‘आदिवासी बोधकथा’ मानवी सहजीवनातील आनंद सांगणाऱ्या गोष्टी

-प्रमोद मुनघाटे

आदिवासी बोधकथा’ हे एक एक सुंदर पुस्तक आहे. पुनः पुन्हा वाचावे असे. ‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान’ असे उपशीर्षक असलेल्या ‘आदिवासी बोधकथा’ या पुस्तकात वारली जमातीच्या पंधरा कथांचे संपादन आहे. मुळात या बोधकथा प्रदीप प्रभू आणि शिराज बलसारा यांनी त्या इंग्रजीत संगृहीत केल्या होत्या. त्यांचे मराठीतील पुनर्कथन सुहास परांजपे आणि स्वातीजा मनोरमा यांनी केलेले आहे. प्रदीप प्रभू आणि शिराज बलसारा यांनी लिहिलेली प्रस्तावना ही अशा विषयाच्या संदर्भात अपूर्व आहे. काही पुस्तकांच्या प्रस्तावना फारच मोहक असतात. स्वतः लेखक संपादकाने लिहिलेली आणि नेमकी प्रस्तावना असेल तर दुधात साखर.आदिवासी साहित्याच्या प्रत्येक अभ्यासकांनी ती वाचलीच पाहिजे.

स्वातीजा यांनी साधारणपणे सहा महिन्यापूर्वी हे पुस्तक मला पाठवले. आणि ते लगेचच वाचून पण झाले. त्यावर लिहायचे मात्र राहून गेले होते. इतक्या सुंदर पुस्तकावर आपल्याकडून लिहून होत नाही, याची बोच होती. कोरोनाच्या सक्तीच्या रजेने ती बोच दूर करण्याची संधी दिली आहे.

प्रदीप प्रभू हे ठाणे जिल्ह्यातील वारली भागात गेली अनेक दशके काम करणाऱ्या ‘कष्टकरी संघटने’चे कार्यकर्ते आहेत. ही संघटना गेली चाळीस वर्षे आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत आहे. आदिवासींना लुबाडणारी सावकारी बंद करणे आणि त्यांच्या हस्तांतरित जमिनी परत मिळविणे हे या संघटनेचे यश आहे. पण आदिवासी राहतात त्या परिसरावर आणि जंगलावर त्यांचा नैसर्गिक हक्क मिळवून देणे सोपे नाही. केवळ कायदा करून हे साधणार नाही. गावातील जंगल हे सामुहिक जंगल कसे करता येईल, शिक्षणामध्ये आदिवासी मूल्ये आणि परंपरा यांचा कसा समावेश करता येईल ही खरी आव्हाने आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या अंगाने काम करण्याची गरज आहे. साहित्य आणि संस्कृती हा त्यापैकी एक मार्ग आहे, या जाणिवेतून कष्टकरी संघटनेने वारली जमातीमधील बोधकथांचे संकलन केले, ही पार्श्वभूमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

प्रदीप प्रभू आणि शिराज बलसारा प्रस्तावनेच्या प्रारंभीच म्हणतात, “पिढी दर पिढी असे म्हणतात की, डोहाच्या संथ पाण्याच्या खोलीचा थांग लागत नाही. वारल्यांच्या जीवन व्यवहाराबद्दलही असेच म्हणता येईल. विशेषत : एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपले ज्ञान सोपवण्याच्या त्यांच्या व्यवहाराबद्दल. वर वर साध्या वाटणाऱ्या या व्यवहारामागे खोल अर्थ दडलेला आढळतो. वारल्यांचे पारंपरिक ज्ञान अनेक रूपात पुढच्या पिढीकडे सोपवले जाते. लग्न लावणारी ढवळेरीण किंवा तिला मदत करणाऱ्या सवाष्णी जे विवाहाचे मंत्र म्हणतात, ते त्याचेच एक रूप असते . जागरणाच्या वेळी, मृत्यूच्या वेळी, पूर्वज विधींसाठी, इथल्या माणसांच्या पलीकडच्या जगाशी असलेल्या नात्याचा शोध घेण्यासाठी डाक्या भगत जे म्हणतो, तेही त्याचेच दुसरे रूप असते. वारली समाजाचा इतिहास जपून ठेवणारा थळावला जेव्हा ऐकणाऱ्यांना त्यांच्या समाजाचा व परिसराचा रसभरित इतिहास सांगतो , तेव्हा ते पुढच्या पिढीला ज्ञान पोहोचवण्याचेच तिसरे रूप असते. लहान मुलांना वडीलधाऱ्या स्त्री-पुरुषांनी सांगितलेल्या तोंडी कहाण्या हे त्याचे चौथे रूप आहे. या कहाण्या जीवनाकडे, तत्त्वज्ञानाकडे, संस्कृतीकडे पाहण्याचा खास वारली दृष्टिकोन त्या मुलांना सोपवतात, या समृद्ध परंपरांचे आक्रमक आदिवासेतरांपासून रक्षण करतात आणि त्या वारली मुलांमधील विद्यार्थ्या ‘ ला चेतवतात. या कहाण्यांमध्ये सांगणारा आणि ज्यांना सांगितले जाते त्यांच्यात एक खास एतद्देशीय द्वंद्वात्मक व संवादात्मक देवाणघेवाण असते. यातील अनेक कथांचा आशय उपदेशात्मक, आदेशात्मक असतोच ; परंतु यापलीकडे जाऊन, कसे वागावे याबद्दल या कथा एक खास प्रकारचा विचारदेखील देत असतात. उदाहरणार्थ, खरे बोलावे. खरे का बोलावे यासाठी देवाचा कोप होईल, नरकात जावे लागेल असा दैवी आधार किंवा संदर्भ आदिवासींच्यात नसतो. असते, ते एक खोलवर रुजलेले मानवी मूल्य, इतरांचा गैरफायदा घेऊ नये, जे या कथा रुजवतात.”

