कैवल्यदानी !

मराठी पत्रकारितेवर आजही प्रभाव असणार्‍या अनंतराव भालेराव यांचं जन्मशताब्दी वर्ष १४ नोव्हेंबरला सुरु झालं . अनंतराव भालेराव हे महाराष्ट्रात सर्वदूर घट्ट पाळंमुळं पसरलेले केवळ मूल्यनिष्ठ , अबोल धाडसी , बहुपेडी संपादक-लेखक नव्हते तर तो एक सर्वव्यापी संस्कार आहे ; अशी ठाम धारणा असणार्‍या पिढीचा मी प्रतिनिधी आहे . जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित होणार्‍या अनंतराव भालेराव स्मृती ग्रंथातील हा लेख . ( ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या आणि ) नांदेडच्या अभंग प्रकाशनाच्यावतीने अनंतराव भालेराव यांच्या जन्म शताब्दी वर्षात प्रकाशित होणार्‍या या स्मृती ग्रंथाच्या नोंदणीसाठी संजीव कुळकर्णी यांच्याशी ९८२३१२५३४३  या क्रमांकावर संपर्क साधावा ]

 प्रवीण बर्दापूरकर

तसं पाह्यला गेलं तर मी काही अनंतराव भालेराव स्कूल म्हणा की विद्यापीठाचा , विद्यार्थी नव्हे . पण, मराठवाडा दैनिकाचा पहिला अंक मला आठवतो आणि तेव्हाच्या न कळत्या वयापासून अनंतराव नावाचा एक संस्कार माझ्यावर होत गेलेला आहे .

माझी आई नर्स होती . तिची नियुक्ती वैजापूर तालुक्यातील खंडाळा या गावी झालेली होती . कुंभार आळीत एका दीड खणाच्या खोलीत माझी आई म्हणजे माई आणि तिचे आम्ही दोन मुलगे राहत होतो . माई विधवा होती आणि महत्वाचं म्हणजे देखणी होती . आता नेमकं नाव आठवत नाही पण गावातला एक पुढारी वारंवार आणि वेळी-अवेळी आमच्या घरी येत असे . तेव्हा मी आठवीत होतो आणि नेमकं काही कळण्याचा वय नव्हतं पण, त्याच्या येण्यानं माईला विलक्षण त्रास होतोय हे कळत होतं . गावात आम्ही नवीन होतो . कोणाकडे जावं आणि बोलावं हे काही उमजत नव्हतं . एक दिवस मी कोणत्या तरी तिरीमिरीत तेव्हा ‘मराठवाडा’चे संपादक असलेल्या अनंतराव यांना एक पत्र लिहिलं आणि ही आपबीती सांगून ते  पत्र प्रकाशित करण्याची विनंती केली . त्या माणसाची सॉलिड बदनामी व्हावी ; पर्यायानं त्यानं आमचा नाद सोडावा , हा माझा ते पत्र प्रकाशित होण्याची विनंती करण्यामागचा बाळबोध-पांढरपेशा-सदाशिवपेठी हेतू होता . अवघ्या पाच-सात दिवसातच तो माणूस घरी आला आणि त्यानं माईची सपशेल माफी मागितली . ‘अण्णांच्या भावकीत आहात हे आधीच का सांगितलं नाही ?’ अशी त्याची तक्रार होती . मग कळलं , अण्णा म्हणजे ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक असलेले अनंत भालेराव ; त्यांना अण्णा म्हणत असावेत असा अंदाज ‘त्या’ माणसाच्या बोलण्यातून आला आणि खंडाळा हे अनंत भालेराव यांचं गाव आहे . नंतर त्यांचं एक पत्रही आलं . त्या गावात असेपर्यंत कोणीही आमच्या घराकडे वाकडी नजर करून पाहिलं नाही .

