राधाबाई बुधगावकर नाट्य संच: रंजन-प्रबोधनाची विलक्षण कहाणी

 

साभार: दिव्य मराठी

-अविनाश दुधे

राधाबाई बुधगावकर आणि नाट्यसंचाने जवळपास ७५ वर्ष रंगभूमीची सेवा केली. या कालावधीत त्यांनी ५० हजारापेक्षा अधिक नाट्यप्रयोग सादर केले. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीच बुधगावकर कुटुंब आदिलाबादला स्थायिक झाल्याच्या कारणाने महाराष्ट्राने या कलाकार कुटुंबाला कधी सन्मानित केले नाही. कलाकारांना मिळणारे निवृत्ती वेतनही त्यांच्या वाट्याला आले नाही. मराठीत कला सादर करतात म्हणून आंध्रप्रदेशानेही त्यांची दखल घेतली नाही.

…………………………………………………………….

‘राधाबाई बुधगावकर आणि नाट्यसंच’ म्हटलं की महाराष्ट्रातील चार पिढ्यांची मन झंकारून उठतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ज्या काळात मनोरंजनाची कुठलीही साधनं नव्हती त्या काळात राधाबाई आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब राज्याच्या कानाकोपऱ्यात विनोदी आणि प्रबोधनकारी नाटिका घेऊन फिरत असत. ज्या गावात बस सुद्धा जायची नाही अशा गावात राधाबाई बुधगावकरांचा संच १५-२० दिवस ठाण मांडायचा. ग्रामीण महाराष्ट्राला नाटक या प्रकाराची ओळखच राधाबाईंच्या संचाने करून दिली. ज्या काळात नाटक, लावणी हे प्रकार थिल्लर मानले जायचे त्यावेळी त्यांच्या नाटकांना मोठ्या संख्येने महिला येत. हुंडाबंदीवरील ‘सदूचे लग्न’, व्यसनमुक्तीवरील ‘ऐका हो ऐका… दारूची गोष्ट ऐका’, द्विभार्या कायद्याच्या प्रचारासाठी ‘दोन बायकांचा दादला’, भ्रष्टाचार विरोधातील ‘टेबेवाडीचे सरपंच’, आंतरजातीय विवाह विषयावरील ‘लाडाची मैना’ अशा अनेक नाटकांमधून राधाबाई बुधगावकर व कुटुंबीयांनी महाराष्ट्राचे मनोरंजन केले. सामाजिक प्रबोधन केले. एक दोन वर्षे नव्हे तर तब्बल ७५ वर्षे हा वसा त्यांनी जोपासला.

   अभिनय, नृत्य, लावणी व गायनाने सात दशक रंगभूमीची सेवा करणाऱ्या राधाबाईंच्या आयुष्याची कहाणी मोठी विलक्षण आहे. महाबळेश्बरनजीकच्या पसरणे येथील राधाबाई एका कलापथकात लावणी सादर करायच्या. त्यांचा आवाजही अतिशय सुरेल होता . एकदा त्यांचे कलापथक तेव्हाच्या सातारा संस्थानातील बुधगाव येथे असताना तेथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दामोदर जोशी यांनी या कलापथकाला विरोध केला. गावातील तरुणांवर लावणीचा वाईट परिणाम होईल, असे सांगून त्यांनी गावकऱ्यांना एकत्रित केले. मात्र त्यांच्या एका मित्राने तू एकदा राधाबाईंचं गायन ऐक , मग काय विरोध करायचा तो कर, असे त्यांना सांगितले. दामोदर जोशींना संगीताची, लेखनाची आवड होती. त्यामुळे मित्राच्या आग्रहाखातर ते कलापथक पाहायला गेले. राधाबाईंच्या गायनाने, व्यक्तिमत्वाने ते चांगलेच प्रभावित झाले . काही दिवसातच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काहीशी ‘पिंजरा’ सिनेमासारखी ती कहाणी होती. दामोदर जोशी हे सातारा संस्थानात राज जोतिष्य असलेले विनायक जोशी यांचे चिरंजीव होते. स्वाभाविकच १९२५ साली ब्राह्मण मुलगा आणि अन्य जातीतील मुलगी अशा या विवाहामुळे प्रचंड खळबळ माजली .त्यांना मोठा विरोध झाला. समाजाने त्यांना वाळीत टाकले. त्यांना सातारा जिल्हा सोडावा लागला.

