– सानिया भालेराव
माणसाकडे असलेलं वरदान आणि शाप दोन्हीही खरं बघायला गेलं तर एकच आहे.. आठवणी! माणसाची स्मृती ही मला कायम एक विलक्षण गोष्ट वाटत आली आहे. आठवणींमध्ये रमणारे लोकं येडछाप असतात असं माझी एक मैत्रीण म्हणायची. सेल सायन्सेसमध्ये रिसर्च करत असताना स्मृती, आठवणी ह्यावर आमची जोरदार चर्चा चालायची. त्यावेळी सिलेक्टिव्ह मेमरी रिटेन्शन ह्या विषयवार मी बरेच रिसर्च पेपर वाचत असे. आपण केवळ प्रिय घटना स्मृतीमध्ये ठेवल्या तर आयुष्य सुंदर होईल असं माझी ही मैत्रीण नेहेमी म्हणायची याउलट मी आठवणींना असं कॅटेगराईझ करता येत नाहीच.. आठवणी नसतील तर माणूस आतून जिवंत राहू शकत नाही असं सर्व शक्तीनिशी म्हणून गड लढवत असायचे.
‘You can erase someone from your mind getting them out of your heart is another story’
‘तुम्ही एखाद्याला तुमच्या मनातून, आठवणीतून मिटवू शकता पण त्याला हृदयातून, आत्म्यातून नाहीस करणं ही सोपी गोष्ट नाही..
असा डायलॉग मारून एक दिवस आमच्या सरांनी ‘इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माईंड’ हा चित्रपट बघ आज होस्टेलवर गेलीस की असं म्हटलं आणि लव्हस्टोरीच्या पलीकडे असलेला हा नितांत सुंदर चित्रपट माझ्या आयुष्यात आला. अगदी आजही जेव्हा एखादी खोलवर खुपसून ठेवलेली आठवण वर डोकं काढायला बघते तेव्हा तिला मी हात देऊन वर काढते. तिच्या सोबत तिला हवा तेवढा वेळ घालवते. निवांत रडून घेते, थोडंसं स्वतःवर हसूनही घेते आणि मोठ्या प्रेमाने तिला आत सोडून येते.. हे सर्व शक्य होतं ते केवळ ह्या चित्रपटामुळे.. आणि म्हणून मला (बि)घडवण्यात ह्या चित्रपटाचा खूप मोठा वाटा आहे.
मिशेल गोंद्री (Michel Gondry) यांनी दिग्दर्शित केलेला “इंटर्नल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माईंड” हा चित्रपट आहे क्लेमेंटाइन(केट विंसलेट) आणि जोएल(जिम कॅरी) या कपलचा. काही वर्ष यांच्या नात्याला झालेली असतात पण एकमेकांशी न पटल्याने क्लेमेंटाइन आपल्या आठवणींतून जोएलला काढून टाकण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने मेडिकल प्रोसिजरद्वारे जोएलच्या सगळ्या आठवणी पुसून टाकते. जोएल मात्र ब्रेक अप कसबसं सहन करत असतो. त्याला एक दिवस क्लेमेंटाइन ने आपल्याला विसरण्यासाठी काय केलं आहे हे समजतं आणि मग तो देखील ही प्रोसिजर करून घ्यायला जातो आणि मग हा चित्रपट उलगडतो. चित्रपटात खूप गहिरे इमोशन्स आहेत, नात्याचा टाईम ट्रॅव्हल आहे, वरवर वाटते तशी टिपिकल लव्ह स्टोरी नसूनही प्रेमावर आणि नात्यावर अतिशय सुदंर भाष्य करणारा हा चित्रपट ह्याहून जास्त चित्रपटाच्या कथेबाबत सांगण्यात अर्थ नाही कारण हा चित्रपट म्हणजे एक अनुभव आहे. आठवणी पुसल्या जातात का, एखाद्या व्यक्तीला, नात्याला पुसणं शक्य आहे का आणि सायन्सच्या पलीकडे माणसाचं मन, त्याचा मेंदू आणि त्याचं हृदय आणि त्यामध्ये मुरलेलं नातं, प्रेम असं पुसून टाकता येत का.. अशा कित्येक बाबींवर हा चित्रपट आपल्याला विचार करायला लावतो आणि म्हणून तो अनुभवावा असा आहे.