पुढच्या औरंगाबाद चकरेत मी थेट ‘मराठवाडा’ कार्यालय गाठलं अनंत भालेराव यांना भेटलो . ‘तुम्ही तक्रार छापली नाही पण , आम्हाला दिलासा मिळाला’, हे सांगून टाकलं ! ते काही आमच्या जवळ किंवा दूरू-दूरच्याही नात्यात नव्हते . त्याच अस्पष्ट भेटीत त्यांना ‘अण्णा’ म्हणतात हे मला स्पष्टपणे कळलं . अण्णा जे काही बोलले तेव्हा ते मला काही कळलं नाही ; माझं ते वयही नव्हतं . प्रत्येक तक्रार बातमी नसते पण त्या तक्रारीचं निवारण हळुवारपणे कसं करायचं हा पत्रकारितेतला माझ्यावर नकळत झालेला पहिला संस्कार , हा असा आहे . नंतरही मी त्यांना अधून-मधून भेटत असे . माझी काही पत्रंही त्याकाळात ‘मराठवाडा’त प्रकाशित झालेली आहेत . आयुष्याच्या प्रवासात नंतरही अनंतराव भालेराव असेच कुठे-कुठे भेटत गेले आणि न बोलता संस्कार करत राहिले आणि त्यांचं अस्तित्व महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात किती ठळक आहे दिसलं .

नंतरच्या काळात अनंतराव भालेराव यांचा मुलगा निशिकांत याची भेट झाली . तीही औरंगाबादेत नव्हे तर दिल्लीत . त्यावेळी तो दिल्लीत पत्रकारितेचा अभ्यास करत होता . नेहेरु युवक केंद्र , औरंगाबाद यूथ सेंटरमध्ये मी सक्रीय होतो . पद्माकर खेकाळे , उल्हास गवळी यांच्यामुळे माझी तिकडे लुडबुड सुरु होती . याच लुडबुडीचा एक भाग म्हणून मी दिल्लीला विश्व युवक केंद्राच्या एका कार्यक्रमासाठी गेलो आणि निशिकांतची भेट झाली ; फिल्याच भेटीत आमची झालेली दोस्ती अजूनही टवटवीत आहे . त्याकाळात , एक वेळ जेमतेम जेवता येईल एव्हढ्या पगारात नेहेरु युवक केंद्रात अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून काम करत माझा जगण्याचा संघर्ष सुरु होता . नंतर तेव्हाच्या बांधकाम आणि इमारत खात्यात रोजंदारीवर लागलो . आकाशवाणीचं केंद्र औरंगाबादला  सुरु झाल्यावर आकाशवाणीवरील एक अधिकारी वसंतराव देशपांडे यांनी छोट्या-मोठ्या असाईनमेंट द्यायला सुरुवात केली . त्यातून आपल्याला लिहिता येतं हा विश्वास आला . पण , इथं एक गोची होती . त्याकाळात औरंगाबादला कुठंही गेलं की , ‘ज.रा.बर्दापूरकरांचा तू कोण ?’, हा प्रश्न समोरून  हमखास येत असे . ज.रा. बर्दापूरकर यांचं मुद्रित माध्यम आणि मराठवाडा दैनिकातील योगदान मोठं होतं . औरंगाबादला राहिलो तर या क्षेत्रात त्यांचं नाव ओलांडून आपण जाऊच शकणार नाही याची खात्री पटत गेली आणि त्यामुळे मी वैतागलेलोही होतो . त्यातच आणीबाणीत काही तरी छोटी-मोठी आगळीक घडली आणि कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष असलेले तत्कालिन डी.आय.जी. राममूर्ती यांनी असोसिएशनच्या सचिव असलेल्या आस्मादिकांना दम भरला . मी वसंतराव देशपांडे यांना गाठलं . त्यांनी ‘गोमंतक’चे तेव्हा संपादक असलेल्या माधव गडकरी यांना पत्र दिलं आणि मी थेट गोव्यात जाऊन पणजी गाठलं . तो माझा पत्रकारितेतला उदय होता !

