(मीडिया वॉच दिवाळी अंक २०१७)
शेखर पाटील
लाईव्ह स्ट्रीमिंगच्या रूपाने आता सर्वसामान्य व्यक्तीच्या हातामध्ये चक्क दूरचित्रवाणी वाहिन्यांप्रमाणे लाईव्ह प्रक्षेपणाची सुविधा आली आहे. आज कुणीही स्टींग ऑपरेशन करू शकतो आणि अगदी बिनदिक्कतपणे जगाला दाखवू शकतो. बातमी दाबली जाऊ शकत नसल्याचा आदर्शवाद हा पत्रकारितेच्या पाठ्यपुस्तकांपुरताच मर्यादीत असल्याचा मध्यंतरी समज झाला होता. मात्र आज खर्या अर्थाने लोकशाहीवादी समांतर माध्यम प्रचंड गतीने विकसित झाल्याचे आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. याच्या केंद्रस्थानी अर्थातच लाईव्ह व्हिडीओ हा प्रकार आहे.
………………………………………………………………………………………………………………………………………………
सध्या आपले आयुष्य तंत्रज्ञानाने वेढून टाकले आहे असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही. विशेष करून इंटरनेटचा वापर आपल्या ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासाठी होत असतांना सोशल मीडियाने याला आदान-प्रदान अर्थात शेअरिंगचा नवीन आयाम दिला आहे. अर्थात संगणकापासून सुरू झालेला हा प्रवास आता हातात मावणार्या स्मार्टफोनपर्यंत येऊन पोहचल्यामुळे खूपच सुलभ झालाय. याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोडदेखील मिळाली आहे. खरं तर इंटरनेटच्या विकासाचा विचार केला असता वेब १.० मध्ये स्टॅटीक वेबसाईट केंद्रस्थानी होत्या. वेब २.० मध्ये सोशल मीडिया अवतरला. वेब ३.० मध्ये गतीमान पोर्टल्स आले. तर वेब ४.० म्हणजेच अतिशय गतीमान असणारी सेमेंटिक वेब होय. याच्या पुढील म्हणजेच मॅसेंजर्सच्या युगात आपण केव्हाच प्रवेश केला आहे. यातील अन्य तपशील या ठिकाणी अप्रस्तुत असले तरी शेअरींग हे क्रमबध्द पध्दतीने कसे विकसित होत गेलेय? याची माहिती आपल्याला यातून मिळू शकते. समाजमाध्यमे प्राथमिक अवस्थेत असतांना शब्द वा प्रतिमांची देवाण-घेवाण करण्याची सुविधा मिळाली होती. यात यथावकाश अॅनिमेशन्स, इमोजी/स्टीकर्स यांच्यासह व्हिडीओजचा समावेश झाला आहे. आजचा विचार केला असता आपल्याला शब्दांपासून ते व्हिडीओजपयर्पंत सर्व काही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करता येते. यातीलच महत्वाचा पैलू असणार्या घटकाबाबत या लेखाच्या माध्यमातून उहापोह करण्याचा माझा मानस आहे.
साधारणपणे फेसबुक हे बाल्यावस्थेत असतांना ‘ब्रॉडकास्ट युवरसेल्फ’ ही कॅचलाईन घेऊन युट्युब अवतरले. गुगलने या संकेतस्थळाचे महत्व हेरून युट्युबला विकत घेतले. यानंतरचा इतिहास आपल्यासमोर आहे. युट्युबने मानवी इतिहासाला नवीन वळण लावले हे नाकारता येणार नाही. याआधी कुणालाही व्हिडीओच्या माध्यमातून जगापर्यंत आपले म्हणणे सादर करण्याची सुविधा नव्हती. युट्युबने मात्र अगदी एक पैशाचीही आकारणी न करता ही सुविधा उपलब्ध करून दिल्याचे जीवनाच्या विविध क्षेत्रांवर व्यापक परिणाम झाले. जगातल्या अनेक देशांमध्ये प्रस्थापितांविरूध्द झालेल्या उठावांमध्ये युट्युबने मोलाची भूमिका पार पाडली. तर युट्युबच्याच माध्यमातून दहशतवादी प्रचारयंत्रणा राबविण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे हे दुधारी शस्त्र असल्याचेही सिध्द झाले. एकीकडे युट्युबची झपाट्याने वाढ होत असतांना दुसरीकडे फेसबुकही प्रचंड गतीने विस्तार पावले होते. दरम्यान, तंत्रज्ञानात अनेक घडामोडी झाल्या होत्या. ब्रॉडबँडच्या युगाच्या पलीकडे मोबाईल इंटरनेटचा वेग विलक्षण गतीने वाढला होता. जगातील बहुतांश राष्ट्रांमध्ये फोर-जी सेवा सुरू झाली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे आयफोनसह अन्य मॉडेल्सच्या माध्यमातून स्मार्टफोनचे युग सुरू झाले होते. या पार्श्वभूमिवर, जुलै २०११ मध्ये फेसबुकने आपल्या युजर्सला त्यांच्या टाईमलाईनमध्ये व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा प्रदान केली. आधी चॅटींग आणि मर्यादीत स्वरूपात उपलब्ध असणारे हे फिचर काही महिन्यात सर्व युजर्ससाठी खुले करण्यात आले तेव्हापासून फेसबुकने अगदी जाणीवपूर्वक व्हिडीओ कंटेंटवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. यातून फेसबुक विरूध्द युट्युब असा सामना रंगला आहे. मात्र या दरम्यानच्या एका फिचरने जगाला अजून एक नवीन वळण दिलेय ते म्हणजे- लाईव्ह व्हिडीओ होय.
