तुषार गांधी यांनी आपल्या दौऱ्यात ‘गांधीहत्येमागे सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे खरे मास्टरमार्इंड होते’, असा खुलेआम आरोप केला . एवढा गंभीर आरोप करुनही अद्याप संघ तोंड उघडायला तयार नाही़ . तुषार गांधी खोटं बोलत असेल, तर संघाने त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा टाकायला पाहिजे . किमान हे खोटं आहे, हे सांगितलं पाहिजे . संघाचं मौन शंका वाढविणारं आहे .
………………………………………………………………………………………….
‘राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या खूनाला ६८ वर्ष लोटलीत . या एवढ्या वर्षात हा खून समर्थनीय ठरविण्यासाठी नथुराम गोडसेला हुतात्मा ठरवायला निघालेल्या प्रवृत्तींनी अनेक खोटीनाटी कारणं देशातील जनतेला सांगितली़. गांधींचा पणतू म्हणून या गोष्टी ख-या आहेत का, असं लोक मला विचारतात. त्यांचे प्रश्न, उत्सुकता मी समजू शकतो . पण हत्येमागील कारणांच्या खरेखोटेपणाचा खुलासा पणतू म्हणून मीच का करायचा? राष्ट्रपित्याच्या खूनामागील खरी कारणं समजून घ्यावीत, त्या खूनामागची मानसिकता समजून घ्यावी, असं इतरांना का वाटू नये?’….. अश्रूभरल्या डोळ्यांनी विचारलेले हे प्रश्न आहेत महात्मा गांधी यांचे पणतू व ‘लेट्स किल गांधी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक तुषार गांधी यांचे . आम्ही सारे फाऊंडेशन या संघटनेने विदर्भातील प्रमुख शहरांमध्ये ‘गांधींच्या हत्येमागील षडयंत्राची कहाणी’ या विषयावर नुकतीच तुषार गांधी यांची व्याख्यानं आयोजित केली होती . या व्याख्यानांमध्ये तुषार गांधी यांनी शेकडो संदर्भ व पुराव्यांसहीत महात्माजींच्या खूनामागचं एक भयानक कारस्थान उलगडून सांगितलं. केवळ ६८ वर्षाच्या कालावधीत सततच्या खोट्या प्रचाराने स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात मोठ्या शोकांतिकेवर असत्याची पुटं कशी चढविली गेलीत आणि त्यातून खून्याला आणि खूनाचा कट आखणा-यांना महानायक ठरविण्याचं कारस्थान कसं आखलं गेलं आहे, याची थरारक कहाणी तुषार गांधी यांनी विदर्भाच्या जनतेसमोर मांडली . ही कहाणी त्यांच्याच कटकारस्थानाची आहे. ज्यांनी बळीराजाला संपविलं होतं, ज्यांनी चार्वाक सत्य सांगतो म्हणून त्याचा आवाज कायमचा बंद केला होता, ज्यांनी तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठ पाठविलं. त्यांनीच महात्माजींचा खून केला़.
तुषार गांधी काही ब्रिगेडी कार्यकर्ते नाहीत किंवा आपल्या पणजोबाला नाहक कसं मारलं म्हणून भावनिक उमाळे काढणारेही नाहीत़ . जवळपास सहा वर्ष गांधीहत्येसंदर्भातील सर्व कागदपत्रे व पुराव्यांचा सखोल अभ्यास करुन त्यांनी ‘लेट्स किल गांधी’ हे पुस्तक लिहिलेलं आहे . महात्माजींचा खून का केला, हा प्रश्न कोणालाही विचारा . १०० पैकी ९५ माणसं एकसारखी उत्तर देतील . महात्मा गांधींनी देशाची फाळणी घडविली, ते मुस्लिमांचे लाड करत होते, त्यांनी पाकिस्तानला जबरदस्तीने ५५ कोटी रुपये द्यायला लावलेत, ही कॉमन उत्तर लोकांकडून मिळतात. त्यातही ५५ कोटीचे बळी, हे उत्तर तर मनामनात ठसविलं गेलं आहे . ज्यांना महात्माजींबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आदर आहे असेही ख-या कारणांबाबत अनभिज्ञ आहेत. महात्माजींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा आग्रह केला म्हणून देशप्रेमी गोडसे व आपटेने त्यांचा खून केल्याची कहाणी तर सतत सांगितली जाते़. त्यासाठी नथुरामाच्या त्यागाच्या, शौर्याच्या खोट्या कहाण्या रंगवून सांगितल्या जातात . मात्र जेव्हा फाळणी वा ५५ कोटी हा विषय कुठेही नव्हता, तेव्हाही नथुरामने महात्माजींना संपविण्याचे थेट प्रयत्न केले होते, हे सफाईने लपविले जाते़. गांधींजींचा खून करण्याचा पहिला प्रयत्न १९३४ मध्ये पुण्यात झाला होता . त्यांच्या मिरवणुकीवर हँडग्रेनेड फेकण्यात आला होता़ . त्यानंतर जुलै १९४४ मध्ये पाचगणीत झालेल्या प्रयत्नात नथुराम गोडसेचा थेट सहभाग होता . त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये सेवाग्राम आश्रमाबाहेर जंबिया घेऊन असलेल्या नथुरामला अटक करण्यात आली होती़. २९ जून १९४६ ला गांधींना पुण्यात घेऊन येणा-या स्पेशल ट्रेनला अपघात घडविणा-या कटातही नथुराम होता़. थोडक्यात फार पूर्वीपासून नथुराम आणि त्याचे साथीदार गांधींना संपवायच्या मागे लागले होते़. खूनाचे हे सगळे प्रयत्न लक्षात घेतले, तर ५५ कोटी हा बहाणा हे होता, खरे कारण काही वेगळेच होते, हे स्पष्ट आहे .
