#आयडिया_ऑफ_इंडिया

– आनंद शितोळे

आपल्या देशाची देश म्हणून नेमकी ओळख कधी सांगता येते किंवा मिळाली ?

अगदी सिकंदराच्या आक्रमणापूर्वीही हा देश नेमका कसा होता ?

पाच दहा गावांची जहागिरी असलेला जहागिरदार आपल्याला राजा समजायचा.
अशी हजारापेक्षा जास्त राज्य असलेला देश म्हणजे एक कडबोळ होता.

लढवय्या जमाती, सुबत्ता, बुद्धिमत्ता हे सगळ असताना सात आठशे वर्षे मुघलांनी आणि नंतर दोनशे वर्षे ब्रिटीशांचा अंमल ह्या देशावर का राहिला ?

सातवाहन, चोल, चालुक्य, मौर्य, गुप्त , देवगिरी हि साम्राज्य नेमकी कशामुळे लयाला गेली ?

इथल्या बहुतांशी राज्यकर्त्यांना रयतेची स्थिती ह्याविषयी फारशी चिंता कधीच नव्हती.

त्यांचा सगळा भर आणि उद्देश फक्त राज्यविस्तार आणि संपत्ती ह्याच दोन गोष्टींवर होता.

परिणामत: राज्यकर्ते आणि सामान्य जनता ह्यांच्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली जिथे संवादाचा अभाव होता.

त्याचा दुसरा परिणाम म्हणजे राज्यव्यवस्था देत असलेल्या शिक्षणावर अतिशय मोजक्या आणि राजाश्रय असलेल्या समूहांचा पगडा राहिला आणि बाकीची रयत रोजच्या जगण्याचा संघर्ष करत राहिली.त्यामुळे जातीव्यवस्था नावाची विषवल्ली प्रचंड वेगाने फोफावली.

हि भेदाभेदाने विखुरलेली जनता जेव्हा देशावर आक्रमण झाल तेव्हा हे आक्रमण राजावर आहे ,त्याचा आपला संबंध नाही म्हणून अलिप्त राहिली. जे राजांनी पेरल तेच उगवून वर आल आणि मुघलांनी आपल बस्तान बसवलं.

त्यानंतरही इथल्या संस्थानिक, सरदार, जहागिरदार,वतनदार मंडळींनी आपापल्या गाद्या सांभाळायला मुघलांशी जुळवून घेतल. मुघलांचीही नाळ जनतेशी जुळली नाही.

मध्ययुगीन भारतात रयतेचे हित महत्वाचे हा विचार घेऊन राज्य करणारी मोजकी नाव पुढ आली ज्यामध्ये शिवाजी महाराज सगळ्यात अग्रस्थानी होते.

नंतरच्या काळात मुघल स्थानिक झाले आणि बाकीचे आक्रमक आले , लढाया ,संघर्ष सुरूच राहिले ज्यामध्ये सामान्य रयतेचा सहभाग नगण्य राहिला.

मात्र मुघलांच्या नोकरीच्या, पैशाच्या आणि सत्तेच्या आमिषाला भुलून आणि त्याचवेळी इथल्या जातिभेदाच्या वागणुकीला कंटाळून मोठ्या संख्येने धर्मांतर होत राहिली.

राज्यव्यवस्था चालवायला मुघलांना वेगळे कष्ट करावेच लागले नाहीत.कारण त्यांना राज्यव्यवस्था बदलावी अशी गरजच वाटली नाही.

मात्र ब्रिटीश आल्यावर परिस्थितीत महत्वाचा बदल झाला.

ज्यावेळी ब्रिटीश भारतात आले त्या वेळी युरोपात रिनेसंस चे वारे वाहू लागलेले होते.नंतरच्या काळात आलेल्या औद्योगिक क्रांतीने ‘ ज्ञान हीच संपत्ती किंवा ज्ञानातून संपत्ती ‘ हि संकल्पना रुजलेली होती.

आधुनिक शिक्षणातून , ज्ञानातून इथल्या समाजात सुधारकांची फळी निर्माण व्हायला लागली.

ब्रिटीश सरकारला आपल्या राज्यकारभाराची गाडी चालवायला मोठ्या प्रमाणावर स्थानिक कनिष्ठ दर्जाची नोकरदार मंडळी लागत होती ज्यांना आधुनिक ज्ञान, विज्ञान ह्यांची माहिती असेल.

