विचारधारांवर कडवी निष्ठा असूच नये!

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१७

 

मुग्धा कर्णिक

 

एखादा समाज एखादी विचारधारा अंगिकारतो असे दिसत असले तरीही हे खरे नसते. विचारधारा अंगिकारणे हे व्यक्तीमनाचे, बुद्धीचे काम आहे. बहुसंख्य व्यक्ती ती अंगिकारतात तेव्हा ती विचारधारा समाजाने अंगिकारली अशी छाप पडते. पण समाजातील व्यक्ती भिन्नभिन्न प्रकृतीच्या असतात. खोलवर विचार करून त्यात स्वतःच्या विचारांची भर घालणारे अगदी थोडे, विचार करून अंगिकारणारे थोडे जास्त, केवळ अनेकांनी अनुसरले आहे म्हणून गतानुगतिकतेने मागून जाणारे जास्त. प्रचलित जे आहे ते मान्य केल्याने एक प्रकारची सामाजिक सुरक्षितता मिळते आणि विचार करण्याची गरज संपते हे सोयीचं म्हणून ती मान्य करणारे विपुल.

…………………………………………………………………………………………………..

 

तत्वज्ञानात्मक विचारधारांबद्दल चिंतन करणे आणि त्या तत्वांबद्दल निष्ठा बाळगणे हे कोणत्याही कालखंडात अगदी थोड्या व्यक्तीच करीत होत्या. आजही तेच आहे, आणि भविष्यातही तेच चित्र राहील. कारण हा मानवी वैचारिक उत्क्रांतीचा अविभाज्य भाग आहे. बहुसंख्या जगत रहाते आणि काही थोडे लोक मौलिक विचार करून जग विविध प्रकारे पुढे नेण्याच्या प्रयत्न करतात. मौलिक विचार हे एवढ्यासाठीच म्हटले आहे की साधा विचार तर प्रत्येकालाच करावा लागतो. अग्नीचा वापर करून अन्न शिजवायलाही विचार करावा लागतो, ते खातानाही विचार करावा लागतो. जगण्यापुरता विचार हा प्रत्येकाला करावा लागतोच.

आता मौलिक विचार म्हटल्यानंतर प्रश्न येतो तो विचारधारांचा. समाजाची काही विशिष्ट रचना, उतरंड असो किंवा क्षितिजसमांतर रचना असो- ती अस्तित्वात येतानाच विचारधारांना आकार येऊ लागला असे म्हणता येईल.

भवतालचा निसर्ग तर अस्तित्वात होताच. तो तर मानव असो वा नसो अस्तित्वात होता आणि राहील. पण मानवी जाणीव होती, मानवी बुद्धी होती म्हणून या भवतालाचा अर्थ लावला जाऊ लागला. प्रश्नांची उत्तरे शोधताना उत्तरे शोधण्याच्या पद्धती आल्या, ज्ञानमार्गाचे सिद्धांत आले, त्यातून नीतीशास्त्रही आकाराला येत गेले. आणि काही बुद्धीवंतांनी केलेला विचार हा चिमटीचिमटीने जगत रहाणाऱ्यांबरोबरच, कारागिरी करणाऱ्या, कलांना जन्म देणाऱ्या, विज्ञानाला जन्म देणाऱ्या माणसांच्या समाजात पसरत राहिला, समाजाचे प्रशासन आणि शासन सांभाळणाऱ्या राज्यकर्त्या माणसांच्या समाजातही पसरत राहिला.

राजकीय-सामाजिक विचारधारा या मूलतः समाजाची बांधणी, संयोजन त्या त्या काळात कसे असावे याचा विचार मांडत असतात आणि मग त्या दृष्टीने कृतीमार्गांचा नकाशा देत असतात. अशा राजकीय विचारधारा, त्यांचे मुख्य पंथ, उपपंथ विपुल आहेत,तत्वज्ञानात्मक विचारधारा ज्या मानवी जीवन, त्याचा हेतू, सृष्टीचा हेतू, सृष्टीनिर्माणाचे स्पष्टीकरण, मानवी नैतिकता याबद्दल चिंतन मांडतात त्याही विपुल आहेत.

