गांधी….पुन्हा पुन्हा!

-श्रीकांत बोजेवार

आम्ही गांधींना पाहिले नाही. स्वातंत्र्याची दोन दशके उलटता उलटता जन्माला आलेली आमची पिढी. पाचवी-सहावीत असताना, दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या देशप्रेमानं भारलेल्या वातावरणात खाकी अर्धी चड्डी आणि पांढरा सदरा घालून मिरवणुकीत सहभागी होऊन ‘बोल गांधीचे मनी धरू, देशासाठी त्याग करू’ अशी घोषणा देत गावातील मैदानात जमायचो. तिथे गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी जमा होऊन मग ‘झंडा उँचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा’ हे झेंडागीत सामुहिक स्वरांत गायले जायचे.

परंतु सर्व विद्यार्थी एकत्र येईस्तोवर लाऊडस्पीकरवर गाणी सुरू असायची आणि त्यात ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमतीके संत तुने कर दिया कमाल’ हे गाणं हमखास असायचं.

त्याआधी चौथीला ‘थोरांची ओळख’ या पुस्तकांत गांधीजींची तोंडओळख झालेली होती. त्यातून अहिंसा आणि सत्याग्रह हे शब्द परिचयाचे झाले होते. गांधीजींना राष्ट्रपिता का म्हणतात वगैरे माहिती प्रश्नांच्या उत्तरांत लिहून झाली होती.

चरख्यावर सूत काततांनाचा त्यांचा कृश देह, दृष्टी खाली असल्याने निट न दिसणारा चेहरा आणि टकलामुळे मोठ्या दिसणाऱ्या कानांवर चढलेल्या गोल चष्म्याच्या दांड्या असं एक चित्र डोळ्यांपुढे उभं राहात असे. सूत कातताना त्यांनी घातलेली विशिष्ट पध्दतीची मांडीही मनात एखाद्या शिल्पासारखी कोरलेली.

तेव्हा ते अभ्यासाच्या पुस्तकातला एक धडा म्हणूनच माहिती होते. मिरवणुकीत त्यांचे नाव घेऊन देशासाठी त्याग करण्याची घोषणा देताना कुठेतरी जाणिव होऊ लागली की हे प्रकरण फक्त अभ्यासक्रमापुरतं नाही बहुधा. मात्र त्याग वगैरे शब्दांचं गांभीर्य फार कळत होतं असंही नाही.

शालेय जीवनांत मोठी माणसे म्हणून ज्यांचा अभ्यास केला त्यातल्या तीन व्यक्तींनी पुढील आयुष्यातही वेगेवेगळ्या कारणांनी सतत स्तिमित केले. महात्मा गांधी, पंडीत नेहरू आणि छत्रपती शिवाजी.

शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे विविध पैलू जसे जसे कळले तसे ते चकित करीत गेले. नेहरूंनी स्वतंत्र भारताचा पाया किती कल्पकतेने घातला आणि एका नव्या देशाला सशक्त वाटचालीचा मार्ग कसा दाखवून दिला हे पाहून आदर वाढत राहिला.

मात्र गांधींबद्दल उत्सुकता वाटण्याचं, त्यांच्याबद्दलचं गूढ सतत गहिरं होत जाण्याचं कारण सर्वस्वी वेगळं होतं. पुस्तकांत, इतिहासांत गांधींबद्दल, त्यांच्या महानतेबद्दल सतत वाचायला मिळत होतं आणि प्रत्यक्ष समाजात मात्र गांधींबद्दल टोकाचा विद्वेष असणारी माणसे दिसत होती.

हा विरोधाभासच त्यांच्याकडे अधिक आकर्षित करत होता. मी साधारणतः सातवी-आठवीत वगैरे असेल. एका रविवारी शाळेच्या पटांगणात आम्ही काही मुले क्रिकेट खेळत होतो. शाळेच्या एका कोपऱ्यात काही माणसे जमलेली आहेत आणि एक पन्नाशीचा नेता जरा उंच असलेल्या पायरीवर उभा राहून भाषण करीत आहे, असे दिसले म्हणून आम्ही काही मुले बॅट काखोटीला धरून भाषण ऐकायला उभे राहिलो. बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव वाजपेयी आहे असं कुजबुजीतून कळलं आणि भाषण संपवून ते गेल्यावर त्यांचं पूर्ण नाव अटलबिहारी वाजपेयी असल्याचं कळलं. त्या भाषणातलं काही कळलं नव्हतं आणि आता ते लक्षातही नाही.

परंतु तिथून घरी जाताना आमच्यातल्या एका मुलानं गांधीजींना सणसणीत शिवी दिली आणि ‘त्या टकल्यामुळे भारताचे दोन तुकडे झाले आणि भारतानं पाकिस्तानला ५५ कोटी रूपयेही टकल्यानंच द्यायला लावले’ असं तो म्हणाला.

गांधीजींचा टकल्या असा उल्लेख मला प्रचंड दुखावून गेला. त्यांचा असा अपमानास्पद उल्लेख तेव्हा मी पहिल्यांदाच ऐकला होता.

घरी गेल्यावर मी बाबांना ते सांगितलं तेव्हा ते एवढचं म्हणाले, बामनाचं पोरगं असंच बोलणार…!