यंत्र तसंच तंत्रज्ञान आणि बंधनं या दृष्टीकोनातून तो काळ माध्यमांसाठी प्रतिकूल होता . आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही पण , फोन सहज मिळणे लांबच , सर्वत्र दिसतही नव्हता आणि पेजर , सेलफोन तर भारताच्या दृष्टीक्षेपात नव्हते . दळणवळण कठीण होतं . संगणक , फक्स , इंटरनेट काहीच नव्हतं . अन्य गावातील वृत्तपत्रे पोस्टाने येत . पणजी , मग कोल्हापूर , सातारा , चिपळूण आणि नागपूर या माझ्या प्रवासात मी ज्या-ज्या वृत्तपत्रात नोकरी केली तिथे पोस्टानं येणारा ‘मराठवाडा’ दैनिकाचा अंक ही माझी मानसिक गरज बनली ; माझी त्यामुळे मराठवाड्याशी जुळलेली नाळ राहायची . ‘मराठवाडा’ दैनिक वाचायला मिळालं की घरापासून लांब आल्याचा सुरुवातीचा होमसिकनेस काहीसा दूर पळत असे . या होमसिकनेस बाबत नंतर घर सोडून आलेले सगळे होतात तसा मी निगरगट्ट झालो . पण, त्याकाळात ‘मराठवाडा’ आणि ‘संचार’ या दैनिकांचे अंक सर्वांना सहज प्राप्त होत नसत . आलेलं टपाल प्रथेप्रमाणे आधी संपादकाच्याकडे जात असे आणि ‘मराठवाडा’ तसंच ‘संचार’चे पोस्टाने आलेले अंक ते काढून घेऊन उर्वरीत टपाल वृत्तसंपादकाकडे पाठवत . संपादकांनी ते अंक बघितले की साधारणपणे अग्रलेख लिहिणारे सहाय्यक संपादक , वृत्तसंपादक , रविवार पुरवणीचे संपादक अशा क्रमाने हे अंक फिरत आणि मग इतरांसाठी ते उपलब्ध होत . ‘मराठवाडा’ आणि ‘संचार’ या दैनिकांत आलेल्या अग्रलेखाशी आपल्या दैनिकाचा अग्रलेख ताडून पहिला जात असे . विशेषत: ‘मराठवाडा’ दैनिकातील अग्रलेखाशी स्वत:च्या मजकुराची सहमती झाली की संपादक स्वत:वर जाम खूष असत . मी तर केवळ मराठवाड्यातला होतो पण , नागपुरात असतांना हरिहर येगावकर , शांताराम बोकील , शंकरराव बेदरकर , रमेश राजहंस ही मंडळी अनेकदा ; मी जणू काही अण्णांचा कोणी प्रतिनिधी आहे अशा अविर्भावात ‘मराठवाडा’च्या अग्रलेखात व्यक्त झालेल्या मतांशी त्यांची झालेली सहमती आवर्जून शेअर करत . ‘मराठवाडा’तील म्हणजे अनंतराव भालेराव यांची आणि आपली मतं कशी सारखी आहेत याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेणं हा तत्कालिन महाराष्ट्रीय वृत्तपत्रसृष्टीचा स्थायीभावच झालेला होता , इतका अनंत भालेराव आणि ‘मराठवाडा’ दैनिकाचा अनेकांना स्वाभाविकच असूया वाटण्यासारखा दबदबा होता . यात माझा स्वार्थ म्हणजे मला हे अंक लवकर मिळत . शिवाय , अशी मतं जुळल्यामुळे हे सिनियर स्वत:वर बेहद्द खुश होत त्यामुळं अनेकदा माझी चहा-विडीकाडी सुटत असे ! नागपूर पत्रिका , तरुण भारत , सकाळ , लोकसत्ता , महाराष्ट्र टाईम्स अशा सर्वच वृत्तपत्रातील सिनियर्स तेव्हा नव्याने भरती झालेल्यांना ‘जरा अनंत भालेरावांचे अग्रलेख वाचा म्हणे पत्रकारिता काय असते ते कळेल’, असा पत्रकारितेचा पहिला धडा देत असत . सुरेश द्वादशीवार यांच्यासोबत मी विदर्भ साहित्य संघ आणि ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीत प्रदीर्घ काळ काम केलं . अर्थात द्वादशीवार मला सिनियर आणि राज्याच्या सांस्कृतिक तसंच साहित्य संस्थांच्या राजकारणात त्यांचं नाव मोठा दबदबा असणारं पण , अनंतराव भालेराव आणि नरहर कुरुंदकर हा आमच्या अधिकृत सिनियर-ज्युनिअर सहकारी आणि अनधिकृत अकृत्रिम स्नेहशील मैत्र आजवर असण्यातला कायम दुवा राहिला .