जे आहे तेच आहे हे मान्य करणे आणि काय काय आहे त्याचा शोध घेणे हा तो बुद्धीविवेक अखेर साऱ्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे मूळतत्व आहे.

ग्रीक-युरोपीय-पाश्चिमात्य, अमेरिकी पाश्चिमात्य, मध्यपूर्व, पौर्वात्य, अतिपौर्वात्य, आफ्रिकन, मूळ अमेरिकी अशा वेगवेगळ्या भूप्रदेशांतील वेगवेगळ्या कालखंडांत गेल्या तीन हजार वर्षांत हजारो विचारवंतांनी नीती, जीवन, समाज याबद्दल विविध संकल्पना मांडल्या. काही विचारांभोवती मोठमोठे लोकसमुदाय शतकानुशतके राहिले. यात प्रामुख्याने धार्मिक विचारधारा आहेत आणि मानवी समाजाच्या राजकीय रचनेसंबंधी, आर्थिक नियोजनासंबंधी विचारधारा आहेत.

यातील अनेक विचारधारा आज इतिहासाचा भाग बनून राहिल्या आहेत तर अनेक वर्तमानाचा भाग बनून शिल्लक आहेत. भविष्यात कोणत्या विचारधारा पुढे येतील, टिकतील, नष्ट होतील हे सांगणे कठीण आहे.

जवळचे उदाहरण द्यायचे तर भारतीय तत्वज्ञाने, विचारधारांमध्ये परिवर्तित झालेली तत्वे यांमधील नास्तिक-आस्तिक म्हणजे वेदप्रामाण्य मानणारे आणि न मानणारे पंथ यातील अनेकविचारधारा मागे पडल्या. काही विचारधारा किंवा पंथ काहीकाळ पुढे आले, मग मागे पडले, मग पुन्हा पुढे आले. यात राजकीय घटनांचा, राजाश्रयाचा आणि त्यामुळे प्रभावित झालेल्या लोकाश्रयाचाही प्रश्न होता. आज ‘आजीवक’ आणि ‘चार्वाक’ या दोन वैचारिक पंथांचा जवळपास पूर्णतः ऱ्हास झाला आहे. जैन किंवा बौद्ध तत्वज्ञानही राजकीय-सामाजिक मार्ग म्हणून अस्तित्वात आहे. त्या पंथांच्या धर्मगुरूंपुरती त्यातील तत्वचर्चा टिकून आहे. पण प्रत्यक्ष समाजजीवनात त्यातील मोजकी कर्मकांडे कधीमधि पार पाडण्यापलिकडे तत्वपालन नाममात्र उरले आहे. असे धार्मिक स्वरुपाच्या सर्वच विचारधारांबाबत झाले आहे. पण तरीही त्यातील काही टिकून आहेत त्याला सत्ताकारणाला उपयुक्त अशा विचारधारांतील तत्वांची जोड मिळाल्यामुळे आणि वर्चस्व माजवण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक युक्त्या राज्यकर्त्यांना सापडल्यामुळे.

या विचारधारांचे धारावाहित्व नष्ट होऊन, पुढे जाणारे पंथत्वही नष्ट होऊन त्यांची डबकी होऊ लागतात ते अनुयायीत्वामुळे.