त्यावेळी न कळलेले अनेक संदर्भ नंतरच्या आयुष्यात कळत गेले. गांधीजी १९१४ साली दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले, परत गेले आणि मग १९१५ साली ते कायमचे भारतात आले. त्याला अाता बरोब्बर शंभर वर्षे झाली आहेत. गेल्या शंभर वर्षात अनेकांच्या कर्तृत्वाचा इतिहास पुसला गेला, पुसट झाला किंवा त्यांचे महात्म्य मान्य करून त्यांचे देव्हारे केले गेले.

महात्मा गांधी मात्र आजही, शंभर वर्षींनतरही अनेकांच्या मते महात्मा आणि अनेकांच्या मते ‘टकल्या’ आहे.

परंतु त्यातली विलक्षण गोष्ट अशी की तुम्ही त्यांना मान्य करा, अमान्य करा…ते तुमची पाठ सोडत नाही. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा अथवा त्यांचा व्देष करा,ते तुम्हाला स्वतःची दखल घ्यायला भाग पाडतात.

गांधी आम्हाला भेटले ते त्यांच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधात सतत केल्या जात असलेल्या चर्चांमधून आणि लेखनामधून. गांधींचा शोध सगळे घेत आहेत परंतु शंभर वर्षांनीही गांधी कुणाला पूर्णपणे सापडलेला नाही.

या समाजात मोठं व्हायचं असेल, एका मोठ्या जनसमुदायाची मान्यता मिळवायची असेल, विश्वासार्ह नेतृत्व स्थापित करायचे असेल तर गांधीजींचे नाव घ्या, आपण त्यांचे अनुयायी आहोत म्हणून सांगा, त्यांच्या विचारांचा आपल्यावर प्रभाव आहे म्हणून सांगा.

तुम्हाला चर्चेत रहायचं आहे, तुम्ही जे काही बोलता लिहिता त्यावर हिरिरीने वाद झडावेत असे वाटते? मग गांधीजींना शिव्या घाला. त्यांच्या मोठेपणाचे बुरखे फाडा. तुमच्याकडे हमखास लक्ष वेधले जाईल.

सर्वसामान्य माणसांत स्वातंत्र्य चळवळीचा अंगार फुंकण्याचे, त्याला या चळवळीचा भाग बवनिण्याचे श्रेय गांधीजींचे आणि देशाचे तुकडे पाडण्याचे पापही गांधीजींचेच.

गांधी मरताना हे राम म्हणाले, त्यांच्या आश्रमात भजने गायली जात, त्यांना हिंदु धर्माच्या अध्यात्मिक शक्तीबद्दल अभिमान होता अशी निरिक्षणे नोदविणारे अनेकजण आहेत. त्याचवेळी गांधीजी मुस्लीमांच्या बाजूचे होते असाही आरोप करणारे हजारो लोक आहेत.

अफगाणिस्तानला हाताशी धरून भारतावर हल्ला घडवून आणण्याची त्यांची योजना होती, इतपत टोकाची टीका त्यांच्यावर झाली. ते खूप हट्टी होते. ते अत्यत निर्मळ होते. ते अत्यंत धूर्त होते. त्यांनी स्वतःवर विजय मिळवला होता. ते अत्यंत वाह्यात आणि कामूक होते. त्यांनी अहिंसेचा मंत्र दिला. त्यांची अहिंसा ही हिंसेपेक्षाही घातक होती. त्यांच्या आग्रहामुळे पटेलांचा पत्ता कट होऊन नेहरूंकडे देशाचे पहिले पंतप्रधानपद गेले. अशी परस्परविरोधी मते एवढी की कुणाचाही गोंधळ उडावा.

जगभरातील अनेक मोठे विचारवंत गांधींच्या सत्याग्रहानं दीपून गेल्याचं दिसत असताना, जगात कुठं कुठं त्यांचे पुतळे बसविले जात असतानाच, चौकांना-रस्त्यांना त्यांची नाव दिली जात असताना, भारतात गांधीजींच्या पुतळ्यावर कावळे शिटून त्याचे ओघळ त्यांच्या टकलावरून खांद्यापर्यंत येत असतानाही त्याची कुणालाच तमा नसते. त्यांचे आदराने नाव घेणारांनाही नाही आणि टीकाकारांना तर नाहीच नाही.

प्रत्यक्ष आयुष्यातही गांधीजी असे ओघळ सहन करत आले, हे इतिहास वाचताना लक्षात येते. त्यांच्यापेक्षा त्यांच्या पुतळ्यांचे भागधेय वेगळे कसे असेल?

ज्या इतिहासाचे आपण साक्षीदारही नाही आणि भागीदारही नाही. जो इतिहास आपल्या जन्माच्या आधी घडून गेला आहे, ज्या इतिहासाचा आपल्या आजच्या जगण्याशी थेट संबंध नाही, त्याचा अर्थ कसा लावायचा? शिवाजी महाराजांच्या बाबतीत ते खूप सोपे आहे. त्यांचे शत्रू ते आपले शत्रू. त्यांचा अभिमान बाळगला की आपली जबाबदारी संपते. नेहरूंनी पंतप्रधान म्हणून घेतलेल्या निर्णयांचे, त्यांच्या श्रेष्ठत्वाचे परिणाम दिसतात, जाणवतात. त्याचा आपल्याला अर्थ लावता येतो. आपण त्याच प्रगतीच्या एका टोकाला उभे असल्याने दुसरे टोक पाहू शकतो. गांधींचे काय?