वर नमूद केल्यानुसार युट्युबचे घोषवाक्य-‘ब्रॉडकास्ट युवरसेल्फ’ असले तरी यात आधी चित्रीकरण केलेले व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा होती. काही वर्षांनी युट्युबने आपल्या युजर्ससाठी लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा दिली असली तरी ती मर्यादीत स्वरूपाची होती. अर्थात हे फिचर निवडक युजर्ससाठी देण्यात आले आहे. आजही युट्युबवरील लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी संबंधीत युजरचे एक हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर असावे अशी अट टाकण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे फेसबुकने अल्प कालावधीत सर्व अटी काढून टाकल्या आहेत. अर्थात ऑगस्ट २०१५ मध्ये फेसबुकने निवडक सेलिब्रेटी आणि पत्रकारांना लाईव्ह स्ट्रीमींगचे फिचर दिले होते. मात्र काही महिन्यांमध्येच ही सुविधा सर्वांना देण्यात आली आहे. आज अगदी नवीन अकाऊंट उघडणारादेखील कोणत्याही घटनेचे लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतो. विशेष म्हणजे प्रोफाईलच नव्हे तर ग्रुप, पेजेस आदींमध्येही लाईव्ह स्ट्रीमिंग करता येते. यातील प्रमुख फरक आपण समजून घ्यायला हवा. समाजमाध्यमांनी आधीच मुद्रीत माध्यमांना अतिशय सक्षम असा पर्याय दिलेला आहे. लाईव्ह स्ट्रीमिंगच्या रूपाने आता सर्वसामान्य व्यक्तीच्या हातामध्ये चक्क दूरचित्रवाणी वाहिन्यांप्रमाणे लाईव्ह प्रक्षेपणाची सुविधा आली आहे. अर्थात यासाठी अत्यंत महागड्या ओबी व्हॅन्स, उपग्रहाद्वारे होणार्या संदेश वहनाचे मूल्य तसेच प्रशिक्षीत पत्रकार व तांत्रिक स्टॉफची कोणतीही आवश्यकतादेखील नाही. म्हटलं तर तसे हे साधारण तांत्रिक टुल आहे. मात्र याचा जगावर अत्यंत व्यापक परिणाम झाला आहे. लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंगची सुविधा देणारे अनेक साधने असली तरी सध्या तरी यात फेसबुक आणि युट्युबची आघाडी असल्यामुळे विस्तार भयास्तव प्रस्तुत लेखात मी या दोन्ही सेवांचाच प्रामुख्याने विचार केला आहे.