एखादा समाज एखादी विचारधारा अंगिकारतो असे दिसत असले तरीही हे खरे नसते. विचारधारा अंगिकारणे हे व्यक्तीमनाचे, बुद्धीचे काम आहे. बहुसंख्य व्यक्ती ती अंगिकारतात तेव्हा ती विचारधारा समाजाने अंगिकारली अशी छाप पडते. पण समाजातील व्यक्ती भिन्नभिन्न प्रकृतीच्या असतात. खोलवर विचार करून त्यात स्वतःच्या विचारांची भर घालणारे अगदी थोडे, विचार करून अंगिकारणारे थोडे जास्त, केवळ अनेकांनी अनुसरले आहे म्हणून गतानुगतिकतेने मागून जाणारे जास्त. प्रचलित जे आहे ते मान्य केल्याने एक प्रकारची सामाजिक सुरक्षितता मिळते आणि विचार करण्याची गरज संपते हे सोयीचं म्हणून ती मान्य करणारे विपुल.

त्यामुळे विचारधारांची असली घट्ट मान आवळणारी छाप ही विचारांच्या परिशीलनाच्या, घुसळणीच्या दृष्टीने फार फसवी असू शकते. विचारधारांचे डबके होण्याचा काळ शेवटच्या दोन मानवीप्रकारांची संख्या बेसुमार वाढते तेव्हाचाच. आणि मग या घोर डबक्यात विचारांचे तर्पण होते.

राजकीय विचारधारा आणि विवेकी जीवनचिंतन यांमध्ये अनेकदा फारकत दिसत असते ती जेव्हा राजकीय विचारधारेने विवेक हरवलेला असतो तेव्हाच.खरं म्हणजे कोणत्याही विचारधारेच्या छपराखाली आलेले लोक राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी जेव्हा सरसावतात तेव्हा राजकीय विचारधारांमधील मूल्यांमध्ये काटछाट करायला सुरुवात करतात. त्यातले टरफल शिल्लक रहाते. सत्याचा गाभा केव्हाच सत्तेसाठी तोंडात टाकून चावून टाकलेला असतो.

विचारधारा म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने आपल्या भोवतीच्या समाजाच्या सवयी आणि समस्या लक्षात घेऊन बदलासाठी मांडलेला कृतीमार्ग म्हणजे विचारधारा असते अशी अनेकांची गल्लत होते. ती व्यक्ती मरून गेल्यानंतर तिने वापरलेला कृतीचा मार्ग हीच एक विचारधारा मानली जाऊ लागते. विवेकवाद, मानवतावाद, भांडवलवाद, समाजवाद, साम्यवाद, उदारमतवाद, धार्मिकगूढवाद अशा विस्तृत तत्वविचार स्वरुपांच्या विचारधारांमध्ये किंवा त्यांच्यातील समान धाग्यांच्या एकत्रीकरणामध्ये महत्त्वाचे कार्य करून ठेवलेल्या व्यक्तींची नावे त्या त्या विचारपंथाला मिळाली. पण त्यामुळे त्या मूलभूत विचारधारा ठरत नाहीत.

उदाहरणार्थ गांधीवाद हा मानवतावाद, भांडवलवाद, समाजवाद आणि धार्मिक गूढवाद या अनेक प्रणालींचे मिश्रण आहे. त्यांचा कृतीमार्ग होता तो. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या व्याप्तीमुळे जरी गांधींच्या कृतीमार्गाला आणि वैचारिकतेला गांधीवाद असे नाव मिळालेतरी ती एका तर्काशी प्रमाण राखणारी विचारधारा नाही. आंबेडकरांचेही तेच. बुद्धाचेही तेच. नेहरूंचेही तेच. पण या एकत्रित विचारपद्धतींचे तात्कालिक मोलही आहेच.

पाश्चिमात्य विचारवंतांच्या नावेही विचारांचे पंथ सुरू झाले. कान्टियन विचार, नित्शेचा विचार, आयन रँडचा विचार हे सारे वैचारिक पंथ आहेत. आणि ते मान्य होणारे लोकही आहेत.

