घर बघतच जगन रेप करतो!

संजय आवटे

‘जगन रेप कर’ असं जगनला कोणी सांगत नाही, हे खरं.

पण, ‘तुला काय अक्कलय! गप्प बस’ असं बाप आईला चार-चौघात म्हणतो, तेव्हा आठवीतल्या जगनला कळतं की बाईला काही सन्मान वगैरे नसतो.

बहिणीला ‘बघायला’ पाहुणे येतात. तेव्हा तिला शोरुमसारखं पाटावर बसवलं जातं. पाय दाखव. चालून दाखव, वगैरे सुरू असतं, तेव्हा जगनला कळतं की गाडी वा टीव्ही विकत घेणं आणि लग्नासाठी बायको घेणं (आणि, इथं पैसे आपल्यालाच मिळतात!) यात काही फरक नाही.

मैत्रिणींच्या गराड्यात रमलेल्या मावशीचा एकदा पदर पडतो आणि जगनलाही काहीतरी दिसू लागतं. मग, सहावीत असलेला जगनचा मावसभाऊ म्हणतो, ‘आई, पदर नीट घे.’ तेव्हा, मावशीच्या सगळ्या मैत्रिणी त्याचं कौतुक करायला लागतात. ‘पोरगं मोठं झालं बघ’, असं मावशीला सांगू लागतात. तेव्हा आपला मोठेपणीचा ‘रोल’ जगनच्या लक्षात येतो.

शाळेतल्या बाई चांगल्या शिकवतात, असं तो आईला सांगतो, तेव्हा आई म्हणते, ‘नटवी मेली! दंड मोकळे ठेवते. बेंबीखाली साडी नेसते. ती रे कसली चांगली?’ तेव्हा, बाई म्हणजे शरीर हे जगनच्या लक्षात येतं.

मग तोही रस्त्यावरच्या पोरींचं हेच बघत बसतो.

वर्गातल्या बाई असोत की त्याला तपासणा-या डॉक्टर, त्याला हे आधी दिसतं. मग कळतं की हे ‘शरीर’ शिक्षिका आहे किंवा डॉक्टर!

मूल होत नाही म्हणून त्याच्या मावशीला काकानं सोडल्यावर, ‘हीच कमनशिबी’ असं आजी म्हणते, तेव्हा ‘बायको म्हणजे पोरं जन्माला घालायची मशिन’ हे जगनला समजत जातं.

एके दिवशी शेजारच्या मालतीकाकू रात्री कोणाच्या तरी बाइकवर घरी येतात, त्यावर आई आणि इतर बायका करत असलेलं गॉसिप जगन ऐकत असतो. बाई पुरुषाच्या जवळ आली म्हणजे तसलंच काहीतरी घडतं, हे तर जगनला समजतंच, पण त्यात चूक फक्त बाईची असते. पुरुष तर मजा मारत असतात. हेही जगनला समजून चुकतं.

जगनला पहिल्यांदा हस्तमैथुन करावं वाटतं. आणि, आपण चूक केलं का बरोबर, हेही त्याला माहीत नसतं. पण, ते विचारायलाही कोणी नसतं. त्यामुळं अशा गोष्टी लपूनछपूनच करायच्या असतात, याची त्याला खात्री पटते.

एकदा रात्री बहीण उशिरा येते. जगन नेहमीच त्याहून उशिरा घरी येत असतो. बहिणीला आई बडवते आणि म्हणते, ‘बाई म्हणजे काचेचं भांडं. पुरुषाला काय, तो काहीही करेल!’ तेव्हा, जगनला समजतंः बाईनं आपलं चारित्र्य जपायचं असतं आणि पुरुषानं पौरुष सिद्ध करायचं असतं.

आज तीन *** मारले. बायको घायल. नको, नको असं ती किंचाळतेय. मी थोडाच गप्प बसतोय’, असं नुकतंच लग्न झालेला त्याचा दादा मित्रांच्या कोंडाळ्यात सांगत असतो, तेव्हा पौरुष म्हणजे काय, हे जगनला समजतं.

काकू शेजारणीला सांगत असते, ‘ती प्रिया उगीच नाही झाली मेंबर. अण्णांपुढं असं दहादा पदर पाडल्यावर मग ते काय सोडतील का तिला? मग पुरेपूर किंमत वसूल केली तिनं. अण्णांना पाहिजे, ते त्यांनी मिळवलं. आपण नाही बाई असलं काही करणार. नाहीतर मीच झाले असते मेंबर!’ मग जगनला हा ‘व्यवहार’ समजतो.

गणेशोत्सवाच्या रांगेत किती पोरी दाबल्या, यावर गल्लीत पोरांची चर्चा सुरू असते, तेव्हा जगनचे हात सळसळू लागतात.

***

कधीतरी कळतं, जगननं कोणावर तरी बलात्कार केलाय.
जगनला ‘रेपिस्ट’ कोणी केलं?
फासावर द्यायचं कोणाला?

जगनला द्यायचंच, पण या घराचं काय करायचं!

(लेखक ‘दिव्य मराठी’ चे राज्य संपादक आहेत)

+91 98812 56009

Previous articleबाबासाहेबांची अफाट दूरदृष्टी
Next articleमाणसांच्या मनातलं अरण्य वाढायला लागलंय.
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here