-कामिल पारखे
पोर्तुगिजांच्या दीर्घ राजवटीच्या अनेक पाऊलखुणा गोवा आजही बाळगून आहे.यापैकी अनेक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्येअभिमानास्पद आहेत. साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेने या प्रदेशांत दूरगामी परिणाम केले.पोर्तुगिजांचा हा प्रभाव त्यांच्या या वसाहतीतसामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,भाषा,वास्तुकला, खाद्यसंस्कृती, संगीत, नृत्य आणि इतर क्षेत्रांत आजही ठळकपणे दिसून येतो. .पोर्तुगीज राजवटीचा वारसा असलेला ‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’(समान नागरी कायदा) गोव्यात जवळजवळ शंभर वर्षांपासून अस्तित्वात आहे, हे आजही अनेकांना ठाऊकही नसेल.
…………………………………….
महाराष्ट्र किंवा कर्नाटक सीमा ओलांड़ून गोव्यात प्रवेश केला की, एका वेगळ्याच संस्कृतीचे दर्शन घडू लागते. कोकणातली हिरवी जर्द झाडी आणि विविध दिशेने उंच झेपावलेली नारळाची झाडे इथेही असतात. पण, गोव्याचे वेगळेपण जाणवते, ते इथल्या टुमदार, बैठ्या कौलारू घरांमध्ये, उंच टेकडीवर मोक्याच्या जागी असलेल्या चर्च आणि छोट्यामोठ्या चॅपेल्समध्ये, वेगळ्या धर्तीच्या मंदिरामध्ये. म्हापसा आणि पणजी शहरांकडे आपण येतो, तेव्हा गोव्याचे हे वैशिष्ट्य अधिक ठळकपणे जाणवते. लांबवर पसरलेले समुद्रकिनारे, तिथल्या अरबी समुद्रात आजही स्वच्छ असलेले पाणी आणि तिथली स्वच्छ वाळू कुणालाही मोहित करतात. मात्र, गोवा याहून कितीतरी अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय संघराज्यातल्या इतर राज्यांपेक्षा गोवा अनेक बाबतीत आपले वेगळेपण आजही राखून आहे. हे सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वेगळेपणाचे एक मुख्य कारण म्हणजे, गोवा हा चिमुकला प्रदेश तब्बल साडेचारशे वर्षे पोर्तुगीज वसाहत होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय लष्कराकरवी गोवा, दमण आणि दीव या प्रदेशाला १८ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केले, या घटनेचा यावर्षी सुवर्णमहोत्सव साजरा होतो आहे. मात्र, पन्नास वर्षांपूर्वी हा प्रदेश भारतीय संघराज्यात सामील झाला तरी पोर्तुगिजांच्या दीर्घ राजवटीच्या अनेक पाऊलखुणा गोवा आजही बाळगून आहे. यापैकी अनेक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये अभिमानास्पद आहेत. ‘वैविध्यतेतून एकता’ असे बिरूद अभिमानाने मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या या वैशिष्ट्यात गोव्याचेही योगदान आहे.
पोर्तुगालच्या अल्फान्सो डी अल्बुकर्कने गोव्यावर १५१० साली राजकीय सत्ता मिळवली. ओल्ड गोवा येथे आपल्या या वसाहतीची राजधानी बनवली आणि त्यानंतरच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरल यांनी गोव्याच्या इतरत्र भागांवर सत्ता मिळवली. पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन हिचे ब्रिटिश राजपुत्र चार्ल्स दुसरा याच्याशी १६६१ साली लग्न झाले, तेव्हा पोर्तुगालने आपल्या ताब्यात असलेली मुंबईची सात बेटे ब्रिटिशांना चक्क आंदण म्हणून देऊन टाकली होती. वसई येथील पोर्तुगीज अंमल चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांच्या सैन्याने संपवला होता. ब्रिटिश सत्तेने संपूर्ण भारतभर राजकीय सत्ता मिळवली, मात्र गोव्यातील पोर्तुगीज सत्तेशी ब्रिटिशांनी कधी स्पर्धा केली नाही.
गोव्यापासून दूर अंतरावर, गुजरातपाशी असलेल्या दादरा नगर हवेली, तसेच दमण आणि दीव हे चिमुकले प्रदेशसुद्धा पोर्तुगीज इंडिया, म्हणजेच पोर्तुगीज इस्तादिओचा भाग होते. साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेने या प्रदेशांत दूरगामी परिणाम केले. पोर्तुगिजांचा हा प्रभाव त्यांच्या या वसाहतीत सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, भाषा, वास्तुकला, खाद्यसंस्कृती, संगीत, नृत्य आणि इतर क्षेत्रांत आजही ठळकपणे दिसून येतो.
गोव्याची राजधानी पणजी या शहरात प्रवेश केल्यावर तिथला आदिलशहा पॅलेस परिसर, अल्तिन्हो (पोर्तुगीज भाषेत टेकडी) किंवा फॉन्तइनेझ अथवा मांडवीच्या तीरावरच्या कंपाल परिसरात तुम्ही फिरला की, पोर्तुगीज राजवटीचा वास्तुशास्त्रीय वारसा तुम्हाला ठळकपणे लक्षात येईल. इथल्या इमारतींचा, बंगल्यांचा, छोट्यामोठ्या घरांचा रंग यामध्ये एक कमालीचे सातत्य आहे, हे तुम्ही लक्षपूर्वक पहिले, तर लगेच तुमच्या लक्षात येईल. या वास्तूंचा रंग केवळ दोन रंगात असतो, पिवळा आणि सफेद, लाल आणि सफेद, निळा आणि सफेद. फॉन्तइनेझ परिसरातले रचनाबद्ध रस्ते आंणि तिथली घरे गोव्यातल्या पोर्तुगीज शैलीच्या वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. मागे एका संस्थेने तर आपले पूर्ण वार्षिक कॅलेंडर फॉन्तइनेझ परिसरावर काढले होते !
