(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)
-मिथिला सुभाष
*******
एक तरुण, देखणी मुलगी… नृत्यनिपुण… तिची आई देवदासी… आपल्या वाट्याला जे भोग आले ते आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत असं आईला वाटतं आणि ती त्या मुलीचं लग्न एका वयस्कर आर्किआलॉजिस्ट – पुरातत्वशास्त्रज्ञाशी लावते. तो खूप श्रीमंत, गडगंज माणूस असतो. त्याला फक्त तिचं ‘नाचणं’ आवडत नसतं. कारण त्याच्यामते नृत्यकलेला सामाजिक प्रतिष्ठा नसते. शिवाय त्याला वेळही नसतो फारसा आपल्या तरुण बायकोसाठी. पण कपडालत्ता, दागदागिने, सगळी सुखं अगदी हात जोडून उभी करतो तो आपल्या या नव्या नवरीसमोर. नीट राहायचं ना तिने? पण नाही! ती गाठते एक प्रेम करणारा तरुण पुरुष… आणि जाते त्या नवऱ्याला सोडून! कित्ती वाईट्ट… …
गडबडलात ना? काहीही वाईट नाहीये यात! ज्या संबंधात प्रेमच नाहीये, फक्त तिरस्कार आणि उपकाराची भावना आहे, तो संबंध कसा टिकायचा? का टिकवायचा? ज्याला आपल्या जोडीदाराबद्दल आदर नाही, अशा माणसाशी संसार का करत राहायचा? केवळ लग्न झालंय म्हणून? लग्न ही फक्त एक ‘रीत’ आहे. प्रेम या सगळ्या रीतीभातींच्या वर – सर्वोपरी असतं. प्रेमात वयातली अंतरं मोजली जात नाहीत, प्रेमाला फक्त मनातलं अंतर कळतं… आणि जेव्हा दोन मनात अंतराय नसतो, तेव्हा हे प्रेमी जीव एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात… अगदी काहीही…! हेच सांगणारी ही कथा, एका मनस्वी वाटाड्याची आणि त्याच्या प्रेमाखातर समाजाचीही पर्वा न करणाऱ्या त्याच्या प्रियतमेची ही जगावेगळी प्रेमकहाणी – गाईड!
1965 मध्ये ‘गाईड’ प्रदर्शित झाला. तूफान यश मिळाले या सिनेमाला. उत्तम गोष्ट, उत्कृष्ट पटकथा, सुजाण दिग्दर्शन, अवीट गोडीची गाणी, दर्जेदार अभिनय…काय-काय सांगावं ‘गाईड’बद्दल? सर्वांगसुंदर सिनेमा! रासीपुरी कृष्णस्वामी नारायण (आर. के. नारायण) यांनी ‘गाईड’ची गोष्ट त्यांच्या आवडत्या मालगुडीच्या पार्श्वभूमीवर लिहिली होती. सिनेमा बनवताना मालगुडीचे उदयपुर केलेले त्यांना अजिबात पसंत नव्हते. पण ‘गाईड’च्या कथेवर सिनेमाचे संस्कार करणारा, दिग्दर्शक-पटकथाकार विजय आनंद याने आपला हट्ट सोडला नाही. त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत.
खरं तर अत्यंत धाडसी विषयावरचा हा सिनेमा. Live-in Relationship बद्दल आपण आता-आता बोलायला लागलो. ‘गाईड’मध्ये कदाचित पहिल्यांदाच अशा नात्याचे चित्रण केले आहे. पण तरीही त्याने प्रेक्षकाला सांस्कृतिक धक्का दिला नाही. कारण ‘गाईड’मधल्या राजू-रोझीचे समंजस नाते, त्यांच्या प्रेमाची डूब, तिने नवऱ्याचे घर सोडण्याचे कारण आणि कथेला चटका लावणारं वळण देणारा नात्यातला तणाव…हे सारे मानवीय आहे. लेखकाने कोणालाच मखरात बसवलेले नाही. त्यांच्या मातीच्या पायासह ती माणसे आपली वाटतात आणि मग, ‘राजू ‘गाईड’चे पाय मातीचे असले तरी त्याचे मन सोन्याचे आहे,’ हे आपल्याला मान्य होतं. त्याचं मरण पाहतांना त्याला एकदा तरी आईच्या मायेनं पोटाशी घ्यावे वाटते. ‘वहां कौन है तेरा’ने सुरु झालेला एका ‘माणसा’चा प्रवास, ‘अल्ला मेघ दे, पानी दे, छाया दे रे तू, रामा मेघ दे’ या भिजलेल्या विलापिकेच्या साक्षीने संपत असतांना आपली अवस्था मात्र, ‘आँखें फाडे दुनिया देखे आज ये तमाशा…हाय रे विश्वास मेरे, हाय मेरी आशा’ अशी झालेली असते. मग प्रश्न पडतो, तो गाईड – वाटाड्या, म्हणून या सिनेमाचे नाव ‘गाईड’ की…भान सुटलेल्या प्रत्येकाला ‘मार्गदर्शन’ करणारा हा ‘गाईड?’