मुळातच मेनस्ट्रीम मीडियात समाजातील निवडक घटकांनाच महत्वाचे स्थान मिळत असते यावर कुणाचे दुमत असूच शकत नाही. दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये तर अगदी स्पष्टपणे हा ‘सिलेक्टीव्ह अॅप्रोच’ जाणवतो. राष्ट्रीय वाहिन्यांचा विचार केला असता, दिल्ली, नवी दिल्ली तसेच जवळपासच्या उत्तर भारतातील साधारण घटनांनाही फार व्यापक प्रमाणात प्रसिध्दी मिळते. यातून वाहिन्या मोठ्या प्रमाणात दळण दळतांना आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्रातील वाहिन्यांचा मुख्य झोत हा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि फार तर औरंगाबाद आदी महानगरांच्या पलीकडे फारसा जात नाही. यामुळे फेसबुक लाईव्हसारख्या अतिशय सुलभ टुलमुळे वृत्तवाहिन्यांच्या मिरासदारीला जोरदार हादरा बसला. ज्यांच्या पर्यंत कधी ओबी व्हॅन्स, कॅमेरा व बूम घेतलेले पत्रकार पोहचू शकत नाही अशा परिसरातील भेदक सत्य या माध्यमातून जगासमोर येऊ लागले. भारताचा विचार करता, प्रेमी जोडप्यांना मॉरल पोलिसींगच्या नावाखाली होणारी मारहाण, कथित गोरक्षकांचा धुमाकुळ, शोषितांवरील अन्याय, एखाद्या उच्चपदस्थाची मुजोरी आदींसारख्या असंख्य घटना यातूनच जगासमोर आल्या असून यात भर पडतच आहे. स्मार्टफोनचे अल्प मूल्य आणि याच पध्दतीने सध्या तरी कमी खर्चात मिळणार्या फोर-जी डाटा पॅकेजेसमुळे प्रत्येकाच्या हातात एक विलक्षण परिणामकारक टुल आले आहे. आज कुणीही स्टींग ऑपरेशन करू शकतो आणि अगदी बिनदिक्कतपणे जगाला दाखवू शकतो. बातमी दाबली जाऊ शकत नसल्याचा आदर्शवाद हा पत्रकारितेच्या पाठ्यपुस्तकांपुरताच मर्यादीत असल्याचा मध्यंतरी समज झाला होता. मात्र आज खर्या अर्थाने लोकशाहीवादी समांतर माध्यम प्रचंड गतीने विकसित झाल्याचे आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. याच्या केंद्रस्थानी अर्थातच लाईव्ह व्हिडीओ हा प्रकार आहे.
फेसबुक लाईव्ह हे विलक्षण परिणामकारक टुल आहे. याच्या मदतीने जगभरातील आंदोलन, सामाजिक कार्यकर्ते आदींसह सर्वसामान्यांना आपले म्हणणे जगापर्यंत पोहचवण्यासाठी एक सर्वव्यापी माध्यम मिळाले आहे. फेसबुकने सर्वांसाठी हे फिचर खुले केल्यानंतर काही महिन्यांनी अमेरिकेत अल्फ्रेड ओलँगो या अश्वेत तरूणाला पोलिसांनी कोणतेही सबळ कारण नसतांना गोळ्या घातल्याच्या घटनेने खळबळ उडाली. पोलिसांच्या गोळीबारानंतर काही क्षणातच ओलँगोच्या सोबत असणार्या त्याच्या बहिणेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून या घटनेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू केले. यामुळे क्षणार्धात लक्षावधी लोकांपर्यंत ही भयावह घटना पोहचली. फेसबुक लाईव्हची परिणामकारकता दर्शविणारी ही पहिली घटना. या व्हिडीओत रक्तपात असल्यामुळे फेसबुकने याला काही तासांनी आपल्या साईटवरून हटविले तरी युट्युबवर आजही आपण तो पाहू शकतो. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे ओलँगो याची बहिण एखाद्या अनुभवी पत्रकाराप्रमाणे अत्यंत सफाईदारपणे या दुर्घटनेची माहिती जगाला देतांना आपल्याला दिसून येते. यानंतर अनेक घटनांच्या माध्यमातून या सेवेचे बरे-वाईट परिणाम जगासमोर आले आहेत. यातील संपूर्ण तपशीलात जाणे येथे अप्रस्तुत ठरेल. तथापि, लाईव्ह व्हिडीओजचा वापर हा सकारात्मक कामांसाठी होत असतांना याच्या दुसर्या पैलूकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आजवर अनेकदा खून, बलात्कार, आत्महत्या, हाणामारी आदींना फेसबुक लाईव्हवर दर्शविण्यात आल्याचे जगाने अनुभवले आहे. अशा घटनेनंतर फेसबुक संबंधीत व्हिडीओ काढून टाकत असते. मात्र तोवर संबंधीत व्हिडीओ हा वार्याच्या गतीने जगभरात पोहचलेला असतो. तर लाईव्ह संस्कृतीचा सर्वात भयंकर पैलू म्हणजे बर्याच दुर्घटनांमध्ये मदत करण्याऐवजी लोक त्याचे लाईव्ह स्ट्रीमींग/शेअरिंग करण्यात धन्यता मानत असल्याच्या अनेक घटना अगदी आपल्या भोवताली घडत आहेत. अर्थात एका बाजूने लाईव्ह स्ट्रीमिंगच्या रूपाने अॅक्टीव्हिजमसाठी परिणामकारक साधन उपलब्ध झाले असतांना दुसरीकडे लोक अगदी निर्विकारपणे समोर दिसेल ते आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून जगासमोर पोहचविण्याची धडपड करत असल्याचे चित्र आहे. ही विसंगती दिवसेंदिवस वाढत चालल्याचेही आपण अनुभवत आहोत.