गोव्यातल्या जुन्या सरकारी, खासगी इमारती, तीनशे-चारशे वर्षे जुन्या असलेल्या चर्चेस वगैरे वास्तू इथल्या पोर्तुगीज राजवटीच्या खुणा दृश्यपणे आपल्या अंगाखांद्यांवर बाळगून आहेत. त्याचप्रमाणे या प्रदेशातल्या इतर कितीतरी अदृश्य बाबी पोर्तुगीज राजवटीचा आणि संस्कृतीचा वारसा मिरवत आहेत. यात परदेशी राजवटीचा व संस्कृतीचा अभिमान नसला, तरी त्याबाबत लज्जा राखण्याचेही काही कारण नाही.
भारतीय उपखंडातील पोर्तुगिजांच्या वसाहतीचा एक महत्त्वपूर्ण प्रभाव म्हणजे; या प्रदेशात म्हणजे, वसई, गोवा, दमण आणि दादरा, नगर हवेली येथील ख्रिस्ती लोकसंख्येचे मोठे प्रमाण. गोव्यात विशेषतः दक्षिण गोव्यात विविध जातींतले स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती झाले. पोर्तुगीज हे कॅथोलिक पंथीय, त्यामुळे साहजिकच गोव्यातला ख्रिस्ती समाज कॅथोलिक आहे. पोर्तुगिजांचा विविध क्षेत्रांतील प्रभाव प्रामुख्याने या कॅथोलिक समाजात आढळतो.
गोवा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेजवळचा एक अगदी छोटासा, महाराष्ट्रातील एका जिल्ह्यांच्या आकाराएवढा. गोवा, दमण आणि दीव हा एक केंद्रशासित प्रदेश होता. १९८७ साली दीव आणि दमण यांना वेगळं करून गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. गोवा हे समुद्रकाठचं स्थळ, त्यात पाश्चिमात्य वळणाची जीवनशैली, खाद्य आणि पेय संस्कृती! गोव्यामध्ये शेजारच्या राज्यांच्या तुलनेत पेट्रोलप्रमाणेच मद्यही खूप स्वस्त आहे, हे आता संपूर्ण देशभर माहीत आहे.
मात्र पोर्तुगीज राजवटीचा वारसा असलेला ‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’ (समान नागरी कायदा) गोव्यात जवळजवळ शंभर वर्षांपासून अस्तित्वात आहे, हे आज अनेकांना ठाऊकही नसेल. लग्न, मालमत्तासंबंधी वारसाहक्क आणि स्त्री-पुरुषांना समान हक्क, ही या कायद्याची काही वैशिष्ट्ये!
मी गोव्यात शिक्षणासाठी १९७० च्या दशकात पोहोचलो, तेव्हा माझ्या मित्रांचे आईवडील, इतर ज्येष्ठ मंडळी आपसात पोर्तुगीज भाषेत बोलत. त्यांच्यामुळे मीही या भाषेत थोडेफार बोलायला शिकलो. आता गोव्यातून पोर्तुगीज भाषा हद्दपार झाली आहे. पोर्तुगीज संस्कृती आणि इतिहासाचे अनेक अवशेष मात्र गोव्यात आजही आढळतात
भारतातील पहिले आणि शेवटचे सार्वमत
भारतात सामील झाल्यावर गोवा, दमण आणि दीव या छोट्या प्रदेशाचे करायचे काय, हा प्रश्न निर्माण झाला. गोव्यात हिंदू समाजातील सर्व लोक आपसात कोकणीत बोलत असले, तरी सर्वांना मराठी कळते. लिहिता-वाचता येते. अनेकांना गोवा हा प्रदेश महाराष्ट्रात विलीन व्हावा, असे वाटणे साहजिकच होते. मात्र, मराठी न समजणाऱ्या, देवनागरी लिपीचे फारसे ज्ञान नसणाऱ्या, कोकणी आणि पोर्तुगीज बोलणाऱ्या गोव्यातील ख्रिस्ती लोकांसाठी गोवा महाराष्ट्रात विलीन करणे धक्कादायक होते.
गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याच्या या घडामोडींनी ‘युनायटेड गोवन्स’चेही नेते डॉ. जॅक सिक्वेरा अस्वस्थ झाले. गोवा काँग्रेसचे अध्यक्ष आणि स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर, उदय भेम्ब्रे यांच्यासह अनेक कोकणी साहित्यिकांचाही गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यास ठाम विरोध होता. या विलिनीकरणविरोधी नेत्यांच्या प्रयत्नास यश येऊन अखेरीस भारतीय संसदेने सार्वमताला मंजुरी दिली. त्यानंतर १६ जानेवारी १९६७ रोजी गोव्यात सार्वमत घेण्यात आले. ५४ टक्के लोकांनी या प्रदेशाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या बाजूने कौल दिला, तर ४३ टक्के लोकांनी गोव्याच्या विलिनीकरणाच्या बाजूने मत दिले. हे सार्वमत भारतातील पहिले नि शेवटचे ठरले. त्यानंतर कुठल्याही राज्यात सार्वमत घेऊन जनमताचा कौल घेण्याचा विचारसुद्धा केंद्रातील कुठल्याही सत्ताधारी पक्षाने कधीही केलेला नाही.
