–उत्पल व्ही. बी.
गांधीजी : काय काय शब्द काढतात रे…
मी : नवीन काहीतरी सापडलेलं दिसतंय तुम्हाला.
गांधीजी : हो.
मी : तुम्ही जरा जपून वापरा हां इंटरनेट. माणूस बिघडतो.
गांधीजी : मला ना कधी कधी शंका येते.
मी : कसली?
गांधीजी : मी तुला फार डोक्यावर तर चढवत नाही ना याची.
मी : म्हणजे?
गांधीजी : तू मला सल्ले देतोस बिघडण्यावरून? सकाळी दात घासायला तू मोबाइल वापरत नाहीस अजून हे मी नशीब समजतो.
मी : सॉरी हां… मी आपलं सावधगिरी बाळगावी म्हणून म्हटलं…बरं ते सोडा. शब्द कुठला सापडला तुम्हाला?
गांधीजी : फोमो.
मी : ओके….फिअर ऑफ मिसिंग आउट.
गांधीजी : राइट. शब्द गमतीशीर आहे. पण माणसाचं आज असं होतंय हे जरा चिंताजनक नाही वाटत तुला? म्हणजे इंटरनेट, सोशल मीडियाने जन्माला घातलेली नवी फिअर्स?
मी: अर्थात वाटतं. आजच्या माणसाबाबत चिंता करावी असं पुष्कळ काही आहे. आणि मला त्याचीच चिंता आहे. जामच. म्हणजे मी सारखा माणसाची चिंताच करत असतो. तुम्हाला खरं सांगायचं तर चिंता करणं हेच माझं मुख्य काम झालं आहे. बीइंग वरिड इज माय मेन प्रोफेशन. म्हणजे कुणी मला विचारलं की तुम्ही काय करता बुवा तर मी सांगू शकतो की मी चिंता करतो. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पुढे काय होणार? पर्यावरणाचं काय होणार? साहित्याचं काय होणार? लोकांच्या अभिरुचीचं काय होणार? मूल्यांचं काय होणार? माणसाचं एकूणात काय व्हायला हवं? पण काय होणार? मला वाटतंय ते बरोबर ठरलं तर काय होणार? नाही ठरलं तर काय होणार?
गांधीजी : चांगलंय की. चिंता करना अच्छी बात है…
मी : आणि पुढे?
गांधीजी : चिंता जर प्रामाणिक असेल तर कृती होईल.
मी : म्हणजे? मी कृती केली नाही तर माझी चिंता प्रामाणिक नाही? हा माझ्यातल्या तळमळीचा अधिक्षेप नाही का?
गांधीजी : तळमळीचा अधिक्षेप? काय पण शब्द काढलायस….बरं मला सांग चिंता प्रामाणिक आहे म्हणजे काय?
मी : म्हणजे मला आतून, मनापासून वाटतंय काहीतरी.
गांधीजी : ओके. पण ते तसं नसून तुला वाटणारी चिंता ‘फिअर ऑफ पीपल मिसिंग आउट ऑन युअर तळमळ’मधून आलीय असं असेल तर?
मी : तुम्ही मूळचे वकील आहात हे मी विसरतो कधीकधी.
गांधीजी : थँक्स.
–9850677875