औरंगाबाद सोडल्यावर पणजी , कोल्हापूर , सातारा , चिपळूण , नागपूर , मुंबई आणि दिल्ली असा माझा पत्रकारितेच्या निमित्ताने प्रवास झाला . या सुमारे पावणेचार दशकाच्या प्रवासात मी अण्णांच्या जमेल तसा आणि जमेल तेव्हढा संपर्कात राहिलो . मी त्यांच्या खास वर्तुळात नव्हतो , त्यांचा उजवा किंवा डाव हात तर मुळीच नव्हतो , त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मला कधी मिळाली नाही ; औरंगाबाद सोडून मी ती संधी घालवली असंही म्हणता येईल . ‘मराठवाडा’ या दैनिकासाठी मी अधिकृतपणे कधी कामही केलं नाही . निशिकांत भालेराव ‘मराठवाडा’त रुजू झाला , दरम्यान राजीव गांधी-पित्रोदा जोडीने संवाद साधनं सुलभ केलं . मग विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात किंवा नागपूर-विदर्भात काही महत्वाचं घडलं तर निशिकांतचा फोन येत असे आणि ती बातमी मी बिनदिक्कतपणे ‘मराठवाडा’शी शेअर करत असे . ‘मराठवाडा’तून निशिकांत वेगळा झाला तरी . ‘मराठवाडा’तून कोणा-न-कोणाचा फोन येतच राहिला . नागपुरात मी नागपूर पत्रिका , अल्पकाळ तरुण भारत व युगधर्म आणि मग लोकसत्ता या दैनिकात प्रदीर्घ काळ नोकरी केली पण, त्यापैकी एकाही दैनिकाच्या वरिष्ठांनी कधी ‘मराठवाडा’शी बातमी/माहिती का शेअर करतो म्हणून टोकलं नाही ; हा अनंत भालेराव नावाच्या संपादकाचा महाराष्ट्रावर असणारा प्रभाव होता आणि या प्रभावाला मी ‘अण्णा’ असं घरगुती नावाने संबोधतो याचं अप्रूप या माझ्या सर्वच वरिष्ठांना होतं !