https://www.youtube.com/watch?v=7J1nr0-2O60
‘गाईड’मधल्या धाडसी विषयामुळे हा सिनेमा विकला जात नव्हता, पण देव आनंदच्या ‘नवकेतन’चे प्रॉडक्शन कंट्रोलर यश जोहर यांनी आपले व्यावसायिक कौशल्य पणाला लावले आणि ‘गाईड’ विकला गेला. (यश जोहर यांचा हा ‘जोहर’ – गुण, त्यांचे चिरंजीव करण जोहर याच्यात जरा ‘जास्त’च उतरलेला दिसतो. काहीही बनवतो आणि विकतो गडी.)
देव आनंद, वहिदा रहमान आणि सचिनदा ही ‘गाईड’मधली झळाळती नक्षत्रं आणि पडद्यामागे राहून त्यांना प्रकाश देणारा स्वयंप्रकाशी तारा – विजय आनंद! खरं तर चेतन आनंद यांनी ‘गाईड’चे दिग्दर्शन करावे असे ठरले होते. पण ते त्यांच्या ‘ह़क़ीकत’मध्ये गुंतले होते. त्यामुळे आनंद बंधूंमधल्या विजय या शेंडेफळाची वर्णी लागली. कानामागून आलेल्या या शेंडेफळाने याआधीच स्वत:ला सिद्ध केलं होतं. पण ‘गाईड’ने त्याच्या यशावर झळाळती सुवर्णमुद्रा उमटवली. दिग्दर्शक म्हणून विजय आनंदला मिळालेल्या ‘गाईड’ आणि नंतरच्या ‘ज्वेल थीफ’च्या यशानंतर देव आनंदचा अहंकार कुठेतरी दुखावला आणि त्यानंतर त्याने जे सुरु केले ती त्याच्या कारकिर्दीच्या शेवटाची सुरुवात ठरली, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. ‘गाईड’ हिंदी सिनेमाचा मानबिंदू झाला!
देवने यातला राजू गाईड अप्रतिम उभा केला. त्याची ‘चॉकलेट हीरो’ची तयार प्रतिमा यात त्याच्या पथ्यावर पडली. केसांचा कोंबडा, त्यावर अलगद ठेवलेली हॅट, कानात सोन्याची बटणं आणि हातात वेताची छडी! सुईच्या नेढ्यातून आरपार जाईल अशी त्याची तब्येत पण पठ्ठ्याची नजर मर्दाची आणि हसणं मासूम (त्या त्याच्या तुटक्या दातासह!). रोझीवर जिवापाड प्रेम करणारा, तिचं करियर घडावं म्हणून स्वतःच्या कामावर पाणी सोडणारा, ती आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून शेवटी भान सुटलेला, आणि त्याभरात गुन्हा करायलाही मागेपुढे न पाहणारा राजू…! असं आत्मघात करणारं प्रेम माणूसच करु जाणे ना? फक्त त्या एका झंझावाती प्रेमामुळे राजू हीरो ठरतो. आणि हे सारे देवने अत्यंत कौशल्याने दाखवले आहे. शेवटी मारुन-मुटकून त्याला ‘स्वामी’ केले जाते, तो भाग, त्यातली राजूची घुसमट, जुनं भरजरी आयुष्य त्यातल्या प्रेमासह समोर उभं असताना, भोळ्याभाबड्या गावकऱ्यांचा विश्वास न तोडण्यामागची त्याची अगतिकता हे सारे देव आनंदने अनपेक्षित सहजपणे पेलले आहे.
https://www.youtube.com/watch?v=BpLyDTEw3Z4