गांधी नावाचे विलोभनीय कोडे

 

-अविनाश दुधे

लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॉंपिए या ब्रिटीश व फ्रेंच लेखक जोडीने मिळून लिहिलेल्या ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’ या अतिशय गाजलेल्या पुस्तकात महात्मा गांधी यांच्याबद्दल एक लक्षवेधी वाक्य आहे. ते म्हणतात, ‘गांधी म्हणजे नियतीने ब्रिटिशांना घातलेले एक अनाकलनीय कोडे होते’. अगदी खरं आहे ते . गांधीजींच्या हयातीत आणि आता त्यांच्या हत्येला ७४ वर्ष झाली असतानाही जगभरातील माणसांसाठी- यात त्यांचे चाहते आणि टीकाकारही आलेत-  हा माणूस कोडे बनून राहिला आहे . केवळ ब्रिटीशच नव्हे जगभरातील विविध देशांचे राजकीय नेते ,लेखक , विचारवंत आपापल्या पद्धतीने या कोड्याची उकल करण्याचा प्रयत्न करताहेत. हे करताना गांधी नावाच्या माणसाचे एवढे विलोभनीय पैलू समोर येतात की त्यामुळे स्तिमित व्हायला होतं. त्यामुळेच आईनस्टाईनसारखा महान शास्त्रज्ञ लिहून जातो – ‘गांधीसारखा हाडामासाचा माणूस या पृथ्वीवर होवून गेला यावर पुढील पिढी विश्वास ठेवणार नाही’

   गांधी दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील जनरल स्मट्स व गोऱ्या अधिकाऱ्यांची स्थिती मोठी अडचणीची होती . कुठल्याही आंदोलकांना, राजकीय विरोधकांना बळाच्या जोरावर दडपून टाकणे एवढे त्यांना माहीत होते . पण एक निशस्त्र माणूस जनतेला कुठलीही चिथावणी न देता , हिंसाचार न माजवता , आक्रस्ताळेपणा न करता अतिशय नम्रपणे आपल्या न्याय्य मागण्या लावून धरतो . त्याचा पाठपुरावा करतो . हे करताना राज्यकर्ते , पोलिसांबाबत कुठलीही द्वेषभावना ठेवत नाही .उलट त्यांना सहकार्य करतो . उलट तुरुंगातील वास्तव्यात जनरल स्मट्ससाठी चपला विणतो , हे सारेच तेथील राज्यकर्त्यांना चक्रावून टाकणारं होतं. अशा पद्धतीने वागणाऱ्या या माणसासोबत कसे वागावे , हे तेव्हाच्या आफ्रिकेच्या तत्कालीन राज्यकर्त्यांना शेवटपर्यंत समजले नाही .

     गांधी १९१५ ला भारतात परत आल्यानंतर इंग्रज राज्यकर्ते, कॉंग्रेसचे तत्कालीन नेते, संस्थानिक, तेव्हा देशाचे नेते असलेल्या लोकमान्य टिळकांचे अनुयायी, वर्णवर्चस्व डोक्यात ठासून भरलेले पुण्याचे चित्पावन ब्राह्मण, कॉंग्रेसव्यतिरिक्त इतर संघटना-दबावगटांचे मोहम्मद अली जिना , सावरकर , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यासारख्या  मोठ्या नेत्यांचीही अवस्था आफ्रिकेतील राज्यकर्त्यांसारखीच झाली .     गांधी हे त्यांच्यासाठी ‘गूढ’ च  ठरलेत. राज्यकर्ते किंवा राजकीय विरोधकच नव्हे तर पुढील काळात गांधींचे निकटचे सहकारी असलेले पंडित नेहरू , सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, अब्दुल कलम आझाद  आचार्य कृपलानी आदी कॉंग्रेस नेत्यांसाठीही अनेकदा गांधींचे वागणे अलाकनीयच असे.

    जागतिक राजकारणाचा सखोल अभ्यास , राजकारणातील डाव – प्रतिडाव , मुत्सद्दीपणा याचा सराव असलेले दिग्गज नेते गांधींसोबतच्या राजकीय चर्चेदरम्यान हमखास गोंधळून जात असे. कारण गांधी हे रुटीन नेते नव्हतेच . गहन राजकीय चर्चेदरम्यान गांधी मध्येच   मीठाच्या पाण्याचा एनिमा , बकरीचे दूध, लैंगिक संयम निसर्गोपचार, प्रार्थनेचे महत्व अशा विषयावर बोलत असे .  यामुळे वाटाघाटी किंवा सल्ला मसलतीसाठी आलेली नेतेमंडळी चक्रावून जात असे. या माणसासोबत चर्चा करायच्या तरी कशी , हा पेच त्यांच्यासमोर पडे. गांधींचे हे वागणे त्यांच्याबद्दलच्या अनेक कथा –दंतकथांना जन्म देणारे ठरले . त्यांच्या राजकीय विरोधकांची त्यांच्याबद्दल जी टोकाची मते तयार झालीत , ती अशा वागण्यातूनच झालीत.