‘आदिवासी बोधकथा’ या पुस्तकात वारली जमातीमधील पंधरा लोककथांचे संकलन केले आहे. यातील दहा कथा या अगोदर इंग्रजीतून ‘विस्डम फ्रॉम दि विल्डरनेस’ या नावाने प्रसिद्ध झाल्या आहेत. या संग्रहातील कथांचे पाच प्रकार आहेत. काही कथांमध्ये विविध प्रकारचे तत्त्वज्ञान किंवा कल्पनाप्रणाली गुंफलेल्या आहेत. काही कथा पर्यावरणाच्या संदर्भातील आहेत. शिकार करणारा माणूस शेती करू लागला आणि मग निसर्ग व माणूस, माणूस व प्राणी यांच्यातील नाते संबंध कसे बदलत गेले याविषयी काही तथ्ये या कथांमधून व्यक्त होतात. काही कथांमधून गैरआदिवासी समाजाच्या वसाहतवादाबद्दल वारली जमातीला काय वाटते, तो दृष्टीकोन व्यक्त करणाऱ्या आहेत.काही कथांमधून पुरुषप्रधान समाजव्यवस्था, स्त्रियांचे स्थान, त्यांचा संघर्ष प्रतीत होतो. जमीन हेच वारल्यांचे उपजीविकेचे मुख्य साधन असते. ब्रिटीशांनी वारली पुरुषांच्या नावे जमिनीची मालकी कायद्याने देऊन स्त्रियांना वंचित केले, त्यामुळे त्या कशा दुर्बल झाल्या हाही काही कथांचा विषय आहे. पण या दुर्बलतेतून लैंगिकतेचा (लैंगिकता हे पुरुषसत्तेचेच साधन, असे संपादकांना वाटते.) वापर करून स्त्रिया पुरुषसत्तेला कसे उलटवून लावतात, हे सांगणाऱ्याही काही कथा आहेत. तर काही कथा या बालकथा आहेत.

या कथांचे औचित्य केवळ आदिवासी समूहांसाठी नाही, तर एकूणच मानवी संस्कृतीच्या भविष्यासाठी त्या कशा महत्त्वाच्या आहेत, हे वेगवेगळ्या मुद्द्यांनी प्रस्तावनाकारांनी पटवून दिले आहे. हे मुद्दे म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्या सहसंबंधाची जणू आचारसंहिताच आहे. औद्योगिकरण, त्यासाठी जंगल, पाणी आणि खनिजसंपत्तीचे दोहन, यातून निर्माण झालेली शोषणावर आधारित तथाकथित आधुनिक जीवनशैली यामुळे मानवाने आपली स्वाभाविक प्रवृत्ती गमावली आहे. आता परत त्या स्वाभाविक प्रवृत्तीचा शोध आपल्याला र आदिम जमातीची जीवनमूल्ये आणि जीवनशैलीकडे घेऊन जाणारा आहे, हे या पुस्तकातील बोधकथांवरून लक्षात येते.

