-राज कुळकर्णी
इंदिराजींची हत्या झाली तेंव्हा मी तिसरीला होतो आणि दिवाळी सुट्टीसाठी म्हणून माझ्या आजोळी खेड या गावी होतो. पण त्या दिवशीची स्मृती अजूनही माझ्या मनात आहे.
संध्याकाळची पाच सहाची वेळ होती आम्ही घरातील कांहीजण गावातील आबादानी नावाच्या भागातील एका सोनार आजोबाच्या घरी विठोबाच्या दर्शनाला गेलो होतो. येताना मारूती मंदिरात दर्शनासाठी गेलो. नन्नी म्हणजे आई आणि शैला मावशी घरी गेल्या आणि मी मंदिरा जवळच्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली मित्राबरोबर थांबलो. तीथे एका रेडीओजवळ वीस पंचवीस माणसांचा घोळका होता. त्यावेळी समजलं इंदिरा गांधींना गोऴ्या घालून मारलं. इंदिरा गांधी कोण आहेत, काय आहेत हे कांही समजत नव्हतं. पण कांही तर गंभीर घडलंय एवढंच समजलं! लोक हळू हळू मारूती मंदिरापाशी गोळा होऊ लागले, सर्वजण याचीच चर्चा करत होते. अंधार पडू लागला तसे आम्हा पोरांना त्या सर्व लोकांनी घरी हाकालले. आम्ही घराकडे पळालो. घरी गेलो तर धनुमामा रेडीओ ऐकत बसला होता आणि घरातील सर्वजण रेडीओ शेजारी बसले होते. ‘इंद्रा गांधीला मारलं’ अशी चर्चा होती. तेवढ्यात गुरं घेऊन सालगडी नाना गुराच्या वाड्यात आले. तेही ओसरीपाशी येवून बसले.
सातच्या बसने माझे आजोबा आण्णा आले आणि मग हळू हळू ढाळजत अनेक लोक जमा होऊन, यावर चर्चा सुरू झाली. इंदिराजींच्या हुशारीवर एवढा सर्वसामान्यांचा विश्वास होता की ज्यांना मारलं त्या ख-या इंदिरा गांधी नव्हत्याच, असेही कांही जण म्हणायचे. इंदिराजींची हत्या झाली त्यावेळी आम्हांला जेवायला घातलं पण आमच्या आण्णांनी मात्र जेवण केलेच नाही. ‘बाई मोठी कर्तृत्ववान होती’ असे ते म्हटल्याचे मला आठवते. पुढे मी आठवीला गेल्यावर नेहरू वाचले त्यांच्या बरोबर त्यांची मुलगी म्हणून इंदिराजींबद्दल वाचले ते तेवढेच पण त्यांचे कर्तृत्व समजायला सोऴा वर्ष लागली. मात्र इंदिराजींचे कार्य व कर्तृत्व नेहरूंची मुलगी असे न पाहता स्वतंत्र राजकीय व्यक्तीमत्व म्हणून पाहू सन २००० पासून पाहू लागलो ते वाचनातून!
इंदिरा गांधींवर कुमार केतकर, पिपुल जयकर, जयराम रमेश, पी.सी.आलेक्झांडर रामचंद्र गुहा, इंदर मल्होत्रा, अनिता इंदर सिंग यांची पुस्तके वाचली. त्याच प्रमाणे मधु लिमये यांनी सौहार्द या पुस्तकात ‘मोहीनी अट्टम’ हा इंदिराजीवर लिहीलेला लेख वाचला. प्रभाकर कुंटेंच्या ‘माझे जीवन राजकारण’ याचेही वाचन केले. या शिवाय महत्वपुर्ण म्हणजे नेहरूंनी इंदिराजींना लिहीलेली स्वतंत्र पत्रे आणि इंदिराजींनी नेहरूंना लिहीलेली पत्रे वाचली. ‘लेटर्स ऑफ डॉटर’ हा ग्रंथ सोनिया गांधींनी संपादीत केला आहे आणि तो वाचनिय आहे. ए.सी.एन.नंबीयार यांच्यावर ‘ A life in Shadow- The secret story of ACN Nambyar – a forgotten anticolonial warrior’ हे वल्लाप्पा बालचंद्रन यांचेही पुस्तक वाचले. विशेषत: हे पुस्तक इंदिराजी आणि नेताजी बोस यांच्या स्नेहपुर्ण सबंधावर भाष्य करणारे आहे. इंदिराजी आणि नंबीयार यांचा पत्रव्यवहार हा १९३६ च्या व्हिएन्ना पासून ते त्यांची हत्या होण्याच्या केवळ दहा दिवस आधीपर्यंतचा आहे. नुकतेच मला ‘Two faces of Indira Gandhi’ हे उमा वासुदेव यांचे पुस्तक मिळाले आहे मात्र ते अद्याप वाचले नाही. पण इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारोह समितीचा आयोजन समितीचा सदस्य म्हणून गेल्या वर्षभरात इंदिराजींची आणखी नवी ओळख झाली. त्यातून इंदिराजींची केवळ नेहरूंची कन्या ही ओळख पुर्णपणे पुसली गेली. त्या स्वयंप्रतिभावान अशा नेत्या होत्या.