त्यांनी शिक्षणाच सार्वत्रिकीकरण केल आणि सगळ्या समाजातल्या लोकांना शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या.

त्याचे अपरिहार्य परिणाम झाले. जे जिथे जिथे युरोपियन वसाहती होत्या तिथे तिथे जगभर दिसून आले.

शिक्षणाची संधी मिळालेल्या स्थानिकांनी जगातल्या वेगवेगळ्या देशातले स्वातंत्र्य संघर्ष वाचले,अभ्यासले आणि आपापल्या देशातल्या लोकांत स्वातंत्र्यासाठी जागृती सुरु केली.

महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले , राजर्षी शाहुनी केलेला सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आणि बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या वाटचालीत असलेले अतिशय महत्वाचे टप्पे.

टिळक आणि आगरकरांचा आधी सुधारणा कि आधी स्वातंत्र्य हा टप्पा येऊन गेला.

या राजा राममोहन रॉय ते आगरकर ह्या काळात भारताची वाटचाल देश म्हणून हळूहळू होऊ लागली.

मात्र कॉंग्रेस च्या जन्मानंतर एक वेगळाच विचार संस्थानिकांच्या मनात बळ धरू लागला.

कॉंग्रेस ज्या तऱ्हेने अठरापगड लोकांना चळवळीत सामावून घ्यायला निघाली आणि ह्या समावेशाला गांधीजींच्या आगमनानंतर गती मिळाली त्यात पुढे जाऊन जर खरोखर स्वातंत्र्य मिळाल तर स्वतंत्र भारतात आपल स्थान काय हा प्रश्न राजे रजवाडे मनात विचारू लागले.

ह्या टप्प्यावर नवा संघर्ष उभा राहिला.

हजार दोन हजार वर्षे शिक्षणाची आणि पर्यायाने सत्तेची ,राज्यकारभारात स्थान असण्याची मक्तेदारी असलेला वर्ग , संस्थानिक आणि राजेरजवाडे ह्यांचा वर्ग एका बाजूला आणि सात नाही सत्तर पिढ्यात शिक्षणाचा गंध नसलेल्या अठरापगड जातींनी शिक्षणाच्या बळावर, तळमळीच्या, प्रामाणिक भावनेच्या बळावर स्वातंत्र्य चळवळीत मिळवलेल स्थान.

स्वातंत्र्य मिळाल आणि ब्रिटीशांचा कित्ता गिरवत लोकशाही भारतात आली तर त्यात आपल स्थान काय ह्या चिंतेने हा वर्ग हवालदिल झाला.

स्वातंत्र्य चळवळीत संस्थानिकांची भूमिका उघडपणे सरकारविरोधी असण्याच्या घटना दुर्मिळ असण्याच नेमक कारण हेच होत.

आणि इथूनच गांधीना विरोध सुरु झाला.

ज्यावेळी राजकीय क्षितिजावर जीना कुठेही नसताना, पाकिस्तानची मागणी सोडा नाव सुद्धा नसताना गांधीजींना मारण्याचे प्रयत्न झाले त्याच्यामागे वेगळी काय कारण होती ?

हा सगळा तपशील जगण फडणीसांच्या “ महात्म्याची अखेर “ ह्या पुस्तकात आलेला आहे.

ह्या धामधुमीत १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.सरदार पटेलांनी सगळे मार्ग वापरून सगळी संस्थान खालसा करून भारताची निर्मिती केली.

हा आधुनिक भारत ,त्याची देश म्हणून नेमकी ओळख कशी आहे ?

आधी आठ प्रांत होते मग ३१ राज्ये झालीत आणि काही केंद्रशासित प्रदेश.

६ प्रमुख धर्म आहेत.

६४०० जाती आणि १६१८ भाषा.
कुठे पाणथळ ,कुठे वाळवंट ,कुठे वर्षावन ,कुठे सागरकिनारपट्टी ,कुठे बर्फाळ प्रदेश कुठे उंच डोंगररांगा, कुठे विस्तीर्ण पात्र असलेल्या नद्या तर कुठे बारोमास दुष्काळ. ह्या भौगोलिक विविधतेने वेगवेगळे सण आणि अतिशय विभिन्न संस्कृती.