या संग्रहातील पहिलीच कथा ‘कहंकारक व अहंकारक’ ही फार रंजक आणि उद्बोधक आहे. ती अनेक वैचारिक व तात्त्विक संदर्भात कशी अन्वर्थक आहे, ह्याचे विश्लेषण संपादकांनी प्रस्तावनेत केले आहे. कथेची शैली समजण्यासाठी कथेची सुरवात कशी होते, ते पाहण्यासारखे आहे. :

“जंगलाच्या काठावर एका छोट्याशा गावात एक कहंकारक राहत होता. कहंकारक म्हणजे ज्याला गोष्ट सांगायचा नाद आहे , ज्याला गोष्ट सांगितल्याशिवाय राहवत नाही. आज तो कहंकारक अतिशय अस्वस्थ होता. चलबिचल होऊन घरातल्या घरात येरझारा घालत होता . तो त्याच्या बायकोला म्हणाला, “ मी कितीतरी दिवसांत गोष्ट सांगितली नाहीये. आता मला गोष्ट सांगितल्याशिवाय राहवणार नाही. अशा उत्तेजित , अस्वस्थ अवस्थेत मी जास्त काळ राहू शकणार नाही. मला माझ्या गोष्टी एखाद्या अहंकारकाला सांगितल्याच पाहिजेत. ” नवऱ्याच्या आवाजातील अस्वस्थता व निकड बायकोने ओळखली व ती म्हणाली, “ जायचं तर जा. मी लगेच जेवण बनवते. ” जेवण बनवून तिने त्याला जेवायला वाढले व ती भात सडू लागली. कहंकारक जेवायला बसला, पण त्याला जेवणात रस नव्हता. थोडेसे खाऊन तो उठला. तोपर्यंत बायकोचे भात सडून झाले होते व ती डाळ भरडत होती. डाळ भरडण्याच्या आवाजात तिला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात तो तिला म्हणाला, “मी निघतो आता. माझी गोष्ट ऐकायला मला एखादा अहंकारक कधी व कुठे भेटेल काय माहीत! कदाचित मला परत यायला बरेच दिवससुद्धा लागतील. “त्याच्या बायकोने त्याला त्याच्या लांबच्या प्रवासाकरिता नुकतेच सडलेले तांदळ भरडलेली डाळ प्रेमाने दिली. कहंकारकाने जेवण शिजवायला एक लहान पाते शोधले, त्यात भरडलेली डाळ व तांदूळ घेतले, गाठोडे बांधले आणि तो घरातन निघाला. अहंकारकाच्या शोधात.”

बोधकथांचे संपादक म्हणतात, या कथांमधून सांगणारा आणि ऐकणारा यांच्यातील संवादातून काल्पनिक गोष्टींकडून आयुष्यातल्या व्यवहाराकडे एक प्रवास घडतो. या कथांमधील अर्थ व ज्ञान यांच्या विविध पातळ्या आहेत. ‘कहंकारक व अहंकारक’ मध्ये कहंकारक हा शब्द घडवणारा आहे. तर अहंकारक हा ऐकणारा, साद देणारा आहे. इथे निव्वळ ऐकणे हे काहीतरी आत्मसात करणे आहे. त्याच्या सध्या ऐकण्याच्या कृतीतूनही तो सांगणार्याचे अस्तित्व सिद्ध करतो. याच कथेतून हेही लक्षात येते की मानवी समाजातील संबंध हे साहचर्यावर आधारलेले असतात. ते परस्परांना पूरक असतात, एकमेकांच्या विरोधी नसतात. हे या कथेचे सार आहे.
या बोधकथा निसर्ग आणि मानव यांच्यातील नात्याचाही शोध घेणाऱ्या आहेत. निसर्ग व मानव यांच्या परस्परसंबंधातून घडणाऱ्या क्रियेतून आदिवासी आपल्या जगण्याचा कसा अर्थ लावतात, ते या कथा सांगतात. आणि अर्थ लावण्याच्या पद्धती आदिवासी पिढी दर पिढी विकसित करीत असतात. आजही ऐंशी टक्के आदिवासी निसर्गाच्या जवळच राहतात. अन्न, आरोग्य आणि आडोसा या त्यांच्या जगण्याच्या मुलभूत गोष्टी आजही जंगलाशीच निगडीत आहेत. म्हणून झाड, प्राणी, पक्षी ही त्यांची कुळाची दैवते ते प्राणपणाने जपतात. त्यातूनच जैवविविधताही साध्य होते. सूर्य-चंद्र किंवा अन्य नैसर्गिक प्रतीकांची ते पूजा करतात, त्यामागे भयमिश्रित आदर असतो. पण त्यापेक्षा ज्या अतींद्रिय शक्तींचे ते अस्तित्व मानतात, त्यातूनही मानवी अस्तित्वाचा अर्थ लावण्याची सर्जनशीलता दिसून येते. यातूनच निसर्गावरील आक्रमणाला ते विरोध करतात. हा विरोध जाणिवपूर्वक नकारात्मक नसून तो त्यांच्या जगण्याच्या शैलीचा भाग कसा आहे, तेही या कथांमधून दिसते.