      उपजीविकेसाठी करायचे काय म्हणून राधाबाईंनी स्वतःचे कलापथक स्थापन केले. दामोदर जोशी लावण्या लिहायचे आणि राधाबाई आणि अन्य कलाकार गायन आणि नृत्य सादर करायचे. मात्र सातारा व लगतच्या जिल्ह्यांमध्ये दामोदर व  राधाबाईंच्या प्रेमविवाहाची कहाणी कर्णोपकर्णी झाली असल्याने त्यांना ठिकठिकाणी विरोध व्ह्यायचा . शेवटी त्यांनी तो परिसर सोडून निजामाच्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला. निजामाच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठी भाषिक प्रदेशात या जोडप्याने आपले कलापथकाचे प्रयोग लावण्यास सुरुवात केली. समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांबाबत प्रबोधन होईल आणि सोबतच कुटुंबातील सर्वांना प्रयोग पाहता येईल, अशा स्वरूपाच्या छोटया नाटिका दामोदर जोशींनी लिहिण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांना उत्तम प्रतिसाद मिळायला लागला.  याच दरम्यान वेगवेगळ्या जिल्ह्यात भटकंती करताना यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेल्या पूर्वीच्या आंध्रप्रदेश व सध्याच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद या छोटेखानी शहरात त्यांनी १९४८ मध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.  पावसाळा संपला की राधाबाई व दामोदरराव संपूर्ण कुटुंब व अन्य कलाकारांसह  बाहेर पडायचे . त्यानंतर सलग आठ महिने ते वेगवेगळ्या गावात प्रयोग करायचे . जूनमध्ये  पाऊस सुरू झाल्यावरच ते आदिलाबादला परतायचे.

या दाम्पत्याला श्रीरंग, पांडुरंग , श्रीकृष्ण , विष्णुपंत, रामचंद्र, विजया, सुलोचना , शकुंतला , शालिनी व सुमती अशी एकूण दहा मुलं-मुली झालीत. उपजत कलागुण असलेली ही सगळी मुलं नकळतपणे राधाबाई बुधगावकर नाट्यसंचाचा भाग झाली. या मुलांपैकी श्रीकृष्ण जोशी हे ‘सदूचे लग्न’ या नाटिकेत बारीकरावची भूमिका करत असे. ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळाळून हसवित . ‘सदूचे लग्न’ या नाटिकेचे तब्बल दहा हजार प्रयोग झालेत. ही नाटिका भालजी पेंढारकर यांना अतिशय आवडली होती . त्यावर मराठी सिनेमा काढण्याचा विचार त्यांनी केला होता . पण काही कारणांनी तो बारगळला. राधाबाईंची बाकी मुलंही कलाकर होती . कोणी  हार्मोनियम, तबला , कार्डियन वाजवत तर  मुली अभिनय, गायन व नृत्यात सहभागी होत असत. थोरली मुलगी विजयाने ‘शिलंगणाचे सोने’ या चित्रपटात काम केलं आहे. १९६०च्या दशकात आलेल्या ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटात राधाबाई बुधगावकर व त्यांच्या मुलामुलींनी काम केले होते.

  १९८४ मध्ये राधाबाईंचे निधन होईपर्यंत हा नाट्यसंच तुफान फॉर्मात होता. गावोगावीच्या जत्रांमध्ये या नाट्यसंचाला खूप मागणी असायची . राधाबाईंना पाहायला व ऐकायला जबरदस्त गर्दी होत असे . त्यांच्या लावणी व पोवाड्याच्या रेकॉर्डही निघाल्या होत्या. राधाबाई गेल्यानंतर त्यांच्या मुलामुलींनी २००६ पर्यंत हा नाट्यसंच जिवंत ठेवला. दरम्यानच्या काळात जग खूप बदललं. घरोघरी  टीव्ही आला. जत्रा –यात्रांची गर्दी ओसरली.  प्रेक्षकांची संख्या कमी झाली. नुकसान वाढू लागले. शेवटी  २००६मध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शेवटचा प्रयोग करून या नाट्यसंचाने विराम घेतला.

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे  संपादक आहेत)

८८८८७४४७९६

Previous articleएकाकीपणाच्या मुळाचा अवघड शोध
Next articleगांधारी..तिचं चुकलंच..!! पण ती अजाण होती..!!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.