वास्तविक पाहता समाजमाध्यमांमधून पसरवणार्यात येणार्या फेक न्यूज हा जगातील बहुतेक टेक कंपन्यांसाठी डोकेदुखीचा मुद्दा बनला आहे. फेसबुक, गुगल, ट्विटर आदी कंपन्यांनी फेकन्यूजला आळा घालण्यासाठी एकत्रीतपणे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी फॅक्ट चेकींगचे अनेक फिल्टर्स लावण्यात आले आहेत. यासाठी आर्टीफिशियल इंटिलेजियन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापरदेखील करण्यात येत आहे. अगदी याच पध्दतीने लाईव्ह स्ट्रीमिंगमधील गैरप्रकाराला आळा घालण्याची आवश्यकता असली तरी ते तितकेसे सोपे नसल्याची बाबदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे. यातच व्हिडीओजच्या विस्तारलेल्या क्षितीजाचा विचार केला असता आपल्याला अनेक नाविन्यपूर्ण बाबी दिसून येतील. आज सोशल मीडियात फक्त द्विमीतीय व्हिडीओ अपलोड आणि शेअर करता येतात. लवकरच त्रिमीतीय व्हिडीओदेखील शेअर करता येणार आहेत. अलीकडेच फेसबुकने ३६० अंशातील व्हिडीओ शेअरिंगचे फिचर आपल्या युजर्ससाठी दिले आहे. सध्या बाजारपेठेत ३६० अंशातील व्हिडीओच्या चित्रीकरणास सक्षम असणारे मोजके कॅमेरे आहेत. मात्र लवकरच अशा प्रकारचे अनेक किफायतशीर मॉडेल्स सादर होऊ शकतात. यामुळे येणारा काळ हा ३६० अंशातील लाईव्ह व्हिडीओजचा असेल हे नक्की. तर याला आभासी सत्यता म्हणजेच व्हर्च्युअल रिअॅलिटीचा आयामदेखील जुडणार हेदेखील निश्चित. म्हणजे व्हिआर हेडसेट घातल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात व्हिडीओतल्या घटनास्थळी असल्याची अनुभुती घेता येईल. तर विस्तारीत सत्यता म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअॅलिटीच्या माध्यमातून सत्याला कल्पनेचे पंख लावण्याची सुविधादेखील मिळणार आहे. मात्र जर सुजाणपणे याचा उपयोग होत नसेल तर काय उपयोग?