‘कहंकारक व अहंकारक’ या कथेचेच उदाहरण घेतले तरी ‘मौखिकता’ या मानवी संस्कृतीमधील तत्त्वाचे महत्त्व लक्षात येते. बोलीची मौखिक परंपरा ही संस्कृतीच्या विकासामधील अवस्था होती, एवढाच मौखिकतेचा मुद्दा नाही. पुढच्या काळातील लिपी किंवा मुद्रणाच्या साधनांचा अभाव इतकाच अन्वर्थ नाही. तर माणसामाणसातील साहचर्य हे कसे अपरिहार्य आहे ते मौखिकतेचे तत्त्व सिद्ध करते. मौखिकतेच हा मुद्दा प्रस्तावनेत फार छान उलगडून दाखवला आहे. अस्तित्वासाठी आणि विकासासाठी माणसे एकमेंकावर कसे अवलंबून असतात, किंबहुना एकमेकांच्या अस्तित्वाची ग्वाहीच मौखिकतेतून मिळते. मी मी आहे, कारण तू तू आहेस असे तर्कशास्त्रीय सत्य ‘कहंकारक व अहंकारक’ ही कथा व्यक्त करते, असे संपादकांना वाटते. परस्परविरोधी समाजांपेक्षा परस्परसमर्थक समाज निर्माण करणारे हे तर्कशास्त्र आहे. आधुनिक समाजासारखी इथे परस्पर स्पर्धा किंवा व्यक्तिवाद नाही. तर कुणीतरी साद घालणे आणि दुसर्याने साद देणे अशा सह-आनंदातून सहकार्य व साहचर्य ज्यातून साधले जाते त्याचे मौखिकता हे एक गमक आहे. ते लोकशाहीचे एक सूत्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या उच्चारात दुसऱ्याच्या अस्तित्वाचा उच्चार पाहिला जातो. जगभरच्या आदिवासी आणि इतर एतद्देशीय जमातींच्या जगण्याचे व विचारांचे हेच तर्कशास्त्र आहे, असे या संपादकांना वाटते.

ही मौखिकताच आदिवासी लोकसाहित्याची मुख्य वैशिष्ट्य आहे. पण अलीकडे मौखिकतेसह आदिवासी कथांचा ऱ्हास होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आदिवासी जमातीना ‘विकासाच्या मुख्य प्रवाहात’ आणण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत, त्यातून अतिशय अर्थपूर्ण आणि जीवनाचे सार सांगणाऱ्या कथांचा ऱ्हास होत आहे. लिपी नसलेल्या बोलीतील मौखिक साहित्य म्हणजे आदिवासींचे तेच मागासलेपण आहे किंवा त्यांचे ते ‘अशिक्षित’पण आहे, असेच मानले गेल्याने त्यांना असंस्कृत ठरवले गेले. त्यातून त्यांच्या सगळ्या मौखिक ज्ञानाला आणि आनंदी सहजीवनाचे अधिष्ठान असलेल्या जीवनजाणिवांना सुरुंगच लावला गेला. या आदिम मौखिकतेत मानववादी पर्यावरण ज्ञान होते, हे कळले, तेव्हा खूप उशीर झाला होता. या पार्श्वभूमीवर आदिवासींच्या या बोधकथांचे महत्त्व लक्षात घ्यावे लागते.
जीवनमूल्ये, जीवनशैली, पर्यावरणाचे प्रश्न अशा अनेक संदर्भात सांस्कृतिक अभिजनांच्या आक्रमणामुळे आदिवासींच्या मौखिक परंपरा कोलमडून गेल्या. आज सर्व जीवांसोबत जगण्याचा सह आनंद शोधण्यासाठी मानव अनेक नवनवीन विचारप्रवाह धुंडाळत आहे. पण आपल्याच भोवतालच्या आदिम संस्कृतीत असलेले ते शहाणपण त्याच्या दृष्टीआड झाले आहे. याही संदर्भात या कथांचे संपादन महत्त्वाचे आहे.

या संग्रहातील प्रत्येक कथा अशी जीवनाचा अर्थ शोधणारी आहे. हे संकलन केवळ साहित्य म्हणून नव्हे तर पर्यावरण, तत्त्वज्ञान आणि मानवी सहजीवनाचा आनंद शोधणाऱ्या नव्या विचारप्रवाहांच्या आधुनिक ज्ञानाचे एक स्रोत म्हणून महत्त्वाचे आहे, हे निश्चित.

-(लेखक नामवंत समीक्षक आहेत)

7709012078

‘आदिवासी बोधकथा’ : एक पुनर्कथन
इंग्रजी संकलन : प्रदीप प्रभू आणि शिराज बलसारा
मराठी पुनर्कथन : सुहास परांजपे आणि स्वातीजा मनोरमा
मनोविकास प्रकाशन, पुणे सप्टेंबर २०१८
मूल्य : रु. २५० /-

Previous articleगांधारी..तिचं चुकलंच..!! पण ती अजाण होती..!!
Next articleअंबा..!! पुरुषप्रधान समाजाचा बळी..!!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here