जेसुईट धर्मगुरुंनी पणजीत चालविलेल्या प्री-नोव्हिशिएटमध्ये धर्मगुरु होण्यासाठी दाखल झालेले आम्ही वीस तरुण उमेदवार पाच वर्षे उच्च माध्यमिक शिक्षण घेत होतो. मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी असलेल्या आमच्या प्री-नोव्हिशिएटमध्ये मूळ दमणचा रहिवासी असलेला फ्रान्सिस हा मेस्ता किंवा आचारी होता. तो फक्त पोर्तुगीज, कोंकणी आणि थोडीफार हिंदी बोलायचा. संध्याकाळी कामातून मोकळा होऊन फेणी घेतल्यावर, तो आपल्या कर्कश आवाजात पोर्तुगीज गाणी गायचा. आमच्या जेवणासाठी तो रोज बनवत असलेल्या बीफच्या विविध पाककलाकृती, केक आणि त्याची जीवनशैली दमण येथे त्या काळातही कायम असलेल्या पोर्तुगीज प्रभावाचे प्रतीक होते. मेस्ता फ्रान्सिसमुळेच पोर्तुगीज भाषेत दमण या शब्दाचा उच्चार ‘दमॉव’ असा करतात, पोर्तुगालची राजधानी लिस्बनचा पोर्तुगीजमध्ये उच्चार ‘लिसबॉव’ असा करतात, हे मला कळले होते. या मेस्ताकडून मी ‘ओब्रिगाद’ (थँक्स) असे अनेक पोर्तुगीज शब्द शिकलो.
चर्चमधील ‘मिस्साविधी’ आणि इतर सर्व प्रार्थनांसाठी गोव्यातील कॅथोलिक समाज पोर्तुगीज प्रभावामुळे आजही फक्त रोमन लिपीत लिहिलेल्या कोकणी भाषेचाच वापर करतो.
पोर्तुगाल आणि युरोपात स्थलांतर
गोवा भारतात सामील होण्याआधी गोव्यात ख्रिस्ती समाजाचे प्रमाण जवळजवळ ३० टक्के होते. पण, नंतरच्या काळात त्यांच्या भारतात आणि परदेशात होणाऱ्या स्थलांतराने आणि भारतीय लोक गोव्यात मोठ्या प्रमाणात स्थायिक होत गेल्याने ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या वेगाने खाली येऊन आता २५ टक्क्यांवर आली आहे. अलीकडेच मी दमणला भेट दिली. दमणमधील ख्रिश्चन समाजाची संख्या झपाट्याने कमी होत आहे, कारण त्यांच्यापैकी बरेच लोक पाश्चात्य देशात स्थायिक झालेले आहेत. अजूनही पोर्तुगीज पासपोर्ट असल्याने आजही युरोप आणि इतर देश त्यांना खुणावत आहेत.
पोर्तुगालचे पंतप्रधानपदी गोव्याचे कोस्टा
मूळच्या गोवन असलेल्या अनेक लोकांनी पोर्तुगालच्या संसदेत खासदार आणि मंत्री म्हणून कार्य केले आहे. गोव्यातील जनतेला पोर्तुगालचे नागरिक म्हणून समान हक्क होते. ब्रिटिश राजवटीत दादाभाई नौरोजी ब्रिटिश संसदेचे खासदार बनले त्याच्या कितीतरी आधीपासून गोव्यातील लोकांना पोर्तुगालच्या संसदेचे सदस्य होण्याची संधी मिळाली होती. सध्याचे पोर्तुगालचे दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले अंतोनियो कोस्टा हे सुद्धा मूळचे गोव्याचे. मडगाव येथे त्यांचे आजोबा राहात असत. पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर कोस्टा यांनी गोव्याला २०१७ ला भेट दिली होती. या दौऱ्यात आपल्या मडगावच्या घरी, ओल्ड गोव्याला बॉम जेसू बॅसिलिका आणि मंगेशी मंदिराला त्यांनी भेट दिल्या होत्या.
गोवा, दमण आणि दीव या छोट्याशा प्रदेशातील अनेक लोकांनी मागील तीनशे चारशे वर्षांच्या काळात पोर्तुगालला किंवा पोर्तुगिजांच्या वसाहती असलेल्या मोझांबिक, टांझानिया वगैरे ठिकाणी स्थलांतर केले होते.
सध्या पोर्तुगालचे पंतप्रधान असलेल्या अंतोनियो कोस्टा यांच्या आजोबांनीही असेच गोव्यातल्या मडगाव येथून मोझांबिक येथे स्थलांतर केले होते. या पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील अनेक लोकांनी पोर्तुगालला आणि युरोपात जाऊन विविध क्षेत्रांत नाव कमावले आहे. आधुनिक वैज्ञानिक संमोहनशास्त्राचा जनक म्हणून फ्रान्समध्ये कीर्ती कमावलेला ॲबे डी फरिया या त्यापैकी एक. पणजीला जुन्या सचिवालयाजवळ ॲबे डी फरियाचा पूर्णाकृती मोठा पुतळा आजही आहे.
गोवा, दमण आणि दीव या पोर्तुगीज वसाहतीतील लोकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे नागरी हक्क होते आणि पोर्तुगीज पासपोर्ट असायचा. गोवा, दमण आणि दीव भारताचा भाग बनला, तेव्हा या प्रदेशातून पोर्तुगालला किंवा पोर्तुगालच्या इतर वसाहतीत राहायला गेलेल्या बहुतेक लोकांनी स्वतःचा पोर्तुगीज नागरिकाचा पासपोर्ट कायम ठेवणे, म्हणजेच पोर्तुगालचे नागरिक म्हणून राहणे अधिक पसंत केले. त्यानंतर ते गोव्यात आणि भारतात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येतात, ते परदेशी नागरिक म्हणूनच. आताचे पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनियो कोस्टा आले होते, त्याप्रमाणे अशा लोकांची संख्या प्रचंड होती. अर्थात, यामध्ये कॅथोलिक लोकांचा भरणा अधिक होता, हे साहजिकच होते. गोव्यातील हिंदू लोक उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा करिअरच्या शोधात मुंबई-पुण्याकडे वळत असत, तसे इथले पाश्चात्य संस्कृतीकडे ओढा असलेले कॅथोलिक लोक लिस्बन किंवा इतर शहरांत जात असत.