कालगणना सुद्धा वेगवेगळ्या.

३२०० किमी लांब आणि ३००० किमी रुंद असा अवाढव्य पसरलेला प्रदेश.

मग ह्या भारताची “ आयडिया ऑफ इंडिया “ नेमकी काय आहे ?

ह्या देशाचा प्रमुख धर्म हिंदू असला तरीही तो देशाचा अधिकृत धर्म नाहीये.आपला देश धर्मनिरपेक्ष आहे.

हिंदू धर्मातल्या अनेक गोष्टी न पटल्याने वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या दार्शनिकांनी नव्याने धर्म स्थापन केले.

बौद्ध,जैन,शिख,लिंगायत ह्या धर्मांच उगमस्थान भारत आहे.
बहुसंख्य मुस्लीम आणि ख्रिश्चन आहेत तसेच पारशीही आहेत.
वेगवेगळे पंथ किती ह्याचा हिशोबच नाही.

७००-८०० वर्षे मुघलांनी राज्य करूनही हा देश इस्लामिक झाला नाही आणि २०० ब्रिटीश असूनही हा देश ख्रिश्चन झाला नाही.

दुसऱ्या धर्माच्या माणसांच्या सोबत , वेगवेगळ्या जातीच्या माणसांसोबत आपापल वेगळेपण जपत सहकार्य आणि सहजीवन हा भारताचा आत्मा आहे.

भारत असा आहे.

एवढ्या अवाढव्य पसरलेल्या प्रदेशातली टोकाची विभिन्नता ,विविधता अद्भुत आहे.

हि विविधता भारताची ताकद, शक्ती असू शकते का ?

जगाच्या इतिहासात एक धर्म असलेले देश किंवा ज्या देशात एकाच धर्माचे लोक अतिशय मोठ्या संख्येने आहेत असे देश अगदी सहजतेने हुकुमशाही राजवटीच्या हाताखाली जाण्याचा धोका असतो जे अनुभवाने सिद्ध झालेलं आहे.

भाषा, धर्म, संस्कृती ,सणवार ह्या सगळ्यामध्ये असलेली विविधता प्रादेशिक अस्मिता आणि राजकीय मतभिन्नता जन्माला घालते.

असा विभागलेला देश एका मुद्द्यावर एकत्र आणायची कसरत किंवा कौशल्य अतिशय दुर्मिळ असतय.

असा प्रयोग करू पाहणाऱ्या माणसांची उद्दिष्ट तेवढी स्वच्छ आणि प्रामाणिक असतील तर आणि तरच हे शक्य आहे.

असा प्रयोग आजवर यशस्वी झाला तो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जेव्हा मोबाईल , न्यूज वाहिन्या , वर्तमानपत्र , टेलिफोन हि साधन अतिशय मर्यादित असूनही लोक एकत्र आले, जोडले गेले आणि ब्रिटीश राजवटीच्या विरोधात उभे राहिले.

आपल्यासोबत स्वतंत्र झालेला पाकिस्तान निम्म्यापेक्षा जास्तकाळ हुकुमशाही राजवट आणि उरलेला काळ लष्कराच्या हातातली बाहुली सत्तेत बघत आलाय.

मात्र नेहरूंनी विकासाची, विज्ञानवादी दृष्टीकोनाची जी वाट धरली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका रशिया च्या साठमारीत अलिप्त राष्ट्र परिषद निर्माण करून देशाला विकासासाठी उसंत मिळवली त्याचे परिणाम म्हणजे आजचा भारत.

संघाचा गांधीजी आणि नेहरू ह्यांना असलेला तीव्र आणि टोकाचा विरोध त्यांच्या दोघांच्या भूमिका हिंदुराष्ट्र निर्मितीला छेद देणाऱ्या होत्या म्हणूनच आहे हे समजल कि मग चित्र अजून स्पष्ट होत.

ह्या देशावर ज्यांना एकछत्री अंमल गाजवण्याची इच्छा आहे त्यांना आपली उद्दिष्ट लोकांना प्रामाणिक आहेत ,चांगली आहेत हे नुसत पटवून देऊन भागत नाही तर काळाच्या कसोटीवर ते सिद्ध कराव लागत.