आपण जेव्हा म्हणतो की विचारधारांचा लोप होतो आहे तेव्हा हे वाक्य केवळ काही विचारसरणी मागे पडत असल्याच्या दुःखातून येत असावे. कारण धार्मिक गूढवादाच्या किंवा धार्मिकवर्चस्ववादाच्या विचारधारांचे पाईक दिवसेंदिवस वाढत चाललेलेच दिसत आहेत.

विचारधारा कालबाह्य होत आहेत का या प्रश्नाचे उत्तर… विचारधारांतील काही तत्वे कालबाह्य होणे ही संतत प्रक्रिया आहे.टिकले पाहिजे ते सत्य, टिकला पाहिजे तो विवेक, टिकली पाहिजेत ती चिरंतन मूल्ये.

विचारधारा म्हणजे व्यक्ती आणि समाजासंबंधी काही कल्पनांचा, विचारांचा समुच्चय असतो. विचार करणे, विचारांत भर घालणे, त्यात बदल करणे हे व्यक्तिशःच केले जाते.त्या त्या व्यक्तीचा भवताल, त्यात घडणाऱ्या घटना, न्याय-अन्यायाचे प्रमाण, सांस्कृतिक वातावरण, विश्वास-श्रद्धा यांतून पोसलेले वा झडलेले समज, ज्या समाजात जन्म झाला त्या समाजाच्या इतिहासाचे भान यातून व्यक्तींच्या विचारसरणीवर परिणाम होत असतो. व्यक्तीने स्वतःसाठी घडवलेली, स्वीकारलेली विचारधारा ही एखाद्या चष्म्यासारखीच काम करते. कारण आपल्याला पटलेल्या अनेक कल्पना, तत्वे, न पटलेल्या कल्पना, तत्वे यांच्या पार्श्वभूमीवरच व्यक्ती स्वतःबरोबरच आपला समाज जोखते, आपले आणि समाजाचे नाते ठरवते, आपल्या आयुष्यात कोणते बदल हवे आहेत आणि काय दूर सारायचे आहे हे ठरवत असते. समाजाची आर्थिक, सामाजिक, राजकीय रचना कशी असावी, न्यायव्यवस्था कशी असावी हे ठरवताना व्यक्ती आपल्या मेंदूत तयार झालेल्या विचारांच्या एका अदृश्य चौकटीचा आधार घेत असतात. आणि या चौकटीसाठी निष्ठा वाटली तर त्यादृष्टीने काम करू लागतात. मग त्यात लिहिणे, बोलणे, शिकवणे, व्यक्तिगत संघर्ष करणे किंवा सामाजिक संघर्ष उभा करणे या सर्व प्रकारच्या कृतींचा समावेश असू शकतो.

निव्वळ अमूर्त कल्पनांसाठी, अमूर्त विचारधारांसाठी म्हणून कुणीही संघर्ष करीत नाही. विचारधारांच्या चौकटीत बसणारे मूर्त सामाजिक, राजकीय, आर्थिक संघर्षांचे मुद्दे त्यासाठी डोळ्यासमोर असावे लागतात.

संघर्षमार्गाचा अवलंब करायची वेळ केव्हा येते? जेव्हा आहे त्या सामाजिक-राजकीय-आर्थिक रचनेतील कोणत्यातरी भागातील असमतोल हा कोणत्या ना कोणत्या मानवसमूहासाठी, किंवा व्यक्तींसाठीही क्लेशकारक, अन्याय्य ठरू लागतो. जोवर अगदी काठापर्यंत पोहोचूनही कडेलोट झालेला नसतो तोवर संघर्षाचा मार्ग सहसा चोखाळला जात नाही.मात्र जेव्हा या असमतोलाचे चटके समाजातील काही घटकांना बसू लागतात तेव्हा परिवर्तनासाठी संघर्षाचा मार्ग पत्करला जातो. आणि अशाच वेळी विचारधारांचा आधार घेतला जातो. किंवा परंपरागत नीतीमूल्यांचा आधार घेतला जातो.

