गांधारी..तिचं चुकलंच..!! पण ती अजाण होती..!!

महाभारतातल्या स्त्रिया: भाग एक
**********

-मिथिला सुभाष

शकुनीच्या हातातले फासे दिसत होते, कृष्णाचे डाव दिसत नव्हते. कृष्णाला शह एकाच घटनेमुळे मिळाला. द्रौपदीचा भरसभेत झालेला अपमान..!! त्याने साड्या पुरवल्या वगैरे सगळ्या नंतर घुसवलेल्या भाकडकथा आहेत. रजस्वला द्रौपदी भरसभेत निर्वस्त्र केली गेली तिने आपल्या लांबसडक केसांनी स्वत:ला कसंबसं झाकलं हे सत्य..
***********************
गांधारी.. तिचं नेत्रहीन धृतराष्ट्राशी लग्न.. आणि लग्नाच्या पहिल्या रात्री तिने डोळ्यांना कायमची पट्टी बांधणं..!! हा घटनाक्रम मला नेहमी विचारात पाडतो. तिचा भाऊ शकुनी याने बहिणीच्या घरात कायम राहणं आणि दुर्योधन, दु:शासन वगैरे भाच्यांची पाठराखण करणं, दुष्ट डावपेचाने वागणं या सगळ्या गोष्टी वर सांगितलेल्या घटनाक्रमाचा पडसाद आहेत असं मला फार वर्ष वाटतंय.

रामायण-महाभारतादी महाकाव्यांकडे बघण्याची आपली एक विशिष्ट दृष्टी आहे, जी आपल्या पूर्वसूरींनी आपल्याला दिलेली आहे. वेगळा काही विचार करून डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा, ‘बाबा वाक्यम् प्रमाणं’ हे धोरण आपल्या सोयीचं असतं. शंभर कौरव, धृतराष्ट्र, शकुनी वगैरे मंडळी वाईट आणि पाच पांडव, पंडू, कुंती, द्रौपदी वगैरे सगळे चांगले असं आपण गृहीत धरलंय. म्हणूनच तर वासुदेव कृष्ण त्यांच्या बाजूने होता ना..असं आपल्याला वाटतं. तो पांडवांचा मामेभाऊ होता हे आपण विसरतो. त्यामुळे शकुनी हा मामा जसा स्वाभाविकपणे कौरवांच्या बाजूने होता, तसा कृष्ण हा मामेभाऊ स्वाभाविकपणे पांडवांच्या बाजूने होता. पण तो देव होता असं एकदा नक्की केल्यावर त्याने जे केलं ते न्याय्य ठरतं.

या सगळ्यांना ‘माणूस’ समजून महाभारताचा विचार केला तर त्या गोष्टीचा तोलच बदलतो. आणि मग शकुनीला कपटी म्हणायला जीभ रेटत नाही.

अंध धृतराष्ट्राला बायको आणण्यासाठी भीष्म लवाजमा घेऊन थेट गांधारदेशात पोचला. म्हणजे आजच्या अफगानिस्तानाच्या आसपास. हस्तिनापुर म्हणजे दिल्ली. दिल्लीच्या जवळचं स्थळ का नाही पाहिलं? कारण युवराज अंध आहे हे इथल्या जवळपासच्या देशांत माहीत होतं. भीष्माने सोळा वर्षांच्या गांधारीला आपल्या नेत्रहीन पुतण्यासाठी मागणी घातली. गांधारराज हुरळले आणि लग्नाला तयार झाले. एवढ्या मोठ्या कुरुकुलाची मागणी कशी आणि का नाकारायची..?? लग्नाच्या तारखा ठरवून भीष्म हस्तिनापुरी परतला. हलकट माणूस..!!

ठरलेल्या मुहूर्तावर गांधारराजाचं सगळं लटांबर हस्तिनापुरकडे निघालं. तिथे लग्न व्हायचं होतं. खरं तर त्याकाळातही लग्न मुलीच्या घरी होत असे.. पण कुरुकुलाच्या प्रतिष्ठेचा दबाव आणून भीष्माने टाकलेला हा दुसरा डाव होता. लग्नात मुलीकडच्या लोकांना कळलं की आपला जावई नेत्रहीन आहे. पण त्यांच्या सिच्युएशनचा विचार करा. एकतर, लग्नाचे काही विधी झालेले असणार. शिवाय ते लोक आपल्या देशापासून शेकडो मैल दूर आणि कुरुकुलाचा दबदबा. सगळं गांधार कुटुंब लग्नासाठी आलेलं असणार, त्याची सुरक्षितता पण महत्वाची होती. आपल्या भावांना बायको मिळावी म्हणून याआधी भीष्माने लढाया केल्या होत्या. त्यात काशी नरेशाची मुलगी अंबा हिचा हकनाक बळी गेला होता. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून गांधार राजाने मान तुकवली. आणि सुकुमार गांधारीचा बळी गेला. तिचं आणि धृतराष्ट्राचं लग्न झालं.

