या कायद्याद्वारे इमारती /जमीन मालकास त्याची जागा भाड्याने देतांना भाडेकरु सोबत लेखी करार करणे यापुढे बंधनकारक राहणार आहे. सद्यस्तिथीत इमारती/जमीन मालकास याबद्दलचे कुठलेही बंधन नसल्यामुळे ही तरतूद अतिशय महत्वाची अशी म्हणता येईल. त्याचप्रमाणे, सदरच्या भाडेकराराबाबत, भाडेकरार झाल्याच्या दोन महिन्याचे आत इमारती /जमीन मालक व भाडेकरू यांना संयुक्तपणे त्यांच्यातील भाडेकराराची माहिती ‘शेड्यूल-१’ मध्ये सांगितल्यानुसार संबंधित भाडे प्राधिकरणास देणे करणे बंधनकारक असेल. व संबंधित भाडे प्राधिकरणास प्राप्त झालेल्या सर्व करारनाम्यांची माहित, माहिती मिळाल्यापासून सात कार्यालयीन दिवसांत विहित नमुन्यात त्यांच्या संकेतस्थळावर स्थानिक भाषेत प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. सदर लेखी भाडेकरारनामा हा इमारती /जमीन मालक व भाडेकरू मधील ‘टेनंसी’ चा निर्णायक पुरावा (Conclusive Proof) मानण्यात येईल. तसेच सदर भाडेकराराबाबतची माहिती प्रस्तावित स्वरुपात भाडे प्राधिकरणाकडे दिलेली नसल्यास, इमारती /जमीन मालक किंवा भाडेकरू, या कायद्यांतर्गत कुठलीही दाद मागण्यास पात्र राहणार नाही. महत्वाचे म्हणजे कराराच्या नोंदणीबाबतीत हा कायदा ‘सायलेंट’ असून त्याबाबत तूर्तास तरी काही स्पष्टता नाही.
इमारती/जमीन मालक व भाडेकरू यांच्यातील भाडेकरारादरम्यान इमारती/जमीन मालक अथवा भाडेकरूपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यास, त्या परिस्थितीत त्यांच्यातील भाडेकराराच्या अटी व शर्ती त्यांच्या वारसांना देखील लागू राहतील. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या भाडे करारास अनुपूरक करार (Supplementary Agreement) केल्याशिवाय, भाडेकरू कुठल्याही प्रकारे पोट-भाडेकरू ठेऊ शकणार नाही व आधी नमूद केल्यानुसार त्या अनुपूरक कराराची देखील माहिती ईमारती/जमीन मालक व भाडेकरू यांना संयुक्तपणे संबंधित भाडे प्राधिकरणास सदरचा अनुपूरक करार केल्याच्या दोन महिन्यात देणे बंधनकारक असेल.
तसेच या कायद्याच्या कलम ४० (१) नुसार, या कायद्यांतर्गत चालवल्या जाणाऱ्या प्रकरणांकरिता दिवाणी न्यायालयांचे कार्यक्षेत्र (Jurisdiction of Civil Court) प्रतिबंधित (Barred) केले गेले आहे. व कलम ४० (२) नुसार भाडे न्यायालयांचे कार्यक्षेत्र हे फक्त ‘टेनंसी’ च्या मुद्यापुरते मर्यादित केलेले असून त्यांना जागेच्या मालकी हक्काबाबत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नसेल.