नेहरूंच्या विचारांचा वारसा व प्रभाव असूनही त्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाच्या होत्या! नेहरूंचा लढा स्वातंत्र्यपुर्व काळात परकीय शक्तींशी होता व स्वातंत्र्योत्तर काळात ज्यासाठी स्वातंत्र्य मिळवले त्या उद्दिष्टांची पुर्तता करताना विरोधक निष्प्रभ होते. पण इंदिराजीसमोरची आव्हाने ही देशातील अशी विरोधकांची होती जे इंदिराविरोधासाठी कांहीही करण्यास उत्सुक होते. त्यामुळे इंदिराजींचा संघर्ष जास्त कठिण होता.
इंदिरा गांधीं मोरारजी देसाईंना कॉग्रेस अंतर्गत झालेल्या निवडणूकीत पराभूत करून २४ फेब्रुवारी १९६६ रोजी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. त्यावेळी नुकतीच त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. व्ही.के. नारसिंम्हन त्यांच्या ‘Kamraj-A study’ या पुस्तकात म्हणतात “ ……. there was general welcome to her election not only as Nehru’s Daughter but also as a Leader in her own right” परंतु नेहरू प्रमाणेच इंदिरा गांधींनाही पक्षातून सतत विरोध होत राहीला.सन १९६७ सालीच जुनी कॉंग्रेस म्हणून के.कामराज यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींना विरोध करण्याचे धोरण आखले गेले होते. कॉंग्रेस (आर) हा पक्ष इंदिराजींचा समर्थक होता. मोरारजी देसाई , निजलिंगप्पा, के. कामराज हे इंदिराजीच्या विरोधात होते. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ‘The Dramatic Decade- The Indira Gandhi Years’ या ग्रंथात याबद्दल खूप विस्तृत वर्णन केले आहे.
इंदिरा गांधी यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना ही बाब आवर्जून दुर्लक्ष केली जाते की, प्रत्येक वेळी मूळ कॉंग्रेस म्हणून ओळखल्या जाणा-या कॉग्रेससोबत संघर्ष करत त्यांनी स्वतंत्र यश मिळवलेले आहे. नेहरू १९५४ ला अध्यक्ष झाल्यानंतर हे पद १९५५ पासून १९५९ पर्यंत यु.एन.ढेबर यांच्याकडे होते, त्यानंतर १९६०, १९६१ आणि १९६३ नीलम संजीव रेड्डी हे अध्यक्ष होते तर १९६४ पासून १९६७ पर्यंत के.कामराज अध्यक्ष होते. हे सर्वच नेते इंदिराजींचे विरोधक होते ! पुन्हा १९६८ आणि १९६९ रेड्डी हेच अध्यक्ष होते. या काळात कॉंग्रेस वर दक्षिणात्य नेत्यांचा वरचष्मा होता आणि हे सर्व इंदिरा गांधींचे विरोधक होते. माजी केंद्रीय मंत्री के.नटवर सिंग यांनी त्यांच्या ‘ One life is not enough’ पुस्तकात लिहिले आहे की, ‘From 1966 to 1969- Indira Gandhi was in office but not in power. The actual power rested in the hands of Syndicate- S.Nijlingappa, Atulya Ghosh, K.Kamraj, Morarji Deasi and S.K. Patil’ म्हणजे पंतप्रधान असूनही त्या पक्षात नेहरूंप्रमाणेच कमजोरच होत्या!
उत्तर भारतात कॉंग्रेसची अवस्था अतिशय बिकट होती, म्हणून कॉंग्रेसला उत्तर भारतीय नेता हवा होता , जो केवळ बाहुला (Puppet) म्हणून काम पाहू शकेल. इंदिरा गांधी यांचा ‘गुंगी गुडिया’ हा उल्लेख याच वेळेचा आहे. म्हणजे नेहरू या नावाचे ‘गुडवील’ वा ‘ब्रँड’ वापरून त्यांना सत्ता मिळवायची होती परंतु अंकुश मात्र स्वत:चा ठेवायचा होता. वास्तविक इंदिरा गांधी स्वातंत्र्यपुर्व काळापासून कॉग्रेस मधे कार्यरत होत्या आणि भारत छोडो आंदोलनात त्यांनी कारावासही भोगला होता. त्यांचे हे वैयक्तिक योगदान होते. हे पाहता खरेतर या इंदिरा विरोधकांना नेहरू-गांधी परीवारावर घराणेशाहीचा आरोप करण्याचा नैतिक अधिकारच नाही! कारण स्वहित पाहताना इंदिराजीचे स्वतंत्र अस्तित्व त्यांना मान्यच नव्हते!