सत्तरच्या सुमारास धर्मगुरु होण्यासाठी मी गोव्यात आलो, तेव्हा गोवा नुकताच पोर्तुगिजांच्या सत्तेतून मुक्त झाला होता. पोर्तुगीज राजवटीच्या इथल्या खूप खाणाखुणा अस्तित्वात होत्या. पोर्तुगीज पासपोर्ट असणारे आणि नोकरीनिमित्त पोर्तुगाल किंवा पोर्तुगिजांच्या पूर्वीच्या वसाहतीत राहणाऱ्या काही पालकांची मुलं माझ्याबरोबर या प्री-नॉव्हिशिएटमध्ये होती. साहजिकच पोर्तुगीज भाषेत बोलणे त्यांना जमायचे. विशेष म्हणजे, यापैकी काही मुलं गोव्यात जन्मलेली होती, तर काही चक्क पोर्तुगालमध्ये किंवा नैरोबी वगैरे शहरात जन्मली होती.
आमच्यासारखी ही मुलं भारतीय नव्हती, त्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट असल्याने माझे हे मित्र पोर्तुगीज नागरिक होते, हे मला खूप उशिरा कळाले. वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच, म्हणजे सज्ञान होण्याआधीच यापैकी काही मुलं आपल्या भावंडांसह गोव्यातून भुर्रकन उडाली आणि आपल्या पोर्तुगीज पासपोर्टच्या आधारे लंडन वगैरे युरोपातल्या शहरांत स्थायिक झाली. सज्ञान झाल्यानंतरही त्यांनी गोव्यात राहायचे ठरवले असते, तर त्यांना भारतीय पासपोर्ट, म्हणजे नागरिकत्व घ्यावे लागले असते आणि याबाबत ही मुलं आणि त्यांचे आईवडील फार उत्सुक नव्हते.
ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला अशा पद्धतीने पोर्तुगालमार्गे युरोपला, अमेरिका किंवा कॅनडाला स्थायिक झालेल्या माझ्या या मित्रांशी गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांमुळे पुन्हा संपर्क झाला आहे. आपल्या नातेवाईकांना आणि माझ्यासारख्या मित्रमंडळींना भेटण्यासाठी ते चारपाच वर्षांतून एकदा येतात, ते परदेशी नागरिक म्हणूनच. गोव्यात अनेक गावांत परदेशात स्थायिक असलेल्या गोंयकारांची मोठमोठी घरे बेवारस स्थितीत आहेत आणि त्यांच्यावर ‘लँड माफियां’चा डोळा आहे.
गेल्या महिन्यात मी गोव्यात होतो, तेव्हा सहज फिरताना पोर्तुगीज वकिलातीचे कार्यालय दिसले. गोव्यात अठरावा जून रोडवर पणजी चर्चजवळ असलेल्या पोर्तुगालच्या वकिलातीच्या कार्यालयात पोर्तुगीज पासपोर्ट, म्हणजे नागरिकत्व मागण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या आजही खूप आहे. डिसेंबर १९६१ च्या आधी दमणमध्ये जन्मलेल्या सर्वांना पोर्तुगीज पासपोर्ट मिळायचा. या सुविधेचा लाभ घेऊन अनेकांनी पोर्तुगालमार्गे युरोपियन राष्ट्रांचे नागरिकत्व मिळवले आहे. आजही त्या प्रयत्नात शेकडो जण असतात. गोव्यातही असाच प्रकार मी अनुभवला आहे.
आपण फार वेगाने अल्पसंख्य होत चाललो आहोत आणि काही काळानंतर या प्रदेशातील आपले अस्तित्व व संस्कृती दखल घेण्यासारखी राहणार नाही, अशी भावना गोव्यातील कॅथोलिक लोकांमध्ये आढळते. कारण, या समाजातील लोक मोठ्या संख्येने युरोपात आणि इतर पाश्चात्य देशांत स्थायिक झाले आहेत.
‘सांन जॉव’
पावसाचं आगमन झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस गोव्यातील झरे-ओढे, विहिरी, तलाव आणि तळी पाण्यानं तुडुंब भरतात. सर्व परिसर हिरवाईनं नटतो. या काळात २४ जून रोजी गोव्यात ‘सांन जॉव’ हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. अनेक गावांत तरुण या दिवशी घुमट, गिटार आणि इतर वाद्यांच्या संगीतात धुंद होत ‘सांन जॉव’ अशी आरोळी ठोकत पाण्यात सूर मारून हा सण साजरा करतात.
‘सांन जॉव’ म्हणजे पोर्तुगीज आणि कोकणी भाषेत ‘सेंट जॉन’. सेंट जॉन द बॅप्टिस्ट ‘बायबल’च्या ‘नव्या करारा’तील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. येशूचा त्याने बाप्तिस्मा केला] म्हणून जॉन बॅप्टिस्ट हे नाव.
सेंट जॉन द बॅप्टिस्ट आणि येशू ख्रिस्त आपापल्या आईंच्या उदरात असताना त्या दोघींची भेट झाली आणि त्या वेळी झालेल्या एका घटनेशी संबंधित या उत्सवाची जन्मकथा आहे. तो प्रसंग फादर फ्रान्सिस दिब्रिटो-संकलित ‘सुबोध बायबल’ या ग्रंथात पुढील शब्दांत लिहिला आहे – “मारियाने झेकरायहाच्या घरी जाऊन एलिझाबेथला अभिवादन केले. मारियेचे अभिवादन ऐकताच एलिझाबेथच्या उदरातील बालकाने उसळी मारली आणि एलिझाबेथ पवित्र आत्म्याने भरून पावली. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्या पायरीवर चढावे, हा माझा किती मोठा सन्मान आहे! पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने आनंदाने उसळी मारली.”