औरंगाबादला चक्कर झाली की मी आधी फोन करून एकदा तरी अण्णांना भेटायला जात असे . एक काळ असा होता की , सन्मित्र कॉलनीत जाणं प्रतिष्ठेचं समजलं जात असे . ब्रिटनला जाऊन शेक्सपिअरच्या घराला भेट देणं , ऑस्ट्रियात साल्झबर्गला जाऊन मोझार्टच्या घरी जाऊन माथा टेकवून येणं , वाशिंग्टनला जाऊन व्हाईट हाऊस बघणं हे जितकं सहज ; तशीच भावना औरंगाबादला आल्यावर सन्मित्र कॉलनीतील अण्णांच्या घरी किंवा मराठवाडा कार्यालयात जाताना माझ्या मनात असे , नेमकी हीच भावना अनेकांनी अण्णांचा विषय निघाल्यावर महाराष्ट्रातील बोलून दाखवलेली आहे . अशा एका भेटीची आठवण माझा मनात कायम घर करून आहे कारण त्या आठवणीची नाळ अण्णांच्या साधेपणा आणि निर्मोहीपणाशी जोडली गेलेली आहे . ही बहुदा १९८७ची घटना आहे . तडजोड न करण्याच्या स्वभावाला शोभेल अशा पद्धतीने ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा तडकाफडकी राजीनामा देऊन मी रस्त्यावर आलेलो होतो…त्यामुळे सुरु असलेल्या परिणाम निराकरणाचा एक भाग म्हणून चरितार्थासाठी ‘सकाळ’ या दैनिकासाठी स्वत: तर ‘लोकसत्ता’ या दैनिकासाठी पत्नी-मंगलाच्या नावे नागपूरचा वार्ताहर म्हणून काम करत होतो . शिवाय कामगार नेते वसंत लुले यांचा ‘चर्चा’ या दिवाळी अंकाचा मदतनीस आणि इतर ‘छुटपूट’ उद्योग सुरु होते . हे सुरु असतानाचा मित्रवर्य आणि कॉंग्रेसचे नेते , तटकालीन खासदार विलास मुत्तेमवार यांच्या मालकीच्या ‘जनवाद’ हा दिवाळी अंक संपादित करण्याची ऑफर आली . मुत्तेमवार पत्रकारितेतून राजकारणात आलेले होते आणि गांधी कुटुंबियांशी त्यांचे निकटचे संबंध होते . अत्यंत गाजावजा करत त्यांनी ‘जनवाद’ हे दैनिक सुरु केलेलं होतं . लेटर-हेड ते दिवाळी अंक अशा सर्वच ठिकाणी संपादक म्हणून माझे नाव सर्वात वर राहील , अंकाचा विषय तसंच लेखक मी ठरवेन आणि त्यात विद्यमान संपादक तर सोडाच पण , मालक म्हणजे खुद्द विलास मुत्तेमवार यांचा किंचितही हस्तक्षेप चालणार नाही ; या माझ्या अटी मुत्तेमवार यांनी दिलदारपणे मान्य केल्या . लेख मागतानाच लेखकाला मानधनाचा धनादेश देण्याचीही माझी अट मान्य करताना विलास मुत्तेमवार यांनी एका बँकेतील स्वत:च्या खाजगी खात्याचे स्वाक्षरी केलेले कोरे पन्नास धनादेश माझ्या स्वाधीन केले . लेखकाला समक्ष भेटून लेख मागण्याच्या मोहिमेवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो , मजल-दरमजल करत औरंगाबादला पोहोचलो . अण्णांना एक दिवस सकाळी भेटलो . लेख देण्याची विनंती केली . विषय वगैरे ठरल्यावर दोन दिवसांनी लेख देण्याचं अण्णांनी मान्य केलं . मी मोठ्या ऐटीत ५०० रुपयांचा धनादेश एका पाकिटात घालून अण्णांना दिला आणि बाहेर पडलो . तेव्हा ५०० रुपये ही रक्कम मोठी होती पण, नियोजनाप्रमाणे ‘स्टार’ लेखकाला तितकं मानधन देण्याचं मी ठरवलेलं होतं . मजकुराबाबत एकदा बोलणं अंतिम झाल्यावर त्याप्रमाणे मी विलास मुत्तेमवार यांच्या सहीचे धनादेश देत होतो .

औरंगाबादेतल्या जुन्या दोस्त-यारांना भेटण्यात उंडरुन ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी लेख घ्यायला गेलो तेव्हा अण्णांनी लेख तर दिलाच पण , ‘इतकं मानधन खूपच होतंय’, असं म्हणत तो धनादेशही परत केला ; शिवाय माझ्याकडून मानधन घेण्यासच नकार दिला . मी खूप विनवण्या केल्या पण, त्यांनी ते मानधन घेतलंच नाही . ‘टचवुड’ सांगतो ; गेल्या सुमारे पावणे चार दशकाच्या पत्रकारितेत इतक्या संपादकांना भेटलो , साहित्य बीट कव्हर करण्याच्या आणि असंख्य  दिवाळी अंक संपादित करण्याच्या निमित्तानं असंख्य अस्सल साहित्यिक तसेच अनेक ‘लेखकरावां’नाही भेटलो पण , दिलेलं मानधन जास्त आहे असं सांगून ते परत करणारे अण्णा हे माझ्या आयुष्यातील एकमेव संपादक आणि लेखक ! निरोप घेताना तेव्हा त्यांच्या पाया पडलो तेव्हा माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या होत्या .