दोन जीव एकत्र येतात, प्रेमात पडतात, एकत्र जगतात.. शरीरं एकत्र येतात, पॅशन, जीवघेणी ताटातूट, एकत्र येणं, एकमेकांशिवाय तळमळणं, पुन्हा शरीरांची सरमिसळ होणं हे सगळं होत असतंच. पराकोटीचं प्रेम असलं की एकत्र राहणं अशक्य होऊन जातं कित्येकदा. दोघांपैकी एकाला नातं नकोसं वाटणं इतकं की आठवणीच पुसून टाकावंस वाटणं. मग पाटी पुन्हा कोरी करकरीत.. मग पुन्हा तेच चक्र.. थोड्या फार फरकाने तसंच नातं.. पुन्हा भावनांचा कडेलोट.. पुन्हा नातं नकोसं वाटणं.. पुन्हा पाटी कोरी करणं.. असं आयुष्य असू शकतं?
एखादं नातं, एखादं माणूस ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं त्याला असं पुसून टाकता येतं? शेवटी नातं म्हणजे असतं तरी काय? दोघांनी मिळून उभारलेल्या आठवणी असतात त्या! त्या नात्यामध्ये घालवलेले उत्कट क्षण, अनुभवलेलं प्रेम हीच जमापुंजी असते नाही का? माझ्या आधीच्या पिढ्या मानसिकरित्या फार इव्हॉल्व्हड होत्या असं मला नेहेमी वाटतं. त्यांच्या काळी हे असं फोटो काढणं, व्हिडीओ रेकॉर्ड करणं फारसं नव्हतं. रात्री शांतपणे बिछान्यावर पडून एखाद्या नाजूक फुलाचा हळुवार वास घ्यावा तसं ते नातं, ते माणूस अलगदपणे मनाच्या पापुद्र्यातून ते उलगडत असतील. एक एक पापुद्रा बाजूला सारताना रात्रीच्या नीरव शांततेत मग ते नातं अलवारपणे वर येईल आणि मनात गडद प्रेमाचा रंग चढत जाईल.. आपलं माणूस आठवायला त्यांना ना कोण्या फोटोची गरज ना व्हिडिओची.. आमची पिढी त्यामानाने फार इमोशनली इन्सिक्युअर आहे. सगळे क्षण फोटोत पकडण्याची त्यांना सवय. मला तर कित्येकदा वाटतं की हे फोटो आणि व्हिडीओ म्हणजेच आठवणी असं समीकरण झालं आहे आपलं. उद्या जर माझ्याकडे असलेला सगळा डेटा उडाला..फोटो, व्हिडीओ डिलीट झाले तर माझ्या आठवणी गायब होतील का? ते क्षण जे मी जगले ते विस्मरणात जातील का?
नात्यामधला असा एखादा क्षण तुम्ही अनुभवला आहे का की जो इतका उत्कट,पराकोटीचा अलवार आणि अतिप्रचंड बेशकिमती होता की त्याला फोटोमध्ये अथवा व्हिडिओमध्ये कैद केलं तर तो हरवून जाईल असं तुम्हाला वाटलं आणि म्हणून तो तुम्ही आत साठवून ठेवला… असं जर तुम्ही कधी केलं असेल तर मग तुमची इंटर्नल मेमरी काम करते आहे असं म्हणायला हरकत नाही.
सिनेमा म्हणून सोडून द्या पण न्यूरॉलॉजिकल आणि सायकॉलॉजिकल सायन्सेसमध्ये मेमरी इरेझिंग या विषयवर खूप रिसर्च झाला आहे. या विषयावर ‘नेचर’ ह्या प्रसिद्ध रिसर्च जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या Marijn Kroes या न्यूरोसायंटिस्टच्या रिसर्च पेपरमध्ये नको असलेल्या आठवणी मेंदूतून पुसून टाकण्यासाठी ‘ब्रेन झॅपिंग’ या प्रोसिजरबद्दल खूप महत्वाचा रिसर्च नमूद केला आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर इलेक्ट्रोकंव्हलझीव ( electroconvulsive (ECT)) टेक्निकद्वारे आपल्या मेंदूतील काही आठवणी ज्या आपल्याला नकोशा वाटतात त्या मिटवता येतील असा यांचा दावा आहे. याखेरीज ‘ erasing bad memories’ यावर आज प्रचंड प्रमाणात काम सुरु आहेच. काही वर्षांत कदाचित क्लेमेंटाईननं जसं जोएलला, त्यांच्या नात्याला आपल्या आठवणीतून काढून टाकलं तसं शक्य होईल सुद्धा..