खराखुरा असमतोल किंवा अन्याय आणि आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण करून देणारा प्रचार यात मूलतः फरक आहे. सत्य आणि आभास यातील फरक.

संघर्षाचा तत्वमार्ग शिकवला तो प्रथम कार्ल मार्क्सने असे म्हणतात. सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात हे खरे आहे. त्या पूर्वीची युद्धे, सत्तासंघर्ष हे उच्चवर्गातील किंवा राज्यकर्त्या वर्गातील सत्ता परिवर्तनासाठी किंवा सत्ताक्षेत्रे वाढवण्यासाठी वापरले जात होते. वर्गयुद्ध असे नाव ज्या संघर्षाला मिळाले तो संघर्ष मात्र समाजाच्या  शोषणकर्त्या उच्चवर्गाविरुद्ध होता. सामाजिक संघर्षाचे मार्ग जणू या वर्गलढ्याच्या नव्या अस्त्राने मोकळे झाले. पण आजच्या जगात याच मॉडेलवर दुसऱ्या मुद्द्यांवरूनही संघर्ष झडू लागले. त्यात स्त्रीवाद किंवा भिन्नलिंगींसाठी समन्याय, अपंगांसाठी न्याय, वर्णभेदाविरुद्ध लढा यांसारख्या भल्या मुद्द्यासोबतच, वंशवर्चस्व, धर्मवर्चस्व, सांस्कृतिक वर्चस्व, भूभागांचे स्वामित्ववाद यासारख्या मुळातच अविवेकी, अनीतीमान तत्वांच्या पायांवर आधारित संघर्षांनाही खतपाणी मिळाले.

अनेक प्रकारचे अन्याय विवेकाने दूर होऊ शकतात, असे असूनही विवेकाविरुद्धच संघर्ष सुरू करण्यात आला. ईश्वरवाद-अध्यात्मवाद, अमुकधर्मवाद, निराधार श्रद्धांवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करणाऱ्यांचा भोंदूवाद किंवा गूढवाद हे सुद्धा एक प्रकारे विवेकाविरुद्ध संघर्षच करीत असतात. जरी त्या मानवी जीवनाच्या भविष्यासाठी मारक आहेत, तरीही त्याही विचारधाराच आहेत. आणि त्यांना वाहून घेतलेल्या व्यक्ती अर्थातच असतात. अगदी जिवावर उदार होऊन लढायला तयार असलेल्या, मरायला, मारायला तयार असलेल्यांची भली मोठी फौज या (अ)विचारधारांचा अनुनय करीत असते.

आदर्शवादी ईश्वरवादी, धर्मवादीही असतात आणि आदर्शवादी विवेकवादी, साम्यवादी, भांडवलवादीही असतात. पण पुन्हा तेच, की आदर्शवादी भूमिका घेऊन एखाद्या विचारप्रणालीच्या मागे उभे रहाणारे, त्यात तनमनधन जोडणारे लोक कुठेही जनसामान्यांच्या संख्येच्या प्रमाणात तसे कमीच असतात.

उदाहरणार्थ इस्लामी दहशतवादाच्या विचारधारेसाठी शहीद, कुर्बान वगैरे होणारे लोक एकंदर इस्लामी लोकसंख्येच्या एक टक्काच असतात. स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय असायला हवे असे वाटणारे उदारमतवादी लोक जगात जितके आहेत त्यातील एक टक्काच लोक या तत्वांसाठी समाजकारणात किंवा राजकारणात उतरून क्रियाशील होतात.