उदरातील बालकाने आनंदाने उसळी मारण्याच्या बायबलमधील प्रसंगानिमित्त सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या फेस्ताच्या, म्हणजे जन्मदिनाच्या सणाच्या दिवशी खोलवर पाण्यात उडी मारून गोव्यात हा ‘सांन जॉव’ उत्सव साजरा केला जातो. उत्तर गोव्यात आणि विशेषतः बार्देस तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. उत्तर गोव्यातल्या साळगाव, शिवोली वगैरे गावांत या उत्सवादरम्यान तरुण मुलांना ‘सांन जॉव’ असे ओरडत पाण्यात सूर मारताना मी पाहिले आहे. विविध पानेफुले यापासून तयार केलेले कॉपेल (मुकुट) डोक्याला लावून पाण्यात डूब मारली जाते. पारंपरिक संगीताची साथ असतेच.
विशेष म्हणजे, बायबलवरील आधारित हा लोकोत्सव असला, तरी जगाच्या पाठीवर केवळ गोव्यातच हा ख्रिस्ती सण अशाप्रकारे साजरा होतो! या उत्सवाचे कार्निव्हलसारखे सुदैवाने मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झालेले नाही. गोव्यातील लोकसंस्कृतीचा तो एक भाग राहिला आहे.
ओल्ड गोवा आणि सेन्ट फ्रान्सिस झेव्हिअर
गोव्याला पर्यटक म्हणून येणारे बहुतेक सर्व जण जुन्या गोव्याला हमखास भेट देतात. याचे कारण म्हणजे, त्याचे मध्ययुगीन काळातले स्थान आणि त्या ऐतिहासिक काळाच्या तिथे अजूनही सुस्थितीत असलेल्या खाणाखुणा आणि पाश्चात्य गॉथिक शैलीचा समृद्ध वास्तुशास्त्रीय वारसा. पोर्तुगिजांच्या राजवटीत १७ व्या-१८ व्या शतकांत गोव्याला ‘पूर्वेकडचे रोम’ म्हटले जाई. कारण म्हणजे, येथील मोठमोठी कॅथेड्रल, चर्चेस. चर्चच्या गॉथिक शैलीच्या भव्य वास्तू. जुन्या काळातील या स्थळाच्या गौरवशाली पर्वाची साक्ष देणारे सेंट ऑगस्टीन टॉवरसारखे उंच आणि भव्य भग्न अवशेष पर्यटकांना आजही गोव्याच्या एका वेगळ्या संस्कृतीची, ऐतिहासिक ठेव्याची चुणूक दाखवून देतात.
ओल्ड गोवा ही या पोर्तुगिजांच्या वसाहतीची सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून राजधानी होती. सतराव्या शतकात बांधलेल्या सी कॅथेड्रल आणि बॉम जेजू बॅसिलिका. या दोन वास्तू पाहिल्याशिवाय ओल्ड गोवा या पर्यटनस्थळाची भेट पूर्णच होऊ शकत नाही. कारण, बॉम जेजू बॅसिलिका येथे सोळाव्या शतकातील संत फ्रान्सिस झेव्हिअर यांच्या शरीराचे अवशेष (रिलिक) ठेवले आहेत.
सतराव्या शतकातील फ्रान्सिस झेव्हिअर हा स्पॅनिश जेसुईट धर्मगुरु. चीनकडे जाण्यासाठी जहाजाची वाट पाहत असताना त्याचे निधन झाले आणि त्याचे शरीर गोव्यात आणले गेले. ते कुजले नव्हते म्हणून मग जपले गेले आणि गेली काही शतके पारदर्शक पेटीत ठेवण्यात आले आहे. तीन डिसेंबर हा सेंट फ्रान्सिस झेव्हिअर ‘गोयंचो सायबा’ याचा सण (फेस्त). त्यादिवशी ओल्ड गोव्यात मोठी यात्रा भरते, तीन डिसेंबरला गोवा राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. महाराष्ट्रातून काही मंडळी, विशेषतः कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील बार्देसकर लोक या गोयंचो सायबाला वंदन करण्यासाठी पदयात्रा करत ओल्ड गोव्याला दोन डिसेंबरच्या संध्याकाळी पोहोचत असतात.
गोवा राज्य शासनातर्फे या संताच्या अवशेषाचे दशकातून एकदा प्रदर्शन (एक्स्पोझिशन) भरवले जाते आणि या महिन्या-दीड महिन्यांच्या काळात देशभरातील लाखो भाविक गोव्याला भेट देतात. या धार्मिक पर्यटनामुळे गोव्याच्या महसुलात भर पडत असते. अशाच एक-दोन प्रदर्शनात सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे हे अवशेष मी जवळून पाहिले आहे. संत फ्रान्सिस झेव्हिअरला कॅथोलिक चर्चने गोव्याचा आश्रयदाता म्हणजे ‘पॅट्रन सेन्ट’ हा दर्जा दिला आहे.
जुन्या गोव्याच्या अगदी एका टोकाला मांडवी नदीच्या किनाऱ्यापाशी आजही चांगल्या स्थितीत असलेले पण छोटेशेच ‘व्हॉईसरॉय आर्च’ आहे. गोव्याच्या या सागरी प्रवेशद्वाराविषयी माहिती नसल्याने बहुतेक पर्यटक या निर्जन टोकाला फिरकतदेखील नाहीत वा त्यांचे पर्यटक गाईड त्यांना इकडे आणत नाहीत. मांडवीच्या तीरावर नांगर टाकलेल्या गलबतातून लिस्बनहून आलेले वास्को द गामा आणि अफान्सो डी अल्बुकेर्क वगैरे व्हॉईसरॉय, गव्हर्नर जनरल या सागरी प्रवेशद्वारातून या ‘व्हॉईसरॉय आर्च’मधून लष्करी इतमामाने गोव्यात प्रवेश करत असत. या ‘व्हॉईसरॉय आर्च’वर म्हणजे कमानीच्या अगदी टोकावर आजही गोव्यात पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या युरोपियन दर्यावर्दी वास्को द गामाचा छोटासा, पण पूर्णाकृती पुतळा आहे.