इंदिरा गांधी १९६७ ला झालेल्या निवडणुकी नंतर पुन्हा पंतप्रधान झाल्या , तेंव्हा कॉंग्रेसच्या २८४ खासदारांपैकी त्यांना केवळ २११ खासदारांचा पाठींबा होता, डाव्या पक्षातील खासदारांच्या पाठींब्यावर त्यांचे सरकार उभे होते. पुढच्या तीन वर्षात पक्षातील प्रभावशाली नेत्यांनी अडचणी निर्माण केल्यावर त्यांनी २७ डिसेंबर १९७० रोजी लोकसभा विसर्जित करून पुन्हा जनतेसमोर जाण्याचे ठरवले. मूळ कॉंग्रेस पक्षाचे ‘बैल-जोडी’ चिन्ह त्यांना मिळाले नाही कारण ते संघटना कॉग्रेसने स्वत:कडे ठेवले होते. इंदिरा गांधींनी मुळ कॉग्रेसचा त्याग करत कॉग्रेस (जगजीवनराम) या पक्षासाठी ‘गाय वासरू’ हे चिन्ह घेवून निवडणूक लढवली आणि ३५० जागांसह जिंकली. इंदिरा-जगजीवनराम कॉंग्रेसने संघटना कॉंग्रेसला पराभूत केले होते. अतिशय अल्पकाळातच त्यांनी स्वतःचा वेगळा असा ठसा आणि वेगळी ओळख निर्माण केली ,जी जवाहरलाल नेहरूंच्या कन्या या पेक्षा पुर्णत: स्वतंत्र आणि वेगळी अशी निर्माण झाली होती!
इंदिरा गांधी यांनी स्वतःचा स्वतंत्र असा प्रभाव निर्माण केला होता, इथेच खरेतर घराणेशाही हा मुद्दाच इथे नष्ट झाला होता! गमतीचा भाग असा की,इंदिरा गांधी नेहरूंच्या कन्या म्हणून जेंव्हा प्रचारादरम्यान त्यांचा उल्लेख इंदिरा नेहरू असा कोणी केला तर त्यावर विरोधकांकडून टीका केली जायची की, विवाहानंतर नाव बदलते मग इंदिराजींनी नेहरू हे नाव का लावावे? अगदी हाच प्रत्यय प्रियांका गांधी म्हटल्यावर हल्ली फेसबुकवरही येतो ! वास्तवात कॉंग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेंव्हा, पक्षातील नेतेच पुन्हा पक्षाला गांधी-नेहरू घराण्याचा आश्रयाला घेवून गेलेले आहेत! जवाहरलाल नेहरू १९५४ मध्ये अध्यक्ष होते ,त्यानंतर हे पद इंदिरा गांधी यांना तब्बल २४ वर्षांनी १९७८ साली मिळाले हे विशेष !
‘बैलजोडी’ सोडून मिळवलेले ‘गायवासरू’ हे चिन्हही पुन्हा त्यांना सोडावे लागले आणि इंदिरा कॉंग्रेस स्थापन झाल्यावर ‘हात’ या चिन्हांसह त्यांनी पुन्हा विजय मिळवला! यावरून इंदिरा गांधींची राजकीय नेता म्हणून ओळख आणि लोक स्वीकृती हे स्वतंत्र होती, हेच स्पष्ट होते. प्रत्येक वेळी स्वतःच्या नवीन पक्षाच्या नवीन चिन्हावर निवडणुका जिंकून आल्यावर पुन्हा मुळ कॉंग्रेसचे म्हणवणारे नेते इंदिराजीकडे गेले आहेत, या खूप मोठा अर्थ लपलेला आहे!
