्रवाहाचे पाणी यायचे. सुरुवातील गढूळ असलेले पाणी काही वेळात स्वच्छ व्हायचे.) मग पळसाच्या पानाचा द्रोण करुन इऱ्यातील पाण्याने तहान भागवायची. अमृतासारख्या पाण्याने मन तृप्त व्हायचे. आता सर्वाधिक महाग असलेल्या वॉस आर्टेशियन या नॉर्वेतील कंपनीच्या पाण्यालाही ती सर येणार नाही. भारतात या ब्रँडच्या ३०० मिलीच्या सहा बाटल्या ३,३३० रूपयांना मिळतात. म्हणजे १ लिटर पाण्याची किमत आहे १७०० रूपये. पण जंगलातील खळखळत्या ओढ्यातील ओंजळीने पाणी पिण्याचा आनंद वॉस आर्टेशियन कंपनीच्या पाण्याला येणार नाही.
(लेखक पत्रकार व ग्राम जीवनाचे अभ्यासक आहेत ) 9923169506