लाईव्ह व्हिडीओला भविष्यात अजून एक नवीन आयाम प्राप्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सध्या फेसबुकसारख्या सोशल साईटवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा प्रकार लोकप्रिय झाला असतांना सध्या मॅसेंजर्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. व्हाटसअॅप, एफबी मॅसेंजर, हाईक, वुई चॅट आदी मॅसेंजर्सवर लोक दिवसाला तासनतास घालवत असल्याचे दिसून येत आहे. यावरही प्रामुख्याने व्हिडीओचे कंटेंट मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याचे आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. काही तज्ज्ञांच्या मते आपण सोशल मीडियाकडून मॅसेंजर्सकडे वळत आहोत. या संक्रमणाच्या युगात व्हिडीओ हेच केंद्रस्थानी आहे. सध्या तरी कोणत्याही मॅसेंजरमध्ये लाईव्ह व्हिडीओ प्रक्षेपणाची सुविधा देण्यात आलेली नाही. तथापि, व्हाटसअॅपसारख्या गतीमान मॅसेंजरमध्ये हे फिचर आल्यास किती भन्नाट मजा येईल ? अर्थात ही बाब अशक्य नाहीच. व्हाटसअॅपसह अन्य मॅसेंजरमध्येही लवकरच या प्रकारचे फिचर येऊ शकते. असे झाल्यास लाईव्ह व्हिडीओच्या वापराला प्रचंड गती मिळणार हे नक्की. मात्र यातून गुंतागुंतदेखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंगला अलीकडच्या काळात नवीन आयाम मिळाला आहे. ते अधिक आकर्षक पध्दतीने विविध फिल्टर्स लाऊन शेअर करता येत आहेत. याच्या जोडीला नष्ट होणारे व्हिडीओदेखील अवतरले आहेत. स्नॅपचॅट या तरूणांमध्ये तुफान लोकप्रिय असणार्या अॅप्लीकेशनमध्ये या प्रकारच्या प्रतिमा आणि व्हिडीओतील संदेशांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होत आहे. समोरच्या व्यक्तीला पाठविलेली प्रतिमा वा व्हिडीओ हा त्याने पाहिल्याबरोबर नष्ट होत असल्यामुळे साहजीकच हे माध्यम गंमतपासून ते विकृतीपर्यंत पोहचले आहे. याचा वापर करून एकमेकांना पोर्न क्लिप वा अन्य आक्षेपार्ह कंटेंट पाठविले तरी कायद्याच्या दृष्टीने कोणताही पुरावा शिल्लक उरत नसल्याची बाब आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अलीकडेच ‘साराह’ हे मध्यपुर्वेतील अॅप भारतात तुफान लोकप्रिय झाले आहे. यात संदेश पाठविणार्याची ओळख गुप्त ठेवली जाते. याच्या माध्यमातून सध्या तरी शब्दांमधील संदेश पाठविले जाऊ शकतात. मात्र याच पध्दतीने जर ओळख गुप्त ठेऊन व्हिडीओ पाठविण्याची सुविधा मिळाली तर किती अडचणी निर्माण होतील याची कल्पनादेखील आपण करू शकत नाही. साराह हे कथितरित्या ‘ऑनेस्टी’ अॅप असले तरी या माध्यमातून एकमेकांविरूध्द गरळ ओकण्याची नामी संधी मिळत असल्याचे विसरता कामा नये. हाच प्रकार व्हिडीओच्या मदतीने होण्याची भितीदेखील आहेच.
सध्या आपण संपर्क क्रांतीच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यात आहोत. सप्टेबर-२०१७च्या अखेरीस झालेल्या ‘इंडियन मोबाईल काँग्रेस’ या प्रदर्शनीत देशात लवकरच ५-जी तंत्रज्ञान येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. केंद्र सरकारपासून ते विविध सेल्युलर कंपन्यांनी याबाबत प्रचंड गुंतवणुकीची घोषणा केली आहे. रिलायन्सने जिओच्या माध्यमातून तीन वर्षाांसाठी १५०० रूपयांची अनामत रक्कम घेऊन कोट्यवधी लोकांच्या हातात जनता फोन या नावाने स्मार्टफोन प्रदान केला आहे. याच पध्दतीने एयरटेल कंपनीदेखील किफायतशीर दरात स्मार्टफोन देण्यासाठी पुढे सरसावली आहे. तर भारत सरकारचा उपक्रम असणार्या ‘बीएसएनएल’नेही याच पध्दतीचा स्वस्त स्मार्टफोन देण्याचा मानस व्यक्त केला आहे. याच्या जोडीला अत्यंत किफायतशीर डाटा प्लॅन्स दिले जात आहेत. बहुतांश कंपन्यांनी एक जीबी प्रति दिवस असे मानक ठरवले असतांना आता एयरटेल कंपनीने दिवसाला चार जीबी डाटा देणारा प्लॅन सादर करून भविष्याची चुणूक दर्शविली आहे. अर्थात हातातील किफायतशीर स्मार्टफोनला गतीमान आणि स्वस्त इंटरनेटची जोड मिळाल्यावर आपण अजून एका नवीन गतीमान युगात प्रवेश करणार आहोत. तेव्हा याच्या केंद्रस्थानी अर्थातच व्हिडीओ शेअरिंग असेल हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिष्याची आवश्यकता नाहीच. मात्र या विलक्षण परिणामकारक माध्यमाचा सुजाणपणे वापर होईल का? याचे उत्तर कुणीही देऊ शकणार नाही.
http://shekharpatil.com
Email: [email protected]
संपादक: दैनिक जनशक्ति खान्देश आवृत्ती
संपादक: https://www.techvarta.com