गांधींनी फाळणी घडविली, हा आरोपही निरर्थक आहे़ फाळणीची बीज फार आधी पडली होती़. सर सय्यद अहमद खानपासून मोहम्मद अली जीनापर्यंत सारे प्रमुख मुस्लिम नेते हिंदू व मुस्लिम हे स्वतंत्र राष्ट्र आहे, अशीच मांडणी करत असे . एवढंच काय लाला लजपत राय पासून सावरकरांपर्यंत अनेक हिंदू नेतेही द्विराष्ट्रवादाचे समर्थक होते़. अनेक हिंदू संस्थानिक अगदी सुभाषचंद्र बोसांचे बंधू सरतचंद्र बोस वेगवेगळे देश स्थापन करायला निघाले होते़. एकटे गांधीच काय होते जे शेवटपर्यंत अखंड भारतासाठी आग्रही होते़. इतिहासाचे जरा सखोल अध्ययन केले तर गोपाळकृष्ण गोखलेपासून लोकमान्य टिळकांपर्यत सा-यांनीच परिस्थितीवश मुस्लिमांचा अनुनय केला आहे . ज्यांना महान, मुत्सद्दी नेते म्हणून गौरविले जाते त्या टिळकांनी १९१६ मध्ये जिनांसोबत केलेला लखनौ करार तपासला तर मुस्लिमांना ते किती भरभरून द्यायला निघाले होते, हे लक्षात येते़. महात्मा गांधींनी उलट अगोदरच्या नेत्यांनी जे दिलं होते ते अतिशय सफाईने काढून घेण्याचं काम केलं आहे . हा सारा इतिहास लक्षात न घेता त्यांनी मुस्लिमांचा अनुनय केला हा निरर्थक आरोप सातत्याने केला जातो . यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्ववादी संघटना आघाडीवर आहेत . सकाळच्या प्रार्थनेत गांधींचा समावेश करायचा आणि दिवसभर त्यांच्याबाबत अतिशय खालच्या दर्जाच्या कुचाळक्या करायच्या हा स्वातंत्र्यापूर्वीपासून संघ परिवाराचा आवडता उद्योग आहे .
महात्मा गांधींच्या आगमनानंतर देशाचं राजकारण, समाजकारण आणि इतर क्षेत्रातील सनातनी वर्चस्वाला सुरुंग लागत आहे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा व इतर कट्टरतावाद्यांचं खरं दुखणं होतं. लोकमान्य टिळक असेपर्यंत या देशाची धुरा आपल्याकडे आहे किंवा आपल्या माणसाकडे आहे याचं समाधान सनातन्यांना होतं. मात्र गांधी आल्यानंतर सारी उलथापालथ झाली . हा माणूस एकीकडे स्वत:ला कट्टर हिंदू म्हणवून घेत असला तरी अस्पृश्यांना बरोबरीची वागणूक देतो, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देतो, दलितांना सर्व क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळालं पाहिजे यासाठी आग्रह धरतो, शूद्र मानल्या जाणा-या स्त्रियांना सगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने सोबत ठेवतो, स्वतंत्र भारताची पहिली राष्ट्रपती ही भंगी समाजातील मुलगी असली पाहिजे, असं सांगतो, हे सनातन्यांसाठी प्रचंड धक्कादायक होतं. हा माणूस जिवंत राहला तर वर्षोनुवर्ष कायम असलेली दुकानदारीचं मोडित निघेल ही भिती वाटल्यानेच गांधींचा खून करण्यात आला, हे खरं कारण आहे . फाळणीमुळे सारं काही गमावून बसलेल्या शरणार्थींनी बापूंना संपविलं असतं तर किमान समजून घेता आलं असतं, पण पुण्यातले सनातनी एकापाठोपाठ एक त्यांच्या खूनाचे कट रचतात यामागची कारणमिमांसा सर्वांनी लक्षात घ्यायला हवी . मजेची गोष्ट म्हणजे आज एवढ्या वर्षानंतर महात्माजींचा पणतू आपल्या पणजोबाच्या खुनाची खरी कारणं सांगायला लागल्यानंतर सोशल मीडियावर ज्या पद्धतीने त्यांना शिवीगाळ व संपविण्याच्या धमक्या दिल्या जात आहे त्यावरुन सत्य उघडकीस आणल्याने त्यांना किती संताप अनावर झाला आहे, हे लक्षात येतं. तुषार गांधी यांनी आपल्या दौ-यात ‘गांधीहत्येमागे सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे खरे मास्टरमार्इंड होते’, असा खुलेआम आरोप केला़. एवढा गंभीर आरोप करुनही अद्याप संघ तोंड उघडायला तयार नाही़. तुषार गांधी खोटं बोलत असेल तर संघाने त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा टाकायला पाहिजे़. किमान हे खोटं आहे, हे सांगितलं पाहिजे़. संघाचं मौन शंका वाढविणारं आहे . संघ आपल्या गोबेल्स नितीवरच खुश असावा़. एखादी गोष्ट वारंवार सांगितल्याने पुढच्या पिढीला तेच सत्य वाटायला लागते, हे संघ परिवाराने कृतीने सिद्ध करुन दाखविले आहे . संघपरिवार आपल्या सवयी सोडणार नाही़ मात्र राष्ट्रपित्याबद्दलची कृतज्ञता म्हणून देशाने तरी त्यांची हत्येमागची खरी कारणं ६८ वर्षानंतर का होईना समजून घेण्याची वेळ आली आहे .
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)