माणूस, त्याची बुध्दी, त्याचे विचार, त्याच्या कृती, त्याचे आकलन हे प्रत्येक दिवसाच्या अनुभवाने बदलत असेल तर ते योग्य की अयोग्य? ते सतत बदलत असेल तर त्याचे मूल्यमापन कसे करणार? ज्याला आपण चंचल वृत्ती म्हणतो, धरसोड वृत्ती म्हणतो तिलाच जर स्वाभाविकपणा म्हणायचे तर माणूस जोखणार कसा? गांधीजी म्हणतात, ‘मी एखाद्या विषयावर पंधरा वर्षांपूर्वी एखादे मत व्यक्त केले असेल आणि त्याच विषयावर पाच वर्षांपूर्वी काही म्हटले असेल, या दोन मतांमध्ये भिन्नता असेल तर त्यातले अलिकडले मत ग्राह्य धरा.’ मतावर ठाम राहण्यापेक्षा, स्वतःला सतत अपडेट करत, वेळप्रसंगी पूर्णतः वेगळी भूमिका घेत, स्वतःच्या चुका सुधारत रहा, असा याचा अर्थ होते.

मतलबासाठी आणि स्वार्थासाठी वाऱ्याप्रमाणे पाठ फिरवणे वेगळे आणि स्वतःच्या चुकांची कबुली देत भूमिकेत बदल करणे वेगळे. या दोन गोष्टींमधील फरक कळत नसेल आणि तो स्वीकारण्याचे धाडस नसेल तर गांधीजी कसे पचणार? गांधीजींनी त्यांच्या टीकाकारांना सतत बुचकळ्यात टाकले, गोंधळात पाडले. त्यांच्या अनेक कृतींचे अर्थ आजही लावले जातात. गांधीजींनी हिंसेला प्रकट विरोध केला, त्यांच्या या विरोधाच्या विरोधात अनेकजण ठाम उभे राहिले. तरीही भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांची फाशी रद्द व्हावी म्हणून शब्द न टाकल्याचा आरोप गांधींवरच केला जातो. त्यानी ज्या मार्गाला प्रखर आणि स्पष्ट विरोध केला, त्याच मार्गाने गेलेल्या युवकांचे शिफारसपत्र त्यांना का घ्यावे, या प्रश्नाचे उत्तर कोणाहीकडे नाही. हिंसेकडे दुर्लक्ष करून आणि त्यांचा हेतू लक्षात घेऊन गांधीजींनी ते करायला हवे होते असे म्हटले जाते. परंतु गांधीजींचा आग्रह नेहमीच साधन आणि साध्य या दोन्हींबाबत राहिलेला आहे.  साधनांबाबतच्या त्यांच्या आग्रहामुळे आणि निग्रहामुळेच ते सामान्यत्वाची पायरी ओलांडून महात्मा झाले. त्यांच्या निग्रहाचे आणि इतरांच्या व्यवहारवादामधील विरोधाभासाचे विश्लेषण करताना दोन उद्धृते द्यावीसी वाटतात.

एक लेनिनचे-  There are no morals in politics. There is only expediency.

दुसरे गांधींचे- I would welcome utter failure than achieve a morally doubtful success.

हा विरोधाभास पाहिला की मग एक गोष्ट लख्खपणे जाणवते. सामान्य माणसाच्या स्खलनाचे मार्ग आणि युक्त्या बंद करण्यासाठी गांधीजींनी सर्वत्र प्रामाणिक कबुलीचे, सदाचरणाचे बोळे घालून ठेवलेले होते. गांधींचा भर आचरणावर होता. त्यांचे सगळे तत्वज्ञानच माणसाच्या जगण्या-वागण्याशी संबंधित आहे आणि म्हणूनच केवळ गांधींचे विचार मान्य करणे ही भक्ती होऊ शकत नाही तर ते आचरणात आणावे लागतात. तसे ते प्रत्यक्षात येणे किंवा आणणे हे खुद्द गांधींनाच शक्य झाले, म्हणून ते महान. जगात अनेक विचारवंतांना,समाजशास्त्रज्ञांना त्यांचे आकर्षण वाटले ते त्यामुळेच. मानवी स्खलन स्वीकारून, त्याची जबाबदारीही स्वीकारण्याचे धाडस गांधीजी दाखवू शकत होते. ते कोणतीही- डावी, उजवी किंवा मध्यममार्गी झापडे बांधून वावरले नाही. त्यामुळे ते सगळ्यांनाच सारखेच प्रिय किंवा अप्रिय होते. डाव्यांना, उजव्यांना आणि मध्यममार्गीयांनाही.