अण्णांचं व्यक्तिमत्व तसं खडबडीत , खरं तर काहीसं राकटच  . वेशभूषाही बेतास  बात . कपडे कायमच धुवट . पण अण्णांच्या डोळ्यात एक आश्वासक ममत्व जाणवायचं . हा माणूस कोणाला रागवेल पण, त्याचं काही बुरं करणार नाही याची खात्री अण्णांच्या डोळ्यात बघितलं की मिळायची . हा माणूस खडबडीत दिसतोय  पण , तो कपटी , कारस्थानी नाही हे लगेच जाणवायचं . डोळ्यातून असं ममत्व ओसंडणारी माणसं भेटली की प्रेमाचं एक अख्खं गाव मुक्कामासाठी भेटल्यासारखा आधार कायम वाटतो . अण्णांना भेटलं की अगदी ‘सेम-टू-सेम’ तस्संच वाटायचं . मराठी भाषेलाही अण्णांच्या मनात असलेलं हे ममत्व खूपच भावलेलं असावं . म्हणूनच राग व्यक्त करताना किंवा विरोध करतानाही अण्णांचे शब्द ‘अंगार’ बनलेले दिसत नाहीत . सौम्य भाषेतला विरोध किती ठाम तसंच सात्विक असतो आणि सात्विकतेच्या तेजाला समोरचा आपसूक शरण कसा जातो , याची प्रचीती अण्णांच्या भाषेतून येते . ही प्रासादिक आणि मनाचा ठाव घेणारी साधी भाषा हे अण्णांचा बलस्थान होतं असंच मला  वाटतं . भाषेच्या बाबतीत अनंतराव भालेराव हे कैवल्यदानी संपादक होते , असा प्रत्यय कायमच आलेला आहे !

 एखाद्या माणसाचं कर्तृत्व आणि ऊंची समजण्यासाठी आपल्या आकलनाची खोली डोहखोल असावी लागते हे मला राजकीय आणि विधिमंडळ वार्ताहर म्हणून वावर सुरु झाला तेव्हा समजलं . अनंत भालेराव नावाच्या संपादकाची किंमत आणि विश्वासार्हता किती लखलखीत , घनगर्द आणि विस्तारलेली आहे हे सत्तेच्या दालनात वावरतांना उमजलं . अनंत भालेराव नावाचा प्रभाव आणि त्यांच्या धवल प्रतिमेच्या गडद छायेत जणू मराठी पत्रकारिता यथेच्छ बागडत असण्याचा तो काळ होता . त्यांच्यानंतर अशी घनगर्द आश्वासक-गडद-शीतल छाया देणारा वृक्षच मराठीच काय महाराष्ट्राच्या अन्य भाषक पत्रकारितेच्या प्रांगणात बहरला नाही . मराठवाड्याचा कल काय आहे ही जाणून घ्यायचं असेल तर ‘मराठवाडा’वाचा’, असं राजकारण , प्रशासन आणि संस्कृतिक वर्तुळात राज्याच्या कानाकोपऱ्यात आवर्जून सांगितलं जाई ॰ ( अशीच प्रतिमा आणि विश्वासाहर्ता सोलापूरच्या रंगाअण्णा वैद्य म्हणजे दैनिक ‘संचार’ आणि चिपळूणच्या निशिकांत उपाख्य नानासाहेब जोशी म्हणजे दैनिक ‘सागर’च्या बद्दलही होती ! )

गांधीवादी , सर्वोदयी , समाजवादी तसेच पूर्ण वेळ काम करणाऱ्या रचनात्मक तसेच पुरोगामी कार्यकर्त्यात तर ‘औरंगाबादला जायचंय नं ? काळजी कशाला करतोस ? जा, थेट मराठवाडा कार्यालय गाठ . अनंतरावांना भेट . सगळं मार्गी लागेल !’  असा विश्वास बिनदिक्कत दिला जात असे . ‘आणि ते नसलेच तिथे तर ?’ असा भाबडा प्रश्न समोरून आलाच क्वचित तर , ‘कोणी ना कोणी सापडेलच मराठवाडात . काही काळजी करू नकोस’, असा दिलासाही हमखास मिळत असे . दोन मराठवाडेकर मराठवाड्याबाहेर एकमेकाला भेटले की त्यांच्या बोलण्यात ‘आंबेजोगाई’च येणार , ‘अंबाजोगाई’ नाही…अगदी तस्संच दोन-चार मराठवाडेकर मंत्रालयात किंवा अन्य कुठे भेटले आणि राजकारणावर बोलू लागले की, ‘अण्णांचा मराठवाडा म्हणतुया नं मग बरुबरच असणार ,’ हे प्रमाणपत्र दिलं जाण्याचा अनुभव सार्वत्रिक असे . बोलणारे मराठवाडेकर शहरी किंवा ग्रामीण ; जसे असतील तसा फक्त भाषेचा बाज बदलणार ! औरंगाबादेत मुक्कामाला असणारे नोकरदार शनिवारी मुंबई-नागपूरला जाताना रात्रीच्या बसमध्ये बसण्याआधी तिकडच्या मराठवाडेकरासाठी ‘कावड’ हा अण्णांचा स्तंभ असलेला ‘मराठवाडा’चा अंक आवर्जून सोबत घेणार , हाही अण्णा आणि ‘मराठवाडा’ दैनिकावर असणाऱ्या अस्सल लोभाचा एक भाग असे . पत्रकारितेच्या आणि अन्य निमित्तानंही महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात फिरलो पण , अशी आचंबित करणारी लोकप्रियता वाट्याला आलेले अनंत भालेराव यांच्यासारखे दुसरे संपादक आणि ‘मराठवाडा’ दैनिक माझ्या पिढीनं पहिले नाहीत .