पाव संस्कृती
भाजी-पाव हा गोयंकारांचा सर्वांत लोकप्रिय नाश्त्याचा पदार्थ. या भाजी-पावातील पावांचे आणि भाजींचेही अनेक प्रकार आहेत. बटाटा भाजी, टमाटा भाजी, पातळ भाजी, मिक्स्ड भाजी, सुकी भाजी, उसळ भाजी, वाटाणा भाजी, मुगाची भाजी असे भाज्यांचे अनंत प्रकार असतात. पाव संस्कृती हा सुद्धा पोर्तुगिजांचा आणखी एक वारसा. पाव हा मूळचा पोर्तुगीज शब्द. मराठीत ‘पगार’ हा शब्दसुद्धा मूळ पोर्तुगीज ‘पाग’ या शब्दापासून आला आहे. असे अनेक शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आले आहेत. बटाटा आपल्या जेवणात नेहेमी असतो. बटाटा म्हणजे ‘पोटॅटो’ हा पदार्थ युरोपियन, म्हणजे पोर्तुगीज दर्यावर्दींनी भारताला आणि आशिया खंडाला दिलेली एक भेट आहे, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल.
खाद्यसंस्कृती
गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचा विषय निघाल्यावर तिथल्या पेयपानाबद्दल (की अपेयपान?) कसे टाळता येईल? गोव्यातल्या कुठल्याही मांसाहारी जेवणाच्या हॉटेलात तुम्ही बसला की, वेटर ताबडतोब टेबलावर काचेचे रिकामे ग्लास ठेवतो. उडुपी हॉटेलात टेबलावर पाण्याचे ग्लास ठेवतात तसे! याचे कारण म्हणजे गोव्यात परमिटरूम हा प्रकारच नाही. हा पोर्तुगीज संस्कृतीचा आणखी एक परिपाक.
गोव्यात फिश-करी राईस व्यतिरिक्त चिकन शाकुती, सोरपोतेल, विंदालू, चोरीस पाव सारख्या इतर खास गोवन तथा पोर्तुगीज खाद्यपदार्थांचाही आस्वाद घ्यायला हवा. गोव्यात कॅथोलिक व्यक्तींमार्फत चालविलेल्या हॉटेलात बिफ-स्टीक वगैरे पदार्थ मिळतात. कॅथोलिक कुटुंबात पाहुणचाराचा योग लाभला, तर डुकराच्या मांसाचे (पोर्क) केलेले सोरपोतेर, चिकन वा पोर्क विंदालू या मांसाहारी पदार्थांची चव घेता येईल.
कामावरून संध्याकाळी किंवा रात्री घरी परतल्यावर पेयपान आणि जेवणाआधी आंघोळ करून ताजेतवाने व्हायचे, ही गोव्यातील अनेक लोकांची सवय, हा एक पोर्तुगीज सांस्कृतिक वारसा.
मांसाहाराचे शौकीन असलेल्या मंडळींनी ‘चोरिस पाव’ हे पोर्कपासून बनवलेले चमचमीत, मसालेदार सँडविच खायलाच हवे. याशिवाय, पणजी चर्चपाशी असलेल्या ‘मिस्टर बेकर- 1922’ या दुकानात आणि म्हापसा मार्केटमध्ये अनेक दुकानात गोव्याची खासियत असलेल्या बिबिन्का, काळ्या गुळापासून बनवलेल्या दोदलसारखे विविध बेकरी पदार्थ, केक वगैरे मिळतात.
१९७०च्या दशकात गोव्यातील बहुतेक समुद्रकिनारे निर्जन असायचे. कलंगुट आणि कोलवा हे बीच तेव्हाही लोकप्रिय असले, तरी अंजुना-वागातोर, वारका वगैरे समुद्रकिनारी कुणी फिरकतही नसायचे. अंजुना बीचवर दर बुधवारी भरणारे ‘फ्ली-मार्केट’ त्याकाळीही एक आकर्षण असायचे. या फ्ली-मार्केटमध्ये परदेशी पर्यटक आपल्याकडील विविध वस्तू विकायला काढीत असत आणि यापैकी अनेक वस्तू दुर्मीळ किंवा कलात्मक असत. मागे युरोपला सहलीला असताना पॅरिसमध्ये मोन्तमार्ट परिसरात भुयारी मेट्रोच्या वर असलेल्या वॉकिंग प्लाझावर असाच बाजार भरलेला दिसला. तेथे अनेक लोक आपल्या कुटुंबियांबरोबर घरातील कितीतरी नको असलेल्या वस्तू – पुस्तके, फर्निचर, कपडे – विकत होते. तो बाजार पाहिला आणि मला गोव्यातल्या अंजुना बीचवरच्या फ्ली-मार्केटची लगेचच आठवण आली.
सिएस्ता
गोव्यात मिरामारच्या जेसुईटांच्या पूर्व-सेमिनरीत असताना मला ही सवय लागली, ती आतापर्यंत काही सुटलेली नाही. दिवसाच्या मध्यंतरात सर्वांनी एकत्रित जेवून बरोबर दीडच्या ठोक्याला आपल्या बेडवर दुपारच्या झोपेसाठी सक्तीने निद्रित व्हावे लागे. दुपारची ही झोप म्हणजे ‘सिएस्ता’. गोव्यात साडेचारशे वर्षे असलेल्या पोर्तुगीज राजवटीचा सिएस्ता हा आणखी एक भलाबुरा सांस्कृतिक वारसा ! गोव्यात सिएस्ता एक अगदी संवेदनशील, जिव्हाळ्याचा विषय आहे. सिएस्ताच्या वेळी कुणालाही भेट देणे, फोन करणे शिष्टाचारविरोधी समजले जाते. दुपारी चारनंतर मग सगळीकडे दैनंदिन व्यापार पुन्हा सुरू होतात.