रशियन क्रांतीमध्ये साम्यवादी विचारधारेशी निष्ठा असणे याला इतके अतोनात महत्त्व आले की आयदीनॉस्त (निष्ठावंत) आणि ब्येझआयदीनॉस्त (निष्ठाविहीन) अशी विशेषणे व्यक्तींना चिकटवण्यात येत होती. विचारधारेप्रति निष्ठा असणे किती थोर, किती महान, किती ऊर्जा देणारे असते असा प्रचार सुरू राहिला. निष्ठा असो वा नसो तसे भासवणे महत्त्वाचे ठरू लागले. सारा सोविएत रशियन समाज एकाच विचारधारेचे डबके बनून गेला. व्यक्तींचे स्वतंत्र विचार गुदमरून टाकणारी कोणतीही व्यवस्था शेवटी आतून ढासळत जाते. तसेच झाले. चीनमध्ये अजूनही विचारधारेच्या निष्ठेची अपेक्षा पोलादी पकडीत समाजाला धरून आहे. आणि त्यातूनच चीनचा राज्यकर्ता वर्ग टिकून आहे. त्यांची आर्थिक गणितेही टिकून आहेत. स्वातंत्र्याचा उच्चार करणारे तियानानमेन चौकात दडपले गेले. पण तरीही या पकडीलाही कधीतरी तडे जाणारच आहेत. आज नाही तर उद्या. लिउ झियाबाओंची तत्वनिष्ठा त्यांना तुरुंगात मृत्यू देऊन गेली. ती पूर्णपणे वाया जाणार नाही. जे वाया जाणे आहे ते आजच्या वर्तमानापुरतेच.

इस्लामी निष्ठांच्या अतिरेकाच्या पकडीत- विचारधारेच्या डबक्यात- असलेले लोक आज इतरांच्या हत्या करताकरता आत्मनाश ओढवून घेत आहेत. ही डबकीसुद्धा अखेर सुकून जातीलच.

विचारधारेचे झेंडे फडकावत कोणतेही उद्दिष्ट गाठण्यासाठी वाहून घेणे हे तसे अनेक प्रकारे धोकादायकच आहे. त्यात कडेकोट निष्ठांचा प्रश्न उद्भवतोच. ज्या खांद्यांवर मर्यादित मूल्यांचा, कठोर तत्वांचा, अपरिवर्तनीय नियमांचे ओझे झेंड्यांच्या रुपात येते त्या खांद्यांना स्वतंत्र विचार करणारे उदार डोके झेपेनासे होते हा अनुभव सर्वत्र आला आहे.

विशेषतः जनसंपर्काचे, प्रसारमाध्यमांचे एवढे विविध आणि मुबलक मार्ग उपलब्ध असताना त्या त्या प्रदेशातील बलवत्तर झालेल्या गटाचा प्रभाव त्यांच्यावर पडणे अगदी स्वाभाविक असते. आणि या प्रभावित माध्यमांमार्फत एखाद्या विचारधारेचे किंवा त्यातील एखाद्या तत्वाचे ढोल वाजवले जात राहिले तर विचारधारेप्रति निष्ठा ही आंधळ्या भक्तीत बदलू शकते हे आपल्याला सांगायला कुणी मोठा तत्ववेत्ता यायची गरज नाही.

उपयुक्ततावाद किंवा चंगळवाद हे काहीतरी त्याज्य आहे अशा प्रकारचा जो सोवळा सूर लागतो त्याला माझा स्वतःचा आक्षेप आहेच. अखेर सर्व विचारधारा या मानवजीवनासाठी उपयुक्त काय याचा शोध घेण्यासाठीच मुळात अस्तित्वात आल्या. त्यात मन, बुद्धी आणि शरीर या तिघांचाही विचार केला गेला. विवेकवादाच्या पथावर विज्ञान आणि त्यातून तंत्रज्ञान विकसित झाले. होमो सेपियन मानवाचे शरीर उत्क्रांतीत जसे विकसित झाले त्या शरीराला सुखकर आयुष्य मिळण्यासाठी, जी बुद्धी विकसित झाली तिला नवी आव्हाने मिळण्यासाठी माणसातील काही असाधारण नमुने विचार आणि काम करत गेले. त्याचेच फलित आहे उपयुक्ततेचा विचार. त्यातील कोतेपणा, कुंठित विचार बाजूला पडायला हवा. पण उपयुक्तता मुळात त्याज्य आहे हा विचारच चुकीचा आहे. दुसरा मुद्दा चंगळवादाचा. चंगळ म्हणजे काय? चंगळ ही अत्यंत सापेक्ष संज्ञा आहे. जमिनीवर झोपणाराला चटई चंगळ, चटईवर झोपत आलेल्याला गोधडी चंगळ, गोधडीवरच झोपत आलेल्याला गादी चंगळ. गादी वाल्याला फोमची गादी, आणि फोमची गादी वाल्याला अनुकूलन झालेल्या हवेत अंथरलेली गादी चंगळ… हरकत नेमकी कशाला घेणार. यात चंगळवाद नेमका कुठे शिरतो? आणि चंगळवाद असला तर नेमका कुठे मानवजातीला धोकादायक ठरतो?