पण मुद्दा असा आहे की असं नातं, प्रेम त्याच्या आठवणी पुसून टाकून आपण ‘माणूस’ म्हणून राहू का? सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा वेगळा ठरतो तो ह्या मेमरी किंवा स्मृतीमुळेच. शॉर्ट टर्म मेमरी, लॉंग टर्म मेमरी, एपिसोडिक मेमरी ह्या सर्व स्मृतींच्या वर्गीकरणात मनुष्य कित्येक पटींनी सरस ठरतो आणि ह्या आठवणींमुळे टाईम ट्रॅव्हल करू शकणार प्राणी म्हणून मनुष्य फार युनिक ठरतो. म्हणजे आपल्याला माणूसपण शाबूत ठेवण्यामागे ह्या आठवणी फार महत्वाच्या ठरतात.
प्रेमचा खूप कहर झाला, नातं खूप जवळचं विणल्या गेलं की काळीज सोलून निघतंच. अगदी दुसऱ्याच्या मनाने साधी कूस जरी बदलली तरी सोलवटून निघतं हृदय.. नकोसं वाटतं.. आठवण येऊच नये अजिबात असं वाटत राहतं.. ते क्षण आठवू नये.. चेहरा विसरून जावा म्हणून आपण हर तह्रेने प्रयत्न करतो.. निष्फळ ठरतात ते.. कारण मनात साठवून ठेवलं असतं आपण.. तो चेहरा, ते डोळे, ते नातं.. विसरता येणं अशक्यच असतं.. आधी ती जखम असते.. ठसठसत राहते.. कधी कधी ती शांत निपचित पडून राहते.. मग आपण तिला कधी कधी स्वतःहून उकरतो.. पुन्हा रक्त वाहायला लागतं.. पण यावेळेस आपल्याला दुखत नाही.. कालांतराने ती जखम आपल्या सवयीची होते.. आपण तिची काळजी करणं सोडून देतो..ती आता ठसठसत नाही, उकरलं तरी वाहत नाही.. तिच्यातून आता एक तेज पसरत असतं.. ते आपल्या चेहेऱ्यावर कधी चढायला लागतं आपल्याला समजत देखील नाही.. आणि मग ती जखम.. जखम उरत नाही.. तो आपला अलंकार होऊन बसतो.. हे त्या नात्याचं, प्रेमाचं आणि आठवणीचं खरं ट्रान्सफॉर्मेशन.. पुसून टाकलं असतं तर आज जे काही आहोत ते राहिलो असतो का आपण?
‘इटर्नल सनशाईन’ हा उमजून घेण्याचा चित्रपट आहे. आपण आपला अर्थ लावून, हवं ते घेऊन, एन्लायटन वगैरे होऊन, स्वतःला स्वतःपाशी पोहोचवणारे ओपन एंडेड असे फार मोजके चित्रपट असतात.. सगळ्यांनाच आवडतील असे नसणारे.. माणसाला आपण प्राणी असूनही प्राणी नाही आहोत ह्याची जाणीव करून देणारे, अंतरंग घुसमटून काढणारे म्हटलं तर आतून बदलणारे आणि म्हटलं तर काहीही फरक न पाडणारे.. पण एक नक्की पाटी कोरी करून रिकामं जगायचं की भरगच्च पाटीने उजळून निघायचं हा पर्याय आपल्या सगळ्यांकडेच आहे.. आपण काय निवडतो त्यावर आपण काय जगतो हे अवलंबून आहे इतकंच.
इंग्रजी भाषेतला हा चित्रपट..नेचरमधल्या न्यूरोसायन्सेसच्या रिसर्चमधून उर्दू भाषेतल्या बशीर बद्र यांच्या माझ्या अत्यंत आवडत्या या शेरपाशी येऊन थांबला आहे कारण सुरवात डोक्यापासून झाली तरी शेवट ‘रुह’ पाशीच असतो..
वो बड़ा रहीम ओ करीम है मुझे ये सिफ़त भी अता करे
तुझे भूलने की दुआ करूँ तो मिरी दुआ में असर न हो……
(सिफ़त- attribute, गुण)
लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे .)
……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………
हे सुद्धा नक्की वाचा-
अस्तु-समाधानी आणि शांत जगण्याचा मंत्र– http://bit.ly/2VPJKXv
नवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषे– http://bit.ly/2LgHILE
जगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा – ‘कास्ट अवे’!– http://bit.ly/2VVvmcR
‘द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी– http://bit.ly/2UAWW2m
९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट– http://bit.ly/2G2DlQ1