खाजगी मालमत्तेची कल्पना समाजात विषमता निर्माण करते त्यामुळे ‘सगळेच सगळ्यांचे’ अशी कल्पना डावे पक्ष उचलून धरत होते आणि गांधीजी या कल्पनेला विरोध करतात म्हणून ते त्यांच्यावर भांडवलदार धार्जिणे असल्याची टीका करत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक एम.एन रॉय आणि त्यांच्या पत्नी एव्हलिन रॉय या दोघांनीही याबाबतीत गांधींवर कठोर टीका केली होती. जमिनदार, शेतकरी, कामगार, मालक या प्रत्येकाचे आर्थिक हितसंबंध वेगवेगळे असताना ते एखाद्या सामायिक लढ्यासाठी एकत्र येणे केवळ अशक्यच नाही तर अनैतिकही आहे, असे डाव्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी गांधींना सामान्य माणसाचा शत्रू ठरवले. मात्र गांधींच्या आवाहनाला सर्वसामान्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून डाव्यांपैकी किमान काहींना वेगळे मत मांडणे भाग पडले. गांधींजी जरी सामान्य माणसाच्या हितांच्या विरोधात भूमिका मांडत असले तरी सर्वसामान्य माणसाला आपल्या कृतीत सहभागी करून घेण्याचे त्यांचे कौशल्य वादादीत आहे, असे विधान ब्रिटिश कम्युनिस्ट नेते पाम दत्त यांनी केले. गांधीचे हे कौशल्य खरेच गेल्या शतकभराच्या इतिहासात एकमेवाव्दितीय आहे. दिल्लीतील रामलीला मैदानात अण्णा हजारेंनी लाखो लोक जमवले आणि त्याला एका लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले ते गांधीजींनी दाखवलेला मार्ग अनुसरल्यामुळेच. अण्णांचा साधेपणा लोकांना गांधींचीच आठवण करून देत होता. स्वार्थविरहित चळवळ म्हणजे गांदीवादी चळवळ हा अर्थ गेल्या शंभर वर्षात अधिकच गडद झाला आहे. मात्र अण्णा हे काही खरे गांधीवादी नव्हेत, किंवा गांधीना विचार विचारपूर्वक स्वीकारलेले नेतेही नव्हेत. ते केवळ गांधींचे नाव घेतात. त्यामुळेच त्यांच्या गांधीत्वाची झूल लगेच उतरली आणि रामलीलावरील गर्दी पांगली. गांधी आपल्या विरोधकांना केवळ विरोधासाठी विरोध करत नाहीत किंवा खोडूनही काढत नाहीत. ते आपले मत ठामपमे मांडतात आणि विरोधकांना विचार करायला लावतात. त्याचे मतपरिवर्तन होण्याची वाट पाहतात आणि दरम्यान त्यांचे स्वतःचेच मत परिवर्तन झाले तर तशी कबुलीही द्यायला मागेपुढे पाहात नाहीत. कम्युनिस्ट नेते बी.टी. रणदिवे हे गांधींचे कट्टर आणि कडवे विरोधक. रणदिवेंनी त्यांच्या अखेरच्या दिवसांत टेलिग्राफला तब्बल नऊ तासांची मुलाखत दिली आणि आपण गांधींचे चुकीचे मूल्यमापन केले होते, अशी कबुली दिली.

गांधीजींना टकल्या म्हणणारा माझा बालपणीचा मित्र आजही त्याच्या तेव्हाच्या म्हणण्यावर बराचसा ठाम आहे. गांधीजींविषयीचा हा विद्वेष काही विशिष्ट वर्गाच्या डीएनएमधून वाहात वाहात पुढील पिढ्यांपर्यत पोचला आहे. गांधीजी हेच फाळणीला जबाबदार होते आणि त्यांनीच या महान देशाचे तुकडे केले, असे या वर्गाला वाटते. आपण आपल्या देशाला हिण वगैरे समजण्याची काही आवश्यकता नाही हे खरे असले तरी आपल्या देशाला महान म्हणावे असे त्यात काय आहे, असा प्रश्न माझ्या पिढीने विचारला तर त्याचे तार्किक उत्तर मिळत नाही. किंवा ज्या लोकांनी या महान देशाचे तुकडे पाडल्याबद्दल गांधींना दोषी धरले त्यांनीही हा देश महान व्हावा किंवा रहावा म्हणून काय केले, याचेही उत्तर मिळत नाही. केवळ एका व्यक्तीचा आग्रह किंवा हट्ट जर देशाचे तुकडे करू शकत असेल, त्याच्या हट्टामुळे पाकिस्तानला ५५ कोटी रूपये दिले जात असतील, तर त्या व्यक्तीचा अधिकार किती मोठा असेल यावर कुणी विचार केला असता तर तो अधिकार त्यांना कसा मिळाला याविषयी थोडेफार चिंतन करण्याची बुद्धी त्यांना झाली असती. गांधीजी हिंदुत्ववाद्यांच्या रोषाला अक्षरशः बळी पडले असतानाच खुद्द मोहम्मद अली जीना यांचे एक निकटवर्तीय झेड. ए. सुलेरी यांनी मात्र असे लिहिले होते की ‘गांधी हे भारतातील मुसलमानांचे निर्मुसलमानीकरण करू पाहात होते.’ म्हणजेच एकप्रकारे ते मुसलमानांना हिंदु परंपरांच्या प्रवाहात सामिल करू पाहात होते. लोकशाहीचा स्वीकार म्हणजे हिंदू राज्याचा स्वीकार होय, असे काही मुस्लीम नेत्यांना वाटत होते.  म्हणजे गांधीजी एकाचवेळी हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही सारखेच ‘धोकादायक’ वाटत होते.  खरे तर गांधी जाती-धर्माचा विचार न करता एकूण मानवी समुहाचा विचार करत होते. ‘जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात’ म्हणणारे आणि विश्वाच्या भल्याची साद घालणारे संत ज्ञानेश्वर हिंदुत्ववाद्यांना जवळचे वाटतात, परंतु तीच गोष्ट कृतीत आणू पाहणारे गांधीजी त्यांना देशाचे शत्रू वाटतात. लोकशाहीचा स्वीकार म्हणजे हिंदूराष्ट्राचा स्वीकार होय, असे जे सुलेरी यांना वाटत होते ते एका वेगळ्या अर्थाने आज खरेच ठरले आहे! अनेक दोष असूनही भारतात लोकशाही राज्य पध्दतीने खोलवर मूळे धरली आहेत आणि भारतापासून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानमधील लोकशाहीची प्रकृती कायम तोळामासाच राहिली आहे. कोणत्याही क्षणी लष्कर तेथील लोकनियुक्त सरकारचा गळा धरू शकते अशीच स्थिती आजही आहे. भारतीय लोकशाही टिकली ती तिच्या प्रारंभिक काळात गांधीजींनी वैश्विक मूल्यांचा आग्रह धरणारी धोरणे घटनेत अंतर्भूत करण्याचा आग्रह धरल्यानेच.

नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय पातळीवरील उदयानंतर एका ऐतिहासिक वादाला खरवडून पुन्हा जीवंत करण्यात आले आहे. तो म्हणजे गांधींनी पंतप्रधान म्हणून पटेलांना डावलून नेहरूंच्या केलेल्या निवडीचा. देशाचा पंतप्रधान कोण व्हावा हे ठरविण्याचे, निवड करण्याचे अधिकार गांधींना कोणत्याही शासकीय पदाने दिलेले नव्हते. त्यांनी हा अधिकार स्वतःच्या वैचारिक अधिष्ठाणातून, आचरणातून आणि पुढारीपणातून मिळवलेला होता. एकदा त्यांचा हा अधिकार मान्य केल्यावर त्यांची निवड मान्य करण्याचाही मोठेपणा आपण दाखवायला नको का? गांधीजी हे आदर्शवादी होते, आदर्श अनेकदा अव्यवहार्य असतात. त्यातले किती आणि कोणते घ्यावेत, या देशाला समाजाला त्यातले काय काय पचू शकते याचा अंदाज नेहरूंएवढा कोणालाच नाही हे गांधींजींना कळले होते. स्वतंत्र भारतीय समाजाच्या आणि देशाच्या गरजा केवळ भावनिक नसून त्या प्रानमुख्याने भौतिक आहेत, आर्थिक प्रगतीच्या मार्गानेच फाळणीच्या जखमा बुजवल्या जाऊ शकतात, याचे भान नेहरूंना होते. गांधीजींनी हे बरोबर ओळखले होते. गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात दंगली उसळल्या. दंगलखोरांविरूध्दचे गुन्हे सिध्द करणे शक्य होणार नाही म्हणून दंगेखोरांकडून केवळ पश्चातापपत्रे लिहून घेऊन त्यांना सोडून देण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा त्याला सरदार पटेल यांनी त्याला विरोध केला होता आणि ते संतापले होते. गांधीजींच्या हत्येमुळे संतप्त आणि विदग्ध झालेल्या पटेलांना गांधीजींचे विरोधक म्हणून रंगवणे म्हणजे खरेतर पटेल यांच्याच चारित्र्याचे विकृतीकरण आहे.

काँग्रेसचे एक कार्यकर्ते परचुरे यांना कुष्ठरोगाने ग्रासले तेव्हा त्यांची सेवा स्वतः करण्याचे गांधींनी जाहीर केले. ते रोज ठरलेल्या वेळी त्यांची मलमपट्टी करीत. परचुरे यांच्या मलमपट्टीची वेळ झाली की काँग्रेसच्या बैठकीत महत्वाची चर्चा सुरू असतानाही ते मध्येच उठून जात. देशाच्या हिताच्या चर्चेपेक्षा परचुरे यांची मलमपट्टी तुम्हाला महत्वाची वाटते का असे खुद्द नेहरूंनी विचारल्यावर गांधीजींनी ‘हो’ असे उत्तर दिले. स्वतःच्या कामावर आणि निश्चयावर एवढी श्रद्धा असणारा माणूस सामान्यत्वाच्या पातळीवर कधीच जोखता येत नाही. गांधीना जोखायचे किंवा तसा प्रयत्न करायचा तर आपल्याला स्वतःलाही चार बोटे उंच होण्याचा प्रयत्न करावा लागतो.