दुपारच्या त्या झोपेने दिवसभर मरगळ अशी कधी जाणवायची नाही. विशेष म्हणजे, पणजीतील आणि गोव्यातील म्हापसा, मडगाव अशा इतर काही शहरांतील अनेक दुकानदारसुद्धा या सिएस्तासाठी आपली दुकाने दुपारी एक-दोन बंद तास ठेवत असत. पोर्तुगिजांनी गोव्यात तसे अनेक सांस्कृतिक वारसे मागे ठेवले आहेत. त्यामुळे ‘दुपारी एक ते चार दुकान बंद’ अशी चैन किंवा मक्तेदारी केवळ पुण्यातच चालते, असे म्हणण्यास काही अर्थ नाही. खरे पाहिले तर, सिएस्ता म्हणजेच वामकुक्षी. पण, तरीही दोन्ही संज्ञा दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रिय आहेत. जसे पुण्यातली वामकुक्षी आणि गोव्यातली सिएस्ता. भाषेनुसार वेगळे सांस्कृतिक संदर्भ आहेत.
कार्निव्हल
कार्निव्हल हा गंमतीदार उत्सव भारतात फक्त गोव्यातच साजरा होतो. या उत्सवाचा प्रमुख असलेला किंग मोमो पणजीमध्ये जनतेसमोर जाहीरनामा वाचून शहरात चार दिवसांचा आपला अंमल जारी करतो आणि सर्वांना आपापल्या हौसमजा पूर्ण करून घेण्याची परवानगी वा आज्ञा देतो. थोडक्यात ‘खाओ, फिरो, मजा करो’ असाच या किंग मोमोचा हुकूम असतो. त्याची जनताही या औटघटकेच्या राजाची आज्ञा (मुकाट्याने नव्हे तर) अगदी आनंदाने, हसत-खेळत पाळते.
पोर्तुगीज राजवटीचा गोव्यातील एक सांस्कृतिक वारसा म्हणजे हा कार्निव्हल उत्सव. ख्रिस्ती धर्मातील चाळीस दिवसांच्या उपवासकाळाच्या, म्हणजे लेंट सिझनच्या चार दिवस आधी कार्निव्हल या उत्सवाची सुरुवात होते. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवार वा ॲश वेन्सडे या दिवसापासून हा उपवासकाळ सुरू होतो आणि येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरील मरणाच्या दिवसापर्यंत, म्हणजे गुड फ्रायडेला त्याची समाप्ती होते. आज युरोपात, लॅटिन अमेरिकेत आणि पोर्तुगीज, स्पॅनिश वगैरे देशांच्या जुन्या वसाहती असलेल्या अनेक देशांत कार्निव्हल हा लोकोत्सव म्हणून अगदी उत्साहाने साजरा केला जातो. भारतात केवळ गोव्यात कार्निव्हल साजरा होतो.
गोव्यातला कार्निव्हल मी अगदी पहिल्यांदा सत्तरच्या दशकात पाहिला. तेव्हा हा उत्सव बऱ्यापैकी एक लोकोत्सव होता. उंच टेकडीवर असलेल्या पणजी चर्चच्या पायऱ्याजवळ ही मिरवणूक संपायची. तेथे आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक देखण्या युवतींनी घेरलेला किंग मोमो समोर असलेल्या हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा वाचून गोव्यात आपला चार दिवसांचा अंमल सुरू होत असल्याचे जाहीर करत असे.
मिरामारच्या धेम्पे कॉलेजात बीएच्या दुसऱ्या वर्षाला असताना माझ्याच वर्गात असलेल्या सोनालिता (रॉड्रिग्रस किंवा फर्नांडिस) या मुलीला किंग मोमोची कॉन्सॉर्ट होण्याचा बहुमान मिळाला होता. कॉलेजात मी स्टुडंटस युनियनची निवडणूक लढवताना सोनालिताशी संभाषण झाले होते. त्यानंतर आम्हा दोघांचाही मित्र असणाऱ्या बेनी फरीयाशी बोलताना सोनालिताने म्हटले होते, ‘‘कामिलो इज स्स्सो क्यूट!’’ कॉलेजातील ब्युटी क्वीन असलेल्या सोनालिताने माझ्याबद्दल वापरलेले हे विशेषण अगदी उदार मनाने बेनीने माझ्यापर्यंत पोहोचवले होते.. आजही ‘क्यूट’ हा शब्द ऐकताना, वापरताना सोनालिताची हमखास आठवण येते!
फुटबॉल
गोव्यातील शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात कधीही फुटबॉल खेळली नाही, अशी व्यक्ती सहसा सापडणार नाही. अनेक घरात गिटार वाजविणारी तरुण मुले आणि मुली आणि ज्येष्ठ नागरिकही असतात, त्याचप्रमाणे या छोट्याशा राज्यात घराघरांत फुटबॉलही असतो. गोवा ही पोर्तुगिजांची वसाहत होती, त्याचा हा एक परिणाम. पाश्चात्य प्रभाव असलेल्या भारतातल्या नॉर्थ ईस्ट राज्यांतही फ़ुटबॉल असाच लोकप्रिय आहे. गोव्यात मिरामार समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या डेम्पे कॉलेजात माझे शिक्षण झाले. कॉलेजासमोरच आमचे हॉस्टेल होते. पावसाळ्याचे दिवस वगळता वर्षभर दर दिवशी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत आम्ही विद्यार्थी या बीचवर फुटबॉल खेळायचो.