जिथ असा प्रयत्न करणारी संघटना वर्णवर्चस्ववादी पुरुषांची संघटना असेल जी स्वतः च्या डोक्याने विचार न करता फक्त आदेश मानण्यावर विश्वास ठेवते तिथे अशा संघटनेची उद्दिष्ट प्रामाणिक असण लोकांना पटल तरीही ते सिद्ध करता आल पाहिजे. तर आणि तरच आपापल्या विविधता , अंतर्विरोध बाजूला ठेवून लोक एकत्र येऊ शकतात.

दुसरा मार्ग म्हणजे हि विविधता नष्ट करून एकसुरी ,छापील आणि साचेबद्ध ,ठोकळेबाज तऱ्हेने सरसकटीकरण करून त्यांना आपल्या मुशीत घडवून एकत्रित करायचं.

हे करण्यासाठी मग सगळे मार्ग अवलंबले जातात.

आपला म्हणून असणारा सोडून सगळे धर्म भंपक आहेत, खोटे आहेत, दुष्ट आहेत ,चुकीचे आहेत हे ठसवणे आणि भारतातली सगळी माणस मुळात आमच्याच एका धर्माची लेकर आहेत हे बिंबवणे.
एकाच धर्माचा नारा असला तरीही त्यातल्या जाती पोटजातीचा गुंता मात्र सोडवता सुटत नाही हेही खर.

हि विवीधत खुपते म्हणून सरसकटीकरण करण म्हणजे त्यांच अस्तित्व, इतिहास आणि संस्कृतीच्या खाणाखुणा पुसून टाकण्याच अघोरी काम आहे.
गेल्या काही वर्षात हा संघर्ष टोकदार होतोय कारण ह्या संघर्षाला असलेले अनेक पदर तेवढेच महत्वाचे आहेत.

भौगोलिक विविधतेने आलेली सांस्कृतिक, भाषिक भिन्नता नष्ट करून सगळीकड एकसारखी साचेबद्ध माणस नेऊन बसवली आणि वसवली कि मग अश्या ठोकळेबाज समूहावर पकड ठेवण आणि राज्य करण सोप असतय.

ह्या विविधता जपण्याचा प्रयत्न केला कि लोक तुम्हाला देशद्रोही ठरवतात.

गेल्या पाच वर्षात ब्रिटीश काळापासून संघाने हिंदुराष्ट्राच जपलेल स्वप्न प्रत्यक्षात आणायला तयारी सुरु केलीय.

हे हिंदुराष्ट्र मुळातच भारताच्या सहजीवन,सहकार्य ,साहचर्य ह्या गाभा असलेल्या प्रकृतीच्या जस विरोधात आहे तसच ते थेट देशाच्या राज्यघटनेच्या विरोधात आहे.

अनंतकुमार हेगडे सारखी मंडळी जेव्हा घटना बदलायची गोष्ट करतात तेव्हा त्यांच्या मनात नेमक काय आहे हे आपल्याला समजत नाही का ?

ह्या संघर्षाचा आवाका जास्त मोठा आहे.

कारण ज्यांना सपाटीकरण करायचं आहे त्यांनी हे विष पिढ्यान पिढ्या रुजवल, पेरलेल आहे.
त्या विषवृक्षाला लागलेली फळ किती विषारी आहेत त्याच उदाहरण आज पदोपदी बघायला मिळतय.
आमच्या विरोधातल मत असूच कस शकत किंवा आमच्या पेक्षा वेगळ मत अस्तित्वात असूच कस शकत हा उद्दामपणा म्हणजे ह्याच विषारी फळांची देणगी आहे.

हा संघर्ष समजून घेऊन भारताच अमुल्य वैशिष्ट्य असलेली विविधता जपण हे अवघड असल तरी अशक्य नाही.

हि विविधता ,बहुपेडी संस्कृती, खानपान,सणवार ,चालीरीती आत्मा असलेली आयडिया ऑफ इंडिया जपायला आपल्याकडे फक्त घटनात्मक मार्गच शिल्लक आहेत.

Previous articleदेवाच्या काठीला आवाज नसतो !
Next articleइंदिरा पर्व…..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.