सुखसुविधांची शिडी चढती ठेवल्यामुळे मानवजातीचे अधिक नुकसान होईल की दुसऱ्या कशाने होईल हे पाहाणे मनोज्ञ ठरेल.

सारासार विचार बाजूला ठेवून, मतांचे औदार्य बाजूला ठेवून एकाच विशिष्ट विचारधारेवर कडवट श्रद्धा ठेवणाऱ्यांच्या ‘अमुक’वादांमुळे सर्वाधिक नुकसान, जिवितवित्तहानी, दुःखांचे पर्वत कोसळणे, क्रौर्याची परिसीमा होणे हे घडत आले आहे हे इतिहासाने सिद्ध करून ठेवले आहे.

एखाद्या तत्वाभोवती बांधलेल्या विचारधारेभोवती कडवट होत जाणारी अगदी सामाजिक न्यायासाठी लढणारी माणसेही असह्य एकारलेली होत जातात. तो जो काही अपेक्षित न्याय आहे तो मिळेपर्यंत किती मनांवर अत्याचार होतात गणती नाही.

एखाद्या महात्म्याभोवती, संताभोवती किंवा गुरुजीभोवती बांधलेल्या विचारांच्या उपपंथांत व्यक्ती एकारल्या होतातच, शिवायनिष्ठावंतांच्या झुंडीही अविचारी होऊ शकतात. एक स्थानिक देवच तयार केला जातो. गांधीवादी, आंबेडकरवादी, सावरकरवादी, गोळवलकरवादी असे सारेच त्या त्या केंद्रभूत व्यक्तीच्या विचारांना तर्ककसोटीवर घासून पाहायला कदापि तयार होत नसतात. आयुष्यभर त्या व्यक्तींच्या सद्मूल्यांवर जगतात आणि त्यांच्या चुकांनाही चौथऱ्यावर बसवतात. विचारधारांच्या निष्ठा हा काही आदर्शवत् गुण नाही. त्या विचारधारांतील मूल्ये सतत तपासून पाहाता येण्यासारखी असावीत. वाहून घेणे नकोच.

प्रत्येकाने आपल्या आयुष्याच्या उपयुक्ततेचा विचार करावा, बुद्धीविकासासाठी काय उपयुक्त याचा विचार करावा. सुखे मिळवून समाधानाने जगण्याचा प्रयत्न करावा. सोपं नसतं तेही.

खांद्यावर कडक कांजी केलेल्या निष्ठांचा झेंडा ठेवण्यापेक्षा झेंडे खांद्यावर न घेता स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने विचार फुलवत जगणं अधिक आव्हानात्मक आहे. कठीण पण अधिक तृप्ती देणारं आहे, असा माझा विश्वास आहे.

 

(लेखिका विवेकी व स्वतंत्र विचारवंत आहेत)

[email protected]

Previous articleगो लाईव्ह : कृती, प्रकृती ते विकृती
Next articleहिंसेला भेटलेली सत्यभामा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.