कला, क्रीडा आणि संस्कृती या विषयाला वाहिलेल्या अनेक संस्था आणि स्पोर्टस क्लब्स गोव्यात गावोगावी सापडतात. फुटबॉल हा या स्पोर्टस क्लबचा प्रमुख आणि सर्वाधिक लोकप्रिय खेळ असतो. यापैकी अनेक स्पोर्टस क्लब्सना खूप वर्षांचा वारसा आहे. त्यापैकी काही पोर्तुगीज जमान्यातील आहेत. काही क्लब्सना स्वतःच्या मालकीचे स्पोर्टस ग्राऊंड्स आहेत, इमारती आणि कार्यालये आहेत, ग्राऊंडवर फुटबॉल, हॉकी किंवा क्रिकेट खेळले जाते आणि इमारतीत विविध इन-डोअर गेम्स खेळले जातात. ‘संतोष ट्रॉफी’ हा या खेळातील देशातील सर्वात मानाचा चषक. मी कॉलेजात असताना ब्रह्मानंद शंखवाळकरच्या नेतृत्वाखाली गोवा संघाने हा चषक १९८३ साली जिंकला, तेव्हा पणजीला या संघाचे उत्साहात झालेले स्वागत आजही आठवते.
तियात्र
‘‘आज रात्री अंजुना स्कूलच्या ग्राऊंडवर तियात्र आहे, तू येतोस का पाहायला?’’ माझ्या बहिणीने मला विचारले अन मी एकदम खूश झालो. गोव्यात वागातोरला सुट्टीवर आलो होतो आणि आज शनिवारी रात्री तियात्रचा शो आहे असे ऐकले आणि मी ताबडतोब होकार दिला. खूप वर्षांनंतर तियात्र पाहण्याचा योग आला होता आणि मी ही संधी सोडणार नव्हतो. तियात्र (Tiatr) म्हणजे कोकणी भाषेतील संगीतमय नाटक. पोर्तुगीज भाषेत तियात्रो म्हणजे नाटक. वागातोरहून चालत रात्री साडेनऊच्या दरम्यान अंजुना येथील शाळेच्या मैदानावर पोहोचलो. तेथेच तियात्र आयोजित करण्यात आले होते. तियात्रात पार्श्वगायन नसते. त्या पात्राला स्टेजवर हातात माईक घेऊन किंवा स्टेजवर टांगलेल्या माईकच्या पुढ्यात गायला लागते. तियात्रवर नक्कीच युरोपियन संस्कृतीचा प्रभाव आहे. तियात्रमध्ये वापरल्या जाणाऱ्या संगीत वाद्यांमध्ये व्हायोलिन, गिटार, बँजो, ट्रम्पेट आणि घुमटचा समावेश होतो. एका तियात्रमध्ये दहापासून पंधरापर्यंत कांतार (गीत )असू शकतात. कांताराशिवाय तियात्रची कल्पनाच करता येत नाही, हेही खरे.
या तियात्रात मध्यंतरानंतर मला सुखद धक्का बसला. एका दृश्यात सर्व पात्रांनी एकत्र येऊन एका सुंदर मांडो गीत आणि नृत्य सादर केले. ‘मांडो’ हे समूहनृत्य आणि समूहगीत गोव्याच्या लोककलेचा एका महत्त्वाचा भाग आहे. पाश्चिमात्य धर्तीवरील मात्र पूर्णतः गोव्याच्या मातीत रुजलेली ही एक लोककला आहे.
या मांडो नृत्यात पुरुष पात्रे युरोपियन पद्धतीचा पोशाख, म्हणजे बो टाय, वेस्टकोट, बूट वापरतात; तर स्त्रियांचा वेष काहीसा पारंपरिक आणि काहीसा वेस्टर्न असतो. महिलांच्या हातांत नाजुकसे पंखे असतात. सर्व पात्रांनी एकमेकांच्या हातात हात गुंफवून म्हटलेले आणि विशिष्ट पदलालित्य असणारे हे एक ग्रेसफुल समूहनृत्य आणि समूहगीत आहे. गोव्याचे खास वाद्य असलेल्या घुमट, गिटार आणि व्हायोलिनच्या साथीत फुललेल्या या मांडोने आम्हा सर्व श्रोत्यांना डुलायला लावले.
गोव्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या तियात्र आणि मांडो या कला गोव्यातील ख्रिस्ती लोकांनी जपून ठेवला आहे. गोव्यातील कॉन्व्हेंट शाळांत सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत आणि चर्चच्या फेस्त (सण) निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांतही आवर्जून मांडो नृत्याचा समावेश केला जातो. गोव्यात अनेक चर्चचा किंवा चॅपेलचा फेस्त (वार्षिक सण) फुटबॉल स्पर्धांशिवाय पूर्ण होत नाही, तसेच तियात्रचा प्रयोगही या फेस्तचा एक अविभाज्य भाग असतो. तियात्र हा गोव्यातील पाश्चात्य संस्कृतीचा खास ठेवा आहे. या तियात्रची संहिताही रोमन लिपीत असते. भारतीय कोकणी भाषेसाठी वापरली जाणारी ही रोमन लिपीसुद्धा पोर्तुगिजांचा एक ठेवा. गोव्याला भेट देणाऱ्या लोकांनी तियात्र आणि त्याचप्रमाणे मांडो या कलांचा एकदातरी आस्वाद घ्यायला हवा. गोव्याच्या संस्कृतीची आणखी एक आगळीवेगळी झलक त्यातून दिसेल!
पोर्तुगिजांचा वारसा असा गोव्यात ठिकठिकाणी आणि अनेक बाबींत दिसतो. गोव्यात तुम्ही पुन्हा कधी जाताल, तेव्हा या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राजकीय वारशाकडे नव्या नजरेने पाहता येईल.
साभार: ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२२
selmo kurlma şırılampa şırlampa el nurani
Nice article inspiring thanks. Hello Administ . Seo Paketi Skype: [email protected] -_- live:by_umut
Thank you for content. Area rugs and online home decor store. Hello Administ . Seo Paketi Skype: [email protected] -_- live:by_umut