  अर्थात राज्यकर्ते व नेत्यांसाठी गांधी कायम  गूढ ठरलेत तरी देशातील सर्वसामान्य जनतेला मात्र गांधी हा माणूस कायम सरळसाधा व आपल्यातील एक वाटत आला . त्यामुळेच गांधीएवढी अफाट लोकप्रियता स्वातंत्र्याअगोदर व नंतरही कुठल्याही भारतीय नेत्याच्या वाट्याला आली नाही . नामवंत विचारवंत रावसाहेब कसबे यांनी ‘हिंदुराष्ट्रवाद- सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गांधींचे भारताच्या इतिहासातील मोठेपण नेमकेपणे सांगितले आहे . ते म्हणतात, ‘ भारतीय जनता तिच्या इतिहासात एकदाच संघटीत होऊन एका नेत्याच्या मागे उभी राहिली ती फक्त मोहनदास करमचंद गांधी या महात्म्याच्या मागे. म्हणून तेच अखिल भारताचे पहिले आणि शेवटचे नेते होते’.

   पंडित नेहरूही वेगळ्या शब्दात गांधी इतरांपेक्षा वेगळे का आहेत हे सांगतात . ‘महात्मा गांधींना हा देश आणि यातील  जेवढा कळला , तेवढा कोणालाच समजला नाही. देशातील जनतेची नाडी महात्माजींना नेमकेपणाने कळली होती . जनतेलाही हा महात्मा नेमका उमगला होता . हा माणूस आपल्याला अगदी योग्य मार्गावर नेईल हा विश्वास त्यांनी निर्माण केला होता. त्यामुळेच लाखो माणसं संमोहित झाल्यासारखे या माणसाच्या मागे जात असे.  त्यांनी परदेशी कपड्यांची होळी करा म्हटलं की लोक ती करत असत. त्यांनी सरकारी नोकरी सोडा म्हटलं की लोक नोकऱ्या सोडत असे . सरकारसोबत असहकार करा म्हटलं की संपूर्ण देश ठप्प होवून जात असे . जेव्हा ते  तुरुंगात जाण्याचे आवाहन जनतेला करत , तेव्हा देशातील तुरुंग कमी पडत असे .गांधींच्या  शब्दाला हे एवढं अफाट सामर्थ्य कसं प्राप्त झालं, हा अजूनही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे .

   अर्थात सर्वसामान्य जनताच नव्हे तर प्रतिभावंत , नेते , कलावंत , साहित्यिक , विद्वान यांच्यावरही गांधींचे गरूड होते . त्या काळात गांधींभोवती जी माणसं होती , ती आभाळाच्या उंचीची होती . प्रभावी व्यक्तिमत्व , शैलीदार वक्तृत्व व प्रखर  विद्वत्तेचे धनी असलेले पंडित नेहरू ,  सरदार पटेल , राजेंद्र प्रसाद , अब्दुल कलाम आझाद, विनोबा असे एकापेक्षा एक सरस नेते गांधींसोबत होती .  ही सारी मोठी माणसं कुठलंही विशेष रंग – रूप नसलेल्या, दिपवून टाकणारं पांडित्य, विद्वत्ता नसलेल्या, खिळवून ठेवेल असे वक्तृत्व नसलेल्या  गांधींना आपला नेता का मानत होते ? या सर्वसामान्य माणसाचा शब्द या क्षमतावान नेत्यांसाठी अखेरचा शब्द का असायचा?

     अशी काय जादू होती , या माणसात ? गांधी नावाच्या एका सर्वसामान्य माणसाच्या याच शक्तीचा , क्षमतेचा शोध सातत्याने सुरु आहे. आज एवढ्या वर्षानंतरही या माणसाचं जगणे, त्यांनी वेगवगळ्या विषयात केलेले प्रयोग, करोडो अशिक्षित भारतीयांसोबत संपर्क साधण्यासाठी विकसित केलेली  अद्भूत शैली, त्यांचा आतील आवाज या सगळ्या विषयांबाबत जगभर अनावर कुतूहल , उत्सुकता आहे. त्यातूनच जगाच्या इतिहातात एका कुठल्या व्यक्तीवर लिहिली गेली नाहीत अशी एक लाखांपेक्षा अधिक पुस्तक गांधीजींवर लिहिली गेलीत. अनेक चित्रपट, डॉक्युमेंटरीज निघाल्यात. तरीही या माणसाबद्दलची उत्सुकता शमता शमत नाही. चारचौघासारखा सर्वसामान्य असलेला मोहनदास ‘महात्मा’ कसा झाला, हे कोडं सुटता सुटत नाही.