विद्यापीठ नामांतराच्या काळातही मराठवाड्याबाहेर हीच भावना कायम होती . ‘अनंतरावांना नामांतर मान्य नाही हे खरं पण , त्याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांच्या मनात द्वेष आहे किंवा अनंतराव जातीयवादी आहेत असं मुळीच नाही असं’ , एका मुख्यमंत्र्यानी नाव उघड न करण्याच्या अटीवर एकदा सांगितलं होतं . ‘तुम्ही हे बोलायला हवं’, असा आग्रह मी धरला तेव्हा, ‘हे बोलण्याची राजकीय वेळ ही नाही’, असा बचावात्मक पवित्रा या पुढार्‍यानं घेतला होता . आता एक कबुलीजबाब या लेखाच्या निमित्ताने देतो- नामांतराच्या मुद्द्यावरून अण्णांविषयी आपण असहिष्णुता आणि असंस्कृतपणा दाखवला असं मला तरी अलीकडे वाटतंय . नामांतराच्या मागणीला माझा पाठिंबा होता . हा ठराव विधिमंडळात संमत झाला तेव्हा मी कोकणात-चिपळूणला निशिकांत जोशी संपादक असलेल्या ‘सागर’ या दैनिकात होतो आणि मला पत्रकारितेत येऊन जेमतेम तीन/चार वर्ष झालेली असावीत . तेव्हाही नामांतराच्या बाजूने मी हिरिरीनं लिहित-बोलत होतो . पण , सारासार विवेकानं मतं ठाम करण्याची मानसिक जडणघडण होण्याचा तो माझ्या आयुष्यातला काळ होता . त्यामुळे अण्णांचा तेव्हाचा नामांतराला असलेला विरोध मला नीट समजला होता , असं वाटत नाही . लोकशाहीत प्रत्येकाला विरोधाचा , प्रतिवादाचा हक्क असतो आणि त्याचा आपण आदर करावा ही प्रगल्भता तोपर्यंत माझ्यात विकसित झालेली नव्हती ; त्यामुळे मीही अण्णांच्या विरोधी गटात गेलो आणि त्यांना दुषणे दिली . ती माझ्यातली अकारण म्हणा की अजाणतेपणी आलेली , असहिष्णुताच होती , तो असंस्कृतपणाच होता  . एखाद्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाविषयी एखाद्यानं विरोधाचा सूर काढला की त्याला ‘जातीयवादी’ ठरवून मोकळं होणं ही अध:पतनाची मुलभूत प्रक्रिया आहे हे मला तेव्हाच समजायला हवं होतं , असं राहून-राहून वाटतं .

आता तर, समाजात असहिष्णुता आणि असंस्कृतपणा म्हणजेच विचारसरणी असं मानणारा हुच्चपणा फोफावला आहे . या पार्श्वभूमीवर अनंत भालेराव नावाचा मूल्यगर्भ संस्कार तसंच तत्कालिन ‘मराठवाडा’ नावाच्या दैनिकाची गरज किती तीव्र आहे याची जाणीव नव्यानं सततच होत असते . अर्थात या जाणीवेला उडण्यासाठी पंख नाहीत , रुजण्यासाठी जमीन नाही आणि अनंत भालेराव यांच्यासारखं नेतृत्व नाही…

(लेखक ज्येष्ठ संपादक आहेत)

Cellphone  +919822055799

 

Previous articleविनोबांच्या प्रायोपवेशनाची हकीकत
Next articleनेहरू एकटे व एकाकी होते तेव्हा…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here