इंदिराजीकडे जे लोक केवळ नेहरूंची मुलगी म्हणून पाहतात. कारण त्यांना घराणेशाहीचा आरोप नेहरूंवर करायचा असतो. तर कांही प्रखर लोकशाहीवादी जवाहरलाल नेहरूंच्या विचारांना तिलांजल्या देणा-या वृत्तीच्या नेत्या म्हणूनही पाहतात आणि पुन्हा घराणेशाहीचा आरोपही करतात. आपल्या वडिलांनी कॉग्रेससाठी कार्य केले देशासाठी कारावास भोगला म्हणून नेहरूंच्या त्याच कर्तृत्वावर त्या स्वार झाल्या, असं म्हणणा-या अनेकांना हे माहीत नसते की त्यांनी स्वतंत्रपणे अडीच वर्ष कारावास भोगला आहे. नेहरू स्वातंत्र्यसंग्रमात वयाच्या २७ व्या वर्षी आले मात्र इंदिराजींचा सहभाग हा वयाच्या १३ व्या वर्षापासून आहे. त्यांचं बालपण देखील स्वातंत्र्यसंग्रमात होरपळून निघालेले आहे . नेहरूंनी आयुष्याच्या सुरवातीचा एक कालखंड तरी सुखात काढला, पण इंदिरेने बालवयातही पारतंत्र्याच्या झळा सोसल्यात. हजारो भारतीयांचे कल्य़ाण पाहणा-या बापाचा सहवास एक बाप म्हणून त्यांना कधीच मिळाला नाही. विशेष म्हणजे नेहरूंच्या हयातीत इंदिराजी ना राज्यसभेच्य़ा सदस्य होत्या ना लोकसभेच्या! त्यातूनच विलक्षण असे धाडसी व्यक्तीमत्व तयार झाले आहे. ज्याचा ठसा त्यांनी भारतीय अथवा भारतीय उपखंड नव्हेतर जगाच्या राजकारणावर निडरपणे उमटवलेला आहे.
इंदिराजींनी आणीबाणी लागू करताना त्याची पार्श्वभुमीही पहायला हवी. ती न पाहता अनेकजण टिका करतात. तीची उद्दिष्टे चांगली होती मात्र तीची अंमलबजावणी करताना अनेक चुका झाल्या. त्याचा परीणाम त्यांना भोगावा लागला. आणीबाणी उठवून निवडणुका जाहीर करण्यापुर्वी त्या त्यांचे अध्यात्मिक गुरू जे. कृष्णमुर्तींना भेटल्या त्यावेळी त्यांनी ‘ You are for the people and from the people, so go to the people again’ असा सल्ला दिला अशी माहीती महेश भट्ट यांच्याकडून मिळाली. इंदिराजी त्यावेळी पराभूत झाल्या पण जनतेने पुन्हा त्यांना सत्तेवर आणले. कारण देश त्यांच्याच हाती सुरक्षित असेल अशी जनतेची प्रबळ धारणा होती हेच पुन्हा स्पष्ट झाले.
आज इंदिराजींना आपल्यातून जावून ३४ वर्ष झाली. पण आजही इंदिराजींबद्दलची लोकांच्या मनातील भावना तशीच आहे. इंदिराजींनी भारतातील नव्हेतर, भारतीय उपखंडांतील महिलांना राजकारणाची व नेतृत्वाची प्रेरणा दिली. श्रीलंकेत बंदारनायके यांच्या रूपात सर्वप्रथम महिला नेतृत्व पुढे आले असले तरीही संघर्षाची प्रेरणा ही इंदिराजींचीच आहे, हे अगदी बेनझीर भुत्तो, शेख हसीना यांनीही त्यांच्या लेखनात मान्य केले आहे. एवढंच काय तर आजही, नळावरील भांडणात एखादी स्त्री पुढारपण करू लागली की, अगदी भांडतानाही महिला म्हणतात ‘ हो आलीय मोठी इंद्रा गांधी ‘! जनसामान्य महिलांच्या मनात नेतृत्व म्हणजे इंदिरा गांधी हा मापदंड आजही पक्का आहे!
इंदिराजीनंतर भारताने अनेक उलथापालथ अनुभवली आहे. पण आताचा कालखंड तर खूपच बिकट असा आहे, कारण लोकशाही मार्गाने निवडले गेलेले सरकार लोकशाहीचा अर्थ ‘बहुसंख्यकांची हुकूमशाही’स असा गृहीत धरून लोकशाहीच्या मुळ संकल्पनेस उध्वस्त करू पाहतंय. तेंव्हा आपल्या प्रत्येकात असणा-या इंदिराजींना पुन्हा जागृत करायचे आहे. जनसामान्य लोकांच्या मनात ते स्फुलिंग आहेच फक्त आपण त्याची मशाल बनवणे गरजेचे आहे.
इंदिराजींच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आणि त्यांच्या उत्तुंग कार्यास विनम्र अभिवादन.
©(लेखक नामवंत अभ्यासक व वक्ते आहेत)