आपण चूक करायची नाही आणि आपला जो वैचारिक प्रतिस्पर्धी असेल तो चूक करण्याची वाट पहायची यासाठी फार मोठे धैर्य तर लागतेच, शिवाय नैतिक मुत्सद्देगिरीही लागते. जीनांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘मी कुणाला भीत असेल तर ते केवळ गांधींना. ते बुद्धीमान आहेत आणि आणि त्यांनी सतत माझ्याकडून चुका होण्याची वाट पाहिली आहे.’ रिचर्ड अटनबरोच्या गांधींवरील चित्रपटात पाकिस्तान निर्मितीच्या वेळचा एक प्रसंग आहे. गांधी जीनांना सांगतात की उद्या परिस्थिती आलीच तर हिंदुस्तानातील प्रत्येक लहान गावातील हिंदू मुसलमानांच्या संरक्षणासाठी स्वतःच्या छातीची ढाल करून उभे राहतील. त्यावर जीना केवळ एक कटाक्ष टाकतात आणि म्हणतात, ‘हिंदुस्तानात गांधी फक्त एकच आहे!’

ज्या देशाने भारतावर राज्य केले, भारताचा स्वातंत्र्यलढ्याच्या संबंध इतिहास ज्या देशाच्या विरोधातील संघर्षाची कथा सांगतो, त्या देशातील एका अभ्यासू दिग्दर्शकाला गांधींचा अभ्यास करण्यावर आणि त्यांच्यावर चित्रपट काढण्यावर आयुष्याची १८ वर्षे घालवावीशी वाटली. ती तशी त्याला का वाटली याचा प्रत्यय आपल्याला ‘गांधी’ हा चित्रपट पाहताना येतो.

ब्रिटिशांनी भारतावर केलेले राज्य हे केवळ राज्य करणे नव्हते. त्यांनी येथील साधनसंत्तीची लूट करतानाच प्रशासकीय सुधारणांपासून तर अनेक गोष्टी केल्या. येथील नागरिकांची मानसिकता समजावून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्याविरोधात लढा द्यायचा आहे, त्यांची वृत्ती समजून घेऊनच तो दिला पाहिजे याचे जेवढे भान गांधीजींनी होते तेवढे इतरांना नव्हते. तुलनेने ‘सभ्य’ असलेल्या ब्रिटिशांएवजी दुसरा कोणी राज्यकर्ता-विरोधक असता तर गांधींनी सत्याग्रह, असहकार, अहिंसा, सविनय कायदेभंग आणि नैतिकता या संकल्पनांना कदाचित थोडे वेगळे रूप दिले असते. त्यांच्या लढ्याचा आणि प्रतिकाराचा पाया मात्र याच प्रमुख तत्वांवर घातला गेला असता. वेगवेगळ्या विकारांवर औषध देताना मूळ घटकांत काही इतर घटक मिसळावे लागतात, याचे त्यांना पक्के भान होते. १९०६ सालच्या सुमारास त्यांनी दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा ‘पॅसिव्ह रेसिस्टन्स’ हा शब्द ऐकला. त्या शब्दांत आपल्याला हवा तो अर्थ आणि कृती नेमकेपणी येत नाही असे वाटल्याने त्यानी नव्या शब्दाचा शोध सुरू केला. आपल्या मनातील कल्पना विषद करून, ती कल्पना शब्दबध्द करण्यासाठी एक स्पर्धा आयोजीत केली. त्यातून सद्आग्रह असा शब्द पुढे आला आणि त्यालाच गांधींना सत्याग्रह असे नाव दिले.