सोळा वर्षाची ती पोर. अशी कितीशी अक्कल असणार तिला..?? शिवाय संताप. तिने धृतराष्ट्राला धडा शिकवण्यासाठी पहिल्याच रात्री संतापून जाऊन डोळ्यांवर पट्टी बांधली. कुरुकुलाने लगेच ती किती पतिव्रता आहे, असा गवगवा केला (राजेशाही कुटुंबात हा तरबेजपणा तेव्हाही असायचा.) आणि गांधारी बिचारी आपल्याच प्रतिमेत बंदिस्त झाली. भीष्माने सत्यवतीच्या मार्फत तिची समजूत काढण्याऐवजी, ‘ती पतिव्रता आहे म्हणून डोळ्यांना पट्टी बांधली तिने,’ अशी दवंडी पिटवून तिच्या नावामागे ‘देवी’ ही उपाधी लावून तिला ‘गांधारीदेवी’ केलं. पण, पतिपरायण म्हणून तिने हे केलेलं नव्हतं. तसं असतं तर हे असलं काहीतरी करण्याऐवजी ती नवऱ्याचे डोळे झाली असती. पण तिने स्वाभाविक विद्रोह केला, सोळा वर्षाच्या अजाण पोरीचा तो संताप होता. आणि नेमकं हेच सत्यवती आणि भीष्म या पट्टीच्या राजकारणी लोकांनी ओळखलं. ही मुलगी जाब विचारेल, डोईजड होईल हे त्यांना कळलं आणि तिला दाबून टाकण्यासाठी तिला पतिव्रतेच्या मखरात बसवलं. आपणही काहीही विचार न करता हे मान्य केलंय. सोळा वर्षाची ती मुलगी तेव्हा चुकली, आपण सगळे अजून तेच खरं मानून चूकच करतोय. गांधारीचं मन किती तडफडत असेल..!! तेव्हा तिने डोळ्यांवर पट्टी बांधली नसती तर मुलांवर लक्ष ठेवलं असतं. जसं कुंतीने ठेवलं होतं. मार्गदर्शक म्हणून विदुर, भीष्म, द्रोणाचार्य वगैरे बडी धेंडं होतीच. पण ते नाही घडलं.

बहिणीचा नवरा आंधळा आणि तिने डोळ्याला पट्टी बांधलेली. त्यामुळे शकुनी तिथेच राहिला. तुम्हीच सांगा, सोळा वर्षांची राजकन्या.. या घरात तिच्या ओळखीचं कुणी नाही.. माहेर शेकडो मैल दूर.. शिवाय माहेर या लोकांपेक्षा सर्वार्थाने थोडं कमी प्रतीचं.. सासरच्या मंडळींचा पूर्ण आर्यावर्तात दबदबा.. आणि ज्याच्या खांद्यावर डोकं टेकायचं तो आंधळा. धोक्याने लावलेले लग्न.. या सिच्युएशनमध्ये कुठल्या भावाचा पाय निघेल..?? त्यानंतर कौरव-पांडव मोठे झाल्यावर तर या कुटुंबावर आणखी एक अन्याय झाला.. धृतराष्ट्र आंधळा म्हणून पंडू राज्य करत होता. पंडूनंतर ते राज्य कुणाचं होतं? पांडवांचं..?? नाही..!! पंडू फक्त ‘केअरटेकर’ होता, न्यायाने विचार करा, ते राज्य पंडूच्या मुलांना का बरं मिळावं? राज्य दुर्योधनाचं होतं. मग दुर्योधनाचा मामा शकुनी चिडणार नाही..?? आधीच त्याच्या बहिणीवर अन्याय, नंतर भाचरांवर अन्याय..!! या लोकांमुळे स्वत:चा देश सुटलेला.. अशा परिस्थितीत काय अपेक्षा करायची शकुनीकडून..??

शकुनीच्या हातातले फासे दिसत होते, कृष्णाचे डाव दिसत नव्हते. कौरवांची एक चूक मात्र त्यांना नडली. द्रौपदीचा भरसभेत झालेला अपमान..!! कृष्णाने तिला साड्या पुरवल्या वगैरे सगळ्या नंतर घुसवलेल्या भाकडकथा आहेत. रजस्वला द्रौपदी भरसभेत निर्वस्त्र केली गेली तिने आपल्या लांबसडक केसांनी स्वत:ला कसंबसं झाकलं. म्हणूनच भीमाने शपथ घेतली.. त्याची शपथ नीट वाचा, “माझ्या प्रिय द्रौपदीचे केस भरसभेत तिच्या अंगच्या रक्ताने माखले, ते आता दुर्योधनाच्या रक्तानेच धुवून मग विंचरले जातील.” काटा आला ना बायांनो अंगावर?? ही एक चूक कौरव पक्षाला जड गेली. या घटनेनंतर माझ्यासारख्या सम्यक विचार करणाऱ्या वाचकांचीही सगळी सहानुभूती पांडव पक्षाकडे जाते. आपल्या मुलांनी असं केलंय, हे कळल्यावर गांधारीने विलाप केला होता. “माझ्या मुलांनी सतीचा शाप घेतला, आता कुरुकुल वाचणार नाही.” त्या दिवशी तिला कळलं असेल की आपण डोळ्याला पट्टी बांधून केवढी मोठी चूक केली. तिचं चुकलंच होतं..!! पण ती अजाण होती..!!

सगळा घटनाक्रम महाभारतातला आहे. त्याचा वेगळा अर्थ मी लावला आहे. हा काही माझा एकटीचा विचार नाहीये. या विचारधारेला मानणारा एक मोठा वर्ग आहे, मी त्यातली एक. माझं कुठे चुकत असेल तर मला सांगा. अर्थात, माझ्याकडे त्याची उत्तरं आणि काउंटर क्वेश्चन्स असतीलच.

[email protected]