  प्रसिध्द लेखक व मनोविकास तज्ञ डॉ, आनंद नाडकर्णी आपल्या व्याख्यानात हे कोडं उलगडण्याचा उत्तम प्रयत्न करतात . ते सांगतात  , ‘ गांधींचं अतिसामान्य असणं हेच त्यांना असामान्य करून गेलं .गांधीजी जे बोलायचे , तेच करायचे . या माणसाजवळ विद्वता, हुशारी नव्हती . पण शहाणपण होतं . हे  शहाणपणच त्यांना इतरांपेक्षा वेगळ स्थान देवून गेलं.’  गांधी नावाचा माणूस त्यांच्या शेकडो मर्यादांसह देशभर स्वीकारला गेला याचं कारण म्हणजे हा स्वतःशी कायम प्रामाणिक राहिला. त्याचं संपूर्ण आयुष्य पारदर्शक राहिल . आफ्रिकेतून भारतात आलेले गांधी एकतर त्यांच्या आश्रमात , तुरुंगात वा तिसऱ्या वर्गाच्या रेल्वेच्या डब्यातच लोकांना आढळायचे. याशिवाय दुसरं आयुष्य त्यांना नव्हतं. सार्वजनिक जीवनातील कुठलाही माणूस एवढं पारदर्शी आयुष्य जगला नाही .

पारदर्शी असण्यासोबतच हा माणूस आपल्या सत्यनिष्ठेपासून कधीही ढळला नाही, जनतेला त्याचे मोठे आकर्षण होते. त्यांच्या व्यक्तिमत्वातील  ही सत्यनिष्ठता , प्रामाणिकता  व निर्भयतेने   सामान्य माणूस त्यांच्याकडे खेचला गेला . गांधीजींचे भारतात आगमन होण्यापूर्वी येथील स्वातंत्र्य चळवळ सनदशीर मार्गाचा वापर करू शकेल अशा मोजक्या वकील मंडळींची वा शस्त्रांचा वापर करू शकेल अशा क्रांतीकारकांची होती .सर्वसामान्य माणूस यापासून दूरच होता . आपला हा मार्ग नव्हे , आपल्याला हे पेलू शकणार नाही , असेच त्याला वाटायचे .

मात्र गांधी सक्रीय होताच चमत्कार व्हावा त्याप्रमाणे सर्व समाजातील, सर्व वयोगटातील  लाखो स्त्री – पुरुष  स्वातंत्र्यलढ्यात उतरली . या सर्वसामान्य माणसांना पेलतील, झेपतील एवढे सोपे मार्ग गांधीजींनी सुचवलेत . तुम्हाला देशासाठी काही करायचं आहे ना ? तर तुमच्या गावाच्या चौकात जावून जोरजोरात फक्त ‘जयहिंद’ म्हणायचं. पोलीस येतील . पकडतील . मारतील . काही वेळाने सोडून देतील . पुन्हा तसेच करायचे. चौकात जावून ‘जयहिंद’ म्हणायचं.  अटक केली तर तुरुंगात जायचे . तेथील नियमांचं पूर्णतः पालन करायचं . सुटका झाली की पुन्हा सरकारविरोधात अहिंसक आंदोलन करायचं . अशा पद्धतीने लाखो सामान्य माणसं  त्यांनी स्वातंत्र्यआंदोलनाशी जोडलीत . एक साधे मीठ उचलण्याने काय चमत्कार होऊ शकतो , हे त्यांनी दांडी यात्रेच्या माध्यमातून जगाला दाखवून दिले .

गांधी नावाच्या माणसाने असे खूप चमत्कार घडविले . केवळ स्वातंत्र्य मिळविणे हे त्यांचे ध्येय नव्हते . ते आज ना उद्या मिळणारच हा ठाम विश्वास त्यांना होता. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश समर्थ, सशक्त  करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात पाय रोवून रचनात्मक काम करणारी माणसं असली पाहिजे, हे त्यांनी ओळखले होते . त्यामुळेच एकीकडे स्वातंत्र्यलढा सुरु असताना दुसरीकडे विधायक काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची फळी त्यांनी देशभर निर्माण केली. स्वच्छता , आरोग्य , शिक्षण , ग्रामोद्योग , निसर्गोपचार असे वेगवेगळे विषय घेवून ते  कार्यकर्ते देशभर काम करत होते . गांधीजींची हत्या झाल्यानंतरही आणि अगदी आताही त्यांच्या विचारांवर निष्ठा ठेवू ठेवून काम करणारी अनेक माणसं देशात दिसतात. महात्मा गांधींनंतर भारतात वा  इतर कुठे ही किमया अन्य कुठल्याही नेत्याला, महापुरुषाला साध्य झाली  नाही . रचनात्मक कामासोबतच देशाची , समाजाची उभारणी नैतिक पायावर व्हावी यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्नरत होते . नैतिक उन्नती हेच वैयक्तिक आयुष्याचे आणि समाजाचे ध्येय असले पाहिजे , हे गांधीजी अतिशय आग्रहाने सांगत. गांधीजींच्या आयुष्याचा संदेशही तोच आहे .जगभर खूप मोठे नेते होवून गेलेत . त्यांनी खूप भव्य –दिव्य कामं केलीत . पण राष्ट्राची उभारणी नैतिक पायावर व्हावी असा आग्रह करणारा हा एकमेव नेता . म्हणूनच तो एकमेवाद्वितीय ठरतो .

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक, दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )

8888744796

………………………………………….

अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.

 

Previous articleमहात्मा गांधी यांची मुलाखत – फॉक्स टीव्ही
Next articleगद्दार गाडायच्याच लायकीचे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.