प्रत्येकाने आपले स्वतंत्र अस्तित्व जपून मगच अन्यायाविरोधात लढे देण्याच्या कल्पनेला गांधींचा विरोध होता. आधी सगळे एकत्र येऊ आणि मग लढू असे ते म्हणत. परंतु अन्याय, अत्याचार करणारे आणि तो सहन करावा लागणारे ही समाजातील दोन टोके एकत्र कशी येतील असा प्रश्न चळवळ, आंदोलने, सुधारणा करू पाहणाऱ्यांना पडे. गांधींचे न ऐकता केल्या गेलेल्या सामाजिक सुधारणांचे झालेले भजे आपण आज पाहतो आहोत. कायद्यामुळे कागदावरून संपलेली जात समाजाच्या सर्व थरांत आजही फणा काढून उभी आहे. धर्माच्या भींती आजही तेवढ्याच मजबूत आहेत. गांधींचे नाव घेऊन राजकारण करणारेच मतदार संघ निवडताना जातीची वर्गवारी करून निवडतात. आदिवासी, दलित, मागासवर्गीय यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ करूनही त्या त्या समाजाचे भले तर झालेले नाहीच, भले करण्याची प्रामाणिक इच्छा असलेला एकही सच्चा प्रतिनिधी गेल्या ६५ वर्षात तयार झालेला नाही. कदाचित डॉ आंबेडकर हयात असते तर त्यांनी स्वतःच राखीव मतदारसंघ रद्द करण्यासाठी चळवळ केली असती. गांधींचा राखीव मतदारसंघांना विरोध होता त्यावरून झालेला संघर्ष हा भारतीय इतिहासातला मोठा तात्विक संघर्ष म्हटला जातो. या संघर्षात भूमिका घेताना गांधींनी भविष्याचे अचूक निदान केले होते, असे आता स्पष्टपणे दिसते. समजा गांधींचे निदान चुकले असते आणि गांधीजी हयात असते तर त्यांनी त्याची कबुली द्यायला मागेपुढे पाहिले नसते. आपल्या आयुष्याला ‘सत्याचे प्रयोग’ म्हणणारे गांधीजी कोणत्याही प्रयोगातील अपयशाची शक्यता गृहित धरूनच तसे म्हणतात. आय अम फार फ्रॉम क्लेमिंग एनी फायनॅलिटी ऑर इनफॉलिबिलिएटी अबाऊट माय कन्क्ल्यूजन. आपल्या कोणत्याही दाव्यात पूर्णत्व अथवा अचूकता असू शकत नाही,असे म्हणण्याचे धाडस,केवळ सतत सत्याचा शोध घेत राहणारी आणि आधी गवसलेले सत्य नाकारण्याची हिंमत असणारी व्यक्तीच करू शकते. आपल्या पुराणांमध्ये, इतिहासामध्ये किंवा एकूणच जगाच्या इतिहासामध्ये याबाबत स्वच्छ भूमिका घेणारी गांधी ही एकमेव व्यक्ती आहे. म्हणूनच जगाला गांधींचे सतत आकर्षण वाटत राहिले आहे. कुठलाही प्रयोग आधी स्वतःवर करून पाहायचा आणि त्याच्या योग्यतेची खात्री पटली की मग तो समुहाकडून करून घ्यायचा ही अतिशय योग्य अशी पध्दत त्यांनी अनुसरली होती. इंग्रजांशी लढा देताना आपण आधी एकत्र आले पाहिजे असे वाटण्यामागे त्यांची जी भूमिका होती ती मांडतांना त्यांनी म्हटले आहे की द इंग्लीश हॅव नॉट टेकन इंडिया,वी हॅव गिव्हन इट टू देम. मुळात ब्रिटिश इथे येऊन राज्यकर्ते होऊ शकले त्याचे कारण शोधून ते नष्ट करण्याचा विचार त्यांच्या मनात होता. आजारावर उपचार करताना आधी त्याच्या मूळावर घाव घालायला हवा म्हणतात,तसाच हा विचार आहे. त्यांची लोकशाहीची आणि स्वराज्याची व्याख्या अधिक व्यापक,संपन्न आहे.  ते म्हणतात, ‘केवळ मूठभरांच्या हाती सत्ता येऊन स्वराज्य स्थापन होणार नाही, ज्यांच्यावर सत्ता केली जाते, त्या सामान्य माणसांच्या अंगी चुकीच्या धोरणांना विरोध करण्याचे बळ येणे म्हणजे खरे स्वराज्य होय. सामान्यांना आपली क्षमता आणि कर्तव्ये यांची जाणिव होणे म्हणजे खरे स्वराज्य.’ आज सत्ताधाऱ्यांचे वागणे आणि सामान्य माणसांची भूमिका पाहिली तर गांधी किती खरे होते हे लक्षात येते. लोकशाहीचा वापर करून केवळ एका पक्षाची सत्ता उलथवणे आता लोकांच्या हाती राहिलेले आहे. सत्तेवर असलेले आणि नसलेले यांच्या कोणत्याही कृतीवर सामान्य माणसाचे काही नियंत्रण राहिलेले नाही.

आपले संडास आपण स्वतः स्वच्छ करावेत,आपले कपडे आपण स्वतः इस्त्री करावे असा अनेक लहान सहान गोष्टींतील स्वयंपूर्णतेकडे असलेला त्यांचा कल,सर्वोदय,स्वयंपूर्णता अशा त्यांच्या आग्रहावर खूप चर्चा आणि टीका झाली. आज सुधागणांच्या आणि शहरीकरणाच्या रेट्यात आपण कौतुकाने घरी आधुनिक इस्त्री ठेवतो आणि जाहीरातीत दिसणारी रसायणे वापरून घरचे संडासही साफ करतो. गांधीजी असे माणसाच्या आचरणातील लहान सहान गोष्टींपासून सुधारणांचा विचार करतात. गांधींच्या ब्रम्हचर्याच्या आणि लैंगिक नियंत्रणाच्या प्रयोगावर खूप चेष्टेने लिहिले गेले आहे. परंतु सर्व नियंत्रणांमध्ये ब्रम्हचर्य हे अत्यंत कठीण आणि जवळपास अशक्यप्राय नियंत्रण आहे, हे त्यांचे म्हणणे खरेच आहे.

देशी वस्तूंचा वापर करण्यपासून तर अनेक बाबतीत त्यांचे विचार त्या त्या विषयाच्या सर्व बाजूंचा अभ्यास करूनच तयार झालेले होते. स्वदेशीचा वापर आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार याबाबतचा आग्रह केवळ एतद्देशियांच्या विकासाच्या आग्रहातून आलेले होते. आपल्या वस्तू त्यांच्या वस्तूंची बरोबरी करत नसतील तरी आपल्याच वस्तू वापरा आणि त्यांच्या दर्जाची बरोबरी करण्यासाठी प्रयत्न करा,असे ते म्हणत. अहिंसेचा पुरस्कार करतानाही त्यांनी पळपुटेपणा आणि भित्रेपणा का हिंसेपेक्षाही वाईट आहे,असेच म्हटले होते.

१९०९ साली, गांधी आफ्रिकेत असताना,इलस्ट्रटेड लंडन न्यूजमध्ये जी.के चेस्टरटनने लिहिले होते की, ‘भारतीयांची राष्ट्रीयतेची चळवळ राष्ट्रीय नाही आणि भारतीयही नाही. तेथिल मूठभर लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि त्यांचा सामान्य माणसांसी काहीही संबंध नाही. ब्रिटिशांप्रमाणे संसद असावी, ब्रिटिशाप्रमाणे निवडणुका व्हाव्यात अशा मागण्यांमध्ये भारतीय म्हणावे असे काय आहे?’ या टिकेचा भारतीयांनी जरूर विचार करावा असे गांधीजी म्हणाले होते, इतरांनी केला असेल किंवा नसेल गांधींनी स्वतः मात्र तो केला.

गांधींची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक संघर्ष आणि त्यांची प्रत्येक चळवळ हा अभ्यासाचा विषय आहे. टीकेची लक्ष वादळे घोंगावूनही गांधी टिकून आहेत. गांधींचे तत्वज्ञान,गांधीचे नाव केवळ भाषणापुरते ठेवून प्रत्यक्षात तो आचरणात आणण्याचे जराही प्रयत्न करायचे नाहीत असा अलिखित संकेतच तयार झाला आहे. तरीही गांधींचे नाव घेणे ही म्हणजे आपल्या भलेपणाची, सदाचरणाची खात्री देणे होय ही या देशातील करोडो लोकांची भावना आजही आहे. एका वर्गाने गांधी हत्येऐवजी गांधी वध असा शब्द प्रयोग करून गांधीजींच्या मृत्युला असूराचा नाश करण्याच्या भावनेपाशी नेऊन ठेवले. गांधींचा खून करणाऱ्या नथुरामच्या माथेफिरूपणाला देशभक्तीची वस्त्रे चढविली आणि या देशाची महानता केवळ एका विशिष्ट वर्गाच्या अस्तित्वात आहे असा धोशा लावला. पटेलांचे पुतळे उभारूण्याचा संकल्प करून गांधींच्या मोठेपणाला आव्हान देण्याच्या घोषणा केल्या. त्याच वर्गाच्या सहानुभूतीमधून सत्तेवर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधानाच्या कार्यालयात आल्याच्या पहिल्या दिवशी गांधींजींना वंदन करतात,त्यांच्या प्रतिमेला हार घालतात आणि राजघाटावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतात. गांधींना नमस्कार करण्यातली ही अपरिहार्यता गांधीजींची जी नाळ सामान्य माणसाशी जोडली गेली आहे,त्यातून येते. गांधी भारतात परत आल्याला आणि त्यांनी येथील स्वातंत्र्य लढ्याची सुत्रे हाती घेण्याची प्रक्रिया सुरू होण्याला शंभर वर्षे पूर्ण होत असतानाही गांधींजींचा प्रभाव टिकून आहे आणि गांधींजींबद्दलचे मतभेदही होते तेवढेच तीव्र आहेत. म्हणूनच, या इतिहासाची पाने प्रत्यक्ष उलटली जात असताना ज्यांचा जन्मही झाला नव्हता,इतिहास घडून गेल्या गेल्या त्याच्या झळा ज्यांना बसल्या नाही,त्या माझ्या पिढीलाही गांधींचे हे गूढ साद घालते. त्यांच्याबद्दल उदंड उलट सुलट लिखाण झालेले आहे, ते आपण जेवढे वाचत जातो,तेवढे गांधींचे गूढ वाढतच जाते. आपण गांधींमध्ये गुरफटत जातो. गांधी स्वतः म्हणतात त्याप्रमाणे स्वतःला सुधारण्याची, स्वतःच्या चुका मान्य करण्याची तयारी ठेवून गांधींकडे पहावे. त्यांना टकला म्हणणारेही,त्यांच्या शारिरिक अस्तित्वाच्या पुढे जाऊन वैचारिक अमरत्वाचे कदाचित विश्लेषण करू लागतील.

बा.भ. बोरकर म्हणाले होते-

अशीच जावी काही वर्षे
आणि महात्मा यावा पुढचा..
अम्हांस आम्ही पुन्हा पहावे..
काढुनि चष्मा डोळ्यांवरचा…

आम्ही स्वतःला पुन्हा पहायला तयार नाही आणि डोळ्यांवरची झापडेही काढायला तयार नाही…मग पुढचा महात्मा कसा येणार? आहे तोच महात्मा आम्हाला, शंभर वर्षे गेली तरी नीट कळलेला नाही.

श्रीकांत बोजेवार
98924 19267
—————–————-—————————————

Previous articleशाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे
Next articleतेव्हा माघार घ्यावी….
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. फारच छान मांडले आपण गांधीजी बद्दल म्हणने अणि सुंदर वर्णन. थोडक्यात गांधीजी बद्दल बरेच काही समझले. असेच लिहित रहा. शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here